झाड वडाचं

Submitted by विद्या भुतकर on 26 January, 2016 - 12:32

मागच्या आठवड्यात एका मराठी चित्रपटात मला वडाच झाड दिसलं आणि मी त्या हिरोला सोडून झाडाकडे बघत होते. कारण वडाचं झाड मला फार आवडतं. अगदी शाळेत असल्यापासून. लहानपणी जेव्हा मला कळलं न की त्याची मूळं झाडावर असतात, खूप आश्चर्य वाटलं होतं. कोरेगावात भरपूर वडाची झाडं पाहिली. आजही कोरेगावच्या वेशीतून आत जाताना दोन्ही बाजूनी पारम्ब्यांची कमान घेऊन ही आपल्या सावलीने स्वागत करतात. गेल्या वर्षात खूप काही बदललं आहे गाव, पण ती माझ्या गावाची खूण आहे माझ्यासाठी न बदललेली. मला एक कळत नाही, त्यांच्या पारंब्या बरोबर अर्ध गोलाकार कशा राहतात रस्त्यावर? गाड्या टेकून त्यांना तसा आकार येतो की कुणी देतं? असो.

आम्ही खूप लटकायचो लहानपणी त्याच्या पारंब्यांना. मध्ये सानू आणि स्वनिकलाही एकदा तो खेळ दाखवला. पण माझ्या हाताची कातडी सोलली गेली आणि तेवढा जोर आता अंगात नाही असं नक्की वाटलं. पण पोरांना मजा आली. पुढे सांगली किंवा पुण्यात माझा इतका संबंध नाही आला त्याच्याशी. मुंबईत TCS चं एक ऑफिस होतं, बनियन पार्क. लहान असताना मजेशीर वाटायचं हे नाव, बनियन ट्री असं कुणा झाडाचं नाव असू शकतं का? त्या मुंबईतल्या ऑफिसचं नावंच फक्त बनियन पार्क होतं. झाडं कमीच. अमेरिकेत तर काही कुठे दिसलंच नाही.

काय विशेष आहे बरं या झाडाचं ? ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व. एखाद्या वृद्ध ऋषीसारखं तेही आपल्या जटा वाढवून बसलेलं, आपली सावली सर्वांना देण्यासाठी. त्याच्या पारंब्याची कल्पना मला एकदम भारी वाटते. मुळातून सर्वच रुजतात, वाढतात पण फांद्यानाही रुजू द्यावं, वाढू द्यावं आणि त्यांनी मूळ बनून अजून फांद्यांना वाढवावं. किती मस्त कल्पना आहे न. कित्येक शिक्षण संस्थांनी आपलं मानचिन्ह म्हणून या झाडाला यासाठीच निवडलं असावं. विद्यार्थ्यांना शिकवावं आणि त्यांनी पुढे जाऊन अजून ज्ञान वाढवावं, पसरावं. आणि त्या संस्थेने अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या झाडासारख ऋषी बनावं. तीच कथा सावित्रीच्या गोष्टीची. मी कधी वडाची पूजा केली नाही वटपौर्णिमेला. तरी मला वाटतं की माझ्या घराचा वंश असाच वाढावा, पसरावा हे दर्शविण्यासाठी या सारखं दुसरं झाड नाही. फक्त पूजेसाठी कुणी त्याच झाडाच्या फांद्या तोडू नयेत हिच विनंती.

गेल्या दोन वर्षात कोथरूड कडून खराडीकडे जाण्याच्या रस्त्यावर मी बरीच वडाची झाडं पाहिली. काही ठिकाणी झाड न तोडता रस्ता रुंद केलेलाही पाहिला. पण बऱ्याच ठिकाणी ही भली मोठी भव्य बुंध्याची झाडं अगदी छाटून टाकली होती. अशी बोडकी झाडं पाहायला फार कसंतरी वाटलं. किती तरी वर्षं पुढे त्यांनी सावली, हवा आणि वारा दिला असता. खूप वाईट वाटलं. पण साधारण २-३ महिन्यांनी पाहिलं तर त्या छाटलेल्या बुंध्याला कुठेतरी कोपऱ्यात पानं आली होती. एकाद्याची पारंबी अगदी जमिनीला टेकली होती. कितीही लुटलं, पडलं तरी पुन्हा जिद्दीने उभं राहणं याला म्हणावं. तेव्हापासून मी वडाची अजूनच मोठी fan झाले आहे.

अशा एक ना अनेक कारणामुळे प्रिय असलेलं हे झाड, वडाचं.

-विद्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वडाच्या झाडाचा बुंधा हा मोठा अवाढव्य असतो. आम्ही लहाणपणी त्याच्यात लपाछपी खेळायचो. या झाडावर चढणे त्यामानाने सोपे असायचे. पारंब्यांना लोंबकळून झोके घ्यायला जाम मज्जा यायची. रात्री याच झाडाखाली बसून आम्ही खेकडे वगैरे भाजून खाल्लेत. असो.
लेखन खूप आवडले.

मस्त लिहीलय विद्या. शीर्षक पाहून लगेच क्लिक केलं. Happy
आणि मी त्या हिरोला सोडून झाडाकडे बघत होते. >>> Proud

काय विशेष आहे बरं या झाडाचं ? ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व. >>> हे आवडलं विशेष. झाड म्हणजे एखादं माणूसच !!
तेव्हापासून मी वडाची अजूनच मोठी fan झाले आहे. >>> अनेक जण असतील. त्यांच्या भावना शब्दबद्ध झाल्यात अगदी.

