आजची लहान मुले आणि वाचन

Submitted by सनव on 2 February, 2016 - 01:08

आमच्या लहानपणी घरी एक कृष्णधवल टीव्ही..त्यात दोनच चॅनल्स. मोबाईल इंटरनेट नव्हतंच. त्यामुळे वाचनाची आवड सहजपणे लागली. पुस्तकांनी बरंच काही दिलंय आयुष्यात...आता मोबाईल इंटरनेट केबल सगळं असलं तरी लहानपणापासूनची वाचनाची सवय सुटली नाही. अजूनही किंडल वगैरे असूनही मला पुस्तकं हातात धरुन वाचायलाच जास्त आवडतात.
पण पुढच्या पिढीपर्यंत ही आवड कशी पोचवावी? आपली मुलं जन्माला येतात ती या स्मार्टफोन टॅबलेटच्या जगातच. अशावेळी पुस्तकांशी त्यांची ओळख कशी करुन द्यावी? अटेन्शन स्पॅन कमी असणार्‍या या आजच्या जगात रात्री जागून एखादं लिटल विमेन वाचून पूर्ण करण्याचा आनंद माझ्या मुलीलाही स्वतः अनुभवायला मिळावा यासाठी मी काय करु शकते?
इथे मला पाठयपुस्तकांचं वाचन अभिप्रेत नाही. पण 'वाचू आनंदे' अर्थात वाचनाचा आनंद घेण्यासाठी केलेलं वाचन...हे अभिप्रेत आहे. इतर अनुभवी पालक-शिक्षक-लेखकांचे विचार जाणून घ्यायला आवडेल. तुमची मुलं वाचतात का? जर हो तर ही आवड जोपासायला तुम्ही काही विशेष प्रयत्न केले का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा मुलगा सध्या तरी प्रचंड वाचतो ( वय सात, इयत्ता दुसरी). आणि बर्‍याचदा जे मिळेल ते वाचतो. परिक्षेच्या आधी अभ्यासाचं पुस्तक वाचायला सांगितल्यावर ते सोडून रुममध्ये इतर पुस्तक वाचत बसलय हे नेहेमी दिसतं. ( मी पण तेच करायचे). शाळेच्या बसमधून येताना आपलं घरून नेलेलं पुस्तक शेजारच्या दादाला वाचायला देवून त्याचं इतिहासाचं ( इयत्ता आठवी) पुस्तक वाचायचा पराक्रम पण करून झालाय. जेवण्याच्या टेबलावर पुस्तक / वर्तमानपत्र वाचत बसायचं नसतं हे रोजच सांगावं लागतं. रोज किमान एक तरी अवांतर पुस्तक वाचल्याशिवाय आम्हाला रात्री झोपायचं नसतं.

ही सवय लागण्यासाठी मला तरी खूप वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत. घरात पुस्तकं उपलब्ध करून देणं आणि अगदी लहानपणापासून घरातल्या सगळ्यांना त्यानी पुस्तकं वाचताना बघणं इतकंच केलं. तो वर्षभराचा असताना बहूतेक पहिलं पुस्तक आणलं असेल त्याला. त्याच्यासाठी आणलेली पुस्तकं त्याला वाचता येत नसतानाही हाताळायला द्यायचो. शिवाय घरात आमची पुस्तकं सगळीकडे विखुरलेली असायची. तो मला पुस्तकं वाचताना बघायचा. तो दोन- तिन वर्षांचा असताना आमच्या घरी माझी एक वाचनची आवड असलेली जाऊ वर्षभर रहायला होती. रोज रात्री लेक तिच्याबरोबर झोपायचा. झोपायच्या आधी तिच्या सवयीमूळे ती काही ना काही वाचायची? ते बघून लेक पण रोज रात्री बेडशेजारी पुस्तकांचा ढीग रचून ही माझी लायब्ररी आहे असं म्हणत सगळ्या पुस्तकातली पानं उलट्त गोष्टी सांगायचा.

आता आम्हाला त्याच्यासाठी पुस्तकं विकत आणणे, त्याला लायब्ररीत नेणे, पुस्तकप्रदर्शनांना त्याला आवर्जून नेणे, त्याच्यासाठी मराठी, इंग्रजी आणी हिंदी अशा तिन्ही भाषेचे शब्दकोष आणून देणे इतकंच करावं लागतं.

