जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध १

Submitted by आशुचँप on 29 February, 2016 - 10:07

प्रसंग १

आज २६ जानेवारी...प्रजासत्ताक दिन आणि आम्ही नुकतेच जम्मुतल्या प्रसिद्ध रघुनाथ मंदीरापासून फ्लॅग ऑफ करून निघालोय....इतक्या पहाटे थंडीचा कडाका चांगलाच आहे...तापमान शून्याच्या जरी खाली नसले तरी फारसे वरही नाही...कालच ०.५ अंश होते आणि आजही त्याच आसपास असावे....एकदम धुक्याने बरबटलेली सकाळ....दिवस उजाडलाय हे केवळ प्रकाशात वस्तू आणि माणसे दिसतायत म्हणून...भास्कररावांचे दर्शन काय आज होईल असे वाटत नाही....कारण कालही नीटसे झालेलेच नव्हते...दिवसभर असाच थंडीचा कडाका आणि ढगाळ हवामान...

नखशिखांत गरम कपड्याने लपेटलोय....कानटोपी, नेक वार्मर, थर्मल्स, जर्सी, जर्कीन, फुल ट्रेकपँट, वुलन ग्लोव्ज आणि सॉक्स असा सगळा जामजिमा...त्यामुळे चालवताना जरी गरम होत असले की थांबल्यावर थिजायला होणार हे माहीती त्यामुळे गपगुमान मान खाली घालून पॅडल मारतोय....आज पहिलाच दिवस त्यामुळे अजून शरीर सायकलींगला सरावले नाहीये पण अजून ताजातवाना आहे त्याची गंमतही अनुभवतोय..थंडीमुळे नाक सुरसुर करतय पण नाकावरून वार्मर काढला की शेंडा झोंबतोय आणि श्वास घेताना फ्रीजरमध्ये बसल्याचा अनुभव...पाणीपण फ्रिजमधलेच थडगार...काहीतरी गरमागरम घशाखाली ओतले तर बरे वाटेल अशी भावना...पण चहा पिऊन पिऊन तरी किती पिणार....

प्रसंग २

राजस्थानातली टळटळीत दुपार....सकाळपासून ४०-५० किमी अंतर कापून आलोय आणि अजून किमान एक १०० किमी जाणे बाकी आहे.....अंतर खूप जास्त असल्याची जाणीव होतीये....जम्मुमध्ये हवाहवासा वाटणारा सूर्य आता तळपून तळपून जीव नकोसा करतोय....उन्हाची प्रखरता एवढी की गॉगलमध्येही डोळे दुखल्यासारखे वाटतायत....बरं आजूबाजूला औषधालाही सावली नाही....सुदैवाने आम्ही वाळवंटाच्या बरेच लांबून चाललोय त्यामुळे त्याचा त्रास नसला तर सगळीकडे नुसता रखरखाट....विस्तिर्ण माळरान, त्यावर पसरलेली खुरटी झुडपे, गेल्या कित्येक तासापासून हेच चित्र बघतोय...त्यामुळे खरोखर पुढे सरकतोय का नुसती सायकल चालल्याचा भास होतोय आणि आहोत तिथेच आहोत हे ही आता कळेनासे झालेय....मेंदू शिणून गेलाय किंवा उन्हाने त्याच्या काही वायरी जळून गेल्यात बहुदा....समोरून एखादी उंटगाडी सावकाश चाललीये....मालक झोपेत असल्यासारखा नुसताच बसून आहे...आमच्याकडे कटाक्ष टाकलाय न टाकलाय म्हणेपर्यंत आम्ही त्याला ओलांडून पुढे गेलोय....

वाराही विरोधात जातोय....झुळुक आली तर बरे वाटते पण समोरून आली तर आधीच रुटुखुटू चाललेला प्रवास अजून मंदावतोय...आधी थंडीनी आणि आता उन्हानी...त्वचा उघडी टाकायला साफ मनाई....नाकात उष्ण झोत आणि बारकी रेती त्यामुळे नाक पुन्हा बंद...घसाही कोरडा पडतोय सारखा....काहीतरी थंडगार घशाखाली ओतले तर बरे वाटेल अशी भावना...पण पाणी पिऊन पिऊन तरी किती पिणार.....


