हिटलरने खरंच आत्महत्या केली का?

Submitted by ऋत्विका on 23 January, 2016 - 13:06

दुसरं महायुद्ध अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं होतं. जर्मनीचा पूर्ण पराभव झाल्याचं स्पष्टं झालं होतं. फॅसिस्ट इटलीने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करलीच होती. इटालियन कम्युनिस्टांनी बेनिटो मुसोलिनी आणि त्याची रखेली क्लारा पेटाक्सी यांना गोळ्या घालून त्यांच्या मृतदेहांची जाहीर विटंबना केल्याची बातमी नुकतीच बर्लिनमध्ये आली होती. ती बातमी येण्यापूर्वीच रशियाची रेड आर्मी बर्लिनमध्ये शिरलेली होती. बर्लिनच्या चौकाचौकांतून जर्मन सैनिकांचा प्रतिकार सुरु होता, परंतु पुढे झेपावणार्‍या रशियन आर्मीला थोपवण्यात जर्मन सैनिक अयशस्वी ठरत होते.

३० एप्रिल १९४५!

बर्लिनमधल्याच चॅन्सेलरीतल्या भूमिगत बंकरमध्ये एक वेगळंच नाट्यं आकाराला येत होतं.
या नाट्यातला प्रमुख कलाकार होता जर्मनीचा हुकूमशहा आणि भयानक संहाराच कर्ताकरविता अ‍ॅडॉल्फ हिटलर!

इटालियन कम्युनिस्टांकडून मुसोलिनीची झालेली हत्या आणि प्रेताची झालेली विटंबना कळल्यावर आपल्या मृत्यूनंतर आपलं प्रेतही कोणाच्याही हाती पडू नये अशीच हिटलरची इच्छा होती. आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यावर हिटलरने तशी व्यवस्था करण्याची गोबेल्सला सूचना दिली होती. दुपारी अडीच-पावणेतीनच्या दरम्यान जोसेफ गोबेल्स आणि त्याची पत्नी मॅग्डा, मार्टीन बोरमन, अ‍ॅडज्युअंट ऑटो गुन्शे, व्हॅलेट हिन्झ लिंन्ग वगैरे सर्वांचा निरोप घेऊन हिटलर आणि त्याची नवपरिणीत पत्नी इव्हा ब्राऊन बंकरमध्ये असलेल्या हिटलरच्या स्टडीत गेले. आदल्या दिवशीच हिटलरने इव्हा ब्राऊनशी रीतसर लग्नं केलं होतं!

साडेतीनच्या सुमाराला हिटलरच्या स्टडीतून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला!

सुमारे पंधरा मिनीटांनी लिन्ग आणि बोरमन यांनी स्टडीचं दार उघडून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्याकेल्या त्याला जळलेल्या बदामांसारखा प्रुसिक अ‍ॅसीडमुळे (द्रवरुप हायड्रोजन सायनाईड) येणारा वास आला! सोफ्यावर नजर टाकताच त्याला हिटलर आणि इव्हा यांचे मृतदेह दृष्टीस पडले. इव्हा सोफ्यावर हिटलरच्या डाव्या हाताला होती. तिचे दोन्ही पाय दुमडून जवळ घेतलेले होते. तिने सायनाईड खाल्ल्याचं स्पष्टं झालं होतं. हिटलरच्या विरुद्ध बाजूला तिचा देह कलंडला होता. हिटलरच्या कपाळाच्या उजव्या बाजूला बंदूकीच्या गोळीमुळे भोक पडलेलं होतं. त्याचं मस्तक समोर असलेल्या टेबलावर टेकलेलं होतं. कपाळावरच्या जखमेतून वाहणार्‍या रक्ताचं टेबलावर थारोळं झालेलं होतं. हिटलरच्या पायाशीच त्याचं वॉल्थर पीपीके ७६५ रिव्हॉल्व्हर पडलं होतं!

हिटलरचा अंगरक्षक रोचस मिश त्यावेळी बंकरमध्ये हजर होता. त्याने स्वतः बंदूकीच्या गोळीचा आवाज ऐकला नव्हता, परंतु त्याने ब्लँकेटमध्ये लपेटण्यापूर्वी हिटलरचा मृतदेह पाहिला होता. गुन्शेने दोघांचे मृतदेह पाहिल्यावर फ्यूररचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. दोन्ही मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून जमिनीवर चॅन्सेलरीच्या बागेत आणण्यात आले. हिटलरच्याच सूचनेनुसार त्यावर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात येत असताना मिश बंकरमध्येच होता. कोणीतरी ओरडलं,

"Hurry upstairs, they're burning the Boss!"

आपण वर जावं असा मिशला मोह झाला होता, परंतु अखेरीस त्याने वर जाण्याचं टाळलं! हिटलरच्या मृत्यूचा एकही साक्षीदार राहू नये म्हणू अंत्यसंस्कारांना हजर असलेल्यांना गोळ्या घालून मारण्याची त्याला भीती वाटत होती!

पेट्रोल टाकून मृतदेह जाळल्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, कारण पेट्रोलने पेटच घेतला नाही! अखेर लिन्गने पुन्हा बंकरमधून कागदाचा रोल आणला आणि त्याच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह पेटवण्यात आले! मृतदेहांनी पेट घेताच बोरमन, गोबेल्स, लिन्ग आणि इतरांनी नाझी पद्धतीने हिटलरला अखेरची मानवंदना दिली.

"हेल हिटलर!" बोरमन उद्गारला!

दुपारी सव्वाचारच्या सुमाराला लिन्गच्या आदेशाप्रमाणे हेन्झ क्रूगर आणि वेर्नर श्विडेल यांनी हिटलरच्या स्टडीमधला रक्ताने भरलेला टेबलाखालचा रग वर आणला आणि जाळून टाकला! श्विडेलला त्या रगवर हिटलरच्या रिव्हॉल्वरच्या रिकाम्या काडतुसाची पुंगळी मिळाली होती! दरम्यान हिटलर आणि इव्हाचे मृतदेह पूर्ण न जळाल्याने एस एस च्या लोकांनी पेट्रोलचे आणखीन कॅन त्यांच्या मृतदेहावर ओतले! सुमारे साडेसहापर्यंत दोघांचे मृतदेह बर्‍यापैकी जळाल्यावर इवॉल्ड लिन्डॉफ आणि हॅन्स रिसर यांनी बॉम्बच्या शेलमुळे पडलेल्या खड्ड्यात उरलेसुरलेले अवशेष पुरुन टाकले!

हिटलरच्या मृत्यूनंतर सुमारे २४ तासांनी - १ मे १९४५ च्या दुपारी ग्रँड अ‍ॅडमिरल आणि हिटलरचा उत्तराधिकारी कार्ल डॉनित्झ याने रेडीओवरुन हिटलरच्या मृत्यूची घोषणा केली. परंतु त्यापूर्वी, १ मेच्या पहाटे ४ वाजताच जनरल हॅन्स क्रेबकडून रशियन जनरन व्हॅसिली चुईकॉव्हने याला ही बातमी कळली होती! चुईकॉव्हने ताबडतोब ही बातमी क्रेमलीनमध्ये स्टॅलिनपर्यंत पोहोचवली. स्टॅलिनने रेड आर्मीचा सुप्रीम कमांडर जनरल जॉर्जी झुकॉव्हला या बातमीची खातरजमा करण्याचा आणि हिटलरचा मृतदेह शोधण्याचा आदेश दिला!

२ मे १९४५ ला लेफ्टनंट कर्नल इव्हान किलीमेन्कोच्या नेतृत्वाखाली रशियनांची एक तुकडी चॅन्सलरीत घुसली. जमिनीखालचा हिटलरचा बंकर आणि इतर सर्व गोष्टींचं निरीक्षण केल्यावर त्याने चॅन्सलरीची बाग गाठली. बॉम्बशेलमुळे पडलेल्या एका खड्ड्यात हिटलरचा मृतदेह असल्याची एका एस एस अ‍ॅड्युअंटकडून माहिती मिळताच इव्हान चुक्रॉव हा सैनिक त्या खड्ड्यात उतरला. हिटलर, इव्हा ब्राऊन आणि दोन कुत्र्यांचे जळलेले मृतदेह त्या खड्ड्यातून वर काढण्यात आले!

हिटलर आणि ब्राऊन दोघांचेही मृतदेह जवळपास जळून खाक झालेले होते. केवळ कवटीचा एक तुकडा आणि खालच्या जबड्याचा भाग आणि दात एवढ्याच गोष्टी शाबूत राहिलेल्या होत्या! या जबड्यांतील अनेक दात नकली असल्याचं रशियनांना आढळून आलं! हिटलरचा डेंटीस्ट ह्युगो ब्लॅश्क याच्याकडून हा जबडा हिटलरचाच असल्याची त्यांनी खात्री करुन घेतली! ही खात्री पटल्यावर पुन्हा दोन्ही मृतदेह पुरण्यात आले!

पुढे १९४६ च्या मे महिन्यात हिटलरचा मृतदेह उकरुन त्यातला कवटीचा तुकडा रशियनांनी मॉस्कोला नेला! या कवटीच्या तुकड्याला बंदूकीच्या गोळीमुळे भोक पडल्याचं दिसत होतं! रशियाच्या ताब्यात असताना मृतदेह अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी गाडला आणि उकरला गेला! अखेर १९७० मध्ये रशियाच्या ताब्यात असलेली हिटलरचा मृतदेह गाडलेली बिल्डींग पूर्व जर्मनीच्या ताब्यात देण्यापूर्वी केजीबीचा डायरेक्टर युरी अँड्रोपॉव्ह याच्या आदेशावरुन सुमारे १० ते ११ मृतदेहांचे अवशेष पूर्णपणे जाळण्यात आले आणि त्यांची राख बिड्रीत्झ नदीत विसर्जित करण्यात आली! हिटलरच्या मृतदेहाचं दफन झालेली जागा हे जर्मनीत मूळ धरू लागलेल्या निओ-नाझींसाठी श्रद्धास्थान ठरु नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती!