अल्पना....तुमच्या मुलाच्या या सवयीबद्दल मी त्याचे (आणि तुमचेही) हार्दिक अभिनंदन करत आहे.

मोबाईल प्रदर्शनापेक्षा "पुस्तकप्रदर्शनांना त्याला आवर्जून नेणे..." हे तुम्ही जे करता ते कौतुकास्पद आहेच आहे.

फार अनुभव गाठीशी आहे असे नाही, पण सुरुवातीला हे काही आम्ही केलेले उपाय. यांच्यामुळे "आता आजच्या मुलांना वाचनाची आवड कशी लावता येईल?" या आम्हालाही पडणार्‍या प्रश्नाची भिती आधीपेक्षा कमी झाली आहे.

१) जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पुस्तक प्रदर्शनांना घेऊन जाणे. तिथे गेल्यावर त्यांना हवी तशी पुस्तकं चाळू देणे. (पसारा केला, नीट लावलेली पुस्तके विस्कटून ठेवली तरी ठेवू दे. आपण नंतर नीट लावून ठेवावीत.) तिथे लहान मुलांसाठी पुस्तकांव्यतिरिक्त आणखी काही असेल (चित्रांच्या पुस्तकांचा, रंगकामाच्या किंवा हस्तकलेच्या वस्तूंचा विभाग वगैरे) तर तेही निवांत बघू देणे. नंतर त्यांनाच विचारून त्यांना आवडलेल्या पुस्तकांची खरेदी करायची. त्यात एखाद दुसरे आपल्याला 'हवीत अशी वाटणारी' पुस्तकही कोंबावे. आम्ही जेंव्हा मुलीला तिने निवडलेल्या पुस्तकांवर ही आमची पुस्तकेही "हे बघ ही मला आवडली, म्हणून ती पण घेऊ या का" असे सांगितल्यावर "अय्या, ही पण!" म्हणून खूप आनंद होतो.

२) आणलेल्या पुस्तकांचे घरातल्या शक्य असतील त्या लहानमोठ्या सदस्यांना सोबत घेऊन सामुदायिक वाचन करणे. वाचताना आपल्याला जसे जमतील तसे ( जरा जास्तच ) हावभाव करून दाखवणे. जेणे करून पुस्तकांमध्येही गंमतजंमत असते, ही जाणीव त्यांना होईल.

३) घरात इथे तिथे पुस्तके "टाकून" द्यावीत, जेणे करून येता जाता कधीतरी का होईना मुलांची त्यांच्याशी टक्कर होईल.

४) पुस्तकातील एखादा मुलांना आवडलेला प्रसंग हेरून ठेवावा आणि एखाद्या शनिवारच्या किंवा रविवारच्या निवांत दुपारी त्या प्रसंगाचे चित्र मुलांबरोबर काढून रंगवावे. यासाठी चांगली चित्रकला अवगत असायला हवी असे नाही, आपल्याला जी चित्रकला येते तीही यासाठी रग्गड असते. (आता पुस्तक वाचत असतानाच मुलगी तिथेच ठरवून टाकते, की पुढच्या वेळी आपण अमुक अमुक प्रसंगाचे चित्र काढायचे.)

असे करताना आधीचे 'आपण वाचायचे आणि तिने ऐकायचे' हे चित्र हळूहळू 'वाचण्यासाठी पुस्तक तिच्या हातात जाणे' इथपर्यंत गेले. आणि मग कधी कधी तंद्री लागली तर " आता झोप! रात्र फार झाली, सकाळी उठून बस वाचत." असेही संवाद घडण्याइतपत गाडी पुढे आली आहे.

सुरुवातीला खूप वाटते, की मुलांनी हे वाचावे, ते वाचावे, अमक्याच्या वाचनात गुंगून जावे, तमक्यात रंगून जावे. पण जेंव्हा सुरुवात करतो तेंव्हा हे जाणवते की आजूबाजूच्या हजार प्रकारच्या प्रलोभनांमधून पुस्तकांपर्यंत मुलांनी पोहचणे हाच एक वळणाचा प्रवास होऊन बसला आहे.

