सर्वांत मोठ्या लोकशाही प्रजासत्ताकाचा सोहळा, २६ जानेवारी

Submitted by पराग१२२६३ on 22 January, 2016 - 00:27

प्रजासत्ताक दिन सोहळा

२६ जानेवारी. भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिनांक. या निमित्ताने नवी दिल्लीत पार पडणारा प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा आणि एकूणच रायसीना टेकडीजवळील राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्स, संसद भवन, रेल भवन, वायूसेना भवन ते इंडिया गेट असा संपूर्ण परिसर, या सर्वांशी माझे विशेष नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच माझ्या संगणकाच्या आणि मोबाईलच्या डेस्कटॉप बॅकग्राऊंडवर पहिल्यापासून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील वेगवेगळी छायाचित्रेच ठेवण्याची इच्छा झाली आणि ती मी आजपर्यंत पूर्ण करत आलेलो आहे. ती छायाचित्रेही केवळ पीआयबीचीच. १९९५ पासून दरवर्षी न चुकता २६ चे संचलन आणि २९ चे बिटींग रिट्रीट दूरदर्शनवर किंवा प्रत्यक्ष नवी दिल्लीत जाऊन पाहत आलेलो आहे. या दोन कार्यक्रमांसाठी सर्व कामे बाजूला ठेऊन (अगदी नोकरीतूनही) वेळ काढत आहे आणि पुढेही असाच काढत राहीन. जेव्हाजेव्हा दिल्लीला जाण्याची संधी मिळाली, तेव्हातेव्हा या परिसरालाही आवर्जून भेट द्यावीशी वाटली ती यामुळेच. वर्षभर केवळ याच सोहळ्याची प्रतीक्षा असते आणि अगदी काऊंटडाऊनही सुरू असते.

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी/ऐकण्यासाठी माझी पहिल्यापासूनच पहिली आणि शेवटची पसंती आहे दूरदर्शन आणि आकाशवाणीला. कारण अतिशय उद्बोधक, उत्साहवर्धक आणि शुद्ध भाषेतून इथेच समालोचन ऐकता येते. अन्य वाहिन्यांसारखा उथळपणा, आरडाओरडा अजिबात नसतोच येथे. खासगी वाहिन्यांना स्वतःच्या कॅमेऱ्यांमधून या सोहळ्याचे थेट प्रसारण करण्याची परवानगी नाही. म्हणूनच या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात राष्ट्रीय भावना, बाजारू मानसिकतेचा अभाव आणि काही गांभीर्यही आजपर्यंत टिकून राहिले आहे.

गेली २१ वर्षांपासून प्रत्येक वर्षी अगदी मनापासून हा सोहळा अनुभवत आहे. या सोहळ्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेतून, निरीक्षणातून या संपूर्ण सोहळ्याविषयीची माहिती गोळा करण्याची सवय लागली. त्यातून या सोहळ्यातील छोट्या-मोठ्या घडामोडींसह त्यातील बदलांसंबंधीचीही मी जमविलेली माहिती आज ९-१० हजार शब्दांच्या आसपास पोहचली आहे. त्यातीलच काही भाग यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पुढे देत आहे. जगातील सर्वांत मोठ्या प्रजासत्ताक, लोकशाहीच्या सोहळ्याची ही शाब्दिक झलक...

-- यात यंदाच्या संचलनातील बदलांचा उल्लेख केलेला नाही. --
----०-०-०-०----
26-1.jpg
राजधानी नवी दिल्लीत दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे भव्य संचलन पार पडते. हे संचलन राष्ट्रपती भवनाजवळील विजय चौकापासून ऐतिहासिक लाल किल्ल्यापर्यंत जाते. गेल्या ६६ वर्षांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची ओळख ‘जगातील सर्वांत भव्य आणि विविधरंगी संचलन’ अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे हे संचलन देशी-विदेशी पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण ठरत आहे. हे संचलन म्हणजे भारताची लष्करी क्षमता, इतिहास, संस्कृती, परंपरा, विविध क्षेत्रांमधील प्रगती यांची थोडक्यात ओळख करून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन असते. त्याचबरोबर नागरिकांना आपले हक्क, कर्तव्ये, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता इत्यादी बाबींचीही जाणीव पुन्हा करून देण्याची संधी प्रजासत्ताक दिन उपलब्ध करून देत असतो.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा इतिहास
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू होऊन भारत एक सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक बनला. कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारताचा राज्यकारभार खऱ्या अर्थाने भारतीयांकडून पाहिला जाऊ लागला. प्रौढ मताधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही यांसारख्या नवनवीन संकल्पनांशी भारतीयांची ओळख होत गेली. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून १९५० पासून दरवर्षी २६ जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिन पाळला जातो. त्या निमित्ताने देशातील मुख्य सोहळा २६ ते २९ जानेवारीदरम्यान नवी दिल्लीमध्ये पार पडतो. या काळात भारताच्या सार्वभौमत्वाची प्रतीके असलेल्या राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, साऊथ व नॉर्थ ब्लॉक यांसारख्या महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई केली जाते.