हे लिखाण ग्रुपपुरतं मर्यादीत ठेवलंय का ? त्यामुळे मायबोलीवर सदस्यत्व नसल्यास किंवा ललित ग्रुपात नसल्यास ते दिसणार नाही. सार्वजनिक केल्यास ते सर्वांना दिसेल.

खूप छान! मला आमच्या कैंपमध्ये भलं मोठं वडाच्या झाडाची आठवण झाली. कैंपमधलं आमचं हटमेड म्हणजे दीड खणीचं एक वीटी भिंतीच घर! दिवसाचा अर्धा वेळ ह्या झाडाच्या सहवासात जायचा. ते झाड इतकं प्रचंड होतं की प्रत्येक रुतुत कुठल्या न कुठल्या भागात सावली असायची .... नॉस्टलजिक केलंस! धन्यवाद!

Thank you Manjutai. Mala mahit navte ki group var fakt share jhale ahe.
Ani sarvana comments baddal hi dhanyavad.
Phone varun Marathi lihine jamat nahiye.
Tumhi ya posts share karu shAkta majhya Facebook page varun.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Vidya.

छान लिहिलय.
आमच्या सोसायटित होते वडाचे झाड चौथ्या मजल्याच्या माझ्या बाल्कनित त्याची फांटी यायची आणि समोर विशाल पसरलेला वृक्ष.

खुप छान वाटायचा त्याचा सहवास.त्याच्यावर लालचुटुक फुळ यायची तेव्हा पक्षांची मेजवाणी असायची.खुप प्र्कारचे पक्षी दिसायची पिवळ्या,हिरव्या,काळ्या रंगाची वेग-वेगळी आवाज काढणारी. आत-आत पानात वटवाघळ लटकलेली. त्यालाच लागुन पिंपळाचे पण झाड होते त्याच्यापेक्षा उंच एकमेकात मिसळुन गेलेली पण का कुणास ठाऊक याच्या पुढे मला ते पिंपळ वृक्ष घमेंडी वाटायचे माझ्या रोजच्या जिवनात ते सहभागी असायचे..

छान ..

कुणाला पुणे सातारा जूना रोड आठवतोय ? रुंदीकरण करताना शेकडो वडाची झाडे कापली गेली होती.. ३/४ फूट व्यासाचे बुंधे होते त्यांचे.

माझे हे वडाचे झाड मुंबई मधे सांताक्रुझ सारख्या गजबजलेल्या सोसायटित आहे.
त्याच्यावर जेवढ्याप्रकारचे पक्षी मी पाहिले तेवढे दुसरी कडे कुठेच पाहिले नाहित.

छान आठवणी आहेत, वडाच्या झाडाच्या.

दिनेश, हो, मला आठवतात पुणे-मुंबई हायवेवरची वडाची झाडं. पुणे विद्यापीठातलं वडाचं झाडही आठवतं.

कलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्ड्नमधे प्रचंड मोठा आणि जुना वड बघितला होता.

अवांतरः ऐका

वडाच्या झाडाचा संदर्भ असलेली कविवर्य बा. भ. बोरकरांची एक कोकणी कविता, पु. ल. देशपांडे यांच्या आवाजात

https://www.youtube.com/watch?v=MdG3Q05koyA

फर्गुसन कॉलेजच्या आवारात असलेला तीनशे वर्षांपूर्वीचा वड आहे का अजूनही ?
नगर रत्यावरचे शंभर एक वर्षांपूर्वी लावलेले वतवृक्ष तोडून टाकले. पण सणसवाडीच्या पुढे अजूनही वटवृक्ष दिसतात. मुंबईत युनायटेड इंक (पार्ले) इथे एक की दोन वटवृक्ष आहेत.

हे जुनाट वृक्ष तोडता येऊन नयेत असा कायदा नाही का करता येणार ?

खरच असा कायदा करायला हवा. धन्यवाद कमेट्बद्दल आणि वाचल्याबद्दल.
या पोस्टमुळे कळलं की प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं. आणि त्याच्याशी झोडलेल्या आठवणीही. नक्की सान्गा इथे सर्वाना.

विद्या.

लहानपणी जेव्हा सुट्टीत गावी जायचो तेव्हा वडाच्या पारावर खूप खेळायचो. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. दुपारी घरचे सगळे झोपले किंवा बाहेर गेले असले कि त्यांचा डोळा चुकवुन वडाच्या पारम्ब्यांवर झोके घ्यायचो आणि जेव्हा आज्जी- आजोबांना कळायचं तेव्हा खूप ओरडा पडायचा. म्हणायचे तिकडे जाऊ नका, भूत आहे त्याच्यावर. पण आम्हाला काही फरक नाही पडायचा. दिवसभर उन्नाडायचो तिकडे, पण रात्री त्या झाडाकडे अजिबात बघायचो पण नाही कारण खरच तिकडून भूत येईल अस वाटायचं…. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी… Sad Sad

छान आहे लेख Happy
पोस्टमुळे कळलं की प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं. आणि त्याच्याशी झोडलेल्या आठवणीही. नक्की सान्गा इथे सर्वाना. >>>>>>>>>>.. माझीही अशीच एक आठवण आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मेन बिल्डींग आनि त्याच्या आवरात असलेले गोकर्ण चिंचेचे झाड्,,लहानपणापासुन ते झाड माझ्या मनात कोरलेले आहे.त्यांचे खोड इतके मोठे की ४ माणसाच्या कवेत मावेल.मधे ते झाड कोसळले अशी पेपर ला बातमी वाचली ,,नकळत डोळ्यांत पाणी आल.आता मात्र त्या उरलेल्या खोडा च्या भागातुन ही पालवी फुटलेली दिसते.आनि आशा वाटते की परत हे झाड मुळ रुपात भेटीला येइल. Happy