माझ्या चाली!

Submitted by प्रमोद देव on 25 January, 2016 - 01:11

चाली लावणे हा माझा छंद आहे आणि आजवर मी बर्‍याच चाली लावलेत...गाण्याचं रीतसर शिक्षण झालेलं नसलं तरी आजवर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायकांपासून ते हल्लीच्या नवोदित गायकांपर्यंत अनेकांची गाणी कान देऊन ऐकत आलोय. ह्या सगळ्याचे जे तरंग मनात उमटतात, त्यातुनच मग जेव्हा कविता वाचनात येतात तेव्हा त्यांच्यासाठी सहजपणे मनातल्या मनात चाली तयार होतात...मी स्वतः एकेकाळी चांगल्या आवाजाचा गायक होतो पण आता वयोमानानुसार माझा तो आवाज राहिलेला नाहीये मात्र गाण्याचं वेड मात्र कमी झालेलं नाहीये...आणि म्हणूनच जमेल तसे गाण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो.

एखाद्याच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकेल की स्वतःला नीट गाता येत नसेल तर इतर कुणाकडून का गाऊन घेत नाही?
प्रश्न अगदी नेमका आहे आणि त्याचे उत्तर असे की मी जसा एक हौशी 'चाल'क आहे तसा/तशी कुणी हौशी' गायक/गायिका आजवर माझ्या संपर्कात आलेला/आलेली नाहीये...अगदीच नाही असे नाही...काही मोजक्या मंडळींनी माझ्या काही चाली गायलेल्याही आहेत....पण त्यात पुढे कधीच भर पडलेली नाहीये हेही वास्तव आहे.
दुसरं असं की पहिल्यापासूनच माझा पिंड हा अव्यावसायिक असल्यामुळे संगीताच्या क्षेत्रातही ही जी काही छोटीशी लुडबुड मी करतोय त्याचाही उद्देश फक्त आणि फक्त आयुष्यातला उरलेला वेळ आनंदात जावा इतकाच मर्यादित आहे आणि त्यामुळेच माझ्या चाली कुण्या नामांकित व्यावसायिक गायक-गायिकांकडून गाऊन घ्याव्यात असे मला कधीच वाटत नाही.

असो. सांगण्यासारखं बरंच आहे..पण त्याचा सारांश वर लिहिल्याप्रमाणेच आहे.
माझ्या, मलाच आवडलेल्या काही चाली मी इथे ह्याच धाग्यावर अधूनमधून सादर करत राहणार आहे....मायबोलीचे एक सदस्य कैपोचे ह्यांची सुचना मला आवडली आणि म्हणूनच मी ती इथे अंमलात आणतोय ज्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला माझ्या चाली ऐकता येतील.

मी सगळ्यात पहिली जी चाल लावली होती त्या काव्याचे रचयिता होते मायबोलीचेच एक सदस्य प्रसाद शिरगांवकर. ही चाल मी एप्रिल २००९मध्ये लावलेली आणि तीच चाल २०११च्या मायबोली गणेशोत्सवात मायबोलीचीच एक सदस्या मुग्धा कारंजेकर उर्फ रैना हिने केवळ तानपुर्‍याच्या साथीने अतिशय सुरेल आवाजात गाऊन सादर केलेली...तीच आज इथे देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=x-8WsUCJ3VQ&feature=youtu.be

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users