बस् एक कोपरा

Submitted by रसप on 22 February, 2016 - 07:30

विस्तीर्ण कधी होता हा रस्तासुद्धा
केव्हढी तत्वनिष्ठांची गर्दी झाली
जायचे पुढे वेगाने प्रत्येकाला
जो पडला त्याला तुडवा पायांखाली

आसमंत जयजयकारांनी दुमदुमतो
आरोळ्या, हाळ्यांचाही गोंधळ चाले
उन्मत्त प्रदर्शन झेंड्यांचे, शक्तींचे
तलवारी हातांच्या, नजरांचे भाले

ही जमीन, अंबर, पाणी सगळे तुमचे
माझ्यासाठी ना येथे जागा उरली
मज माझी भाषा समजेना आताशा
शांततेत माझ्या किती वादळे विरली

हो, उगाच आलो होतो तुमच्यामध्ये
पण परत जायचाही रस्ता गजबजला
बस् एक कोपरा धरून निपचित पडणे
इतकाच तोडगा आहे आता उरला

....रसप....
२२ फेब्रुवारी २०१६
http://www.ranjeetparadkar.com/2016/02/blog-post_22.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users