भोपळ्याची नारळाच्या रसातील मसालेदार भाजी : पुरी थाळीसाठी

Submitted by अमेय२८०८०७ on 14 February, 2016 - 09:29

अलीकडेच मुंबईच्या 'पंचम पुरीवाल्या'विषयीचा व्हिडीओ पाहिला. त्यात दाखवलेली-अनेक रसदार आणि कोरड्या चटपटीत भाज्या तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या असलेली थाळी - वेड लावून गेली. मग डोसक्यात तीच थाळी, आज सकाळी मोकळा वेळ मिळाल्यावर त्या थाळीची घरगुती नक्कल करून पाहिली. अर्थात चार पाच भाज्या करणे शक्य नव्हते पण साध्या आणि पालक पुऱ्यांसोबत मटार-बटाटा गरम मसाला रस्सा, भोपळ्याची नारळाच्या रसातील भाजी, गुजराती कढी आणि गाजर-टोमॅटो कोशिंबीर असा मेन्यू ठरवला.
यातली भोपळ्याची नारळाच्या रसातील भाजी खास आवडून गेली. एका मित्राकडून ही रेसिपी नुकतीच कळली होती.
------------------------------------------------------------------------------------------
साहित्य :
भोपळा - सालासकट मोठ्या फोडी केलेला पाव किलो, एक मध्यम कांदा बारीक चिरून, जिरे - एक टी स्पून, हळद- पाव चमचा, तिखट एक टी स्पून अथवा चवीनुसार, कढीलिंब- सात आठ पाने, बिया काढून उभी चिरलेली एक छोटी हिरवी मिरची

वाटणासाठी: पाऊण वाटी खोवलेला ओला नारळ, अर्धा टी स्पून मोहरी, चार लसूण पाकळ्या, एक मसाला वेलदोडा, दोन तीन लवंगा, पाव इंच दालचिनी, तीन-चार मिरीदाणे, अगदी थोडी कोथिंबीर (ऑप्शनल)

कृती:
वाटणाचे पदार्थ थोड्या पाण्यासोबत मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.

प्रेशर पॅन अथवा छोट्या कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करावे, त्यात जिरे घालावे, कढीलिंब आणि हिरवी मिरची घालावी, कांदा घालावा. कांदा गुलाबी परतला की भोपळ्याच्या फोडी, हळद आणि तिखट-मीठ घालून चांगले परतावे.
दोन वाट्या पाणी घालून झाकण लावावे आणि एक शिट्टी काढावी.
वाफ गेल्यावर झाकण उघडून वाटण घालावे आणि गरज असल्यास थोडे पाणी वापरून भाजी हवी तितकी पातळ करून घ्यावी.
मंद आचेवर दोन तीन मिनिटे शिजवावी.

थाळीचा फोटो:
(गुजराती कढी नेहमीच्या महाराष्ट्रीयन कढीहून किंचित जास्त दाट आणि गोड असल्याने तिखट मसालेदार भाज्यांना छान संतुलित करते असे जाणवले. मटार-बटाटा रस्सा साध्या गोड्या मसाल्यातील वाटणाशिवाय आहे, दाटपणासाठी उकडलेला बटाटाच कुस्करून लावला आहे.
पुऱ्यांऐवजी वेगवेगळे मिनी पराठे करून ब्रंच पार्टीसाठी वगैरे जास्त हेल्दी ऑप्शन ठेवायचाही विचार करता येईल).

puri thali.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतोय मेन्यू.
भोपळ्याच्या भाजीतल्या वाटणाकरता मोहरी वाटायची? कडवट टेस्ट नाही येत?

नाही होत कडवट, पण यावरून आधी मोहरीचे प्रमाण एक टीस्पून लिहिले होते हे लक्षात आले
ते अर्धा टी स्पून हवे, सुधारलेय
थोडीच घ्यायचीय मोहरी

Hayala jabaree disatey ThaLee!

Mala aadhee dudhee bhopalyachee bhajee vatalee. Na du madhalee dudhee chee bhajee pan jabaree lagate. HaLad takayachee nahee.

Ya bhoplyala aamhee dangar mhanato.

वा!
केरळी पद्धतीचे नारळाच्या दुधातील रस्सा भाज्या : http://mariasmenu.com/vegetarian/vegetable-stew

परंतू आताच्या पंजाबी/चाइनिज पद्धतीचे पदार्थ खाणाय्रा पिढीला असले पदार्थ आवडत नाहीत.

अमेय, तुमच्या पाककृती आवर्जून करून बघते. छान असतात. आज ही भाजी केली. फारच मस्तं झालीय चवीला. एरवीच्या बाकरभाजीपेक्षा अगदी वेगळी चव आहे, पण खूप आवडली. कदाचित पुढल्या वेळी करताना प्रेशरकुक करण्यापेक्षा भोपळ्याच्या कापट्या सुट्या शिजवेन. वाटणात थोडी कोथिंबीर घेतल्यामुळे किंचित हिरवा रंग आला.

पाककृतीसाठी धन्यवाद!

bhopala-bhaji-ameya-mb-maayboli.jpg

धन्यवाद मृण्मयी, असं कुणी करून बघितलं आणि आवडलेलं सांगितलं की हायसं वाटतं.
हो, भोपळा जास्त शिजेल अशी भीती मलाही होती म्हणून शिट्टी आल्यावर मी लगेच वाफ काढून झाकण उघडून टाकले त्यामुळे फोडींचा आकार शाबूत राहिला, आणि फोडी थोड्या मोठ्याही केल्या होत्या.

असं कुणी करून बघितलं आणि आवडलेलं सांगितलं की हायसं वाटतं. >> +१

मृण्मयी,
ग्रेट आहे तू..लगेच बनवून फोटो सुद्धा दिलायस..
smileyvault-cute-big-smiley-animated-024.gif

लाल भोपळ्यासाठी नारळाच्य दुधाबरोबर कांदा-मोहरीचं वाटण घालायला जरा धाडस करावं लागेल. पण करून बघायला पाहिजे एकदा.

फोटो लई भारी आला आहे.

>>लाल भोपळ्यासाठी नारळाच्य दुधाबरोबर कांदा-मोहरीचं वाटण घालायला जरा धाडस करावं लागेल.

मंजूडे, तू रेस्पी पुन्हा वाच बघू! नारळाचं दूधही काढलेलं नाही आणि कांदापण वाटलेला नाही. कांदा छान परतायचा आहे आणि थोडासा खवलेला नारळ मसाल्यांबरोबर वाटायला घ्यायचाय.

मोहरीचा एक मस्त माइल्ड स्वाद येतो. तो भारी लागला.

पुन्हा एकदा वरचं फेस्टिव ताट डोळेभरून बघून घेतलं. Happy पुढल्यावेळी पालक्पुर्‍या, कढी आणि दोन्ही भाज्या असा मेनू करायला हवा.