एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ६

Submitted by नानाकळा on 16 February, 2016 - 08:37

पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग | चौथा भाग | पाचवा भाग

साडेबारा वाजून गेले होते. सडकून भूक लागलेली होती. सापुतार्‍याहून दमण दिड-पावणेदोनशे किमी आणि नाशिक साठ-सत्तर किमी. माझ्या जीव वर खाली व्हायला लागला. शेवटी निरंजनशेठने सुटका केली. त्याने स्पष्ट शब्दात यायचेच नाही असे रेडकराला ठणकावले.

सापुतार्‍याहून वीसेक किमीवर एक रेस्टोरंटला आम्ही थांबलो. सदाशेठला अजून उलटी झालेल्या प्रकारामुळे बरे वाटलेले नव्हते. मी वेटरला सांगून त्यांच्यासाठी ग्लासभर गरम पाणी मागवले. त्यात एक पूर्ण लिंबू पिळून त्यांना प्यायला लावले. ते पाणी प्यायल्यावर त्यांना खूपच बरे वाटायला लागले. जेवणाची ऑर्डर दिली. चिकन, वेज, राईस. सगळे आले. मी बकासुरासारखा खा खा खात सुटलो. पोट टम्म भरले. आणि मग चुकीची जाणीव झाली. एवढं जेवायला नको होतं. शरिराला झोप नाही, बराच काळ निट खाल्लेलं नाही. अशा विचित्र शारिरीक स्थितीत असे सामिष दाब्बुन खाणे टाळायला हवे होते. पण आता तासा-दिडतासात घरीच पोचणार म्हणून काळजी नव्हती. घरी जाऊन ताणून द्यायचे मस्त.

सगळ्यांची जेवणं होऊन आम्ही बाहेर पडलो. तिथे निरंजनशेठ ने तिसरा पाय काढला. रेडकरला म्हणाला मला माझ्या घरी, माझ्या गावी सोडा. रेडकरची आयडिया होती की हा इथून बस व रिक्षा-तत्सम पकडून गावी जाईल त्याच्या त्याच्या. त्याने हट्टच धरला. तशी आमची स्कॉर्पियो चकाचक डांबरी रस्त्यावरुन खाचखळग्याच्या माळरानात उतरली, आणि मी डोळे मिटून घेतले. कारण धक्क्यांनी पोटात संसंद अधिवेशन सुरु झालेलं. बैठ जाईये, आप बैठ जाईये करणार्‍या माझ्या मिरामनाचं कोण ऐकत नव्हतं. ही अशी अवस्था असते जिथे शरीर सोडायची तीव्र इच्छा होते. आंबलेलं शरीर, झोपाळू मेंदू, पुढची कार्यवाही करण्यास नकार देणारं पोट-डिपार्टमेंट. ह्याच्या कचाट्यात सापडलं की अजून काय करणार. मी गप्प डोळे मिटून झोप घेण्याचा प्रयत्न करत होतो. फक्त ३५ किमी जास्तीचे होणार होते. फक्त ३५ किमी. ह्या अतीव सुंदर खड्ड्यांतून.

कधीतरी झोप उडाली. निरंजनशेठ उतरत होता. आता मला तीव्र मळमळ जाणवायला लागली. पुढे काही अंतराने तेच लोहणेरे गाव आलं. तिथे पंढरीनाथ उतरणार होते. तिथून आम्हाला लोखंडेची वॅगन-आर परत मिळणार होती. ती घेऊन रीवर्स प्लान नुसार लोखंडेच्या घरी जाऊन माझी कार घेऊन मी पुढे सुटणार होतो. पर ऐसा हो न सका!

मोरेला फोन लावता लावता सगळे थकले गाडीतले.त्याच्या ताब्यात वॅगनार होती ना! खूप प्रयत्नांनी त्याला फोन लागला. तर साहेब कुटूंबाला घेऊन सप्तशृंगी गडाला गेले होते, काय तर गाडी होती म्हणून. लोखंडे त्याला शिव्या घालायला लागला. कारण तो कितीही झटपट आला असता तरी त्याला किमान दोन तास लागणार होते. आता सगळे भडकले. माझ्यासकट. कारण प्लानचा बोर्‍या वाजवला ना गाढवाने. वरुन निरागसपणे म्हणतो, मला वाटलं आज तुम्ही येणार नाही म्हणून.....

