युनायटेड थ्रू ओशन्स...

Submitted by पराग१२२६३ on 2 February, 2016 - 11:51

s2016020676790.jpgजहाजांचा संगम

अहोय, हॅलो, नमस्ते म्हणत भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणासाठी जगभरातून आलेल्या सर्वांचे स्वागत - शुभंकर डॉल्फीन

भारतीय नौदलाने ४ ते ८ फेब्रुवारी २०१६ रोजी विशाखापट्ट्णम येथे ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण’ (इंटरनॅशनल फ्लीट रीव्ह्यू) आयोजित केले आहे. भारतीय नौदलाच्या इतिहासात असे ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण’ दुसऱ्यांदाच आयोजित केले जात आहे. यंदाच्या ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणा’च्या माध्यमातून भारतीय नौदल आपल्या ‘मृदू शक्ती’बरोबरच (सॉफ्ट पॉवर) युद्ध क्षमतेचेही जगासमोर प्रदर्शन करणार आहे. या ताफा निरीक्षणाला आणि त्याच्या आयोजनाला सांकेतिकदृष्ट्याही महत्त्व असते. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेला हा सोहळा प्रत्येकाने पाहून आपल्या नाविकशक्तीविषयी अंदाज घ्यावा, हिच माझी इच्छा आहे.
l200605068514.jpg
राष्ट्रप्रमुखाने आपल्या नौदलाच्या ताफ्याचे निरीक्षण करणे ही जुनी नाविक परंपरा आहे. जगातील सर्वच देशांमध्ये पाळल्या जाणाऱ्या या परंपरेला नौदलाच्या दृष्टीने महत्त्व असते. स्वातंत्र्यानंतर भारतातही या परंपरेला सुरुवात झाली आणि १९५३ मध्ये भारतीय नौदलाचे पहिले ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (प्रेसिडेंट्स फ्लीट रीव्ह्यू) आयोजित केले गेले. औपचारिक आणि सांकेतिकदृष्ट्या महत्त्व असलेला हा विशेष समारंभ दर पाच वर्षांनी (प्रत्येक राष्ट्रपतींच्या कार्यकाळात एकदा) आयोजित केला जातो. त्यामध्ये युद्धासाठी सज्ज असलेल्या युद्धनौका आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याप्रती सन्मान आणि त्याच्याशी बांधिलकी व्यक्त करण्यासाठी, तसेच नाविकांचे सर्वोच्च नेतृत्व आणि राज्याशी ऋणानुबंध निर्माण होण्यासाठी ताफा निरीक्षणाचा समारंभ आयोजित केला जात असतो.

या समारंशामध्ये राष्ट्रपती त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या विशेष युद्धनौकेवर (प्रसिडेंशियल याख्ट) अन्य मान्यवरांसह स्वार होऊन समुद्रात ओळीत नांगरण्यात आलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या जवळून जातात. त्यावेळी त्या युद्धनौका आणि पाणबुड्यांवर उपस्थित नौसैनिक आपल्या टोप्या उंचावत राष्ट्रपतींच्या नावाचा जयजयकार करतात. त्याचबरोबर काही युद्धनौका आणि पाणबुड्या राष्ट्रपतींच्या विशेष युद्धनौकेजवळून वेगाने निघून जातात. यापाठोपाठ नौदल आणि तटरक्षक दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर फ्लायपास्ट करतात. अशा प्रकारे स्थिर, अस्थिर आणि हवाई कसरती या तीन प्रकारे शक्ती प्रदर्शन घडविले जाते. भारतीय नौदलातील सर्व आघाडीच्या युद्धनौका, विमानवाहू जहाजे, पाणबुड्या, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, तटरक्षक दलाची साधने आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील जहाज वाहतूक कंपन्यांची महत्त्वाची व्यापारी जहाजे सहभागी होत असतात.
s200605068512.jpg
विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणा’मध्ये भारतीय नौदलाबरोबरच अन्य मित्र देशांच्या युद्धनौकाही सहभागी होऊन भारताच्या राष्ट्रपतींना सलामी देणार आहेत. हे ताफा निरीक्षण भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वांत मोठे ताफा निरीक्षण ठरणार आहे. भारताचे विविध देशांच्या नौदलांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण व्हावेत आणि त्यातून महासागरांमध्ये निर्माण होणाऱ्या समान आव्हानांचा सामना एकत्रितपणे करता यावा, तसेच आपल्या शक्तीचे जगासमोर प्रदर्शन व्हावे अशा हेतूंनी यंदाच्या ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणा’चे आयोजन करण्यात आले आहे.

