आजची लहान मुले आणि वाचन

Submitted by सनव on 2 February, 2016 - 01:08

आमच्या लहानपणी घरी एक कृष्णधवल टीव्ही..त्यात दोनच चॅनल्स. मोबाईल इंटरनेट नव्हतंच. त्यामुळे वाचनाची आवड सहजपणे लागली. पुस्तकांनी बरंच काही दिलंय आयुष्यात...आता मोबाईल इंटरनेट केबल सगळं असलं तरी लहानपणापासूनची वाचनाची सवय सुटली नाही. अजूनही किंडल वगैरे असूनही मला पुस्तकं हातात धरुन वाचायलाच जास्त आवडतात.
पण पुढच्या पिढीपर्यंत ही आवड कशी पोचवावी? आपली मुलं जन्माला येतात ती या स्मार्टफोन टॅबलेटच्या जगातच. अशावेळी पुस्तकांशी त्यांची ओळख कशी करुन द्यावी? अटेन्शन स्पॅन कमी असणार्‍या या आजच्या जगात रात्री जागून एखादं लिटल विमेन वाचून पूर्ण करण्याचा आनंद माझ्या मुलीलाही स्वतः अनुभवायला मिळावा यासाठी मी काय करु शकते?
इथे मला पाठयपुस्तकांचं वाचन अभिप्रेत नाही. पण 'वाचू आनंदे' अर्थात वाचनाचा आनंद घेण्यासाठी केलेलं वाचन...हे अभिप्रेत आहे. इतर अनुभवी पालक-शिक्षक-लेखकांचे विचार जाणून घ्यायला आवडेल. तुमची मुलं वाचतात का? जर हो तर ही आवड जोपासायला तुम्ही काही विशेष प्रयत्न केले का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<हे अ‍ॅझम्पशन तपासून पहा आधी . तुमच्या आसपास, शाळेत , कॉलेजात जे समवयस्क आहेत त्यांना सर्वांना वाचनाची आवड होती का ? अजून टिकून आहे का ? माझ्या लहानपणी टिव्हीच नव्हता. पण तरिही घरात / शाळेत / शेजारीपाजारी वाचनाची आवड कॉमन नव्हती. अभ्यासाव्यतिरिक्त वर्तमानपत्र देखील क्वचित वाचणारी अनेक मुलं मुली होती.>>

आसपास कशाला, घरातच नवरा आहे जो अजिबात वाचत नाही! मुळात आवड नसेल तर काही करु शकत नाही पण बेसिक आवड असेल तर जोपासायला मला आवडेल. मुलीला आवड आहे असं मला (सध्यातरी) वाटतंय.

>>गेल्या वर्ष भरात तुम्ही, घरातल्या इतर अड्ल्ट्सनी किती व कोणती पुस्तके वाचलीत ? वाढदिवस, मुंज, ग्रॅजुएशन अशा प्रसंगात , किंवा इतर कोणी वाचावं म्हणून किती पुस्तके भेट म्हणून दिलीत ?>>

मी वाचतच असते रेग्युलरली. पुस्तकं भेट देणं फार क्वचित होतं. लोकांना पैसे वा इतर गिफ्ट्स जास्त आवडतात असं दिसतं.

७-८ महिन्यांचा असल्यापासून पुस्तके(अर्थात प्राण्यांची मोठी चित्रे असलेली) ,मुलाला जेवण भरवताना बघायचो.अर्थात त्यावर गाणी वगैरे म्हणून.
रोज रात्री गोष्ट सांगणे/पुस्तके वाचून दाखवणे असायचेच.चवथीपर्यंत बरीच पुस्तके वाचून दाखवली/ विकत घेतली.त्याने स्वतःहून वाचावी म्हणून हे पान तू वाच्,नंतरचे मी वाचेन असे म्हटल्यानंतर मात्र अजिबात पुस्तके वाचली नाहीत.घरात त्याची-माझी पुस्तके,त्याच्या माझ्या लायब्ररीची पुस्तके असूनही त्याने स्वतंत्र वाचन कधीच केले नाही.
प्रथम ही गोष्ट पचवायला जड गेली.अजूनही विषाद वाटतो. माझ्या हातात पुस्तक असायचेच्,रात्री वाचल्याशिवाय झोप येत नाही.पण मुलाला मात्र आवड नाही.

<<वाचन वाया गेलं असं नाही. पण वाचनाचं टोकाचं वेड पण असू नये असं आता वाटतं. >>

मुद्दा पटतोय कपोचे तुमचा. टोकाचं वेड असणं नक्कीच चांगलं नाही.
पण मला मुलीने थोडंतरी वाचन करावं असं जे वाटतंय ते काही 'मिळवण्यासाठी' म्हणून नाहीच. to explore the possibilities of books...for the peace of mind and happiness and sheer pleasure of reading...इतकंच अपेक्षित आहे. म्हणजे पुलंचं लिखाण वाचावं (इंग्लिश मिडियम) असलं तरी...त्यातून निखळ हास्य व आनंद मिळवावा. किंवा 'After all this time?' 'Always' सारख्या पाच शब्दांतून जे काय वाचताना फील होतं ते तिलाही अनुभवता यावं..इतकंच.