मुलांना अक्षरओळख नसेल तर मागे रैनाने कोणत्यातरी बाफावर सुचवलेली ज्योत्स्ना प्रकाशनाची माधुरी पुरंदर्‍यांची चित्रवाचनाची पुस्तके म्हणजे उत्तम पर्याय आहे. ती पुस्तके मोठ्यांनाही आवडावीत अशी आहेत.

अशोकमामा गेली चार वर्ष तो आणि मी इथे दिल्लीत भरणार्‍या वर्ल्ड बुक फेअरला जात आहोत. तिथल्या किड्स पॅव्हिलॉनमध्ये तिन-चार तास घालवून परतताना ज्योत्स्ना प्रकाशनाच्या स्टॉलला भेट द्यायची असं आमचं रुटीन आहे. यावर्षी ज्योत्स्नाच्या स्टॉलवरच्या काकांनी हा दरवर्षी इथे येतो म्हणून त्याचं खूप कौतूक केलं. Happy

ग्रेट अल्पना....वर्ल्ड बुक फेअरचा तुम्ही उल्लेख केला....आणि झटदिशी नजरेसमोर आले ते प्रगती मैदान. मीही तिथे गेलो आहे. "पुस्तकांमुळे वेड लागते..." असे म्हणायचे असेल त्यानी जरूर दिल्लीतील वर्ल्ड बुक फेअरला भेट द्यावी...आपल्या मुलाबाळांसह. मला वाटते फेब्रुवारीमध्येच भरते हे प्रदर्शन....यंदाच्या तारखा समजलेल्या नाहीत; तरीही तुम्ही चिरंजीवांना याही वर्षी घेऊन जाणार हे गृहीतच धरतो.....त्याची आवड अशीच खुलत राहू दे...कौतुकास्पद आहेच आहे.

सनव तुम्ही अल्पना आणि गजानन यानी दिलेली उदाहरणे....जी नेमकी आणि प्रभावी आहेतच...वाचा आणि त्याचे अनुकरण तुमच्या मुलीसाठी करा....तेच उपयोगी वाटेल.

गजानन, अगदी परफेक्ट लिहिलंय. मुलांना पुस्तकं हाताळायला देणं आणि आपणही त्यांच्यासमोर भरपूर पुस्तकं वाचणं या दोन महत्वाच्या गोष्टी. तू हे पुस्तक वाच किंवा वाचत जा गं / जा रे असं सांगून मुलं पुस्तकं वाचत नाहीत. पुस्तकांनी भरलेल्या घरात, पुस्तकं आवडणार्‍यांच्या घरात वाढताना बहूतांशी मुलांना वाचनाची आपोआप आवड निर्माण होते.

मुलीच्या शाळेच्या लायब्ररीतून दर आठवड्याला एक पुस्तक येते, ते झोपताना वाचून दाखवतो.
सध्या तरी पुस्तके '१० चित्र आणि ५ ओळी गोष्ट' अशी आहेत पण 'पुढे काय झालं' ही उत्सुकता निर्माण झाली तर वाचनाची आवड लागू पण शकते.

अल्पना....११ ते १७ जानेवारी....याच दरम्यान पिंपरीचिंचवड इथेही मराठी साहित्य संमेलनाच्याही तारखा (१५ ते १८ जानेवारी) होत्या. तिथेही खरेदीचा असाच उत्सव दिसला. ५ कोटी रुपयांची उलाढाल, पुस्तक खरेदीबाबतची....स्टॉलवर पुस्तके शिल्लक नाहीत अशा बातम्या झळकल्या....त्यामुळे मलाही असे चित्र सुखावहच वाटले. लोक करतात पुस्तकांची खरेदी यात संदेह नाही, फक्त मुलांमुलीमध्ये आवड निर्माण करणे...जी अगत्याचीच बाब मानली जावी...इतकेच पालकांच्या हाती असते.

अल्पना आणि गजानन, सहीच !!
मी पण लकी आहे. माझ्या मुलाला पण वाचायला प्रचंड आवडतं. माझ्यासारखा माझ्या मुलाला वाचाण्याचा छंद असायलाच हवा याबद्दल आग्रही होते. Baby's day out ची प्रेरणा घेवुन मी त्याला ८-१० महिन्याचा असल्यापासुन पुस्तक उघडुन चित्र दाखवत गोष्टी सांगायचे. त्याचं पहिलं पुस्तक '365 Bed time stories' हा आमच्या दोघां मधला soft bond आम्ही अजुन जपुन ठेवला आहे.