४ मे १९४५ मध्ये रशियन अधिकार्‍यांनी हिटलरच्या मृतदेहाचे अवशेष सापडल्याचं जाहीर केलं! इतकंच नव्हे तर हिटलरच्या मृतदेहाचा फोटोही दाखवण्यात आला! आश्चर्याची गोष्टं म्हणजे या फोटोत हिटलरचा मृतदेह अगदी सुस्थितीत होता! त्यावर जळल्याची कोणतीही खूण नव्हती! अर्थात हा फोटो चुकीने प्रसिद्धीस देण्यात आला होता! १० मे ला आणखीन एका रिपोर्टनुसार हिटलरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्याचा दावा रशियनांनी केला! ६ जूनला रशियन आर्मीच्या प्रवक्त्याने हिटलरने बर्लिनमध्ये आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह आमच्या हाती लागला आहे असा दावा केला! मोजून तीन दिवसांनी परराष्ट्रमंत्री आन्द्रेई व्हिशिन्स्की याच्या उपस्थितीत रशियन सुप्रिम कमांडर जॉर्जी झुकॉव्हने पत्रकार परिषदेत जाहीर केलं,

"We did not identify the body of Hitler!" he said. "I can say nothing definite about his fate. He could have flown away from Berlin at the very last moment!"

पुढे १९५२ मध्ये झुकॉव्ह म्हणाला,
"We have been unable to unearth one bit of tangible evidence of Hitler’s death. Many people believe that he escaped from Berlin!"

खुद्दं स्टॅलिनला हिटलर बर्लिनमधून निसटल्याची पक्की खात्री पटली होती! आपल्या सहकार्‍यांशी चर्चा करताना हिटलरच्या गायब होण्यामागे अमेरीका आणि ब्रिटनचा हात असल्याचा स्टॅलिनने आरोप केला होता! १९४५ मध्ये पोट्सडॅम कॉन्फरन्सच्या पूर्वतयारीसाठी मॉस्कोत गेलेल्या हॅरी हॉपकिन्सची स्टॅलिनशी भेट झाली. हिटलरच्या मृत्यूचा आणि मृतदेहाचा विषय निघाल्यावर स्टॅलिन म्हणाला,

"Soviet doctors thought they had identified the body of Josef Göbbels, Hitler’s minister of propaganda, but not Hitler! Personally, I doubt that Hitler had committed suicide as reported!"

पोट्सडॅम कॉन्फरन्समध्ये अमेरीकेचा सेक्रेटरी ऑफ द स्टेट जिमी बायर्न्सने स्टॅलिनला विचारलं,

"What is your view about the death of Adolf Hitler?"

"Hitler is not dead. He escaped either to Spain or Argentina!" स्टॅलिन उत्तरला!

खुद्दं प्रेसिडेंट हॅरी ट्रूमननी विचारलेल्या प्रश्नालाही स्टॅलिनने हिटलरचा मृत्यू झालेला नाही असं ठाम उत्तर दिलं होतं! सुमारे दहा दिवसांनी पोट्सडॅममधून परतण्यापूर्वी पुन्हा एकदा बायर्न्सने हिटलरच्या मृत्यूविषयी स्टॅलिनचं मत विचारल्यावर त्याचं पूर्वीचं मत कायम असल्याचं बायर्न्सला आढळून आलं! १९५३ मध्ये मृत्यूपर्यंत हिटलर निसटलेला आहे हे स्टॅलिनचं ठाम मत होतं!

८ ऑक्टोबर १९४५ मध्ये 'स्टार अ‍ॅन्ड स्ट्राईप्स' या अमेरीकन मिलीटरीच्या वार्तापत्रात अमेरीकन जनरल ड्वाईट आयसेनहॉवरचं एक सनसनाटी वक्तव्यं प्रकाशीत झालं.

“There is ‘reason to believe’ that Hitler may still be alive, according to a remark made by Gen. Eisenhower to Dutch newspapermen. The general’s statement reversed his previous opinion that Hitler was dead!”

हिटलरचा बर्लिनमध्ये मृत्यू झालेला नसल्यास तो पसार होऊन नेमका कुठे पळाला असावा याबद्दल खुद्दं स्टॅलिन, आयसेनहॉवर आणि एफबीआयचा संचालक जे एडगर हूवर यांच्यात एकमत होतं. हिटलरने जर्मनीतून काढता पाय घेतल्यावर सुरक्षीतपणे राहण्यासारखा एकच देश जगाच्या पाठीवर होता!

अर्जेंटीना!

अर्जेंटीनामध्ये अनेक प्रभावशाली जर्मन लोक वास्तव्यास होते! हिटलरच्या 'थर्ड राईश' ला यापैकी अनेकांचा पाठींबा होता. इतकंच नाही तर वेळोवेळी त्यांनी हिटलरला आर्थिक मदतही केली होती! यासर्वांत प्रमुख होता तो म्हणजे वॉल्टर आइकहॉर्न! आइकहॉर्न आणि त्याची पत्नी इडा हे दोघंही हिटलरचे जवळचे मित्रं होते! इतकंच नव्हे तर वॉल्टरने हिटलरला अनेकदा आर्थिक मदतही केली होती! हिटलरने त्याला भेट म्हणून थेट जर्मनीहून एक मर्सिडीझ बेंझ कार पाठवली होती! अर्जेंटीनात आलेली ही पहिलीवहिली मर्सिडीझ!

या दोघांच्या व्यतिरिक्तं अनेक जर्मन सहानुभूतीदार अर्जेंटीनामध्ये होते! परंतु जर्मनांच्या दृष्टीने सर्वात मोठा आधार होता तो म्हणजे अर्जेंटीनाचा सर्वसत्ताधीश जुआन पेरॉन! १९४३ मध्ये पेरॉनने अर्जेंटीनाची सत्ता ताब्यात घेतली तेव्हा तो नाझींच्या पे-रोल वर होता! नाझी जर्मनांना अर्जेंटीनात सुरक्षीत आश्रय देण्यास तो एका पायावर तयार होता! अ‍ॅडॉल्फ आईकमन, जोसेफ मेंगेल, क्लाऊस बार्बी असे अनेकजण अर्जेंटीनाच्या आश्रयाला आले होते! त्यापैकी आईकमनला मोसाद एजंटांनी किडनॅप करुन इस्त्रायलला नेलं आणि फासावर चढवलं!

हिटलर खरोखरच अर्जेंटीनाला पसार झाला का?
बर्लिनच्या बंकरमध्ये मेलेला खरा हिटलर होता का त्याचा तोतया?
आणि
अर्जेंटीनामध्ये हिटलरचं पुढे काय झालं?

जर्मन विमानदलाचा (लुफ्तवाफ्फ) पायलट पीटर बॉम्गार्ट याने न्यूरेंबर्गच्या खटल्यात साक्ष देताना एक बाँबशेल टाकला. बॉम्गार्ट म्हणाला,

"I had personally flown Hitler and his entourage to an intermediate destination in Denmark!"

बॉम्गार्टच्या या सनसनाटी खुलाशानंतर जज्ज मायकेल मुसाम्नो याचीही हिटलर अर्जेंटीनाला सटकल्याची खात्री पटली! हिटलरच्या पलायनाचा दोष त्याने अर्थातच रशियनांच्या माथ्यावर मारला! तो म्हणतो,

"Russia must accept much of the blame that Hitler did not die in May 1945."

१९५२ मध्ये जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हिटलरच्या मृत्यूविषयी बोलताना म्हणाला,
"To be honest, we have been unable to unearth one bit of tangible evidence of Hitler’s death!"

हिटलरच्या जर्मनीतून अर्जेंटीनाला पसार होण्यामागचे अनेक सिद्धांत मांडले जात असताना, अधिकृतपणे हिटलरने ३० एप्रिल १९४५ मध्ये आत्महत्या केल्याचं जगभरात मान्यं करण्यात आलं होतं. रशियन अधिकार्‍यांचा आपल्याकडे हिटलरच्या कवटीचे अवशेष असल्याचा दावाही होताच! परंतु २००९ मधल्या एका घटनेमुळे रशियनांच्या या दाव्यातली हवा पार निघाली! कनेक्टी़कटच्या युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ डॉ. निकोलस बेलॉत्तिनी याने थेट रशियात जाऊन हिटलरच्या कवटीचं डीएनए सँपल मिळवलं. या डीएनए सँपलची टेस्ट केल्यावर पुढे आलेलं सत्यं कमालीचं धक्कादायक होतं!

१९४५ मध्ये ५६ वर्षांच्या हिटलरची म्हणून रशियन सैनिकांनी हस्तगत केलेली कवटी ही प्रत्यक्षात एका स्त्रीची निघाली! या स्त्रीचं वय ४० पेक्षा कमी होतं! हा डीएनए इव्हा ब्राऊनचा असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. १९४५ मध्ये इव्हाचं वय होतं ३३! परंतु इव्हाचा डीएनए अमेरीकन आणि ब्रिटीश शास्त्रज्ञांनी युद्धकाळातच मिळवला होता! इव्हाच्या डीएनएशी हा डीएनए अजिबात जुळत नव्हता!

रशियन अधिकार्‍यांनी बेलॉत्तिनीने कवटीचं सँपल नेल्याचंच अपेक्षेप्रमाणे नाकारलं! परंतु हा दावा पोकळ असल्याचं ध्यानात येताच, ती कवटी स्त्रीची असली तरीही हिटलरचा मृत्यू झाल्याचं आणि त्याचे अवशेष आपल्याकडे असल्याचा अजब दावाही रशियन अधिकार्‍यांनी केला!

हे कमी होतं म्हणूनच की काय, दुसर्‍या महायुद्धानंतर तब्बल ६५ वर्षांनी, २०१० मध्ये अमेरीकन सरकारने नाझींशी संबंधीत अनेक कागदपत्रं गोपनियतेच्या फितीतून मुक्तं केली आणि सामान्य जनतेसाठी उपलब्धं केली! या कागदपत्रांतून पुढे आलेली माहिती तर अधिकच धमाकेदार होती! जगभरातील इतिहास संशोधकांच्या विचारांना या कागदपत्रांनी अधिकच खाद्यं पुरवलं!

या कागदपत्रांतून पुढे आलेल्या माहितीनुसार हिटलरच्या जर्मनीतून पलायनाची अमेरीकेला पूर्ण कल्पना होती! इतकंच नव्हे तर तो अर्जेंटीनामध्ये वास्तव्यास असल्याचंही एफबीआयच्या अनेक गुप्तं कागदपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं! जर्मन शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान आणि खासकरुन अणुविज्ञानातील केलेल्या संशोधनाच्या साद्यंत माहितीच्या बदल्यात हिटलरच्या अर्जेंटीनातील पलायनाकडे आणि वास्तव्याकडे अमेरीकेने काणाडोळा केला होता असं या कागदपत्रातून ध्वनित होत होतं!

