सरदार मुजुमदरांच्या ठेवणीतील संग्रहाचे डिजिटलायझेशन - (सकाळ ३१ जानेवारी २०१६)

Submitted by गायत्री१३ on 2 February, 2016 - 21:55

मुजुमदार घराण्याच्या वंश़जांनी आबासाहेबांच्या १ फेब्रुवारी रोजी असलेल्या १२९ व्या जयंतीच्या निमित्ताने दुर्मिळ छायाचित्रे व पत्रांचे डिजिटलायझेशन केले आहे. या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन!
आबासाहेबांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांच्या विनंतीवरून सकाळमधे आलेला हा लेख इथे टाकत आहे.

**********************************************************************

सरदार मुजुमदारांच्या ठेवणीतील संग्रहाचे डिजिटलायझेशन - दुर्मिळ छायाचित्रे आणि पत्रे ठरणार अभ्यासकांसाठी उपयुक्त

सरदार मुजुमदार घराण्याचे मूळपुरुष...घराण्याचा गणेशोत्सव...वाड्यावर भरलेल्या सांगीतिक मैफिली...आणि १०० वर्षांपुर्वी घडलेल्या सामाजिक, राजकीय घटनांची कृष्ण-धवल छायाचित्रे...आबासाहेब मुजुमदारांना काश्मीर ते कन्याकुमारी येथून आलेली दुर्मिळ पत्रे. मुजुमदार घराण्याच्या वंश़जांनी या दस्तऐवजाचे डिजिटलायझेशन केले असून तत्कालीन भाषा, व्यक्तींची हस्ताक्षरे, लेखनशैलीतून उमटलेले स्वभावविशेष आदींचा हा ऐतिहासिक ठेवा संशोधक, अभ्यासकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरावा...असेच या संग्रहाचे वर्णन करावे लागते.

कसबा पेठेत सरदार गंगाधर नारायण ऊर्फ आबासाहेब मुजुमदार यांची वास्तू (वाडा) आहे. वाड्याच्या समोरच मुजुमदार घराण्याचे मूळपुरुष नारो गंगाधर ऊर्फ आयाबा मुजुमदार यांचे समाधी मंदिर आहे. आबासाहेब मुजुमदार यांचा तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांगीतिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये सातत्याने संपर्क होता. अनेकांबरोबर त्यांची छायाचित्रे व त्यांना आलेली पत्रेही मुजुमदार घराण्याच्या वंश़जांनी जतन करून ठेवली होती. त्याचेच डिजिटलायझेशन करण्यात आले आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, नानासाहेब परुळेकर, पु. ल. देशपांडे, आर. सी. मेहता, माणिक वर्मा, रोहिणी भाटे, मालती पंडित, उस्ताद विलायत खाँ, मास्टर कृष्णा, हिराबाई बडोदेकर यांसारख्या सामाजिक, राजकीय, सांगीतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींशी आबासाहेबांचा परिचय होता. सभा, मैफिली, चर्चासत्रांच्या माध्यमातून एकत्रित येत असताना छायाचित्रातून टिपलेलं जुने पुणे आणि पत्रव्यवहारातून व्यक्त झालेला जिव्हाळा हे त्यांच्या या संग्रहाचे वैशिष्ट्य ठरते.

तंत्रड्न्यानामुळे घटनांना उजाळा
आबासाहेब मुजुमदारांच्या नातसून अनुपमा मुजुमदार म्हाणाल्या, "आबासाहेब हे उत्तम छयाचित्रकार होते.अनेक संस्थांवर त्यांनी अध्यक्षीय पदे भूषविली होती. त्यांचा सामाजिक, सांगीतिक क्षेत्रातील व्यासंग मोठा होता. त्यांची १ फेब्रुवारी रोजी १२९ वी जयंती होती. या निमित्ताने दुर्मिळ छायाचित्रे व पत्रांचे डिजिटलायझेशन केले आहे. त्यांच्या संग्रहातून तत्कालीन परिस्थिती, राहणीमान यांचा संशोधकांना उपयोग होउ शकतो. घडलेल्या घटना तंत्रड्न्यानामुळे पुन्हा प्रकाशात येउ शकतात. सत्यतेच्या जवळ पोचण्याचे हे साधन आहे. याच अनुषंगाने हा संग्रह डिजीटलाइज केला आहे."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुपमा मुजुमदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व त्यांच्या घरीच ठेवण्यात आले आहे आणि अभ्यासकांना ते उपलब्ध करून देण्यात येईल.
इच्छुकांनी आधी फोन करुन वेळ घेणे आवश्यक आहे. त्यांचा नं ०२०-२४५७९३६४.