माझ्या मुलीचे वय ४.५ वर्षे आहे.
२ वर्षाची होईपर्यंत घरात होती ती पुस्तक घेऊन बसायची छोटी छोटी, लहान मुलांसाठी छान सेट्स मिळतात कार्डबोर्ड बुक्स चे ती एतर खेळन्यांबरोबर आजूबाजूला पडलेली असायची पुस्तक तिला वाटेल तेंव्हा त्यातली चित्र बघून सांगायची काय आहे ते.
त्यानंतर क्लॅसिक्स चा एक सेट आणला ती अगणित वेळा वाचून झाल्यावर मग डॉ. सूस ची काही पुस्तक वाचली आम्ही.
तिची काही आवडती कार्टून कॅरॅक्टर्स आहेत त्यांचे सेट्स आणले मग लक्षात आल की तिला अजुन वाचायचाय मग लाइब्ररी मधे जायला लागलो आता दर आठवड्याला चक्कर असते.

काही काही पुस्तक तिला ईतकी आवडली की तिने आपणहून संगितल आपण हे अजुन वाचू किंवा मग त्या लेखक /लेखिकेची तशीच एतर पुस्तक आणली की ती खुश तिचा उत्साह खुापाच असतो अशी पुस्ताक आणली की.

त्यातून मलाही काळात गेल तिची आवड काय किंवा अजुन काय करता येईल.

मायबोली वर मेधा ची एक सुप्रसिध्ह लिस्ट आहे मुलांसाठी त्यातली किंवा goodreads.com या संकेतस्थळा वरुन ऑस्ट्रेलियन पुस्तक तिच्या वयाची आणून वाचतो आम्ही दोघी सध्या.

तिला अजुन वाचता येत नाही पण तिची लाडकी पुस्तक पाठ आहेत तिची. काही पुस्तकातली वाक्य कोट करते ती ते क्षण आनंदाचा ठेवा झालेत.

आपल्याला त्यानी काय वाचायला हवय या पेक्षा त्या वाचनामधून त्याना काही सापडत्ाय का हे महत्वाच ते सापडत असेल तर वाचना ची गोडी आपोआप लागेल.

माझा मुलगा पण खुप वाचतो. मुख्यत्वे इग्लिश. हिंदी फक्त अभ्यासापुरते. मराठी नाही वाचत पण बोलतो Happy आता पुस्तके ठेवायला जागा नाही म्हणुन किंडल घेतले. मागच्या वर्षी प्रगती मैदान पुस्तक मेळाव्यात ५५००/- रु ची खरेदी झाली होती. यावर्षी जायला जमले नाही. नशिब माझे :-). मी कधीच वाचायचा फोर्स करत नाही. सध्या वाचन थोडे कमी आणि football वाढला आहे. ते पण खुप जरुरी आहे.

मला ते उपजत आवड प्रकरण फारसे समजलेले नाही. निदान काही काळ तरी प्रयत्न करायला हवा पालकांनी (आणि शिक्षकांनीही). (निदान ज्यांना शक्य आहे त्यांनी )

वर अनेकांनी उत्तम मार्ग सुचवले आहेत. प्रदर्शनांना जाणे, पुस्तकांबाबत बोलणे, ती सहज दिसतील अशी अवतीभवती राहू देणे वगैरे.

children become readers on the laps of their parents हे बर्‍यापैकी खरं आहे.
नुसती पुस्तकं आणून देऊन भागत नाही, त्यात जीव सुद्धा गुंतवावा लागतो ना ?

आणि हो, घरातल्या इतर व्यक्तींच्या सवयीचा प्रभाव पडतोच की. आईवडिल आणि मुख्यत्वे आजीआजोबा (घरात असतील तर), किती वेळ टीव्ही पाहतात ? किती वेळ मोबाईलवर/ computer वर सतत घालवतात ? किती वेळ वाचतात ?

माझी मुलगी (वय ८) हिच्यासाठीही आम्ही थोडेफार प्रयत्न केले. आता ती वाचते बर्‍यापैकी. मलाही वाचनाची थोडी आवड आहे. हजार एक पुस्तकं घरात असतील. त्यात मुलीचीच तिनेकशे आहेत बहुतेक. सार्वजनिक वाचनालयातली वेगळी.
इकडील वाचनालयात माणशी ८ पुस्तकं घेता येतात. आम्ही कित्येकदा मुलांची २४ सुद्धा आणलेली आहेत. तो कागद, चित्र आणि विषयांचे वैविध्य पाहून स्तिमीत व्हायला होतं.