दुसरं महायुद्धं अंतिम टप्प्यात आल्यावर रशियाची साम्राज्यतृष्णा अमेरीकेच्या चांगलीच ध्यानात आली होती. बाल्कन राष्ट्रांमध्ये स्टॅलिनने कम्युनिस्ट सरकारं बसवण्याचा सपाटा चालवल्यामुळे रशियाशी युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती! अशा परिस्थितीत अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञान आपल्या हाती असणं हे अमेरीकेच्या दृष्टीने आवश्यंक झालं होतं! स्वदेशाच्या स्वार्थासाठी महायुद्धात मारल्या गेलेल्या लाखो-करोडो ज्यू आणि स्लाव्हवंशीयांच्या हत्या फाट्यावर मारण्याची अमेरीकेची तयारी असल्याने हिटलरच्या पलायनाकडे अमेरीकेने काणाडोळा करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती! दुसर्‍या महायुद्धानंतर सुमारे ७०० नाझी जर्मनांना अमेरीकेने आश्रय दिलाच, त्याचबरोबर पुढे सीआयए चा डायरेक्टर झालेल्या अ‍ॅलन डलेसने अनेक नाझींना अर्जेंटीनामध्ये पळून जाण्यास सक्रीय मदतही केली होती! अमेरीकेच्या या खास ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन पेपरक्लीप!

१९४४ मध्ये, हिटलरच्या 'मृत्यू'पूर्वी वर्षभर एका एफबीआय एजंटकडून जे एडगर हूवरला एक महत्वाची टीप मिळाली होती. ४ सप्टेंबर १९४४ च्या या पत्रानुसार अर्जेंटीनातील सत्ताधिशांची नाझी जर्मनीशी महत्वाच्या विषयावर बोलणी सुरु असून यांतून अर्जेंटीनामध्ये जर्मन वसाहत उभारण्याची योजना आकार घेत होती! या वसाहतीच्या उभारणीसाठी आणि संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं आणि तंत्रज्ञं जर्मनीहून अर्जेंटीनामध्ये येणार होते! महायुद्धातून माघार घ्यावी लागल्यास हिटलर आणि त्याच्या सहकार्‍यांसाठी ही वसाहत म्हणजे आश्रयाचं स्थान असणार होती!

अर्जेंटीनाचा तेव्हाचा सत्ताधिश होता जुआन पेरॉन!

२८ ऑगस्ट १९४५ मध्ये एफबीआयच्या लॉस एंजलिस ऑफीसमध्ये एक व्यक्ती येऊन थडकली. अर्जेंटीनामधून आलेल्या या खबर्‍याने अमेरीकेत आश्रय मागितला होता! एफबीआयच्या अधिकार्‍यांशी बोलताना त्याने हिटलर जर्मनीतून निसटून अर्जेंटीनात आल्याचं ठामपणे सांगितलं! अर्जेंटीनात पोहोचल्यावर सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या कामाला मदत करण्यासाठी त्याला पंधरा हजार डॉलर्स देण्यात आले होते असंही त्याने एफबीआयच्या अधिकार्‍यांशी बोलताना स्पष्टं केलं!

२ मे १९४५ मध्ये बर्लिनवर रशियनांनी ताबा मिळवल्यावर काही आठवड्यांनी दोन जर्मन पाणबुड्या ब्युनॉस आयर्सच्या दक्षिणेला असलेल्या सॅन व्हॅटीयसच्या आखातात येऊन पोहोचल्या. पहिल्या पाणबुडीतून बरंच सामान आणि काही जर्मन अधिकारी किनार्‍यावर उतरले. पहिल्या पाणबुडीनंतर सुमारे दोन तासांनी दुसरी पाणबुडी किनार्‍यालगत आली आणि या पाणबुडीवरुन खुद्दं हिटलर, इव्हा ब्राऊन, आणखीन एक स्त्री आणि काही जर्मन अधिकारी किनार्‍यावर आले! अर्जेंटीनाच्या अधिकार्‍यांना हिटलरच्या आगमनाची पूर्ण कल्पना होती. सहा वरिष्ठ अर्जेंटीनी अधिकारी हिटलरच्या स्वागताला हजर होते!

हिटलर आणि इतर सर्वजण किनार्‍यावर उतरल्यावर त्यांच्यासाठी तयार असलेल्या घोड्यांवर स्वार झाले आणि सर्व सामान लादून झाल्यावर त्यांनी पहाटेच्या सुमाराला अंतर्भागात कूच केलं!

या खबर्‍याने हिटलरचं तपशीलवार वर्णनही केलं होतं. हिटलरला दमा आणि अल्सरच्या विकाराने ग्रासलं आहे. तसेच त्याचा एक हात कायम थरथरत असल्याने तो स्थिर राहू शकत नाही! त्याने आपली सुप्रसिद्ध मिशी काढली असून डोक्यावरचे केसही बर्‍याच प्रमाणात कापलेले आहेत!

या खबर्‍याने स्वतःप्रमाणेच हिटलरला अर्जेंटीनात आल्यावर अंतर्भागात जाण्यास सहाय्य करणार्‍या आणखीन तीन व्यक्तींचीही एफबीआयला नावं दिली! इतकंच नव्हे तर अर्जेंटीनात सॅन अँटोनियातल्या एका हॉटेलमध्ये एफबीआयच्या एजंट्सशी त्या तिघांची भेट घालून देण्याचीही त्याने तयारी दर्शवली! इतकंच नव्हे तर या खबर्‍याने हिटलरने सुरवातीला आश्रय घेतलेल्या हॉटेलचंही तपशीलवार वर्णन केलं! हे हॉटेल अर्थातच वॉल्टर आईकहॉर्नचं हॉटेल!

हॉटेल इडन

अर्जेंटीनातून आलेल्या या खबर्‍याने दिलेल्या माहितीचा एफबीआयच्या अधिकार्‍यांवर चांगलाच परिणाम झाला होता. खुद्दं डायरेक्टर जे एडगर हूवरने लॉस एंजलिसमध्ये येऊन या खबर्‍याची भेट घेतली आणि त्याच्याकडे तपशीलवार चौकशी केली! हूवरशी बोलताना त्याने हिटलरने प्रवास केलेल्या प्रत्येक भूभागाची माहिती दिलीच, पण त्याने मुक्काम केलेल्या गावांची नावं आणि घरांची माहितीही पुरवली! या माहितीची हूवरला इतकी खात्री पटली होती की त्याने ही माहिती काही अमेरीकन जनरल्सना दिली! परंतु पुढे काहीच झालं नाही!

जे एडगर हूवरने १३ नोव्हेंबर १९४५ ला ब्युनॉस आयर्समधल्या अमेरीकन वकिलातीला लिहीलेल्या पत्रात हिटलर जर्मनीतून निसटून अर्जेंटीनात आल्याची पक्की खात्री असल्याचं स्पष्टपणे लिहीलं होतं. काही महिने अगोदरच ब्युनॉस आयर्समध्ये असलेल्या अमेरीकन नेव्हीच्या अधिकार्‍यांकडून हिटलर अर्जेंटीनाच्या आश्रयाला आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हूवरच्या या पत्रामुळे एफबीआयची हिटलर अर्जेंटीनात असल्याची पक्की खात्री पटल्याचंच सिद्धं होत होतं! इतकंच नव्हे तर एलियान्ड्रो बस्टीलो या आर्कीटेक्टने अर्जेंटीनात उभारलेल्या बव्हेरीयन पद्धतीच्या आलीशान व्हिलाचं डिझाईनही एफबीआयला मिळालं होतं!

२१ सप्टेंबर १९४५ ला एफाबीआयच्या फाईल १०५-४१० मधली ही नोंद हिटलरच्या आगमनाचं वर्णन करते -

"Approximately two hours later the second sub came ashore and HITLER, two women, another doctor, and several more men ... were aboard. By pre-arranged plan with six top Argentine officials, pack horses were waiting for the group and by daylight all supplies were loaded on the horses and an all-day trip inland toward the foothills of the southern Andes was started."

एफबीआयच्या साईटवर आजही ही फाईल सामान्य वाचकाला उपलब्धं आहे!

हिटलरची एफबीआय फाईल

२०१० मध्ये एफबीआयने खुल्या केलेल्या फाईल्समध्ये या खबर्‍याचं नाव गाय्डॅनो असं नमूद केलं आहे.

Hitler esta Vivo (Hitler is Alive) या पुस्तकात लाडीसालो साब्झो या हंगेरीयन सैनिकाने अर्जेंटीनामध्ये यू-५३० ही पाणबुडी आल्याचं नमूद केलं आहे. या पुस्तकात त्याने हिटलरचा अंटार्क्टीकामध्ये पसार होण्याचा प्लान होता असा दावा केला आहे! १९३८-३९ ,मध्ये अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर गेलेल्या जर्मन संशोधकांनी आणि नेव्हीच्या अधिकार्‍यांनी वॅडेल समुद्र आणि क्वीन मॉड पेनिन्सुलाच्या परिसरात हिटलरच्या वास्तव्यासाठी जागा पाहून ठेवल्याचं साब्झोने प्रतिपादन केलं आहे! अर्थात हा दावा चुकीचा होता!

एफबीआयची कागदपत्रं खुली होण्यापूर्वी २००३ मध्येच अर्जंटीनाचा लेखक एबल बस्ती 'हिटलर इन अर्जेंटीना' या त्याच्या पुस्तकात हिटलरच्या अर्जेंटीनातील वास्तव्याची साद्यंत हकीकत मांडली होती!

आपल्या या पुस्तकासाठी बस्तीने सुमारे सात वर्ष संशोधनात घालवली होती! अर्जेंटीनाच्या दक्षिणेला असलेल्या पॅट्गोनिया प्रांतात हिटलरचं वास्तंव्य होतं असं बस्तीचं ठाम मत होतं! या प्रदेशात अनेकदा त्याने भटकंती केली. अनेक लोकांच्या त्याने मुलाखती घेतल्या होत्या! दूरदूरच्या प्रदेशात असलेल्या अनेक रांचवर अनेकदा त्याला शस्त्रसज्ज असलेल्या जर्मनांकडून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या!

