शब्दपुष्पांजली : मी पायी केलेली भटकंती

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 February, 2016 - 07:01

एखाद्या गावात आपण लोकांशी संवाद साधत त्यांना काहीतरी शिकवायला म्हणून जावे आणि त्या गावातील रहिवाशांची, त्या गावाची प्रत्यक्ष ओळख झाल्यावर त्यांच्याकडूनच काहीतरी अनमोल असे सोबत घेऊन यावे.... पुण्याजवळील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी या आदर्श ग्राम पुरस्कार मिळालेल्या गावाच्या भेटीत आणि गावातून केलेल्या भ्रमंतीत मी असाच काहीसा अनुभव घेतला.

एका गणेशोत्सवाअगोदर गावडेवाडीहून पुण्यात शिकायला आलेल्या काही युवकांचा मला फोन आला. गावातील गणेशोत्सवासाठी मी कार्यक्रम सादर करावा अशी त्यांची आग्रहाची विनंती होती. याअगोदर त्या गावाच्या जवळपासच्या भागांत मी कार्यक्रमांसाठी गेले असल्यामुळे तेथील लोकांची साधारण माहिती होती. गावडेवाडीतील काही मुलामुलींना त्यापूर्वी मी भेटलेही होते. आपल्या गावाबद्दल त्यांना वाटणारी कळकळ, आत्मीयता आणि नवीन काहीतरी करून दाखवायची त्यांची जिद्द मला खूप आवडली होती. आताही मला फोन करणारा एक मुलगा इंजिनियरिंगचा डिप्लोमा कोर्स करत होता, एकजण फार्मसी कॉलेजात शिकत होता तर एक मुलगी नर्सिंगचा कोर्स करत होती. ''ताई, तुम्ही आमच्या गावाला आलंच पाहिजे! जरा बघा तरी कसं आहे आमचं गाव!'' मुलांचा प्रेमळ आग्रह मला मोडवेना. कार्यक्रमाचे बहुतेक सगळे संयोजक होतकरू, आर्थिक परिस्थिती बेतास बात असणारे होते. या मुलांना कार्यक्रमाचा खर्च, आयोजनासाठी लागणारा निधी कसा काय परवडणार असा विचार मनात येत असतानाही मी त्यांना होकार देऊन टाकला.

कार्यक्रमाचे दिवशी दुपारी मी ठरविलेल्या ठिकाणी येऊन थांबले. एका जुनाट पांढर्‍या अँबॅसेडर गाडीतून आम्ही गावडेवाडीच्या दिशेने निघालो. माझ्यासोबत गाडीत माझा वादक मित्र आणि गाडीचालकासह गावडेवाडीचे दोन युवक व एक युवती होते. मागच्या सीटवर आम्ही तिघे बसलो होतो. पण पुण्याच्या हद्दीबाहेर गाडी पडताच हळूहळू पुढच्या सीटवर बसलेल्यांची संख्या चार झाली. मुलांच्या गप्पांमधून समजले की गावातील बरेचसे तरुण तरुणी पुण्यात व जवळपासच्या गावांत शिकायला येतात. मी गाडीतल्या गर्दीने काहीशी अस्वस्थ होते. मुले मजेत होती एकदम. त्यांच्या गप्पा अखंड चालू होत्या. शहरी वातावरणाची जागा मोकळ्या माळरानांनी आणि डोंगररांगांनी घेतली तशी मुलांची कळी अजूनच खुलू लागली.

''ताई, आता आपलं गाव जवळच आलं बरं का!'' मुले मला गाडीतून आजूबाजूचा हिरवागार परिसर दाखवत होती. त्यांच्या बोलण्यावरून समजत होते की हे गाव अनेक वर्षे पाण्याच्या दुर्भिक्ष्याखाली वावरत होते. पण मग नेमके काय बदलले? कसा घडून आला बदल? माझ्या मनातले कुतूहल जागृत झाले होते.