माझ्या नवर्‍याला वाचनाची आवड नाही. तरीही मुलीसाठी, तिला वाचून दाखवण्यासाठी तो वेळ राखीव ठेवत आला आहे, अगदी ती सहा महिन्यांची असल्यापासून.
झाडांना पाणी घालतो तसं मुलांना काही सवयींच्या बाबतीत पाणी घालत रहावे असे वाटते.
या सगळ्यासाठी काढावा लागतो तो 'वेळ'. वाचन, नृत्य/संगीत, कुठलाही खेळ नीट शिकणे, बागकाम जे काय असेल ते.. याला थोडेसे खतपाणी देणे गरजेचे आहे. आणि मुलांच्या वयानुरुप आपणही त्यांच्या सोबत तो वेळ (आनंदाने) देऊ शकणे मलातरी आवश्यक वाटते. (आणि स्क्रीनटाईम कमी केला, तरच तो वेळ आपण काढू शकतो.)
दुसरे असे की याच तर आपल्या थोड्याबहुत आठवणी राहणार ना मुलांजवळ? If we are creating memories as parents .. ?

आज काय करुया ? चला लायब्ररीत जाऊया/ पुस्तक प्रदर्शनाला जाऊया.. हे आनंदाने आणि आपसूक म्हणायला घरानेही शिकायला हवय..

सनव, माझा मुलगा (१० वर्ष) वाचनाची आवड आहे, पण एक प्रॉब्लेम असा की एखादा ऑथर आवडला की तो त्याचीच पुस्तकं वाचत बसतो, मग संपली, की पुनःवाचन सुरू करतो, त्यामुळे असं झालं की त्याला दुसर्‍या सीरिज कडे वळवणं कर्मकठीण होऊन बसतं.
यावेळी मी त्याला पॉटर सीरिज वाचण्याचा विडा उचलला Wink आणि त्यासाठी मी मोठ्याने त्याला सुरुवातीची २०-३० पानं वाचून दाखवली, आता तो पुरता फॅन झालाय आणि माझ्या वाट्यावर पॉटरची पुस्तकं येऊ देत नाहिये Happy

कधी कधी मुलांना मोटिवेट करावे लागते, तर कधी ती स्वतःच आपलं बघून मोटीवेट होतात.
तुम्हाला शुभेच्छा!

रैना छान लिहिलंस. माझी मुलं लहान असल्यापासून मी वाचते त्यांच्यासाठी आणि चांगला योगायोग म्हणजे ज्या पाळणाघर कम प्रीस्कूल मध्ये ती गेली तिथे वाचन हा दिवसाच्या रुटीनचा अविभाज्य भाग आहे. पुर्वी जास्त वेळा लायब्ररीच्या स्टोरी टाइअम्ला पण जाणं व्हायचं. मागच्या वर्षीपासून बजेट कमी झाल्याने एक एक शिक्षक कमी झाला आहे पण तरी लायब्ररीच्या ट्रीपा कमी असल्या तरी आहेत. त्यांनी खरं अगदी ४-५ वयापासून मुलांना ऑथर वगैरे वाचायला सुरुवात केली. मग आम्ही घरी त्याचा आधार ठेऊन मराठीतले "माधुरी पुरंदरे" वाचायला सुरुवात केली. यावेळच्या वारीत "चिंटू" आणलंय. कितपत कळतंय माहित नाही पण घेऊन येतात मध्ये मध्ये. त्यांना मराठी वाचता येईल का माहित नाही पण घरी आजही रात्री एकतरी पुस्तक पालकांकडून वाचून घेतल्याशिवाय त्यांना झोपायचं नसतं. मध्ये रियल लाइफ स्टोरीज सांग म्हणूनही फर्माइश होती. मला वाटतं गोष्टी/कविता वगैरे मुलांना जनरली आवडतात. त्या अनुषंगाने वाचन वाढवता येईल.

मोठ्याला कधी कधी ल्हान्याला वाचून दाखव म्हणून एन्करेज करत असतो. शाळेत रोजच्या होमवर्कमध्ये १५ मिनिटं वाचन असल्यामुळे प्री-स्कूल नंतरही वाचनात खंड पडला नाही. आता पुढच्या काळात ही आवड किती राहते माहित नाही आणि धाकट्याच्या बाबतीत अजून माहित नाही पण आम्ही आमच्यातर्फे जे काही लहान वयात सुरु केलं पाहिजे ते केलंय. स्क्रीन टाइमऐवजी पुस्तक असं मी तरी बरेचदा करते पण तसंच माझा नवरा करेल असं काही नसतं Happy

गजानन ची पोस्ट जबरी आहे. जेथे तेथे पुस्तके 'टाकून' ठेवण्याबाबत तर प्रचंड सहमत. मला आवड कदाचित त्यानेच लागली होती.

बाकी लो अटेन्शन स्पॅन मुळे पुस्तके वाचली जात नाहीत, की बरोब्बर उलटे आहे याबद्दल मला अनेकदा प्रश्न पडतो :).

Pages