भारताला हजारो वर्षांचा समृद्ध सागरी इतिहास आहे. भारताचे प्राचीनकाळापासून मेसोपोटेमियाशी (सध्याचा इराक) आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील पश्चिम आशियाई देशांशी व्यापारी संबंध होते. तो व्यापार प्रामुख्याने सागरीमार्गानेच होत असे. याचे पुरावे मोहेंजदडो आणि लोथल येथील उत्खननात सापडले आहेत. पुढील काळात भारताचा सागरी व्यापार आफ्रिकेचा पूर्व किनारा, युरोप आणि आग्नेय व पूर्व आशियाबरोबरही सुरू झाला. अनेक शतके हा व्यापार अव्याहतपणे सुरू होता.

या व्यापारामुळे भारतीय संस्कृतीचा प्रभाव त्या प्रदेशांमध्ये पडत गेला आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रांमधील देशांशीही भारताचे संबंध विकसित होत गेले. दरम्यानच्या काळात भारताचे जहाजबांधणीतील कौशल्यही जगभर अतिशय नावाजले गेले होते. पण पंधराव्या शतकाच्या अखेरीनंतर युरोपियनांचे भारतात व्यापाराच्या निमित्ताने आगमन झाले आणि पाठोपाठ वसाहतवादाचाही येथे प्रवेश झाला. भारताचा सागरी व्यापारी क्षेत्रातील प्रभाव मोठा असला तरी त्याला नाविकशक्तीची जोड देण्यात भारतातील तत्कालीन राज्ये अपयशी ठरल्याने या प्रभावाचे साम्राज्यात रुपांतर होऊ शकले नाही असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधी चोल राजघराणे यांचा अपवाद वगळल्यास अन्य राजवटींकडून नाविकशक्तीच्या उभारणीचा विचारच झाला नाही. परिणामी पंधराव्या-सोळाव्या शतकानंतर भारताचे सागरीमार्गांवरील नियंत्रण कमी होण्यास सुरुवात झाली. पुढे युरोपियन सत्तांच्या भारतातील आगमनानंतर भारतातील विकसित जहाजबांधणी उद्योगालाही उतरती कळा लागली.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय नौदलाने आपल्या क्षमतेत सतत प्रगती केलेली आहे. शीतयुद्धानंतरच्या काळात या क्षमतेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाच्या या शक्ती व क्षमतेची दखल जगभरातून घेतली जाऊ लागली आहे. विशाखापट्टणम येथील यंदाचे ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण’ त्याचेच एक उदाहरण आहे. त्यामध्ये ४७ देशांच्या सुमारे १०० युद्धनौका व पाणबुड्या, ६० विमाने सहभागी होणार आहेत.

अशा प्रकारे ‘नाविक राजनया’च्या (नेव्हल डिप्लोमसी) माध्यमातून भारतीय नौदल भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावी भूमिका बजावत आहे.

१९९० च्या दशकात मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण अवलंबिल्यावर जगातील विविध भागांमध्ये भारताच्या राष्ट्रहितांचा विस्तार होऊ लागला. त्याचा भारताच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टांवरही प्रभाव पडत गेला. आज भारताच्या राष्ट्रहितांचा विस्तार पश्चिमेला सुएझ कालव्याच्याही पलीकडे आणि पूर्वेला दक्षिण चीन सागरापर्यंत, तर उत्तरेला मध्य आशियापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत झालेला आहे. या विस्तृत प्रदेशातील आपल्या राष्ट्रहितांच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यदले सज्ज आहेत. भारताचा गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला आहे. येथे मध्यमवर्गाची अतिशय मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आज तरुणांची जगातील सर्वाधिक संख्या भारतात आहे. त्याचवेळी भारताने विस्तृत प्रदेशांमधील राष्ट्रहितांच्या संरक्षणाच्या हेतूने आपल्या सैन्यदलांचे अलीकडे वेगाने आधुनिकीकरण सुरू केले आहे. अशा विविध कारणांमधून भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय प्रभावही वाढू लागला आहे. तरीही भारताने शांती, सद्भाव, पस्रपर सहकार्य आणि वैश्विक मूल्यांप्रती आपली बांधिलकी कायम राखली आहे. भारताच्या या मूल्यांचा प्रसार प्राचीन काळापासून सागरीमार्गाने जगाच्या विविध भागांमध्ये झालेला पाहायला मिळतो. त्याच्या आधारे भारताला आपल्या राष्ट्रहितांच्या संरक्षणासाठी मदत होत आहे. या कार्यात भारतीय नौदलही सक्रीय भूमिका बजावत आहे. हाच सद्भाव टिकवून आपल्या प्रदेशातील शांतता सुनिश्चित व्हावी, त्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंधांच्या विकासाला चालना मिळावी आणि त्यातून आपल्या राष्ट्रीय विकासाला पोषक वाचावरण निर्मिती व्हावी या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणा’चे आयोजन केले गेले आहे.