बस्तीच्या दाव्यानुसार नाझींना अर्जेंटीनात आणून सुरक्षितरित्या पुनर्वसन करण्यामागे मोलाचा वाटा होता तो रोडॉल्फो फ्रूएड याचा. रोडॉल्फो हा लुडविग फ्रूएड या जर्मन कोट्याधिशाचा मुलगा जुआन पेरॉनचा सेक्रेटरी होता. जोसेफ मेंगेल, अ‍ॅडॉल्फ आईकमन यांना अर्जेंटीनात आणण्यातही फ्रूएडचाच हात होता. जर्मनीतून निसटून स्पेनला गेल्यावर आणि पुढे कॅनरी आयलंड्समधून जर्मन पाणबुडीतून प्रवास करुन हिटलर आणि इव्हा ब्राऊन इतर नाझींसह पॅट्गोनियाच्या किनार्‍यावर उतरले होते! जर्मनी - स्पेन - अर्जेंटीना असा पलायनाचा मार्ग हिमलरच्या एस एस संघटनेने आखला होता! याच मार्गाने पुढे आईकमन, मेंगेल, बार्बी इत्यादी नाझी अर्जेंटीनाला आले होते!

स्पेनमधल्या एका जेसुईट पाद्र्याची बस्तीने गाठ घेतली होती. या पाद्र्याचे कुटुंबिय हिटलरचे निकटचे स्नेही होते. जर्मनी़तून निसटल्यावर काही दिवसांसाठी हिटलरचं स्पेनच्या कॅन्टाबेरीया प्रांतात वास्तंव्य होतं. या वास्तव्यादरम्यान हिटलरशी प्रत्यक्षं भेट झालेल्या आणि त्याला पाहिलेल्या स्पॅनिश लोकांच्याही बस्तीने मुलाखती घेतल्या होत्या. या सर्वांनी १९४५ च्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिटलरला स्पेनमध्ये पाहिल्याचं ठामपणे म्हटलं आहे!

ब्रिटीश सरकारच्या आणि एम आय ६ च्या कागदपत्रांनुसार मेच्या पहिल्या आठवड्यात जर्मन पाणबुड्यांचा एक काफीला स्पेनच्या किनार्‍यावरुन निघून कॅनरी आयलंड्सवर आला. एव्हाना हिटलरने कॅन्टाबेरीया प्रांत सोडून कॅनरी आयलंड्सवर मुक्काम ठोकला होता! दोन दिवस कॅनरी आयलंड्सवर थांबल्यावर हा काफीला थेट दक्षिण अर्जेंटीनाच्या दिशेने निघाला.

१९४५ च्या जुलै-ऑगस्टच्या दरम्यान हिटलर, ब्राऊन आणि इतरांचं रिओ नेग्रो परगण्यात कॅलेटा डी लॉस लॉरोस या खेड्याच्या किनार्‍यावर आगमन झालं! समुद्रकिनार्‍यावर उतरल्यावर हिटलरने ला हसिएन्डा सॅन रॅमॉन इथे आश्रय घेतला. काही काळ तो वॉल्टर आईकहॉर्नच्या हॉटेलमध्ये मुक्कामास होता! पुढे यथावकाश लेक नाहुल हुआपी याच्या काठावर असलेल्या व्हिला ला अँगोस्टुरा इथल्या एका रँचवर हिटलरचं वास्तव्यं होतं! हे ठिकाण बस्ती राहत असलेल्या बॅरीलोचे पासून सुमारे ५० मैल उत्तरेला आहे! या रँचवर केवळ बोटीनेच जाणं शक्यं होतं!

व्हिला ला अ‍ॅगोस्टुरा

आपल्या संशोधनादरम्यान बस्तीने हेलॉईस लुआनची गाठ घेतली. लुआन नाझींना देण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांचा 'टेस्टर' होता! नाझींवर कोणत्याही प्रकारे विषप्रयोग होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत होती! लुआनने अनेकदा खुद्दं हिटलरला देण्यात येणार्‍या जेवणंही 'टेस्ट' केलं होतं! लुआनप्रमाणेच हिटलरची स्वयंपाकीण कार्मेन टोरेंट्गुई हिची भाची अँजेला सोरियानी हिनेही हिटलरला अनेकदा पाहिल्याचं बस्तीला सांगितलं होतं!

'इन द फूट्स्टेप्स ऑफ हिटलर' या आपल्या दुसर्‍या पुस्तकात बस्तीने एका ब्राझिलीयन सैनिकाची साक्षं दिली आहे. हा सैनिक म्हणतो,

"५ फेब्रुवारी १९७१ मध्ये हिटलरचा वृद्धापकाळाने अंत झाला! त्याचं पराग्वेमध्ये दफन करण्यात आलं! आज त्या जागेवर एक अत्याधुनिक हॉटेल उभं आहे!"

बस्तीच्या दाव्यानुसार १९७१ मध्ये मृत्यू होण्यापूर्वी हिटलर आणि इव्हा यांना दोन मुली झाल्या होत्या!

अमेरीकन संशोधक जेरॉम कोर्सीच्या दाव्यानुसार अ‍ॅलन डलेसनेच हिटलरला जर्मनीतून निसटण्यास मदत केली होती! डलेस तेव्हा स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास होता आणि इथून युद्धव्याप्त युरोपमधील अमेरीकन हेरांच्या जाळ्याचं नियंत्रण करत होता!

१९४३ पासूनच हिटलरचा सेक्रेटरी असलेला मार्टीन बोरमनने अ‍ॅक्टन अ‍ॅल्डर्फ्लग (प्रोजेक्ट इगल फ्लाईट) नुसार मोठ्या प्रमाणावर जर्मनीतून पैसा बाहेर पाठवण्यास सुरवात केली होती! १९४३-४५ च्या दरम्यान बोरमनने सुमारे २०० अर्जेंटीनी कंपन्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली होती! त्याच्या जोडीला पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि तुर्कस्तान यातील कंपन्यांचाही समावेश होता! इतकंच नाही तर सुमारे साडेनऊशेच्यावर जर्मन कंपन्या त्याने याकाळात तयार केल्या! त्यापैकी ७७० कंपन्या युद्धात तटस्थं असलेल्या राष्ट्रांत होत्या! एकट्या अर्जेंटीनातच यातील ९८ कंपन्या निर्माण करण्यात आल्या! इतकंच करुन बोरमन थांबला नाही, तर अमेरीका आणि कॅनडा यांच्या शेअरबाजारात तेजीत असलेल्या अनेक इंटरनॅशनल कंपन्यांचे शेअर्स त्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते! १९४३ मध्ये जुआन पेरॉन अर्जेंटीनामध्ये सत्तेवर आल्यावर बोरमनने अर्जेंटीनात नाझी जर्मनांसाठी वसाहत उभारण्याच्या कामाला वेगाने सुरवात केली होती!

अमेरीकेच्या नॅशनल अर्काईव्ह्जमध्ये असलेल्या एका डॉक्युमेंट्रीनुसार हिटलर यू-५३० या पाणबुडीने अर्जेंटीनाला पोहोचला होता! पाणबुडीत असलेल्या सर्व नाझींना सुरक्षीतपणे अर्जेंटीनाच्या किनार्‍यावर उतरवल्यावर कमांडर ऑटो वेरमथ आणि एक्झीक्युटीव्ह ऑफीसर कार्ल फेलीक्स शुलर यांनी मार देल प्लाटा या अर्जेंटीनाच्या बंदरात आपल्या पाणबुडीसह शरणागती पत्करली!

कोर्सीच्या संशोधनातून आणि सिद्धांतामधून काही महत्वाचे प्रश्नं पुढे येतात ते म्हणजे,

रशियनांनी हिटलरचं प्रेत जाळून त्याचे उरलेसुरलेले अवशेष नेल्यावरही हिटलरचा मृत्यू झाल्याचा खात्रीलायक पुरावा अमेरीकन अधिकार्‍यांना का मिळू शकला नाही?

खुद्दं स्टॅलिन आणि आयसेनहॉवर दोघांनाही हिटलरचा मृत्यू झालेला नाही असं का वाटत होतं?

अर्जेंटीनाच्या वृत्तपत्रांनी हिटलर अर्जेंटीनात आल्याचं उघडपणे छापल्यावरही अमेरीकन सरकार आणि आर्मीच्या अधिकार्‍यांनी अधिक खोलवर तपास करण्याचं का टाळलं? हिटलरच्या पलायनाला खुद्दं अ‍ॅलन डलेसने सहाय्यं केल्याचं कारण यामागे असावं का?

हिटलर आणि इव्हा ब्राऊनने आत्महत्या केली असल्यास त्यांच्या मृतदेहांचा एकही फोटो का घेतला नाही?

कोर्सीच्या दाव्यानुसार यामागचं कारण एकच होतं, ते म्हणजे हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती तर तो अर्जेंटीनामध्ये निसटला होता! अर्जेंटीनामध्ये त्याच्या बर्चेसगाडेन इथल्या घराप्रमाणेच बांधण्यात आलेल्या बव्हेरीयन व्हिलामध्ये त्याने आपले अखेरचे दिवस काढले होते!

हिटलर इन अर्जेंटीना या आपल्या डॉक्युमेंट्रीत नोअ‍ॅम शॅलेव्हनेही हिटलरने जर्मनीतून पसार होऊन अर्जेंटीनामध्ये आश्रय घेतल्याचं प्रतिपादन केलं आहे.

२८ एप्रिल १९४५ ला हिटलरने उपलब्धं असलेली सर्व विमानं वापरुन जर्मनी आणि डेन्मार्क यांच्यातील मार्ग सुरक्षीत करण्याचा आदेश दिला होता! वास्तविक ज्या मार्गाचा जर्मनीला कोणत्याही प्रकारे उपयोग नव्हता तो मार्ग इतका सुरक्षीत करण्यामागचं एकमेव कारण असू शकत होतं, ते म्हणजे खुद्दं हिटलरला त्या मार्गाने सुरक्षीतपणे जर्मनीतून बाहेर पडायचं होतं!

जर्मनीतून बाहेर पडल्यावर डेन्मार्क - स्पेन - कॅनरी आयलंड या मार्गाने हिटलर अर्जेंटीनाला आला. काही काळ त्याने आईकहॉर्न दांपत्याच्या हॉटेल इडनमध्ये मुक्काम केला होता. याच मुक्कामात हिटलरला प्रत्यक्ष पाहिलेल्या एका वेट्रेसने शॅलेव्हला संपूर्ण डीटेल्स सांगितले.