हल्ली मुल cranky झालं कि त्याच्या हातात मोबाइल कोंबुन टाकतात तसं तो बोअर झाला कि आम्ही स्टोरी बुक समोर टाकायचो. सुरुवातीला पाने चुरगाळणे, मग चित्र एकटक पहात रहाणे, मग पाने उलटणे असं करता करता त्या चित्रांबद्दल उत्सुकता आणि माहिती वाचुन ती समजुन घेणे अशी प्रगती झाली असावी.

त्याला झोपताना, जेवताना, आंघोळ करताना, सतत गोष्टी ऐकण्याचं व्यसन लावलं होतं आणि नंतर बर्‍यापैकी वाचायला यायला लागल्यावर आता गोष्टी सांगणार नाही तर तुझ्या तुला वाचाव्या लागतील हे डिक्लेअर केलं. शिवाय रोज एक गोष्ट ऐकण्यापेक्षा एका दिवसात २-३ किंवा हव्या तेवढ्या गोष्टी वाचायला मिळतील हे अमिष होतंच. आई बाबांनी वाचलेलीच गोष्ट ऐकण्यापेक्षा आपल्याला आवडतील त्या विषयावरची पुस्तकं वाचायला मिळतात हे कळल्यावर ऐकण्यापेक्षा वाचण्याचा जोर वाढला.

जे आपण करू ते अनुकरण मुलं करतात. त्यामुळे माझा मुलगा लहान असताना मी रोज रात्री झोपायच्या आधी एक पुस्तक वाचत बसायचे. आपोआप मुलाने सुद्धा हा गुण उचलला. मग मी पुस्तकां साठी कपाट घेतलं आणि माझी पुस्तकं त्यात छान ओळीने लावून ठेवली. साहजिकच मुलाला सुद्धा स्वताची पुस्तकं घेवून लावावीशी वाटू लागली आणि आम्ही प्रदर्शना ना भेट देउन भरपूर पुस्तके घेऊ लागलो.
आता माझ्या पेक्षा माझ्या मुलाची पुस्तके जास्त आहेत आमच्या घरी. माझी पुस्तकं ठेवायला जागा नाही अस म्हटलं तरी चालेल.
आणि मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा माझे पती त्याला रोज रात्री एक तरी गोष्ट वाचून दाखवायचेच. अशाने त्याची उत्सुकता खूप वाढायची.
तसंच पुस्तके ठेवायची( जोपर्यंत ती वाचून होत नाहीत) काही विशेष अशी जागा नसावी. कुठेही कधीही इच्छा झाली कि पुस्तकं मिळायला हवं. ते वाचण्या बाबत काही निर्बंध नसावेत. म्हणजे नेहमी अशीच पुस्तके वाचा तशी नको असे उपदेश करू नये. वाचनाची आवड लागली कि आपोआप बौद्धिक पातळी वाढत जाते. मला स्वताला लहानपणी फक्त कादंबऱ्या आवडायच्या. मग ऐतिहासिक पुस्तकं आवडू लागली. मुलाला रहस्यमय आवडतात. पतींना लहान मुलांच्या गोष्टी आवडतात. ज्याला जे आवडतं ते वाचू द्यावं.
आणि सगळ्यात शेवटी... जर एखाद्यला वाचायची आवडच नसेल तर वाच, वाच म्हणून जबरदस्ती करू नये. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती....

अल्पना आणि गजानन +११

माझी मुलगी पण खूप वाचन करते. (वय ९ वर्शे)

घरी आम्हाला सगळ्यांनाच वाचायची आवड आहे. ती लहान असताना आम्ही तिला आवडतील अशी पुस्तके वाचून दाखवायचो. तिला पुस्तकं हाताळायला द्यायचो.
नंतर तिला वाचता यायला लागल्यावर तिला वेगेवेगळ्या विषयांवरची पुस्तके आणून दिली. आता तर कुठली पुस्तकं आणायची हे तिच सांगते.