''ताई, ती बघा जाळी... तिकडे रात्री जनावर दिसतं अनेकदा... गावातल्या दोन मुलांना फटका बसलाय...'' निबिड अरण्यागत दिसणार्‍या एका दरीच्या बाजूच्या भागाकडे मुलांनी बोट करून सांगितले. मी जरा सावरूनच बसले. गाव जवळ येत होते तशी आजूबाजूची हिरवाई आणखीच गर्द भासू लागली. हिरवीगार शेते, शेतांच्या बांधाला वार्‍याच्या तालावर डुलणारी उंच डेरेदार झाडे, दूरवर धुक्याच्या दुलईतून दिसणार्‍या डोंगररांगा, पक्षांचे आकाशात झेपावणारे थवे, मस्त प्रसन्न हवा... वातावरणातला हा जाणवणारा फरक चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा होता. परंतु मन प्रसन्न करणारा एक मोठा अनुभव अजून बाकी होता याची मला तेव्हा सुतराम कल्पनाही नव्हती.

गावाच्या वेशीतून आत प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम जाणवली ती रस्त्यांतील स्वच्छता! खरेच सांगते, वर्दळीच्या त्या रस्त्यावर एक कणही कचरा नव्हता. स्वच्छ, साफ रस्त्याच्या दुतर्फा वसलेली साधीच पण नेटकी घरे, घरांसमोर टापटिपीचे व रांगोळी तुळशी वृंदावनाने सजलेले देखणे अंगण, गावातील प्रमुख सार्वजनिक इमारतींना दिलेला रंग ताजाच वाटावा इतकी निगा, धुळीच्या रस्त्यावरही कोठेच उकिरडा नाही की ओसंडून वाहणारी दुर्गंधी कचरा पेटी नाही... माश्यांचे थर नाहीत! सगळ्यांच्या दारी कौतुकाने जतन केलेली रोपे, तोरणांनी सजलेल्या चौकटी... वेडीवाकडी उभी केलेली वाहने नाहीत की सांडपाण्याचे साचलेले ओहोळ नाहीत. आम्हांला गाव बघता यावे म्हणून वेशीतून आत शिरल्यावर आम्ही गाडीतून कधीच पायउतार झालो होतो. श्रमदानातून तयार झालेल्या रस्त्यांवरून चालताना गावातील प्रत्येक माणसाच्या मनात 'हा रस्ता बांधताना मला व माझ्या कुटुंबाला किती श्रम पडले आहेत ते मला ठाऊक आहे. हा रस्ता मी चांगलाच राखणार!' असा विचार येत नसेल तरच नवल! गावातून हिंडताना वाटेत भेटणार्‍या परिचितांशी हसून खेळून चार शब्द बोलत आमची तरुण संयोजक मंडळी मोठ्या अभिमानाने आम्हांला त्यांचा गाव दाखवत होती. दणकट बांधकामाची व गावाला पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक टाकी, प्राथमिक शाळेची इमारत व प्रांगण, सरपंचांचे कार्यालय, ध्वजवंदनासाठी राखीव ठेवलेला परिसर... निर्मल ग्राम पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार अशा गावाला मिळालेल्या विविध पुरस्कारांचे ठसठशीत अक्षरांमधील फलक लक्ष वेधून घेत होते.

जरा वाकडी वाट करून आमचे सोबती आम्हांला जवळच्याच एका आमराईतही घेऊन गेले. सकस, काळ्याशार मातीच्या उदरातून निपजलेले आम्रवृक्षांच्या रूपातील हिरवे धन खरोखर तेथील समृद्धीची साक्ष देत होते. ही समृद्धी पैशाची नव्हती तर अपार कष्ट, चिकाटी, तळमळ व विशिष्ट उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून केलेल्या सकारात्मक प्रयत्नांची होती. गावातील लोकांनी एकत्र येऊन साकारलेल्या हिरव्या स्वप्नाची साक्ष देणारे ते आम्रतरू, हिरवीगार शिवारे, सुजलाम सुफलाम् चा अखंड घोष करणारी वृक्षवल्ली.... आल्हाद देणार्‍या त्या वातावरणातून बाहेर येऊन पुन्हा गावातील भ्रमंतीकडे वळायला आम्हांला खरोखर प्रयास घ्यावे लागले.