आम्ही लोहणेरे गावाच्या मेन चौकात गाडी उभी केली. पंढरीनाथ उतरले. मला असह्य झालं. दरवाजा उघडून मी भका भका उलटी केली. भर चौकात सगळ्या बाजारपेठेच्या बरोबर मधे. हे एवढा मोठा पोवटा, फाट फाट फाट! पोट-डिपार्टमेंट ने सगळं चिकन, तंदुरी रोट्या, राईस रीजेक्ट मारलं होतं. आजूबाजूचे दुकानदारांनी पाणी वैगरे देण्याच्या सूचना केल्या सोबत्यांना. देवा! इतकं बेक्कार वाटलं. सगळ्यांमधे न पिणारा मीच. आणि हे सगळे काय विचार करत असतील की बाप्याला लै चडल्याली दिसतंय सक्काळी सक्काळी. जौदेत. जीव हलका झाला. मन ताळ्यावर आलं. शरिराची रिअ‍ॅक्शन झाली तेच बरं!

आता सुरू झाला तो उंदरा-मांजराचा खेळ. मोरेला इकडून फोन करुन करुन कुठे आहेस, कुठे पोचायचं याच्या सूचना सुरु झाल्या, तो कधी फोन उचलायचा कधी नाही. त्याने गाडी ताब्यात दिल्याशिवाय आमच्या नाशिकला पोचण्याचं काही खरं नव्हतं. कारण स्कॉर्पियो आधीच थांबणार होती. नाशिकच्या ३५ किमी आधी. तिथून पुढे पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या भरवश्यावर वेळचे संयोजन करणे म्हणजे कंजूसाकडून गावजेवण उकळण्यासारखे होते.

आता मात्र स्कॉर्पियोतले वातावरण तापलं. जो तो मोरेला शिव्या द्यायला लागला. रेडकरने कंपनीत अशी माणसेच ठेवायला नको वैगरे सुरु केले. मला म्हणाला, "म्हणून तुम्हाला म्हणतोय साहेब, उद्यापासून या ऑफिसला. ह्या सगळ्याचे मॅनेजमेंट तुम्ही करायला घ्या. मी कुठे कुठे बघू. तुमच्यासारखा एज्युकेटेड एमएनसीत काम केलेला माणूसच ह्यांना सरळ करु शकतो. कुठे रिपोर्टींग नाही करत नीट साले, कशाचा कशाला ताळमेळ नाही."

गॉट इट...? हेच कारण होतं मला सोबत घ्यायचं. रेडकर मला त्याच्या कंपनीत मोठं पद ऑफर करत होता. मी ते केवळ हसण्यावारी नेलं होतं. कारण त्यातले धोके मला माहित होते. जसा निरंजनशेठ्ला मस्का लावणं सुरु होतं तसंच इथे मला. ही कुबेरवारी त्यासाठीच होती. लोखंडेचे डोळे चमकले पण तो काही बोलला नाही. मी ही एकही शब्द बोललो नाही.

रेडकरचे घर जवळ आले. मोरेही लवकरच येणार होता. रेडकर बोलला मोरे येइस्तोवर तुम्ही माझ्या घरी थांबा. मी म्हटलं नको. तो कधी येईल. मला वेळ नाही. आम्हाला इथेच हायवेच्या चौकात उतरुन द्या. एकादी काली-पिली, रिक्षा, बस पकडून जाईन नाशकात. लोखंडेनेही होकार दिला पण त्याचे मन गाडीत गुंतून पडले होते. तो सतत मोरेला फोन करुन त्याचे स्टेटस घेत होता. ह्या सगळ्या लफड्यात चार वाजले होते. साडेचारला आम्ही पिंपळगावच्या चौकात हायवेला उतरलो. बॅग्स घेतल्या, सदाशेठ, रेडकरला बाय केलं.

आता जस्ट कल्पना करा. त्या हायवेच्या मध्यवर्ती चौकात. गर्दीच्या ठिकाणी आम्ही दोघे भर उन्हात बिना चपलेचे-बुटाचे उभे. लोक आमच्याकडे भूत पाहल्यासारखं करत होते. करणारच. दोन व्यवस्थित कपडे घातलेली, शर्ट-इन केलेली, चांगल्या घरातली दिसणारी, हातात कॉर्पोरेट एग्झेकेटीव लेदर बॅग्स असणारी, गोरीगोमटी, उच्चभ्रू दिसणारी माणसे अशी अनवाणी का असावीत हा प्रश्न सगळ्यांच्या चेहर्‍यावर होता. आलिया भोगासी असावे सादर!

