माझी एखादी कविता

Submitted by pkarandikar50 on 14 February, 2016 - 22:27

माझी एखादी कविता

आलो होतो मी कुठे,
सांगायला तुम्हाला की
मी लिहितो, तुमच्यासाठी?
पण भेटलोच आहोत तर,
थांबा की जराशी, वाचून पहा,
माझी एखादी कविता?

नका बसू लावत अर्थ तिचे
अशानेच होतात अनर्थ अर्थांचे.
निरर्थक प्रवासाची जुजबी टिपणे,
तेव्हढ्याच निरर्थक अव्याहताची.
अथांग, अनंत पसरट रेतीवरची,
बडेजावी पाऊले, एका हव्यासाची…

करून तिरपी सुरई चांगली,
घ्याल भरून प्याला काठोकाठी,
हाता-तोंडाशी लावण्या खारे चणे,
जोडीला तशाच माझ्या रुबाया-गज़ला.

जाईल चढत घेऊन ती वरवर,
जशी विस्मृतीच्या हल्लक ढगांवर
तरंगाल, तुम्ही जेंव्हा, किंवा
इरसाल ती बया उतरेल,बघता बघता,
वास्तवाच्या पोकळीचा मस्त सपका
बसून फुटेल थोबाड, रक्त येइल,
तेंव्हाही असू द्या सोबतीला,

माझी एखादी कविता.
तेवढंच बरं वाटेल, जीवाला.

-बापू

Group content visibility: 
Public - accessible to all site users