कदाचित

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 07:13

कदाचित

लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित,

मी माळलेला जाईचा गजरा
घेऊन गेलास तू, 'त्या' दिवशीचा,
करंडक म्हणून, पण त्याला
रातराणीचा गंध येत होता.

लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित,

डोंगरमाथ्यावर चिंब गवतांतून
अनवाणी पायांनी आपण भटकलो,
तळव्यांवर रेंगाळलेल्या हिरवाईला
गुलाबी छटेचं अस्फुट अस्तर होतं.

लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित,

निरोप अखेरचा घेऊन तडक निघालास,
वळणावर थबकून थोडं,मागे पाहिलंस,
कोपर्‍यावरच्या स्थितप्रज्ञ अमलतासाचं
एक फूल हताश, हलकेच गळलं होतं.

बापू

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/110399.html?1149688057
या कवितेवर सुप्रसिद्ध कवि आणि गीतकार वैभव जोशी यांनी दिलेली प्रतिक्रिया..
बापू ....

लक्षात आलं नसेल तुमच्या कदाचित ....

लिहून गेला आहात तुम्ही लिहीता लिहीता
किती सहजरित्या एक नितांत सुंदर कविता
जणू आरंभापासून पूर्ततेपर्यंत
फक्त एक क्षण सरला होता

लक्षात आलं नसेल तुमच्या कदाचित ....

तो एक क्षण कित्येक दिवस पुरेल आता
पुन्हा पुन्हा वाचूनही थोडंसं उरेल आता
अन अश्याच आणखी काही क्षणांसाठी
मन क्षणोक्षणी झुरेल आता

लक्षात आलं नसेल तुमच्या कदाचित ....

ही एका खुल्या दिलाची दुसर्‍याला दाद आहे
भावनेने भावनेला दिलेला प्रतिसाद आहे
कवितेत माणूस शोधतो मी अजुनी
माणसे वाचण्याचा खुळा नाद आहे

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/110475.html?1149765618

वैभव,
ही काय प्रतिक्रिया की प्रिती-क्रिया?
(पुन्हा) कदाचित
(हा सलाम वैभवला)
----------------------

कदाचित,
माणसांच्या अनोळखी भाउगर्दीत
आपल्याच घराचा पत्ता चुकत असेल.

कदाचित,
व्यवहारांच्या निबिड-दाट कोलाहलात
स्वरांची एकेक शलाका झाकोळत असेल.

कदाचित,
शब्दांचा निसटता हात घट्ट पकडून
म्हणूनच, आपण आपल्याला चाचपायचे.

बापू.
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/110578.html?1149932737

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users