मला वाटतं, मुलं लहानपणापासूनच आजूबाजूला वाचणारे बघत असतील आणि त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे/आवडीप्रमाणे पुस्त़कं उपलब्ध असतील तर त्यांना वाचनाची आवड नक्की निर्माण होइल. अचानक मोठं झाल्यावर वाच म्हणून वाचलं जाणार नाही.

मला आणि माझ्या नवर्याला वाचनाचे प्रचंड वेड आहे, रोज काही ना काही वाचत असतो आम्ही..

घरी सर्व प्रकारची पुस्तके पण खुप आहेत. माझे आई-बाबा वर्षातील ५-६ महिने आमच्याकडे असतात. त्यानासुद्धा वाचनाचा खुप छंद आहे..

ईतके सगळे वाचनवेडे आजुबाजुला असुन पण मुलाला ( वय वर्षे ९ ) आजिबात वाचन आवड नाही.

वरचे सर्व प्रतिसाद वाचले... त्यापैकी सगळे काही करुन झाले आहे...

सनव,
माझी मुलगीही ( ९) खुप वाचन करते. इंग्रजी, मराठी आणि हिंदी तिन्ही भाषांमधली पुस्तकं वाचते. शाळा इंग्रजी माध्यमाची असल्याने अर्थात इंग्रजी वाचन जास्त, त्याखालोखाल मराठी. थोडेफार जपानीही वाचते

ती सहा सात महिन्याची असल्यापासुन ( साधारण बसता यायला लागले ) आजुबाजूला तिच्यासाठी भरपूर पुस्तके असतात. पुस्तकांना हाताळु दिलं, चित्र बघु दिली. आम्ही वाचुन दाखवली. एखादे इंग्रजी पुस्तक रोज वाचुन वाचुन पाठ झाल्यावर त्याचीच पाने उलटत ते पुस्तकं मराठीत तिची ती वाचल्यासारखं ( म्हणजे तीला आठवेल तसा अनुवाद) करायची तेव्हा मज्जा यायची. आम्हालाही पुस्तक वाचताना ती पहाते त्यामुळे पुस्तक वाचणे ही रोजची आणि महत्वाची गोष्टं आहे हे तीला कळले असावे.

रोज रात्री झोपताना वाचल्याशिवाय झोपत नाही आणि आता त्यावरुन कधीकधी झोपायला उशीर झाल्यावर 'आज वाचु नकोस' म्हणुन ओरडाही खाते Lol
तिची लहानपणाची पुस्तकं कुणाकुणाला दिली तरी आत्ता तिच्याकडे सुमारे अडिचशे पेक्षा जास्त पुस्तकं असतील. तिच्या रुममधे इतर फर्निचर काहीच नाही पण पुस्तकांचे मोठ्ठे कपाट आहे.
तिच्या शाळेत साधारण दर महिन्या दिडमहिन्याला पिटीआय असते त्यावेळे पुस्तक प्रदर्शन असते. त्यावेळी हमखास पुस्तक खरेदी होते. त्याशिवाय आसपासच्या पुस्तकप्रदर्शनात एकत्र भेट देतो. ऑनलाईन पुस्तके विकत घेतोच.
तीला फोन आणि टिव्ही दोन्हीची आवड अजुनतरी नाही. रिकामा वेळ सगळा पुस्तकांच्या वाचनात जातो.

अल्पना म्हणाली तसे अभ्यासाच्या वेळात आणि जेवतानाही पुस्तक वाचायचे असतेच.

गजानन, तुमची चित्र काढायची कल्पना फार आवडली. प्रयत्न करुन बघणार.

कायरे येथे सगळ्याचीच मुले वाचन कारतात तशी माझी का नाही वाचत????..
मलाही वाचायला खूप आवडते.. पण माझ्या मुलांना नाही... कारण ते इतके TV ला अद्दीच्त झाले आहेत...त्यांना या पासून दूर करण्यासाठी काय करावे..
मी जिथे राहतो तेथे असे पुस्तक प्रदर्शन वगैरे असत नाही..
गाजणा उंची कल्पना मला खूप आवडली या शनिवारी रविवारी प्रयत्न करून पाहतो काहीतरी यश मिळेल..
जर कोणी हस्ताक्षर जर सुधार्वयाचे असेल तर काय करावे...