''आमचं गाव आधीपासून असं नव्हतं, ताई!'' आम्हांला रस्त्यात भेटलेले आणि आमच्याबरोबर हिंडत आम्हांला गाव दाखवणारे एक बुजुर्ग काका सांगत होते.
''गावातली तरुण मंडळी नोकरीधंद्याच्या शोधात पुण्यामुंबईला निघून गेली होती. त्यांना तरी कसा दोष देणार? गावावर अनेक वर्षे दुष्काळाचे सावट होते. इथे कितीही कष्ट करून हाती फारसं गवसत नव्हतं. मग मुलं गेली शहराकडे तर त्यांचं तरी काय चुकलं? पण तिथंही त्यांना सुख नव्हतं. कष्टाचंच जिणं होतं. दुसरीकडे गावाची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती. तरी इलाज नव्हता.''

''पण मग नक्की काय घडलं आणि हा बदल झाला?'' माझ्याबरोबर आलेला वादक मित्र उत्कंठेने विचारत होता.

''नव्वदीच्या दशकात आमच्या गावात वनराई ट्रस्टची माणसं आली बघा. त्यांनी गावाचा, इथल्या जमिनीचा, पाण्याचा, मातीचा, हवामानाचा अभ्यास केला. आमची मीटिंग घेतली. गावाचा समग्र विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आमची जबाबदारी काय आहे हे त्यांनी आम्हांला खूप चांगलं समजावून सांगितलं. गावातले लोक हळूहळू तयार झाले. श्रमदानाने आम्ही गावाच्या पाणीपुरवठ्याची स्थिती सर्वात अगोदर सुधारली. पाझर तलाव, भूमिगत बंधारे बांधले, पावसाचं पाणी साठवायची व्यवस्था केली, जुन्या विहिरी - जलाशय साफ केले. या सगळ्यामुळे इथली पाण्याची पातळी सुधारली. पावसाचं पाणी साठवायची व्यवस्था केलीच होती. त्या पाण्याचं जास्तीत जास्त चांगलं नियोजन आणि पूरक शेतीतंत्रांचा अभ्यास करून आम्ही पैसे मिळवून देणारी पिकं घ्यायला सुरुवात केली. दुधाचा व्यवसाय सुरू केला. टोमॅटो, कांदा, भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. काहीजणांनी फुलशेतीत गुंतवणूक केली. जसजसा हातात पैसा येऊ लागला तसतशी पोटापाण्यासाठी शहरांकडे गेलेली माणसं परत गावाकडे येऊ लागली. शेती करू लागली. आम्ही वनराईच्या मदतीने खूप तर्‍हेची झाडे लावली. गांडुळशेती, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान वापरून पिकाची प्रत सुधारली. फळांच्या बागा पिकवल्या. शेतातलं धान्य, भाज्या साठवण्यासाठी काही लोकांनी कोठारं बांधली. पोल्ट्री सुरू झाली. एकातून दुसरं, दुसर्‍यातून तिसरं असं करत करत टप्प्याटप्प्याने हा विकास घडून आला बघा!''

खरेच आम्हांला आमच्या फेरफटक्यात डोक्यावर हंडे-कळश्यांची उतरंड घेऊन पाणवठ्यावर पाणी भरायला जाणार्‍या मुली-बायका कोठेच दिसल्या नव्हत्या. उकिरडे नव्हते, डुकरे नव्हती, भटकी वसावस भुंकणारी कुत्री नव्हती की दिवसाढवळ्या घोंगावणारे डासही नव्हते. सगळ्या घरांना माफक परंतु स्वच्छ दिसणारी रंगरंगोटी केली होती. शौचालयांचा दुर्गंध नव्हता. रस्त्यातून धावणारी उघडी-नागडी, शेंबडी पोरे नव्हती. कोणत्याही घरांवर किंवा सार्वजनिक भिंती, इमारतींवर प्रेमी युगुलांची नावे कोरण्यात आलेली नव्हती. दुपारच्या रणरणत्या उन्हातही गावात झुळूझुळू वारे वाहत होते, रस्त्याच्या कडेला लावलेले डेरेदार वृक्ष थंडगार सावली देत होते.