कॅटलिना गॅमेरो ही हॉटेल ईडन मध्येच स्वयंपाकीण कम सहाय्यक म्हणून कामाला होती. आईकहॉर्न दांपत्याचा नाझी जर्मनीला असलेला पाठींबा सर्वश्रुत होताच. हॉटेलमधल्या जवळपास प्रत्येक खोलीत आणि लॉबीतही अनेक ठिकाणी हिटलरची अनेक पोस्टर्स टांगलेली होती. खुद्दं आईकहॉर्न दांपत्याला मूलबाळ नसल्याने ते कॅटलिनाला आपल्या मुलीप्रमाणेच वागवत असत!

१९४८ मध्ये आईकहॉर्न दांपत्याने कॅटलिनाला एका खास पाहुण्याच्या वास्तव्याबद्दल काही खास सूचना दिल्या! हा पाहुणा केव़ळ आईकहॉर्न कुटुंबियांच्या नातेवाईकांसाठी वापरण्यात येणार्‍या एका व्हिलामध्ये राहणार होता. त्या पाहुण्याशी बोलायची किंवा कोणत्याही प्रकारे संवाद साधण्यापासून सर्वांना सक्तं मनाई करण्यात आली होती! हा पाहुणा इतरांप्रमाणे डायनिंग रुममध्ये जेवण घेणार नव्हता! दिवसातून तीन वेळा त्याचं अन्नं त्याच्या व्हिलामध्ये सर्व्ह करण्याची जबाबदारी कॅटलिनावर होती!

एका दुपारी एक लिमोझीन हॉटेलसमोर येऊन थांबली आणि त्यातून खाली उतरले खुद्दं हिटलर आणि इव्हा ब्राऊन! सर्वजण चकीत होऊन पाहत असतानाच दोघं लॉबीत निघून गेले! हिटलरने आपल्या मिशीला चाट दिली असली आणि डोक्यावरचे केस विरळ झालेले असले तरी तो नि:संशय हिटलरच होता हे कॅटलिनाने ओळखलं होतं! ती म्हणते,

"I work at the Hotel as a waitress. The hotel is owned by Eda Eichhorn, a Nazi who gets funds by Josef Göbbels, Nazi Propaganda Minister. In 1948, I saw a limo with only 4 doors. When a door opens, I saw Hitler with his wife Eva Braunn going to the lobby. The 'Hitler of the Andes' is the Hitler we all know at the television. Although he cut off his moustache and has a little hair, he wears a wig on it, yes he do. Usually, the lobby is full of people. But in 3 days Hitler lives there, the downstairs is reserved. Eda told me; "What ever you've seen, act as like you don't." So i joke with the chauffeur not too tell the secrets to anyone. but it's been a long time, so I don't care anymore!"

तीन दिवस, दिवसातून तीन वेळा कॅटलिना हिटलर आणि इव्हा ब्राऊन यांना सर्व्हीस देत होती, परंतु दोघांपैकी एकाशीही ती चकार शब्दं बोलली नाही! तीन दिवसांनी हिटलर आणि इव्हा आले तसेच निघून गेले! हिटलरचं वर्णन करताना कॅटलिनाने त्याला पार्किन्सन्समुळे नीट चालता येत नसल्याचाही उल्लेख केला होता!

कॅटलिनाच्या म्हणण्यानुसार १९६१ मध्ये वॉल्टर आईकहॉर्नचं निधन झाल्यावर दर आठवड्याला हिटलरचा न चुकता इडा आईकहॉर्नची चौकशी करण्यासाठी फोन येत असे! १९६४ मध्ये इडाच्या मृत्यूपर्यंत हे फोनचं सत्रं सुरु होतं!

कॅटलिना गॅमेरो प्रमाणेच हिटलरला अर्जेंटीनामध्ये पाहिल्याचं ठामपणे प्रतिपादन केलं नर्स असलेल्या मॅफल्डा फॅल्कन हिने. फॅल्कनचा जन्म जर्मनीत झाला होता. दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीच्या काळात रेडक्रॉसच्या एका हॉस्पीटलमध्ये ती नर्स म्हणून काम करत होती. जर्मनीच्या फ्रान्सवरील आक्रमणादरम्यान जखमी झालेल्या सैनिकांना या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. एक दिवस या सैनिकांना भेटण्यासाठी खुद्दं हिटलरची स्वारी हॉस्पीटलमध्ये अवतरली! मॅफल्डाने त्याचं जवळून निरीक्षण केलं. त्याचे निळे भेदक डोळे तिच्या पक्के लक्षात राहिले होते!

महायुद्ध संपल्यावर फॅल्कन आणि तिच्या नवर्‍याने अर्जेंटीनाच्या पॅटागोनिया प्रांतात स्थलांतर केलं. मॅफल्डा कमोडोर रिव्हाद्विया इथल्या एका हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असताना एका जर्मन सैनिकाला इथे भरती करण्यात आलं होतं. एक दिवस या सैनिकाला भेटण्यासाठी तीन माणसं आली होती. सुमारे दहा फूट अंतरावरुन मॅफल्डा त्यांच्याकडे पाहत असतानाच त्यांच्यातल्या एकाची तिच्याशी नजरानजर झाली आणि पुन्हा एकदा जर्मनीत पाहिलेले ते भेदक निळे डोळे तिच्या नजरेस पडले! मिशी विना आणि बर्‍यापैकी केस पांढरे झालेले असूनही तिने त्याला लगेच ओळखलं! तो हिटलरच होता. परंतु तरीही खात्री करुन घेण्यासाठी ते तिघं निघून गेल्यावर तिने त्या सैनिकाकडे सहजपणे चौकशी केली. इतर दोघांची त्याने नावं सांगितल्यावर तिने विचारलं,

"And the third?"

"The Fuhrer!" तो जर्मन सैनिक उत्तरला!

ब्रिटीश संशोधक आणि लेखक सायमन डन्स्टन आणि जेरार्ड विल्यम्स यांनी आपल्या 'ग्रे वुल्फ' या पुस्तकात हिटलरने जर्मनीतून पसार होऊन अर्जेंटीनाला पोहोचेपर्यंतच्या प्रवासाचं तपशीलवार वर्णन केलं आहे! हिटलरने १९४५ मध्ये आत्महत्या केली नसून तो अर्जेंटीनाला सटकल्याचा त्यांनी ठामपणे दावा केला आहे!

बर्लिनमध्ये हिटलरची चॅन्सेलरीच केवळ जमिनीखाली होती असं नाही तर सुमारे हजारेक बंकर्स जमिनीखाली होते. या बंकर्सच्या जोडीला काही फॅक्टर्‍याही जमिनीखाली उभारण्यात आल्या होत्या! इतकंच नाही तर या सर्व बंकर्स आणि फॅक्टर्‍यांना जोडणार्‍या अनेक गुप्त वाटा आणि भुयारांचा सुळसुळाट होता! हिटलरच्या चॅन्सलरीखालच्या स्ट्डीमधून यापैकी अनेक भुयारांमध्ये निसटणं अगदी सहज शक्यं होतं!

डन्स्टन आणि विल्यम्स यांच्या दाव्यानुसार २७ एप्रिलच्या रात्रीच हिटलर, इव्हा ब्राऊन आणि इव्हाचा मेव्हणा हर्मान फेगेलाईन चॅन्सेलरीतून भुयाराच्या मार्गाने निसटले आणि त्यांच्या जागी बोरमनने निवडलेले त्यांचे तोतये बसवण्यात आले. परंतु या सगळ्या दाव्यामध्ये एक महत्वाची गल्लत आहे ती म्हणजे फेगेलाईनच्या बाबतीत. हिमलरने शरणागती पत्करण्याबाबत वाटाघाटी सुरु केल्यावर हिमलरचा प्रतिनिधी असलेल्या फेगेलाईनवर कोर्ट मार्शल करुन त्याला देहांताची शिक्षा फर्मावण्यात आली होती! चॅन्सलरीच्या बागेत त्याला २८ एप्रिल १९४५ ला गोळ्या घाळण्यात आला!

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बर्लिनमधून विमानाने बाहेर पडणं शक्यं होतं का?

२३ एप्रिलला एकमेव महिला जर्मन फायटरपायलट असलेली बेटे उसे आपल्या अ‍ॅराडो ६६ विमानातून गॅटॉव विमानतळावर उतरली. रॅंग्सडॉर्फ इथल्या आपल्या घरातून आपला तान्हा मुलगा, त्याची नॅनी आणि काही जखमी जर्मन सैनिकांसह तिने पुन्हा २३ एप्रिलला बर्लिन सोडलं. त्याच दिवशी हिटलरचा आर्कीटेक्ट अल्बर्ट स्पीअर गॅटॉव विमानतळावर उतरला! दुसर्‍या विमानाने तो शहराच्या मध्यवर्ती भागात चॅन्सेलरीजवळ असलेल्या पूर्व-पश्चिम अशा हायवेवर उतरला! या हायवेचं तात्पुरत्या रन वे मध्ये रुपांतर करण्यात आलं होतं! हिटलरचा वैयक्तीक वैमानिक हान्स बोअर याच्याकडे या रन वे च्या देखभालीची जबाबदारी होती. २६ एप्रिलला दोन जुंकर्स-५२ विमानं या रन वे वर उतरली! त्याच दिवशी गॅटॉव विमानतळावर बर्लिनच्या संरक्षणासाठी आणण्यात आलेली ५०० नौसेनिकांची तुकडी उतरली!

त्याच दिवशी सुप्रसिद्ध जर्मन महिला वैमानिक हाना रित्श आणि जनरल रॉबर्ट व्हॅन ग्राम गॅटॉव विमानतळावर उतरुन हिटलरच्या भेटीला आले! २९ एप्रिलला रशियनांनी गॅटॉव विमानतळ ताब्यात घेतला असला तरी चॅन्सेलरीजवळच्या रन वे वर अद्याप जर्मनांचा कब्जा होता! २९ एप्रिलला पहाटे १.०० वाजता रित्श आणि ग्राम यांनी याच रन वे वरुन बर्लिन सोडलं! याच रन वे वर एक जुंकर्स-५२ विमान निघण्याच्या तयारीत उभं असल्याचं त्यांच्या नजरेस पडलं होतं. या विमानाचा वैमानिक होता पीटर बॉम्गार्ट!