प्रसंग ३

गुजराथ....दिवसातली कुठलीही वेळ तितकीच त्रासदायक...पण सकाळी १० ते ४ सगळ्यात वाईट....उन्हाचा तडाखा आहेच पण जोडीला प्रचंड दमट हवा आणि सातत्याने घामाचा शॉवरबाथ....घाम डोळ्यात जाऊन डोळे चुरचुर करतायत... नॅशनल हायवेला रस्ता मस्त आहे...वेग चांगला मिळतोय....झपाट्याने किमी पार करतोय आणि पण आडोसा नाही.. थांबून काही बघावे फोटो काढावे असेही काही नाही...एखादे झाड बघून थांबावे तर कित्येक किमी गेलो तरी थांबुन सावली घ्यावी असे काही नाही....त्यातून मुबलक प्रमाणात फ्लायऔव्हर.... आत्ता तरी त्याचाच फायदा घेत चाललोय....फ्लायओव्हर टाळून खालून गेलो की चढ चढावा लागत नाही आणि अर्धा मिनिट का होईना सावली मिळतीये....त्या फुफाट्यातून मिळणारी एक छोटीशी झुळुक.....अजून मुक्कामाचे ठिकाण लई लांब आहे....

एसी बसेस आणि गाड्यांमधुन जाणारे धनिक आमच्याकडे अतीव नजरेने बघत आहेत.....असल्या उन्हात असले वजन घेऊन सायकल चालवणाऱ्यांचे कौतुक करावे का कीव करावी यात विचार करत असलेले....जेवण खाण्यावरची वासना उडाल्यासारखे......काहीतरी पौष्टीक घ्यावे पण ते फाफडा नको ना फरसाण नको.....काहीतरी थंडगार घशाखाली ओतले तर बरे वाटेल अशी भावना...पण ताक पिऊन पिऊन तरी किती पिणार.....

मार्गी मोड ऑफ....

खरेतर मी ज्यावेळी मार्गीचा लडाखचा धागा वाचला त्याचवेळी त्याच्या शैलीच्या प्रेमात पडलो होतो आणि त्याचवेळी ठरवून टाकले की आपला पुढचा सायकल लेख त्याच शैलीत लिहायचा....पण म्हणतात ना जेणू काम तेणू थाय....नाही जमले बाबा....त्यामुळे एक असेच काही टीजर टाईप काही रखडले आणि दिले....असो...

पण वरच्या पॅरावरून अंदाज येईल की साधारण या सायकल मोहीमेचे स्वरूप काय होते ते. पुणे कन्याकुमारी झाल्यानंतर बरोबर वर्षाने केलेल्या या मोहीमेत बरेच काही बदलले होते. सायकल नविन होती, काही सहकारी नवीन होते, रस्ते, प्रदेश, वातावरण सगळेच काही वेगळे होते आणि जास्त आव्हानात्मक होते. थोडक्यात सांगायचे तर कन्याकुमारीचा १५६५ किमी अंतराचा प्रवास एक लीजर राईड म्हणता येईल इतपत आव्हान या २२०० किमी अंतराने दिले. कडाक्याच्या थंडीपासून, पंजाबमधली मोहरीची शेती, लुसलूशीत पराठे, ताजे पनीर, राजस्थानातला उन्हाचा कडाका, चवीष्ट दाल बाटी, अरवली पर्वत रांग, गुजरातमधले रस्ते, कालवे, उंधीयो आणि ऊबाडीयो, मुंबईचे स्वागत, कस लावणारा बोर घाट, आणि हो पुण्यातले ट्रॅफिकही....सगळे काही अनुभवले, सोसले आणि एका अदि्वतीय म्हणता येईल अशा अनुभवाचे धनी झालो....

आज जेव्हा हे लिहायला बसलो तेव्हा विचार करता खरे वाटत नाही की सर्व घडून गेले आहे म्हणून. मी खरेच इतके अंतर सायकलवर पार करून आलोय. आणि मोहीमेचा शीण गेला न गेला तोवर नव्या मोहीमेची मार्ग आखणी सुरु झालीये.

