सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

Submitted by मार्गी on 26 February, 2016 - 03:14

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

औंढा नागनाथकडे चौथे शतक

ऑगस्ट २०१४ च्या पहिल्या आठवड्यात नवीन सायकलीने राईडस सुरू केल्या. पहिल्यांदा एक ३८ किलोमीटरची राईड थोड्या खराब रस्त्यावर केली (परभणी- मांडाखळी- मानवत). पहिल्या तासात सोळा किलोमीटर गेल्यानंतर वेग एकदम कमी झाला. अजून शरीराला ह्या सायकलीची सवय झाली नाहीय तर. दुसरी राईड झिरो फाट्यालाच केली. ह्या वेळी तर पहिल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागला. पहिल्या तासातला वेग आणि दुस-या तासातला वेग ह्यामध्ये मोठा फरक येतो आहे.

आता एक मोठी राईड करायची‌ इच्छा आहे. अर्थात् ह्या सायकलीवर मोठी राईड अगदी सहज होणार नाही. त्यामुळे फक्त शंभर किलोमीटरची‌ योजना बनवली. घरापासून औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग. १०२ किलोमीटर होतील. नवीन सायकलीचा चांगला सरावही होईल आणि तंत्रही नीट जमेल. १२ ऑगस्टला सकाळी सहा वाजता निघालो. पावसाळा असूनही पावसाचा टिपूस नाहीय, फक्त लपंडाव सुरू आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सायकलवर फिरण्याची मजा! आज तिस-या गेअरवर सायकल चालवणार नाही. शक्यतो २-५ व २-६ मध्येच चालवेन. परभणीचे काही सायकलिस्टही झिरो फाटापर्यंत सोबत आहेत. एका तासात इथे पोहचलो. इथून पुढे रस्त्याची गुणवत्ता बदलेल आणि आता सोलो राईड सुरू होईल.

नॅशनल हायवे सोडल्यानंतर रस्ता सामसुम झाला. अगदी शांत रस्ता आणि सायकल चालवताना लागणारा हलका वारा! सायकल राईडमध्ये सगळ्यात जास्त मजा दुस-या तासापासून चौथ्या तासापर्यंत येते. शरीर आणि मन ताजेतवाने असतात. सहज पुढे जात राहिलो. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, पण सायकल सहजपणे जाऊ शकते. मध्ये मध्ये छोटे गांव आहेत, पण नाश्ता बरोबर मिळत नाहीय. आजचं उद्दिष्ट फक्त ५१ किलोमीटरचं असल्यामुळे ते अजिबात लांब नाही वाटलं. लवकरच औंढ्याजवळचे डोंगर दिसायला लागले. बाईकवर अनेक वेळेस ह्या रस्त्याने गेलो असल्यामुळे रस्ता पूर्ण ओळखीचा आहे. नऊ वाजत असताना औंढा गावात पोहचलो. मंदीर अनेक वेळेस बघितलं असल्यामुळे तिकडे जाणार नाही. इथे थोड्या टेकड्या आहेत व एक तलाव आहे, तो बघेन. अर्थात् आता चांगलाच थकवा वाटतो आहे. इथेसुद्धा बरा नाश्ता मिळाला नाही.

त्या तलावाचा रस्ता सापडला नाही. एका छोट्या तळ्यावर समाधान मानावं लागलं. आता ऊन कडक पडलं आहे. लवकरच मुख्य रस्त्यावर येऊन परतीचा प्रवास सुरू केला. आता सारखं थांबावसं वाटत आहे. छोटे छोटे टारगेटस घेऊन पुढे जातोय. पुढचा ब्रेक अर्ध्या तासानंतर, पाच किलोमीटरनंतर दोन मिनिट थांबेन, असं करत पुढे निघालो.

हॉटेलमध्ये तेच तेच खाणं कंटाळवाणं झालं. चहा- बिस्कीट घ्यायची इच्छा होत नाहीय. हळु हळु पुढे जात राहिलो. जेव्हा थकवा फार जास्त झाला, तेव्हा एका जागी सावली बघून अर्था तास पडलो. थोडी ऊर्जा परत आली. आता अगदी हलक्या गेअर्सवर २-३ वर चालवतो आहे. मध्ये मध्ये लागणा-या गावांमधले लोक चकित होऊन चौकशी करत आहेत. मुलंही मध्ये मध्ये रेस लावतात. आता इतकं थकलोय की, ते मुलं सहज पुढे जात आहेत! हळु हळु झिरो फाटा जवळ येत गेलं व थोडा उत्साह येत गेला. कारण तिथून पुढचा टप्पा परभणीच्या सायकलिस्टससाठी लोकल राईड आहे. थांबत थांबत पुढे जात राहिलो. कोणत्याही राईडचा हाच टप्पा कठिण असतो. शरीर आणि मन थकून गेलेले असतात. एक एक किलोमीटर जड जातो. पण हळु हळु घर जवळ येत असल्यामुळे ऊर्जासुद्धा मिळत असते . .


पावसाळ्यात लपंडाव करणारे ढग

पहिल्या ५१ किलोमीटरसाठी ३.१५ तास लागले होते, परतीच्या ५१ किलोमीटरसाठी जवळपास साडेपाच तास लागले. नऊ तासांमध्ये १०२ किलोमीटर पूर्ण झाले! शतक पूर्ण झाल्याचा आनंद! अर्थात् इतका वेळ लागणं अपेक्षितच होतं. हळु हळु शरीर ह्या सायकलसोबत एडजस्ट होतं आहे. पुढे इतका त्रास पडणार नाही.

पुढील भाग १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान राईड... Happy
अरे यार तुम्ही इकडे परभणीपासचे लिहीता अन माझ्या बालपणीच्या नांदेड परभणीतल्या असंख्य जुन्या आठवणींनी मन हळवे, अक्षरषः कातर होऊन जाते हो.... माहित नाही मला मी परत कधी ती ती ठिकाणे बघेन तिथे जाईन...

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! Happy

@ लिंबूटिंबू जी, धन्यवाद. . . !

तुम्ही इकडे परभणीपासचे लिहीता अन माझ्या बालपणीच्या नांदेड परभणीतल्या असंख्य जुन्या आठवणींनी मन हळवे, अक्षरषः कातर होऊन जाते हो.... माहित नाही मला मी परत कधी ती ती ठिकाणे बघेन तिथे जाईन...>>. सेम पिंच. मी हिंगोलीची आहे. मन भरून आले फोटो पाहून.

वेग कमी होण्याचं कारण हेडविंडही असू शकतं. लहान मुले जी रेस लावतात त्या स्प्रिंटची मजाच काही और आहे. मस्त सुरु आहे मालिका.

अॅडमिनना विनंती. माझे सायकलिंग हा नविन विभाग तयार करावा. यासंबंधीचे लेख वाढत आहेत.