एव्हाना आम्ही गावडेवाडीतील अनेक गावड्यांपैकी एका गावडे कुटुंबाच्या घरी आलो होतो. शाळेत शिक्षक असणारे आमचे यजमान गावातील साक्षरता अभियान आणि गावडेवाडीतील मुलांची शाळाकॉलेजातील प्रगती यांबद्दल प्रसन्नतेने बोलत होते. गावातल्या शाळेत मुलांना संगणक प्रशिक्षण दिले जाते, गावात व्यवसायशिक्षण देण्याची व शेतीतील तसेच दुग्धव्यवसायातील नवनवीन तंत्रे, निगा, काळजी घेण्यास शिकवणारे शिक्षणकेंद्र आहे हे त्यांच्याकडूनच कळले. गावडेकाका तंटामुक्तीसाठी गावकर्‍यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत होते. गावकर्‍यांनी वनराईच्या सहयोगाने राबविलेल्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचा त्यांना वाटणारा अभिमान त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होता. गावातील आरोग्य सुविधा, सामूहिक पातळीवर एक गाव एक गणपतीचा निर्णय, सहकारातून साकारलेली समृद्धी अशा अनेकविध गोष्टींबद्दल त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या.

चहा-नाश्ता करून व जरा फ्रेश होऊन सायंकाळी आम्ही पुन्हा एकदा चालत चालतच कार्यक्रमस्थळी गेलो. गावातील घरांमधून बायका-मुले तयार होऊन शेजारणींना, मित्रमंडळींना गोळा करत कार्यक्रमाच्या दिशेनेच निघालेली दिसत होती. शाळेसमोरच्या पटांगणात मोठा मांडव घातला होता. रंगीबेरंगी पताका, फुलांच्या माळा आणि लुकलुकणार्‍या दिव्यांनी मांडव सजवला होता. पुढे प्रशस्त आकारातील, देखणी सुबक रांगोळी काढली होती. चार-पाच लहान मुलेमुली अभ्यागतांचे स्वागत गुलाबपाणी शिंपडून व गंध टिळा लावून करत होती. सरपंचबाईंनी आमचे खूप मनापासून व अगत्याने स्वागत केले. गावातील सर्वच मंडळी हौसेने काम करताना दिसत होती. स्वतः सरपंच बाईही जातीने लक्ष घालत होत्या. आकाशातील संध्येचे रंग पालटून जवळपासच्या मुलुखात अंधाराचे जाळे पसरू लागले तशी कार्यक्रमाची सुरुवात झाली. पेटी, तबला, ढोलक, घुंगरू, टाळ यांच्या साथीने गणरायाच्या स्तवनांत मंडळी रंगून गेली. मध्यांतरात काही हारतुरे, भाषणे झाल्यावर गावकर्‍यांनी आम्हांला आश्चर्याचा धक्काच दिला. गावच्या ज्या दोन तरुणांना बिबट्याच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागले होते ते जायबंदी तरुणही आज श्रोतेमंडळींमध्ये उपस्थित होते. त्यातील एकजण कुबड्यांच्या मदतीने कसाबसा खुरडत चालत होता तर दुसर्‍याला त्याच्या मित्रांनी खाटेवर झोपवून तसेच कार्यक्रमाचे ठिकाणी आणले होते! सरपंचबाईंनी गावातील ज्येष्ठ व मान्यवरांच्या हस्ते या मुलांसाठी गावातील लोकांनी वर्गणी काढून घेतलेल्या व्हीलचेअर्स त्या मुलांना सन्मानपूर्वक बहाल केल्या व त्यांना लवकर बरे वाटू देत अशी प्रार्थनाही केली. आता मला या मुलांचे कार्यक्रमासाठीचे बजेट एवढे काटकसरीचे का होते, हे उमगू लागले होते!