I am just hooked into it

आता थोडक्यात मोहीमेबदद्ल माहीती

सध्या वाढत चाललेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे व शांतता नांदावी अशा सदिच्छा घेऊन राईड फॉर पीस - अशा बॅनरखाली आम्ही भारतातील बरीचश्या राज्यांना सायकलने भेट देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.

गेल्या वर्षी पुणे ते कन्याकुमारी असा १३ दिवसांत केलल्या तब्बल १५६५ किमी च्या प्रवासानंतर यंदा आम्ही जम्मू ते पुणे असे २,२०० किमी चे अंतर १७ दिवसांमध्ये पार केले आहे.

(खुलासा - इथून सायकली कार्गोने जम्मुला पाठवल्या, आम्ही विमानाने जम्मूला गेलो, सायकली ताब्यात घेतल्या आणि चालवत पुण्याला आलो...कन्याकुमारीला बरोबर उलटे केले होते. यंदा तसे केले नाही कारण तिथून कार्गोने पाठवणे फार व्यापाचे होते, आणि घरी सायकल चालवत येण्यातला आनंद त्यात नाही)

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून मोहीमेने जम्मू येथून प्रस्थान केले व पंजाब, राजस्थान, गुजरात अशा राज्यांतून प्रवास करत ११ फेब्रुवारी रोजी पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग गणपती मंदिरापाशी मोहीमेची सांगता झाली. जम्मू, पठाणकोट, अमृतसर, श्री मुक्तसर साहीब, हनुमानगड, सरदारसहर, डिडवाना, अजमेर, भिलवारा, नाथद्वारा, खेरवारा, मोडासा, वडोदरा, अंकलेश्वर, वलसाड, वसई आणि खोपोली असा मोहीमेचा मार्ग होता.
या प्रवासादरम्यान, आम्ही भारतीय जवानांशी संवाद साधलाच, खेरीज शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याचे फायदे समजाऊन सांगितले. आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमारेषेचे संरक्षण करत आहेत, म्हणूनच आपण शांततेचा प्रसार करू शकत आहोत, ही भावना त्यांच्यापर्यंत पोचावी आणि तमाम भारतीयांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही मोहीम काढण्यात आली होती.
आनंद घाटपांडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोहीमेत वेदांग शेवडे, अद्वेैत जोशी, ओंकार ब्रह्मे, सुह्द घाटपांडे, हेमंत पोखरणकर (माबो आयडी हेम) आणि आशिष फडणीस सहभागी झाले होते.
नंदू आपटे, उमेश पवार, अतुल अतीतकर आणि शिरीष देशपांडे हे वडोदरापासून आम्हीला सामील झाले.

=====================================================================================

http://www.maayboli.com/node/57861 - पूर्वार्ध २

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिका सुरू !!! जबरी !!!! (अजून हा भाग वाचलाच नाहीये पण सुरुवात झालेली बघूनच भारी वाटतय!!)
पटपट लिही रे.. Happy

पहिले टीजर टाईप लिखाण छानच..... मोहिम किती अवघड होती ते थोडक्यात पण प्रभावीपणे सांगणारे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

भन्नाट. . . . . . .

माझ्या वर्णनाच्या आठवणीबद्दल धन्यवाद! Happy Happy

पुढच्या भागांच्या प्रचंड प्रतीक्षेत!!!!

भन्नाट. . . . . . .

माझ्या वर्णनाच्या आठवणीबद्दल धन्यवाद! Happy Happy

पुढच्या भागांच्या प्रचंड प्रतीक्षेत!!!!

पहिले तुमचे आणि तुमच्या उत्साही ग्रुप चे अभिनंदन!!!!

तुमचा उद्देश फारच स्त्युत्य आहे. सगळ्या मोहिमां साठी शुभेच्छा!!!

लेख माला लिहिणे हे पेशंस चे काम आहे. लिहिण्याची स्टाईल झक्कास!!!

धन्यवाद सर्वांना....

अजून हा भाग वाचलाच नाहीये पण सुरुवात झालेली बघूनच भारी वाटतय!!