एकविसाव्या शतकात जागतिक अर्थकारणात आशियाचे आणि हिंदी महासागराचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या पार्श्वभूमीवर जगातील पाचवे सर्वांत मोठे नौदल असलेल्या भारतीय नौदलाची ओळख ‘हिंदी महासागरातील सर्वांत प्रबळ नौदल’ अशी निर्माण झालेली आहे. जगात कोठेही आपत्तीच्या काळात तातडीने मदत पोहचविणारे भारतीय नौदल आज ‘नाविक राजनया’च्या माध्यमातून भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीला हातभार लावत आहे. या सर्व बाबींमुळे यंदा विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणा’ला महत्त्व आले आहे.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा सोहळा नक्की 'दूरदर्शन'वर दिसणार आहे, ६ तारखेला सकाळी ९ वाजता ताफा निरीक्षण आणि ७ तारखेला संध्याकाळी नौदलाची युद्धकौशल्ये आणि सर्व सहभागी देशांच्या नौसैनिकांचे संचलन आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा आहे.

मस्त माहिती. लिंक आली की इकडे शेअर करा, आवडेल बघायला.
पण भारताचं नौदल ५वं म्हणजे संख्ये नुसार का? कारण बोटी आणि इतर सामग्री, टनेज इ. मध्ये ७ ते ९वं म्हणतायत.

होय अमितव जी तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेले आहे. आपले नौदल संख्येने जगातील ५वे सर्वांत मोठे नौदल आहे. पण त्याची कार्यक्षमता सर्वोच्च ठरली आहे.

झकास माहिती. Happy

(अवांतर - तुम्हाला संपर्कातून एक ईमेल केलं होतं. कृपया चेक करा. सॉरी, याआधीही तुमच्या एका लेखावरच्या प्रतिसादात मी हे लिहिलं होतं. पण तुमच्याकडून काहीच उत्तर न आल्याने परत लिहीत आहे.)

माझ्या अंदाजानुसार एखाद्या देशातील नौदल ताफा निरीक्षण सोहळ्यात इतक्या मोठ्या संख्येने अन्य देशांनी सहभागी होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणाचा पहिला टप्पा दिमाखदारपणे पार पडला आहे.

धन्यवाद, फार सुंदर माहिती.

हे असे परदेशी निरीक्षकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुर्वी कधी बोलावल्याचे आठवत नाही. चांगली गोष्ट आहे.

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असाच 'फ्लीट रिव्ह्यू' होता.

१९४८ सालापासून आपण इतक्या लढाया खेळलो पण नौदलाला सपोर्टिंग रोल करावा लागल्यामुळे आपलं त्यांच्या कडे जरा दुर्लक्ष होतं. मात्र १९७१ च्या लढाईत चान्स मिळाल्याबरोबर नौदलानी अफलातून कामगिरी केली होती.

बांगलादेशच्या युद्धात तर त्यांचा सक्रीय भाग होताच, पण तेव्हां आपल्या वेस्टर्न फ्लीटनी प्रचंड धोका पत्करून बेधडक कराची बंदरावर हल्ला केला होता. आणि बंदराची वाताहात करून टाकली होती. उरलेल्या युद्धात पाकिस्तानला ते बंदर अजिबात वापरता आलं नाही.

इतकी उत्तम माहिती आमच्यापर्येंत पोहोचवल्याबद्दल अनेकानेक आभार.
धन्यवाद Happy
स्वीट टोकर यांची पोस्ट पण छान आहे.

लेख आवडला! आईबाबांनी दूरदर्शनवर सोहळा पाहीला. त्याबद्दल मला सांगताना त्यांना वाटणारा अभिमान , कौतुक शब्दाशब्दांतून व्यक्त होत होते.