याच विमानातून हिटलर आणि इव्हाने बर्लिनमधून पोबारा केला होता का? बोम्गार्टने न्यूरेंबर्ग खटल्यात दिलेल्या साक्षीत तसाच दावा केला होता!

हिटलर अर्जेंटीनामध्ये आल्यावर काही काळ ब्यूनॉस आयर्समध्ये वास्तव्यास असल्याचंही एका अर्जेंटीनी वेटरच्या साक्षीवरुन पुढे आलं. या वेटरचं नाव होतं रॉबर्टो ब्रून! ब्रून ज्या हॉटेलमध्ये काम करत होता ते एका कॉर्सिकन व्यक्तीच्या मालकीचं होतं. हा मालक फ्रान्समधून पळून अर्जेंटीनाला आला होता आणि फ्रेंच पोलिस त्याच्या मागावर होते! फ्रान्सवर जर्मनीची सत्ता असताना त्याने उघडपणे जर्मनांना मदत केली होती!

ब्रून हॉटेलमध्ये आल्यावर सुमारे सहा-सात महिन्यांनी एक दिवस एका खास पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली! या पाहुण्यासाठी एक खास शेफ बोलावण्यात आला होता! ब्रून म्हणतो,

"I remember black hair with little touches of white, a skinny face, no mustache. When he got up from the table to walk, Mandaver was with me to one side. And all the people were respecting him!"

"Do you know who it is?" हॉटेलचा मॅनेजर मॅन्डॉव्हरने विचारलं.

"No"

"the Fuhrer!"

ब्रूनने हिटलरप्रमाणेच आणखीन एक व्यक्ती तिथे पाहिल्याचा दावा केला. मार्टीन बोरमन!

इव्हा ब्राऊनचं वर्णन करताना ब्रून म्ह्णतो,

"The manager told us there was a group of ladies for tea, and he had been told by his Corsican boss to be very careful with these woman because they were all related to these people!"

Eva Hitler was about 40, not pretty, semi –pretty, very reserved and very demanding, she gave ‘strong’ orders, and was dressed in the fashion of the time. She was the boss there!"

डन्स्टन आणि विल्यम्सच्या पुस्तकात नाझी डॉक्टर जोसेफ मेंगेलचा ब्राझीलमधल्या एका रेस्टॉरंटमधला फोटोही आहे! याबरोबरच आणखीन एक अविश्वसनीय दावा या पुस्तकात करण्यात आला आहे,

१९४३ पासूनच अर्न्स्ट काल्टेनब्रूनर, मार्टीन बोरमन आणि खुद्दं हिमलर यांनी दोस्त राष्ट्रांच्या प्रमुख अधिकार्‍यांशी आणि त्यांच्या करवी प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून हिटलर आणि त्याच्याशी एकनिष्ठ असणार्‍यांची हत्या करण्याचा आणि दोस्तांना सामील होऊन रशियाविरुद्ध लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता! चर्चील, आयसेनहॉवर, पॅटन यांची या प्रस्तावाला मान्यता होती, परंतु रुझवेल्टने मात्रं याला नकार दिला होता! हा प्रस्ताव मान्य केला असता तर किमान दोन वर्ष आधी महायुद्ध थांबलं असतं आणि शेवटच्या टप्प्यात गॅस चेंबर्समध्ये मारले गेलेले वीस लाख ज्यू आणि स्लाव्हवंशीय वाचले असते आणि कॉन्सन्ट्रेशन कँप्सही बंद झाले असते!

डन्स्टन-विल्यम्स यांचा हा दावा मात्रं ओढूनताणून आणलेला वाटतो!

नुकताच २०१५ च्या मध्यावर 'हंटींग हिटलर' ही डॉक्युमेंट्री सिरीज बनवणार्‍या टीमला एक अनपेक्षीत शोध लागला!

बर्लिनच्या टेंपलहॉर्फ विमानतळाजवळ तपासणी़ करत असताना सीआयएचा माजी अधिकारी असलेल्या बॉब बेअर आणि ओसामा बिन लादेनचा शोध घेण्यात सहभागी असलेला टिम केनेडी यांना टेंपलहॉर्फ विमानतळाच्या खाली असलेल्या यू६ या सबवे स्टेशनजवळची एक भिंत पोकळ असल्याचं ध्यानात आलं! आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांनी सोनारच्या सहाय्याने भिंतीची तपासणी केली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला!

ही भिंत म्हणजे बर्लिनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चॅन्सेलरीकडे जाणार्‍या भुयाराचं तोंड होतं!

या भिंतीपलीकडे भुयार असल्याचं ध्यानात येताच हिटलर जर्मनीतून पसार झाल्याची बेअर आणि केनेडी यांची पक्की खात्री पटली! २१ एप्रिलच्या रात्री टेंपलहॉर्फ विमानतळावरुन १० जुंकर्स-५२ विमानं बरच सामान घेऊन उडाली होती! या दहापैकी ८ विमानांमध्ये हिटलरचं सामान असल्याचा त्यांचा दावा होता! खुद्दं हिटलर आणि इव्हा ब्राऊन, मार्टीन बोरमन याच मार्गाने २८-२९ एप्रिलच्या सुमारास निसटले असावे असा बेअरचा तर्क आहे!

एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे हिटलर आणि इव्हा ब्राऊन अर्जेंटीनाला आले असं मानलं तरी त्यांचा चरितार्थ कसा चालत होता?

दुसर्‍या महायुद्धाचा भडका उडण्यापूर्वीपासूनच जर्मनीने पादाक्रांत केलेल्या ऑस्ट्रीया आणि चेकोस्लोव्हाकीयात असलेल्या संपत्तीची आणि दुर्मिळ पेंटींग्ज आणि इतर कलाकुसरीच्या वस्तूंची मनसोक्तं लूट केली होती! पुढे सार्‍या युरोपवर वर्चस्वं प्रस्थापित केल्यावर यात अधिकाधीक भर पडत गेली! जर्मनीतून हिटलर निसटण्यापूर्वीच बोरमनने ही सर्व लूट जर्मनीबाहेर काढून अर्जेंटीनाला आणली होती! या सर्व लुटीच्या आधारेच हिटलरने उर्वरीत आयुष्यं आरामात व्यतित केलं असा बहुतेक सर्वांचा दावा आहे!

हिटलर जर्मनीतून निसटून अर्जेंटीनामध्ये नाही तर इक्वेडोरमध्ये गेला आणि मरेपर्यंत ख्रिस्ती धर्मगुरु म्हणून वावरला असा अमेरीकन आर्मीचा निवृत्त कर्नल वेंडेल स्टीफन्सचा दावा आहे! १९८१ मध्ये स्टीफन्सने इक्वेडोरच्या क्युनेका या लहानशा शहराला भेट दिली होती. इथे त्याची गाठ एका वृद्ध पाद्र्याशी पडली. या पाद्र्याशी बातचीत केल्यावर आणि त्याचं लक्षपूर्वक निरीक्षण केल्यावर हा पाद्री दुसरा-तिसरा कोणी नसून साक्षात हिटलर असल्याची त्याची पक्की खात्री पटली! या पाद्र्याजवळ असलेला दुर्मिळ पेंटींग्ज आणि इतर वस्तूंचा संग्रह पाहिल्यावर तर स्टीफन्सला कोणतीच शंका उरली नाही! परंतु स्टीफन्सच्या दाव्याकडे कोणीच लक्षं दिलं नाही!

स्टीफन्सने हिटलर असल्याचा दावा केलेला हा पाद्री म्हणजे फादर क्रेस्पी!

फादर क्रेस्पी

क्रेस्पीच्या म्हणण्याप्रमाणे तो इटलीतल्या ऑस्ट्रीयन घराण्यात जन्माला आला होता. १९४३ मध्ये तो व्हेटीकनला गेला. व्हेटीकनमध्ये दोन वर्षांनी त्याची पाद्री म्हणून नेमणूक करण्यात आलीच, त्याचबरोबर व्हेटीकनला मिळणार्‍या दुर्मिळ वस्तुसंग्रहाची जबाबदारीही त्याच्यावर सोपवण्यात आली! १९४३ नंतर तो कधीच व्हेटीकनमधून बाहेर पडला नव्हता. १९५६ मध्ये त्याची इक्वेडोरच्या क्युनेका इथे पाद्री म्हणून नेमणूक करण्यात आली. इथे येताना त्याने आपला वैयक्तीक कलासंग्रह बरोबर आणला होता!

क्युनेका हे गाव नाझी युद्धगुन्हेगारांचा शोध घेणार्‍यांना फरार नाझींचं आश्रयस्थान म्हणूनच माहीत होतं! इथे आल्यावर फादर क्रेस्पी खूपच साधं आयुष्य जगत होता! त्याला भेटायला येणार्‍या प्रत्येकाला तो रोख रक्कम भेट देत असे! गावकर्‍यांनाही त्याने त्याच्या चर्च आणि परिसरात कोणी परका माणूस घुसू नये याची खबरदारी घेण्यासाठी भरघोस रक्कम दिली होती! त्याला भेटायला येणारे बहुतेक सर्व लोक हे जर्मन होते!

१९८२ मध्ये ९० व्या वर्षी फादर क्रेस्पीचा मृत्यू झाला तेव्हा सुमारे २००० लोक त्याच्या अंत्यविधीला हजर होते! यात जोडीला शस्त्रधारी संरक्षक असलेल्या अनेक जर्मनांचा समावेश होता! क्रेस्पीचा अंत्यसंस्कार एखाद्या सम्राटाला शोभेल अशा इतमामाने करण्यात आला! त्याच्या स्मृतीस्थानाची आजही दर आठवड्याला सफाई करण्यात येते आणि त्यावर कायम ताजी फुलं वाहिलेली असतात! ही फुलं पाठवणारे मात्रं अज्ञात आहेत!

फादर क्रेस्पीच्या मृत्यूनंतर त्याच्या मागे राहिलेल्या कलासंग्रहाची किंमत कोट्यावधी डॉलर्सच्या घरात होती! यातील बर्‍याच पेंटींग्ज आणि इतर वस्तू या खुद्दं हिटलरच्या संग्रहात असल्याचं अनेक जर्मनांचं मत होतं! फादर क्रेस्पीच्या मृत्यूनंतर १६ मे १९८२ या दिवशी दोन कार्गो विमानांमध्ये त्याचा सर्व कलासंग्रह चढवण्यात आला आणि त्यानंतर तो कोणाच्याही दृष्टीस पडलेला नाही!