Biggrin Biggrin

मार्गी - तुला दंडवत आहे रे बाबा. कसले झ्याक लिहीतोस...वाटते तेवढे सोप्पे नाहीये तसे लिहीणे...मनातल्या मनातला संवाद

वा आशु.... झक्कास लिहिलं आहेस. आणि 'मार्गी मोड' आवडला. > +१

लिखते रहो... चलाते रहो Happy

वा आशु.... झक्कास लिहिलं आहेस. आणि 'मार्गी मोड' आवडला. > +१

लिखते रहो... चलाते रहो स्मित >>> + १

प्रचंड मोठा दंडवत!!!

_________________/\___________________

अशी माणसे आहात राव तुम्ही काय बोलावे आता! निग्रहाने वाचणे टाळत होतो, म्हणले रोज एक सैंडविच खाण्यापेक्षा एकदम बुफे स्प्रेड चट्टामट्टा करावा, पण आम्ही पडलो तुमच्या शब्दांचे भुक्कड़!! ताज्या डोश्याचा तव्यावर चर्र आवाज येऊन ऑफिस ला जाणारी गाड़ी वैशाली समोर शिस्तीत पार्क करावी तसे वाचते झालोय आम्ही! और आणदेओ और जल्दी आणदेओ!!

बाकी, तुम्ही करत असलेले अकरा नंबर गाड़ी (पक्षी टंगड्या) चे व्यायाम जाणून घ्यायला आवड़तील

-(आधाशी) बाप्या

ताज्या डोश्याचा तव्यावर चर्र आवाज येऊन ऑफिस ला जाणारी गाड़ी वैशाली समोर शिस्तीत पार्क करावी तसे वाचते झालोय आम्ही!

हा हा हा हा, लई भारी बापू...कसली सॉलीड उपमा (व्याकरणातील हो....वैशालीकडचा नव्हे) दिलीये.

बाकी, तुम्ही करत असलेले अकरा नंबर गाड़ी (पक्षी टंगड्या) चे व्यायाम जाणून घ्यायला आवड़तील

व्यायाम असे फार काही करत नव्हतो.

जिममध्ये स्व्काट्स, लेग कर्ल, हॅमस्ट्रींग कर्ल, काल्फ्स हे ठरलेले व्यायाम.
लंजेंसनी बराच फरक पडतो. पण नित्यनेमानी केले तरच.
बाकी पळणे, शक्यतो लिफ्ट न वापरता पळत जिना चढणे आणि घरी बैठका किंवा सपाट्या.

अर्थात ही थिअरी बरं का..मी यातला ५० टक्केच अभ्यास केलाय. :प

स्क्वाटस्, लंजेसचा मला वैयक्तिक जाम कंटाळा येतो पण लेगकर्ल्स आवडता प्रकार. रनिंगचा मात्र मला या मोहीमेसाठी फार फायदा झाला.

लै भारी लिहिलंय ... Happy

या प्रवासादरम्यान, आम्ही भारतीय जवानांशी संवाद साधलाच, खेरीज शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याचे फायदे समजाऊन सांगितले. आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमारेषेचे संरक्षण करत आहेत, म्हणूनच आपण शांततेचा प्रसार करू शकत आहोत, ही भावना त्यांच्यापर्यंत पोचावी आणि तमाम भारतीयांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही मोहीम काढण्यात आली होती. >>>>>> वाह, सरजी... सलाम..

गेल्याच आठवड्यात शनिवारी पुणे ते कन्याकुमारी लेखमालेचे सगळेच्या सगळे भाग एका दिवसात वाचून काढले. जसं एखादं पुस्तक हाती घेतल्यानंतर ते पूर्ण वाचल्याशिवाय चैन पडत नाही, अगदी तसं झालं होतं. वर्णन वाचून पदोपदी आम्ही तुमच्याबरोबरच प्रवास करत आहोत, असा भास होत होता. पुढच्या वेळी काय अचाट साहस करणार, असे वाटत असतानाच जम्मू ते पुणे सायकलप्रवास हा धागा आला. टिझर वाचूनच संपूर्ण ट्रीपमध्ये तुमच्या शरीराने काय सहन केले असेल, याची कल्पना आली. तुमच्या या अद्वितीय साहसाला सलाम..सलाम..सलाम..

आशुचँप, सर्वप्रथम तुमच्या जिद्दीला सलाम! "वाचण्यासाठी " म्हणून नोंद करून ठेवली होती. आज सुरवात केली आहे. नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलय! (आता मार्गींचेही लेखन वाचणे आले :))