कायरे येथे सगळ्यांचीच मुले वाचन कारतात तशी माझी का नाही वाचत???? >>>>>
नाही नाही. तुम्ही अज्जिबात complex येवुन देवु नका. माझ्या सासुच्या मुलाला सुद्धा वाचायला अजिबात आवडत नाही. Proud भारंभार अभ्यासाची पुस्तकं वाचली होती वाचली कधी काळी आणि आता Management ची पुस्तकं वाचतो. ते सोडलं तर इतर कोणतंही पुस्तक रात्री झोप येण्यापुर्वी गुंगी येण्यासाठी वापरलं जातं फक्त Wink

माफ करा गजानन तुझी कल्पना असे म्हणायचे होते...

नाही काही वर्षानंतर असे होते वाचनाची आवड कमी होत जाते..

भारंभार अभ्यासाची पुस्तकं वाचली होती वाचली कधी काळी आणि आता Management ची पुस्तकं वाचतो. ते सोडलं तर इतर कोणतंही पुस्तक रात्री झोप येण्यापुर्वी गुंगी येण्यासाठी वापरलं जातं फक्त>>>>>
जे जास्त अभ्यास करतात किंवा करताना वाचतात त्याला वाचन नाही म्हणत.. त्याला फक्त अभ्यासी किडा म्हणतात.. आज काल माझे पण असे होत आहे..

जर कोणी हस्ताक्षर जर सुधार्वयाचे असेल तर काय करावे>>>>> एका वहीत पानं भरून भरून आडव्या, उभ्या, तिरप्या (दोन्ही बाजूने) , अर्धगोल (चारी दिशांना), गोल रेघा काढाव्यात. पानावरच्या जवळ जवळ सगळ्याच रेघा एकसारख्या येऊ लागल्या की अक्षरही सुरेख दिसू लागते.

अ, आ, इ, ई... , A, B, C, D... गिरवण्यासाठीच्या पाट्या पण मिळतात.

मुलांच्या बाबतीत त्यांना छंदवर्ग, खेळ इ. मधे जास्त वेळ जातो. शाळेचा अभ्यास आणि होमवर्क प्रचंड असल्याने पुन्हा वाचनासाठी वेळ नाही मिळत.

हल्ली मुल cranky झालं कि त्याच्या हातात मोबाइल कोंबुन टाकतात तसं तो बोअर झाला कि आम्ही स्टोरी बुक समोर टाकायचो. सुरुवातीला पाने चुरगाळणे, मग चित्र एकटक पहात रहाणे, मग पाने उलटणे असं करता करता त्या चित्रांबद्दल उत्सुकता आणि माहिती वाचुन ती समजुन घेणे अशी प्रगती झाली असावी.

>> गुड आयडीया Happy

हेमंती, तुमचे स्वतःचेच अक्षर किती खराब आहे बघा. गजानन यांची लिहीलयत की गाजण उंची तेच वाचता येत नाही आहे.
मुले बघून बघून शिकतात. आधी स्वतःचे अक्षर सुधारा पाहू!

Light 1

बाकी वाचनाच्या धाग्यावर लिहिण्याचे कुठले स्टेशन लावलंत मध्येच.
लिहिणे, त्यातही सुरेख अक्षरात लिहिणे हा प्रश्न वाचनापेक्षा फार फार भिन्न आहे.
सुंदर अक्षरांत लिहिण्यात शैक्षणिक भाग जास्त आहे.

आमच्या लहानपणी घरी एक कृष्णधवल टीव्ही..त्यात दोनच चॅनल्स. मोबाईल इंटरनेट नव्हतंच. त्यामुळे वाचनाची आवड सहजपणे लागली >. हे अ‍ॅझम्पशन तपासून पहा आधी . तुमच्या आसपास, शाळेत , कॉलेजात जे समवयस्क आहेत त्यांना सर्वांना वाचनाची आवड होती का ? अजून टिकून आहे का ? माझ्या लहानपणी टिव्हीच नव्हता. पण तरिही घरात / शाळेत / शेजारीपाजारी वाचनाची आवड कॉमन नव्हती. अभ्यासाव्यतिरिक्त वर्तमानपत्र देखील क्वचित वाचणारी अनेक मुलं मुली होती.