फादर क्रेस्पी आणि हिटलर यांची तुलना केल्यावर काही मनोरंजक गोष्टी समोर येतात -

हिटलरच्या मृत्यूची तारीख - ३० एप्रिल १९४५
क्रेस्पीच्या मृत्यूची तारीक - ३० एप्रिल १९८२

क्रेस्पीचा कलासंग्रह हा बॅबिलोनियन होता असा त्याचा दावा होता! हिटलरलाही बॅबिलनियन संस्कृतीचं प्रचंड आकर्षण होतं. जर्मनिया हे शहर त्याला बॅबिलोनियन शहराप्रमाणे वसवायचं होतं! हिटलर आणि क्रेस्पी दोघंही कलासक्तं होते आणि दोघांनाही कलासंग्रहाचा शौक होता! दोघंही शुद्ध शाकाहारी होते!

सर्वात महत्वाचं म्हणजे फादर क्रेस्पीला पार्किन्ससने ग्रासलं होतं. बोलताना तो 'आर' या अक्षराचा उच्चार मुद्दाम हेल काढल्यासारखा करत असे! अगदी हुबेहुब हिटलरसारखाच!

फादर क्रेस्पीचा इंटरव्ह्यू

फादर क्रेस्पी हा हिटलर होता का?

हिटलर जर्मनीतून पसार होऊन इंडोनेशियाला गेला असाही एका संशोधकाने दावा केला आहे!

ब्रिटीश इतिहास संशोधक गाय वॉल्टर्स मात्रं या सर्व संशोधनाची आणि हिटलर अर्जेंटीनाला निसटला या सिद्धांताची खिल्ली उडवताना म्हणतो,

"Its 2,000 per cent rubbish!"

हिटलरच्या बंकरमध्ये हजर असलेल्यांची साक्षं जास्तं महत्वाची आहे असं बहुतेक इतिहासकारांचं मत आहे. त्यांच्या साक्षीनुसार हिटलरने आत्महत्याच केली आहे!

परंतु आत्महत्या करणारा हिटलरचा तोतया असला तर?

युद्धाच्या अखेरच्या काळात हिटलरवर उपचार करणारे बहुसंख्य डॉक्टर रहस्यमयरित्या गायब झाले! अपवाद हिटलरचा डेंटीस्ट! या डेंटीस्टनेच हिटलरच्या मृतदेहाची खात्री पटवल्याचा रशियनांचा दावा आहे, परंतु मग डीएनए टेस्टचं काय? हिटलरची कवटी म्हणून जो दावा रशियनांनी केला आहे ती ना हिटलरची कवटी आहे ना इव्हा ब्राऊनची!

आणखीन एक महत्वाचा प्रश्नं म्हणजे इव्हा ब्राऊनच्या मृतदेहाचा एकही फोटो कसा नाही?

रशियनांनी चॅन्सेलरीचा ताबा घेतल्यावर जनरल विल्हेम मोहन्क, हिन्झ लिन्ग, ऑटो गुन्शे आणि हान्स बोअर यांना रशियनांनी अटक केली. हिटलरच्या मृत्यूचं नेमकं रहस्य यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकाने उलटसुलट विधानं केली!

मोहन्क म्हणाला,
"I personally did not see the Führer's body and I don't know what was done to it."

बोअर म्हणाला,
"I have never seen Hitler dead."

सर्वात धक्कादायक खुलासा होता तो लिन्गचा! लिन्ग म्हणाला,
"I did not see Hitler, but toward the end noticed two bodies wrapped in carpet being carried out of the Bunker. I had assumed the bodies to be those of the Hitler couple, only later had he been told that this was the case!"

लिन्गची ही जबानी कमालीची धक्कादायक आहे, कारण बहुसंख्य इतिहास संशोधकांच्या मताप्रमाणे खुद्दं लिन्गनेच हिटलरचा मृतदेह चॅन्सेलरीच्या बागेत नेला! आपण नेत असलेला मृतदेह कोणाचा आहे हे लिन्गला माहीत नव्हतं?

हिटलरचा अंगरक्षक रोचस मिश पुढे म्हणाला,
"I did not hear any shots!"

महायुद्धाच्या काळात हुबेहूब हिटलरसारखे दिसणारे किमान दोन तोतये एस एस ने तयार केले होते हे ब्रिटीश आणि अमेरीकन हेरखात्याच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलं आहे. या दोनपैकीच एक तोतयाने बर्लिनमध्ये आत्महत्या करुन हिटलरचा अर्जेंटीनाला जाण्याचा मार्ग मोकळा केला होता का? आश्चर्य म्हणजे वर्षानुवर्ष हिटलरबरोबर वावरणार्‍यांनी आणि हिटलरला जवळून ओळखणार्‍यांनी हिट्लरचा तोतया ओळखला नसता का? दुसर्‍या महायुद्धानंतर इतक्या वर्षांत इतक्यावेळा तपासणी करुनही एकानेही बर्लिनमध्ये हिटलरच्या तोतयाने आत्महत्या केली असं म्हटलेलं नाही!

परंतु मग अर्जेंटीनात हिटलरला प्रत्यक्षं पाहिलेल्या लोकांचं काय?

एबल बस्तीने तर हिटलर आणि इव्हा यांना दोन मुली झाल्याचाही दावा केला आहे. या दोन मुलींबरोबर हिटलरचा फोटोही त्याच्या पुस्तकात आहे. या दोन मुली सध्या कुठे आहेत?

गोबेल्सचा मुलगा हेल्मट हा माग्डा गोबेल्सला हिटलरपासून झाला होता यात कितपत तथ्यं आहे?

या गिसेला फ्लिशर हिने लिहीलेल्या पुस्तकात तिची आई जर्मन अ‍ॅथलिट टिली फ्लिशर आणि बाप हिटलर असल्याचा दावा केला आहे! या दाव्यात कितपत तथ्य आहे?

१९४५ मध्ये बर्लिनमध्ये असताना इव्हा ब्राऊन प्रेग्नंट होती हा दावा कितपत खरा आहे?

हिटलरचा मृत्यू नेमका कधी झाला?
१९४५? १९६२? १९६४? १९७३? का १९८२?

हिटलरचं शेवटी नक्की काय झालं?

--------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ :-

Revealed - Hitler in Argentina
Hitler of the Andes

Ten Days to Die - Michael Mussamanno
Speaking Frankly - James Byrnes
Hittler in Argentina - Abel Basti
In the Footsteps of Hitler - Abel Basti
Hitler's Exile - Abel Basti
Hunting Hitler: New Scientific Evidence That Hitler Escaped Nazi Germany - Jerome Corsi
Grey Wolf: The Escape of Adolf Hitler - Gerard Williams, Simon Dunstan

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<१९४५ मध्ये इव्हाचं वय होतं ३३! परंतु इव्हाचा डीएनए अमेरीकन आणि ब्रिटीश शास्त्रज्ञांनी युद्धकाळातच मिळवला होता! इव्हाच्या डीएनएशी हा डीएनए अजिबात जुळत नव्हता! >>
-------- DNA चा शोध १९५०-५२ च्या दरम्यान वॅटसन, क्रिक यान्नी लावला असे स्मरते... मग त्या आधी १९४५ मधे इव्हाचा DNA कसा मिळाला असेल....

उदय,

या लेखासंदर्भात वाचन करताना अगदी हीच शंका माझ्याही मनात आली होती. परंतु इव्हाच्या वापरातल्या वस्तू अमेरीकन आर्मीने ताब्यात घेऊन जतन करुन ठेवल्या होत्या आणि त्यावरुन डीएनए टेस्ट करण्यात आली असं डॉ. बेलॉत्तिनींचं स्पष्टीकरण नंतर वाचनात आलं.

भारी! हे खरं असेल तर कमाल आहे! ज्या माणसाला हाल हाल करून मारायला पाहिजे होते त्याच्या नशिबी हे असे शांत जीवन? अजब तुझे सरकार!
अजून लिहा!
उदय, वॉटसन आणि क्रिक यांनी डीएनएची संरचना शोधून काढली. पण डीएनए extraction चे तंत्रज्ञान हे त्या आधी पासून उपलब्ध होते.

पण डीएनए extraction चे तंत्रज्ञान हे त्या आधी पासून उपलब्ध होते.>>

डी एन ए मॅचींगचं होतं का पण?

हिटलरच्या मृत्यूबद्दल वाद असल्याचं पहिल्यांदा आयर्विंग वॉलेसच्या द सेव्हन्थ सीक्रेट कादंबरीमुळे कळालं. मध्यंतरी डिस्कवरी कि हिस्टरीवर सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याची फिल्म होती.

मजा आली वाचताना. ख. खो. चांगुलपणा जाणे, पण कॉन्स्पीरसी थेअरी वाचायला आवडतात, आणि तुम्ही छान शेवटपर्यंत लिहिलंय. स्टोरी टेलिंग मस्त.
जिज्ञासा +१. तेच लिहिणार होतो. डीएनए मॅचींग आल्यापासून जुन्या कोर्ट केसेस मध्ये डीएनए सॅम्प्ल्स असलेल्या केसेस परत ओपन करून अनेक निकाल फिरलेत.

या प्रकरणातील गुंतागुंत आणि कॉन्स्पिरन्सी थिअरीज पाहता मोदीजी जेव्हां विश्वसेवक होतील तेव्हां सर्वच देशांच्या फाईल्स खुल्या होतील आणि नेहरू , गांधी दोषी असल्याचे सिद्ध होईल.
सध्या तरी उलटसुलट दावे पाहता फुसके बार मधे या प्रकरणावर झगझगीत प्रकाश केव्हां पडतो याची वाट पाहत बसणे एव्हढेच आपल्या हाती आहे.

.या प्रकरणातील गुंतागुंत आणि कॉन्स्पिरन्सी थिअरीज पाहता मोदीजी जेव्हां विश्वसेवक होतील
>>
लोकशाही मर्गाने निवडुन आलेल्या भारताच्या पंतप्रधानांवर हिटलर सारख्या मनोवृत्तीचे असण्याचा आणि त्याच्यासारखी विध्वंसक ईच्छा बाळगण्याचा आरोप करणे कसे काय चालते? हे पॉलीसी विरुद्ध नाही का?