मोरे काही लवकर येणार नाही म्हणून आम्ही नाशिककडे जाणार्‍या टॅक्सी-ओमनीत बसलो. बसणारे पहिले दोघे आम्हीच. म्हणजे अजून किमान आठ लोक बसल्याशिवाय ती ओमनी हलणार नव्हती. ते आठ मसिहा कधी अवतार घेतील याची कुठलीही पूर्वसूचना आम्हाला आकाशात दिसत नव्हती. माझी चलबिचल सुरु झाली. काय करु काय नको. ओमनीवाल्याला मी बोललो, 'भाऊ जरा लौकर निघना'. तसा तो म्हणाला, 'ठिकाय आपण बसस्टॅण्डवर कोनी प्याशिंजर मिळतं का ते बघू'. मेन हायवेवरुन साहेबांनी गाडी गावात घातली. बसस्टॅण्डवरुन अवघे दोन प्याशिंजर मिळाले. तिथे थोडा टेम्पास करुन परत हायवेवर आलो. अजून दोन जण आले. असे करता करता फक्त एक बाकी राहिला. सव्वापाच वाजले. माझी घालमेल वाढली. हा काही साडेपाचशिवाय इथून हलणार नाही आणि हलला तरी नाशिकला पोचेस्तोवर सात वाजतील कारण रस्त्यात परत थांबत थांबत प्रवासी घेत-उतरवत ह्याची लोकल होणार आहे हे माहित होते.

शेवटी देव धावून यावा तसा मोरेचा फोन आला. पाच मिनिटात पोचतोय. आम्ही ओमनीतून उतरायला लागलो तो ओमनीवाला आमच्यावर भडकला कारण त्याचा एक शेवटचा प्याशिंजर येतच होता आणि आम्ही दोन प्याशिंजर उतरत होतो. Happy

मोरेची वाट बघत लोखंडेशी माझ्या गप्पा सुरु झाल्या. त्याने मला विचारले ऑफरबद्दल, किती प्याकेज देतोय वैगरे. मी म्हटलं, आहे काहीतरी अठरा लाख वैगरे. तसा तो अजून एक्साईट झाला. असूया, राग, मत्सर, फसवले गेल्याची भावना आणि काय काय त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसू लागली. तो म्हणाला, "नाही, ठिक आहे. ऑफर घ्या तुम्ही, पण दोन महिन्याच्या पगाराचा अ‍ॅडव्हान्स आधीच जमा करुन घ्या. हा माणूस पगार देणार पण कुंथत कुंथत. भिकार्‍यासारखा. आणि तुम्ही ह्याच्या लफड्यात अडकू नका. तुम्ही आर्टीस्ट, इकडे मॅनेजमेंट तेही ह्या अवकाली सेल्समन्सचं तुम्हाला पेलवणार नाहीच. याआधीच्या सीईओचा पोरांनी असाच बट्ट्याबोळ केला. रेडकर त्याला वेपन म्हणून वापरत असे. तुम्हालाही तसंच वापरेल. आमचं तर लाईफ यातच आहे, आम्हाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही बघा कसं ते."

मी म्हटलं त्याला, 'एवढाच प्रश्न नाही आहे तो. मी तुमच्या कंपनीला जी सर्विस देतोय तशी उत्कृष्ट सर्विस इथे अ‍ॅग्रोप्रोडक्ट्समधे नाशिकात कोणीच देत नाही, मागच्या दोन वर्षात माझ्या डीझाइन्समुळे तुमच्या प्रॉडक्ट्सचा सेल तीस टक्क्यांनी वाढलाय. माझ्या डिझाइन्स खूप पॉप्युलर होत आहेत. लोक तुम्हाला विचारतायत कुठून करुन घेताय हे काम, पण तुम्ही कधीच कोणाला सांगितलं नाही. मी तर नविन होतो ह्या क्षेत्रात व नाशकातही, मला फक्त तुम्हीच माहित. माझं सगळं काम ह्याआधी फक्त रीअल इस्टेटमधे चालायचं. ह्या प्रकारच्या कामांशी, कृषीक्षेत्राशी कधीच संबंध आला नाही. तो तुमच्यामुळे आला. पण माझ्या डिझाइन्समुळे तुमचा बिझनेस वाढला, अशा प्रकारच्या कामाची खूप मागणी आहे ह्या गोष्टी मला आता माहित झाल्यात. त्यामुळे मी इतर कंपन्यांकडे माझा बिझनेस वाढवण्यासाठी मार्केटींगला जाणार हे कळल्यावर रेडकरने मला गुंतवून ठेवण्यासाठी खूप आमिषं फेकली आहेत. त्याला नकोय मी इतर कोणाचेही काम केलेले. त्याची मोनोपोली जाईल. लोकांनाही कळेल की हा नाशिकमधून काम करुन घेतोय, आता तर तो इतकंच सांगतोय की मुंबईतून काम करुन घेतोय. त्याचे पितळ उघडे पडू नये व मला एक्स्पोजर मिळू नये ह्यासाठीच त्याचा सारा खटाटोप चाललाय. मी तुमच्या क्षेत्राकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं पण लोखंडेसाहेब, मध्यंतरी, तुमच्या नकळत तुमच्याच तोंडातुन निसटलेल्या एका वाक्याने मला माझी पॉप्युलॅरिटी लक्षात आली. मी रेडकरची नोकरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोन्याची साखळी कोण गळ्यात घालून घेईल?"