गेल्या वर्ष भरात तुम्ही, घरातल्या इतर अड्ल्ट्सनी किती व कोणती पुस्तके वाचलीत ? वाढदिवस, मुंज, ग्रॅजुएशन अशा प्रसंगात , किंवा इतर कोणी वाचावं म्हणून किती पुस्तके भेट म्हणून दिलीत ?

मुलांना लहान वयापासून वाचनाची आवड लावयला सुरुवातीला त्यांना पुस्तके हाताळायला देणे , त्यांच्याबरोबर नित्य नेमाने पुस्तक वाचणे, पुस्तकांबद्दल चर्चा करणे , थोड्या मोठ्या मुलांना तुम्हि काय वाचता त्याबद्दल सांगणे, पुस्तकांवर आधारित सिनेमे / नाटके दाखवणे, लायब्ररी मेंबरशिप घेऊन देणे, शाळेत रीडिंग ऑलिम्पिक्स टाइप स्पर्धा असेल तर त्यात भाग घेणे , वेळोवेळी पुस्तके भेट म्हणून देणे, मीट द ऑथर / बूक साइनिंग असेल त्याला नेणे, लेखकांचे लेक्चर असेल तर त्याला नेणे हे सर्व करु शकता .

ईतके सगळे वाचनवेडे आजुबाजुला असुन पण मुलाला ( वय वर्षे ९ ) आजिबात वाचन आवड नाही. >>>> नसली आवड तर काही बिघडत नाही. आमच्या घरी - आई-बाबांकडे- भरपूर पुस्तकं, वाचनास प्रोत्साहन इ इ सर्व काही होतं. तरी आम्हा भावंडांना सगळ्यांनाच एकसारखी वाचनाची आवड लागली असं झालं नाही. जी काही आवड आहे त्यातही कुठली पुस्तकं वाचायला आवडतात याबाबतीत नेहमीच एकमत होतं असंही नाही. शालेय अभ्यासक्रमात असतात ती पुस्तकं वाचली जातातच. पुढे जॉबसाठी आवश्यक पण वाचली जातात.

अवांतर वाचन हा स्वखुशीचा, आवडीचा भाग असावा सक्तीचा नाही. मग भले तिशी उलटल्यावर सुद्धा एखादी व्यक्ती फक्त चांदोबाच वाचत असेल.

तुमची मुलं वाचतात का?

=====> हो.पण पुस्तके न वाचता, गूगल, विकिपेडीया आणि युट्युब जास्त वापरतात. (काळ बदलला, ज्ञान मिळवायची माध्यमे बदलली पण ज्ञानलालसा मात्र सदैव जागृत आहे की नाही, हे महत्वाचे.)

जर हो तर ही आवड जोपासायला तुम्ही काही विशेष प्रयत्न केले का?

======> अजिबात नाही.(मुलांना कुठल्याही गोष्टीची सक्ती करू नये, असे माझे मत.)

(स्वगतः ज्याला शिकायची/ ज्ञान मिळवायची लालसा आहे, तो काहीही करून ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो आणि यशस्वी पण होतो.मुलांना उंद्ररांच्या शर्यतीत उतरवण्यापेक्षा आणि त्यांना सर्वगूण संपन्न करण्यापेक्षा, त्यांना सिंहा सारखे बनवणेच उत्तम. असे माझे मत.)

घरात वाचनाची आवड इतरांना असेल तर पाहून पाहून सुरुवातीला मुलं पुस्तकं नुसतीच धरुन बसतात असा माझा अनुभव. मी काहीही वाचलं तरी घरातल्यांना ’सक्तीने’ काय वाचतेय/वाचलं ते सांगते (मुद्दाम नाही. सवयच आहे ती पूर्वीपासून) त्यामुळेही मुलांना उत्सुकता वाचून त्यांची आवड वाढली असं वाटतं. रात्री झोपतानाही पुस्तक वाचल्याशिवाय मी झोपूच शकत नाही ते पाहून मुलगीही तिचं पुस्तक (इंग्रजी) घेऊन बाजूला लवंडते. खूपदा बाहेर गेल्यावर मुलांची कटकट टाळायला पालक त्यांना फोन, टॅबलेट इत्यादी पुढे करतात. पर्स मध्ये कारटून, चित्र असणारी पुस्तकं वगैरे ठेवून ती पुढे करावीत असं वाटतं. आता तर मुलगी जन्मापासून अमेरिकेत असूनही मराठीही वाचायला लागली आहे. ११ वर्षाची आहे. कथा लिहितानाही मी तिला कथा वाचून दाखवते आणि त्यात ती बदलही सुचवते.