लोकशाही मार्गाने निवडुन आलेल्या भारताच्या पंतप्रधानांवर हिटलर सारख्या मनोवृत्तीचे असण्याचा आणि त्याच्यासारखी विध्वंसक ईच्छा बाळगण्याचा आरोप करणे कसे काय चालते? >>>>

असे वाक्य कुठे आहे हे दाखवून द्या प्लीज. माझ्या पोस्टमधून तसा अर्थ कसा काय निघाला हे जाणून घेण्याच्या प्रतिक्षेत.
नेहरू देखील लोकशाही मार्गाने निवडून आले होते आणि राजीव गांधीदेखील याचे सुद्धा स्मरण व्हावे.

मोदीजी जेव्हा विश्वसेवक होतील तेव्हा सर्वच देशांच्या फाईल्स खुल्या होतील आणि नेहरु, गांधी दोषी असल्याचे सिद्ध होईल,
याचा अर्थ काय?

त्रुत्विका ज्याने हिटलरच्या धाग्यावर कारण नसताना मोदी आणले त्याला बोला. त्याने डिलीट केले की मी माझे प्रतिसाद काढुन टाकेन.

अशा कॉन्स्पिरन्सी थिअरीज, फाइली खुल्या होणे आणि त्यामुळे मोठे दडवले गेलेले सत्य हाती लागेल यात रस असणे यासाठी भारतीय संदर्भात ती पोस्ट मी लिहीलेली होती. त्यातला उपहासात्मक विनोद समजेलच सर्वांना अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे हे ज्ञान इथे मिळाले.

ऋत्विका सल्ल्याबद्दल अनेकानेक आभार.

ऋत्विका....

~ फ्रेडरिक फोर्साईथ किंवा आयर्विंग वॅलेस यांच्यासारख्या जबरदस्त रोमहर्षक लेखन ताकदीची एखादी कादंबरी वाचत असल्याचा जो फील आला तो विलक्षणच म्हणावा लागला...इतके तुमचे प्रभावी असे कथन झाले आहे. शिवाय मध्यरात्री वाचत गेल्यामुळे त्या कथानकाच्या प्रवाहासोबत मी जात आहे....अगदी अर्जेन्टिना स्पेनच्या त्या त्या भागात जाऊन हिटलर आणि ईव्हा यांचे सुटकेतील ते जीवन पाहात आहे असेच वाटत गेले.

खूप अभ्यास केला आहे तुम्ही....वाचनाची ही कमालच म्हणावी लागेल. हिटलरचे कथीत जळलेला देह दोस्त राष्ट्राच्या अधिकृत प्रतिनिधींनी न पाहिल्यानेच अगदी दहनाच्या त्या दिवसापासून शंकेची जी सुई फिरती राहिली आहे तिला रशियनांनी चांगलेच तेवत ठेवले होते. वादाकरीता जरी मान्य केले की हिटलर आणि ईव्हा अर्जेन्टिना इथे जीवन कंठीत राहिले (त्याना दोन मुलीही झाल्या, त्यांची संपत्ती, त्या चित्रांच्या साठ्यामुळे, अमाप होती...इ.इ.) तरीही इतक्या दीर्घ हयातीत त्यांच्याकडून (तसेच त्यांच्यासाठी सदैव सेवेत तैनात असलेले जे कुणी नाझी सदस्य असतील तसेच अर्जेन्टिनातील हितचिंतक असतील...) जगातील शांती पुन्हा बिघडेल अशी काही पाऊले उचलली गेल्याचे दाखले कुठल्या पुस्तकात मिळत नाही.

कितीही चर्चा होत राहिली (आणि व्यक्तीचा दर्जा व इतिहास पाहता ते अपेक्षितही आहेच) तरी या माणसाच्या नावाचे विलक्षण असे जे आकर्षण आहे ते सर्वत्र तसेच राहिल असेच ऋत्विका यांच्या या अभ्यासपूर्ण लेखनावरून वाटत राहते. लोक चर्चिल स्टालिन रुझवेल्ट आणि हिटलर मुसोलिनी यांची नावे कधीच आपल्या मनातून घालविणार नाहीत....इतका प्रभाव आहे या नावांचा.

कादंबरी सदृश्य वाचनाचा आनंद दिल्याबद्दल आभारी आहे.

उंत्कंठापुर्ण आहे लेखन.
मला तरी असे वाटते, की भूतकाळातील जी गुपिते आता उघड होतील, ती आता केवळ कथा कादंबरी म्हणूनच वाचावीत. कारण त्या घटनेमागील सत्य आता जरी बाहेर आले तरी त्या घटनांचा इतिहासात जो परीणाम झाला तो बदलता येणार नाही.. आणि वारसांना ( जर ते हयात असतील तर ) त्रास वा शिक्षा देण्यात काहीच अर्थ नाही.

सुपर्ब !
कम्माल लिहिलंय अगदी ..

<<< "And the third?"

"The Fuhrer!" तो जर्मन सैनिक उत्तरला! >>> शहारे आले अंगावर !

यामध्ये मला प्रश्न असा पडला, अमेरिकनांनी काही केल नाही ते ठिकाय, पण ज्यू लोकांनी काही केलं नाही असे कसे.? इतके वर्ष तो जिवंत असेल न एवढ्या ढिगभर लोकांनी त्याला पहिले असेल तर मोसादला त्याचा ठावठिकाणा लावणे औघड गेले नसते.
त्यांनी १९६०मध्ये Adolf Eichmann ला अर्जेंटिना मधून इस्राइलला स्मगल करून फासावर चढवले होते असे विकी वर आहे!
त्यांनी हिटलरचे सुद्धा तेच केले असेल काय.? कारण मोसाद ला या गोष्टी अशक्य आहे असे आजीबात वाटत नाही. उलट त्यांनी नाही केल्यास आश्चर्य वाटेल.

(मला इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. चुकले असल्यास कृपया दुरुस्तावे)

Praku,
Sahamat.malahi hach prashna padala hora.Mosad me chunchunke Nazi pakdoon tyaancha faisala kela hota ase Mosadvarchya pustakat hote.

सर्वांचे मनापासून आभार!

प्रकु आणि देवकी,

१९४५ मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यावर रशियन अधिकार्‍यांनी हिटलरच्या मृतदेहाचे अवशेष आमच्याकडे आहेत असं ठामपणे प्रतिपादन केलं ते २००९ च्या डीएनए टेस्ट पर्यंत. आणखीन एक महत्वाची गोष्टं म्हणजे दुसर्‍या महायुद्धानंतर एमआय ६ ने ह्यू ट्रेव्हर-रोपर याच्यावर हिटलरच्या मृत्यूची खात्री करण्याबाबत जबाबदारी सोपवली होती. नाझी अधिकारी आणि फ्यूररबंकरमध्ये शेवटच्या क्षणी असलेल्यांची जबानी ग्राह्य धरुन ट्रेव्हर-रोपरने हिट्लरचा मृत्यू झाला असाच निष्कर्ष काढला. परंतु यात एक गोम होती. हिटलर्स डायरीज म्हणून पुढे आलेली कागदपत्रं अस्सल असल्याचा त्याने निर्वाळा दिला असला तरी ती खोटी असल्याचं पुढे सिद्धं झालं. परंतु त्याकाळी सर्वमान्यं झालेल्या मतानुसार हिटलर मरण पावला आहे यावर मोसादने विश्वास ठेवला असावा असा अंदाज करता येऊ शकतो. अर्जेंटीनामध्ये आईकमन अगदीच एकटा राहत होता. इतर जर्मनांशी त्याचा काहीच संबंध आलेला नसल्याने त्याला उचलणं मोसादला सोपं गेलं. जोसेफ मेंगेललाही उचलण्याचा मोसादचा प्रयत्न मात्रं फसलाच. हिटलरच्या बाबतीत त्याला अर्जेंटीनात जर्मनांचं भक्कम संरक्षण असण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याला उचलणं मोसादलाही कठीण झालं असतं.

महायुद्धाच्या शेवटच्या काळात हिटलरला पार्कीन्सन्सने ग्रासलं होतं. अर्जेंटीनातही तो याच विकाराने ग्रस्तं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनात कितीही आणलं तरी पुन्हा नेता म्हणून आपला प्रभाव निर्माण करणं त्याला शारिरीकदृष्ट्या अशक्यंच होतं. तसंच नाझी भस्मासुराच्या वरवंट्याखाली जर्मन जनताही बर्‍याच प्रमाणात भरडली गेली होती, त्यामुळे पुन्हा हिटलरचं जर्मनीत स्वागत होणं ही अशक्यं गोष्टं होती.

महत्वाचं म्हणजे हिटलर अर्जेंटीनात आहे यावर झालेलं बरचसं संशोधन १९८० नंतर झालेलं आहे. तोपर्यंत हिटलरचा निश्चितपणे मृत्यू झालेला होता, त्यामुळे मोसादने शोध घेऊनही हिटलर हाती लागण्याची शक्यता जवळपास शून्यं होती.

अर्थात हा तर्क-वितर्काचा भाग आहे हे देखिल तितकंच खरं आहे. हिटलरने १९४५ मध्येच आत्महत्या केली असावी हे खरं असण्याचीही शक्यता आहेच!

"....हिटलरने १९४५ मध्येच आत्महत्या केली असावी हे खरं असण्याचीही शक्यता आहेच!...."

~ ऋतिका यानी दिलेले हे वाक्य खूप काही सांगून जाते. हिटलरने बर्लिन बंकरमधून यशस्वी पलायन केले यावर ज्यानी विश्वास ठेवला (जर्मन तसेच विजयी दोस्त राष्ट्राकडील स्टालिन तसेच अन्य उच्च अधिकारी वर्ग) त्यांची संख्या जितकी असेल त्याच्या कैक पटीने जास्त संख्या आहे ती हिटलरने १९४५ मध्ये ईव्हासह आत्महत्या केली आहे ही बाब सत्य मानणा-या जगभरातील लोकांची. मुसोलिनीला जाहीर फ़ाशी दिल्यामुळे त्याच्याबाबतीत काहीच प्रवाद उमटले नाहीत, तद्वतच जर हिटलर आणि ईव्हा विजेत्यांच्या हाती (जिवंत असोत वा त्यांचे देह जाळण्यापूर्वीच) लागले असते तर त्यानंतर भन्नाट कल्पनेचे जे पतंग पन्नाससाठ वर्षे उडत राहिले आहेत, ते घडलेच नसते.

Pages