कार्यक्रमाची सांगता गणपतीबाप्पाच्या आरत्यांनी जोषातच झाली. कार्यक्रमानंतर भेटायला थांबलेल्यांशी चार शब्द बोलत बोलत कार्यक्रमस्थळावरून निघायलाच आम्हांला तास झाला. परतीच्या वाटेवर गावातले रस्ते साफसूफ करून तिथेच दुतर्फा गावजेवणाची अतिशय शिस्तबद्ध पंगत बसलेली दिसली. कसलीही घाई, गडबड, गोंधळ नाही, हमरीतुमरी नाही. लोक शांतपणे पत्रावळींवर वाढलेल्या भात, मटकी, पुरी व गोड बुंदीच्या जेवणाचा आस्वाद घेत होते. कोणीतरी रेडियो लावला होता त्यावरची गाणी ऐकत, गप्पा मारत जेवण चालू होते.

आम्हांला घरी परत निघायला तरी रात्रीचे अकरा वाजलेच! यजमानांनी प्रेमाने व आग्रहाने जेवायला घातले होते त्यामुळे डोळ्यांवर तृप्तीची साय तरंगत होती. ''ताई, आवडलं ना आमचं गाव तुम्हांला? परत या हं नक्की!'' म्हणत प्रेमाने निरोप देणारी बायामाणसे, लहान मुले आणि गावातली तरुण मंडळी. या मुलांच्या चेहर्‍यावरचे कार्यपूर्तीचे समाधानी भाव निरखतच मी गावकर्‍यांचा निरोप घेतला. सोबत पुण्याला परत चाललेली गावची विद्यार्थी मंडळी आमच्या गाडीत दाटीवाटीने बसली होती. पण मला आता त्या गर्दीचा अजिबात त्रास होत नव्हता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मस्तच !

गावडेवाडीला मी पण जाऊन आलोय.

२००८-०९ मधे कॉलेजात असताना वनराई बरोबरच श्रमदानासाठी गेलो होतो. 'पाणी अडवा पाणी जिरवा' कार्यक्रमाचा भाग म्हणून डोंगर उतारावरच्या ओहोळात तिथलेच आजूबाजूचे दगड गोळा करून ठिकठिकाणी बांध घालण्याचे काम आम्ही केले होते. (म्हणजे आमच्या कडून २-३ ठिकाणीच होऊ शकले)

मस्त गाव आहे.

या गावाची स्वतःची एक वेबसाईटही होती.

छानच लिहिलंय.. एखाद्या गावात हे सगळे घडणे म्हणजे काही चमत्कार किंवा जादू टोणा नाही.. मग सर्व देशात का घडू नये ??

अकु,खूप सुंदर लिहिलंयस, तितकाच सुंदर अनुभव!! छान वाटत आहे वाचताना..

तू पण किती गुणाचीयेस गा.. Happy

अकु, खूप सुंदर अनुभव, छान सुटसुटीतपणे मांडला आहे.
हे गाव खरंच बघितलं पाहिजे असं वाटायला लागलं तुझा लेख वाचून..

छानच लिहिलंय.. एखाद्या गावात हे सगळे घडणे म्हणजे काही चमत्कार किंवा जादू टोणा नाही.. मग सर्व देशात का घडू नये ?? >> +१

सुंदर !
गावच्या आठवणी चळल्या ! गावडेवाडी म्हटल्यावर पु ल आठवले सुरवातीला "वाऱ्यावरची वरात " मधले .

छानच लिहिलंय.. एखाद्या गावात हे सगळे घडणे म्हणजे काही चमत्कार किंवा जादू टोणा नाही.. मग सर्व देशात का घडू नये ?? >>>> +9999

लेखनशैली सुरेखच.....