आपल्यापैकी बरेच जण या संस्थळावर वाचण्याची भुक म्ह्णुन आलो असणार. (माझ्या बाबतीत तरी). त्यामुळे इथल्या बर्‍याच (सगळ्याच नाही म्हणत) लोकांच्या दुसर्‍या पिढीत ही सवय आपोआप आली असणार. त्यात आई वडील दोघांना असेल आवड तर चांसेस डबल.

आमच्या मुलाला वाचाय्चे व्यसन (दुसरे काही वाचायला नसेल तर वाचलेलेच पुस्तक २ २ -३ ३ वेळा वाचणे) आहे म्ह्टले तर वावगे ठरणार नाही. कधी कधी त्यावरुन झॅकपॅक सुरु असते. आणि याचे एक कारण आमच्या घरी टीव्ही नाही हे असावे. नेट वर वाचन असे जास्त होत नाही. ४ जणांची ४ पुस्तके लायब्ररीमधुन आणने आणि ती वाचणे हे कायम सुरुच असते.

वाचनाच्या सवयीचा त्याला झालेला फायदा म्हणजे त्याचे ग्रास्पिंक बरेच वाढले आहे . त्याला शक्यतो समजवुन द्यावे लागत नाही, वाचुन समजते. अभ्यास करताना बर्‍यापैकि इन्डीपेंड्न्सी आली आहे.

पहिल्यांदा त्याने काय वाचावे हे आम्ही ठरवत होतो पण निपोंनी एक्दा तसे न करण्याचा सल्ला दिला आणि तो आम्ही अमलात आणला.

मला वाचनाची आवड शाळेत असल्यापासूनच होती. चौथी ते सातवी मधे श्रीमान योगी, राधेय, कौंतेय, म्रुत्युंजय. नाझी भस्मासूराचा उदयास्त, स्वामी, छावा, आलमगीर, झुंज, झेप इ. वाचून झाले होते. नंतरही फुटकळ चालुच होते. पुढे वाचनाचं वेड वाढत गेलं. या दरम्यान मित्रमंडळी, भाऊ मस्तपैकी जगाच्या शाळेत शिकून व्यवहारदक्ष झाले. नंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनीही सिलेक्टीव्ह वाचन ठेवलंच. वाचनासाठी लहानपणी मिळालेली शाबासकी एव्हढंच भांडवल. त्यापैकी बहुतेक ग्रंथ आज निरूपयोगी वाटतात. त्या तख्तपोशी आणि त्याकडे नजर लावून बसलेले राजे महाराजे आजच्या काळात काही कामाचे नाहीत.

जीवनात यशस्वी होण्यासाठी म्हणून वाचली गेलेली पुस्तकं पण पुस्तकी किड्यांसाठीच असतात. त्यातलं किती घ्यायचं, किती सोडायचं हा अनुभव येण्यासाठी मुलांना योग्य त्या वयात योग्य ते सर्व शि़क्षण मिळायला हवं. वाचन वाया गेलं असं नाही. पण वाचनाचं टोकाचं वेड पण असू नये असं आता वाटतं. मुलींशी बोलताना पण जडशीळ शब्दांची अवजड वाक्यं वापरल्याने त्यांनी टाटा बाय बाय करण्यात धन्यता मानली. हसवणारी मुलं जास्त वाचन नसतानाही यशस्वी होताना पाहून स्वतःचा फार राग यायचा त्या काळी. असो.

बाबा आदमच्या जमान्यातले अनुभव आमचे. कुणाला काय इंटरेस्ट असणार म्हणा त्यात ! हल्ली वयाप्रमाणे धार्मिक पुस्तकं वाचत असतो आणि अंनिसची पण वाचतो. त्यातून आणखीच केमिकल लोचा होत चालला आहे.

Pages