"बरं ते जाऊ द्या. पण मला सांगा हे दहा हजार पाण्यात सोडायचं काय झेंगाट आहे?" मी.

लोखंडे, "ओ काय नाय हो ते. तुमची उगाच फिरकी घेत होते सगळे."

मी, "__________________"

----------------------------------------------------------------------------------------------

मोरे आला. आम्ही गाडीत बसलो, सुसाट वेगाने नाशिककडे निघालो. साडेसहा वाजले तेव्हा लोखंडेच्या घरून माझी कार घेऊन मी भरधाव प्रिंटरकडे निघालो. सात वाजता त्याचे ऑफिस बंद होणार होते, त्याआधी मला तिथे पोचणे गरजेचे होते. अंतर होते वीस किलोमीटर. हायवे आणि शहरांतर्गत ट्रॅफिकने नाही म्हटले तरी कमाल वेग शक्य होत नसतो. नाशिकमधे सरासरी वेग ४०-६० आहे. हा तरी खूप बरा आहे. पण आता अधिक काही दुर्घटना घडू नये म्हणुन देवाचा धावा करत होतो. सूर्य मावळला होता. मी रपारप गाडी हाकत निघालेलो.

एका एटीमपाशी थांबून पैसे काढून घेतले. चार्जींग संपल्याने फोन बंद होता त्यामुळे प्रिंटरला संपर्क शक्य नव्हता. तरी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तिकडे पोचलो. तर ते लोक आवरून निघायच्याच तयारीत होते. मी कार एकदम ट्रान्सपोर्टरच्या जेसन स्टेथम सारखी गर्रगर्र फिरवून डिस्पॅच गेटला लावली. मालकाने पोरांना सूचना दिल्या पार्सल टाकायच्या. सात वाजले होते. तोही मला फोन लावलावून हैराण होता. त्याला माझी निर्चप्पल अवस्था काही ध्यानात येत नव्हती. त्याला थोडक्यात कुबेर वैगरे सांगितले पण त्याला काही ते समजले नसावे. असो.

ह्या सगळ्यात दहा मिनिटे गेली. पार्सल माझ्या गाडीत होते. घड्याळात सात वाजून दहा मिनिटे झालेली. आज काय हे पार्सल ट्रान्स्पोर्टमधे पडणार नाही हे निश्चित होते. कारण प्रिंटर ते बसऑफिस अंतर दहा किमी होते, तो मार्गही वाहतूकीचा होता आणि गर्दीही बरीच असणार होती. शिवाय तिथे जाऊन पार्किंगला जागा शोधा. कागदी कार्यवाह्या, पार्सलची उचलाखाचल, ह्यातही वेळ गेलाच असता. हा विचार सोडावा असे ठरवून शांतपणे मनावर दगड ठेवून आणि रात्री क्लायंटच्या शिव्या कशा फेस कराव्यात ह्याचा विचार करत तिथून निघालो. हे पार्सल आज अमरावतीस जाणे नाही. हे सत्य माझ्यासाठी भयंकर होतं. कारण गेले चार महिने खपून ते काम आज हातात आलं होतं. आणि आता ते वेळेला उपयोगी पडणार नाही ह्याचं शल्य खुपत होतं.

