जीवनाची ही तऱ्हा निर्जीव आहे केवढी

Submitted by वैवकु रीटर्न्स on 6 February, 2016 - 08:17

जीवनाची ही तऱ्हा निर्जीव आहे केवढी
आणि श्वासांची मुदत वाढीव आहे केवढी...

हे कसे इतक्या बढाया मारणे जमते तुला
एवढासा जीव पण चिवचीव आहे केवढी !

वाढतो आहे अवाका जातसंख्येचा तुझ्या
राहिली जागा तुझी राखीव आहे केवढी?

थांबवत आहे तिचे आता उदात्तीकरण मी
जाणवत आहे मला 'जाणीव'..आहे केवढी?

आतमध्ये तर जनावर राहते आहे तुझ्या
पण तुझी चर्या पहा पाळीव आहे केवढी

हा कसा आकार आला रे निराकारा तुला
विठ्ठला मूर्ती तुझी कोरीव आहे केवढी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतमध्ये तर जनावर राहते आहे तुझ्या
पण तुझी चर्या पहा पाळीव आहे केवढी<<< सुरेख.

गझल आवडली. जमीनही आवडली. जमीन सांभाळा. पूर्वी इथे जमिनी बळकावणारे एक होऊन गेलेले आहेत. Light 1

मस्त गझल! आवडली!
मतला खासम-खास!

ल.तो.मो.घा. क्षमस्व,पण ईतर शेरांच्या मानाने,चिवचीव जरा हलका वाटला!

वाह!

खर तर तुम्ही नवे नाही आहात खूप अभ्यास आहे तुमचा गझलेचा। भावना ओतपोत भरलेल्या आहेत शब्दात . खुप छान गझल आहे ।। खूप आवडली ।

गजल सुंदर आहे!

<<< आतमध्ये तर जनावर राहते आहे तुझ्या
पण तुझी चर्या पहा पाळीव आहे केवढी

हा कसा आकार आला रे निराकारा तुला
विठ्ठला मूर्ती तुझी कोरीव आहे केवढी >>

या दोन द्वीपदी खूप आवडल्या.

<< जमीन सांभाळा. पूर्वी इथे जमिनी बळकावणारे एक होऊन गेलेले आहेत. >>

संदर्भ कळला नाही. पण संदर्भ महत्वाचा नाही. "जमीन बळकावणे" हा वाक्प्रचार समजला नाही. "जमीन" या गोष्टीवर कॉपीराईट असू शकत नाही. शब्दांवर (शब्दांच्या विशिष्ट "युनिक" रचनेवर किंवा संपूर्ण कवितेवर) असू शकतो.