मी गाडी चालवत घरच्या दिशेने निघालो. अचानक घड्याळावर लक्ष गेले, सात वाजून वीस मिनिटे फक्त. मी कुठे पोचलो होतो ते लक्षात घेतले स्त्यावरच डावीकडे वळले की अगदी दोन मिनिटावर बसऑफिस होते. माझा डोळ्यावर विश्वास बसेना. दहा किमी मी खूप वेगात आलो होतो. आताशा अजून दहा मिनिटे बाकी होती. नशिब आजमावून बघावं काय? नक्कीच. गाडी फिरवली. शॉर्टकट गल्ल्यांतून, मुख्य रस्ता टाळून थेट मागच्या रस्त्याने बसऑफिसमागे गाडी लावली. धावत जाऊन बसची पोजीशन चेक केली. त्यांना पार्सल आहे सांगितलं हमाल घेऊन पार्सल उतरवुन घेतलं. पाच मिनिटात कागदं तयार होऊन पार्सल साडेसातला बसच्या पोटात होतं. हुश्श्श!

शांतपणे पुढे रस्त्यावर आलो. एका दुकानातून माझं फेवरीट 'थम्सअप' घेतलं. तोंडाला लावलं. आज खरंच तूफानीच झालं होतं सगळं. गळ्यातून ते उतरत असतांना एक समाधान शरिरात पसरत जात होतं. शांत-शांत, मस्त वाटत होतं. सगळा शीण विरघळून जात होता. शरीर नवचैतन्याने फुलत होतं. ही कमाल थम्सअपची नाही हे तर कळलं असेलच तुम्हाला! Wink

पार्किंगमधून कार काढली, आता अगदी रमत गमत घरच्या रस्त्याला लागलो. घरी पोचलो. गाडी बंद केली तेव्हा ७ वाजून ४८ मिनिटे झाली होती. मुले खिडकीतून अत्यानंदाने 'बाबा आले, बाबा आले' चा घोष करत होती. मुलांसाठी त्यांचे जुनेच बाबा परत आले होते. माझ्यासाठी मी मात्र जुना परत आलो नव्हतो. जुने कपडे सोडून आलो होतो, जुना माणूसही सोडून आलो होतो. चपलेसकट.

बाथरूम मधे घुसलो. शॉवर सुरु केला. बरसणारे पाण्याचे थेंब उरला सुरला थकवा घालवत होते. एक एक थेंब शरीराची नव्याने जाणीव करुन देत होता. तेव्हा २४ तासातला एक एक क्षण मनावरुन ओघळत होता. एक पूर्ण दिवस, अशा माणसांसोबत घालवला. तो प्रवास रस्त्यांचा नव्हता. तो माणसांचा प्रवास होता. माझ्या मनाचाही प्रवास होता. ही भटकंती होती अनेक असंबंधित आयुष्यांची. काही उघड गुपितांची, काही लपवलेल्या सुस्पष्ट सत्याची. हळव्या कोपर्‍यांची, मतलबी स्वभावांची, एक सफर वेगळ्याच दुनियेची, एका अनियंत्रीत वादळाची, अनोळखी पायवाटेची.

एक गोष्ट. एक स्कॉर्पियो आणि सहा माणसांची.

-----------------------------------------------------------------------------------

समाप्त,

(सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. लेखकः संदीप डांगे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या ५ भागात ज्या प्रकारे उत्कंठा ताणली गेली होती, त्यानुसार शेवटच्या भागात काहीतरी सस्पेन्स , रहस्यभेद वगैरे असावं असा अंदाज केला होता. पण हा शेवटही आवडला.
पुलेशु.

कथा पुर्ण केल्याबद्दल धन्यवाद! या कथेचा वेग हेच याच्या पॉप्युलिरिटीच गमक आहे, आवडली.
(कौतुक शिरोडकर च्या 'यालाच म्हणतात नशिब' ची आठवण झाली.. नसेल वाचली अजुन तर जरुर वाचा.)

डांगे ब्वा निरा नाम ख़तरा न हो !! काय त राज्या ट्रिप हाय न काय हाय !! तो मार्केटच्या मंदी लावेल पवटा वाचुन त लैच हसु आले गड्या

मनापासून धन्यवाद मायबोलीकर मंडळींनो!

मायबोलीवरच्या माझ्या पहिल्याच लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.

खुपच सुंदर लेखन, मी नाशिक शहरात बरीच वर्ष राहीलाे आहे. तुमच्याकडुन भविष्य जाणून घेण्याची इच्छा झाली।

वीस लाखाचे तिकीट आहे त्या कथेला, ज्याची औकात असेल त्याने वीस लाख माझ्या अकौंट ला भरावे आणि मग सांगेन ती कथा.