२६ जानेवारी १९५० रोजी पहिले प्रजासत्ताक दिनाचे संचलन नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये पार पडले होते. त्यानंतर आयर्विन स्टेडियम, रामलीला मैदान, लाल किल्ला अशा ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे संचलन आयोजित करण्यात आले होते. १९५५ पासून त्याचे एक ठिकाण निश्चित करून ते राजपथावर आयोजित करण्यात येऊ लागले. सुरुवातीला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संचलन आणि काही ठराविक कार्यक्रमांपुरताच मर्यादित होता. कालांतराने त्याची व्याप्ती वाढत गेली. तसेच सुरुवातीला केवळ लष्कराचाच या संचलनात सहभाग असे. पुढे पं. नेहरुंच्या इच्छेवरून त्यात सांस्कृतिक पथकांचाही समावेश करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन सोहळ्यामागील उद्देश
1. भारतात प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये भव्य सोहळा साजरा करण्यामागील उद्देश भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला, त्या ऐतिहासिक घटनेची आठवण ठेवणे हा आहे. २६ जानेवारी १९५० पासून भारताचा राज्यकारभार भारताच्या राज्यघटनेनुसार भारतीयांकडूनच पाहिला जाऊ लागला.
2. अनेक शतकांच्या गुलामीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झाला. त्यानंतर थोड्याच काळात भारतीय राज्यघटना तयार होऊन तिची अंमलबजावणी सुरू होऊन भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण ठेऊन भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमागील प्रेरणा, इतिहास यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या हेतूने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जातो.
3. भारतात धर्म, संस्कृती, वंश, परंपर, जाती इत्यादी वैविध्य असल्याने तो एक बहुरंगी देश म्हणून ओळखला जातो. अशा देशातील सर्व नागरिकांमध्ये एकोपा, एकीची भावना निर्माण होऊन त्यांना आपापसांत देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यातून राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले शांततामय सहजीवन प्रस्थापित व्हावे, तसेच राष्ट्र उभारणीत आणि देशांच्या सीमांचे संरक्षण करण्यात अमूल्य योगदान देणाऱ्या नागरिकांच्या/लष्करी-निमलष्करी दलांचा सन्मान करण्याच्या हेतूने प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
4. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला काही हक्क प्रदान केले आहेत, तर त्याचवेळी राष्ट्र आणि समाजाप्रती नागरिकांची कर्तव्येही सांगितलेली आहेत. त्याबाबत तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते.
5. प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील मुख्य भाग असलेल्या लष्करी आणि सांस्कृतिक पथकांच्या संचलनाच्या माध्यमातून देशाची लष्करी शक्ती व सांस्कृतिक शक्ती जगासमोर मांडली जाते. त्यातून भारताच्या लष्करी तयारीविषयी थोडक्यात माहिती दिली जाते.

सोहळ्याची तयारी
प्रजासत्ताक दिनाच्या साहळ्याची तयारी विविध मंत्रालयांकडून ६ महिने आधीपासून सुरू होते. देशातील घटकराज्ये आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या चित्ररथांची निवडप्रक्रिया नोव्हेंबरमध्ये पूर्ण होते. त्याचवेळी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरांसाठी निवडप्रक्रिया देशभरात राबविली जाते. त्याचदरम्यान संचलनात सहभागी होणाऱ्या दिल्लीतील शाळांच्या विद्यार्थ्यांची निवड होते. या सर्व पथकांचा डिसेंबरपासून नवी दिल्लीतील राजपथावरसराव सुरू होतो.

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विविध कार्यक्रम
२६ जानेवारीला राजपथावर होणारे संचलन म्हणजेच नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा असे सामान्यपणे मत आढळते. पण या सोहळ्यात अन्य विविध कार्यक्रमांचाही समावेश असतो. या निमित्ताने नवी दिल्लीत केंज्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडून/विभागांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. २४ ते २९ जानेवारीदरम्यान ‘लो कतरंग राष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव’ आयोजित केला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाल्यावर देशभरातीन आलेले कलाकार आपापल्या क्षेत्रातील पारंपारिक लोकनृत्यांचे सादरीकरण या महोत्सवात करतात. त्याचबरोबर ‘राष्ट्रीय संगीत संमेलन’ तसेच आकाशवाणीतर्फे ‘राष्ट्रीय सर्व भाषा कवी संमेलन’ आयोजित केले जाते. दिल्ली साहित्य अकादमी ‘राष्ट्रीय हास्यकवी संमेलन’ भरविते. अलीकडे भारतीय टपाल खातेही ‘प्रजासत्ताक दिन टपाल तिकीट रेखांकन स्पर्धा’ भरवित आहे. मनुष्बळ विकास मंत्रालयाच्या सहकार्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) देशातील आणि देशाबाहेरील भारतीय शाळकरी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करते.

नागरिकांमध्ये विविध विषयांबाबत जागृती निर्माण व्हावी या हेतूने माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांसाठी सोशल मीडियावर विशिष्ट विषय देऊन स्पर्धा आयोजित करते. त्यात विविध गटांमधून आपल्या कौशल्याचे सर्वात्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या स्पर्धकांना राजपथावरील प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्यासाठी खास निमंत्रण दिले जाते.

एनसीसी व एनएसएसची शिबिरे
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जानेवारीमध्ये दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांची महिन्याभराची ‘प्रजासत्ताक दिन शिबिरे’ भरविली जातात. या शिबिरांसाठी देशाच्या विविध भागांमधून विशेष निवडप्रक्रियेतून सुमारे दोन-दोन हजार छात्र येत सतात. भारताच्या समृद्ध कला-परंपरा, संस्कृती यांची युवकांना ओळख व्हावी, त्यांच्यात संवाद वाढावा आणि यातून राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लागावा असा हेतू या आयोजनांमागे असतो आणि तो बऱ्याच प्रमाणात साध्यही होतो. . या शिबिरांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छात्र व स्वयंसेवकांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होत असते.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय शौर्य गाजविलेल्या १६ वर्षांखालील मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या आधी विविध प्रकारचे ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ जाहीर केले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५७ मध्ये झाली. भारतीय बाल कल्याण परिषद या पुरस्कारांची घोषणा करते.

राष्ट्रपतींचा संदेश आणि विविध पुरस्कारांची घोषणा
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून संदेश देतात. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या विविध सेवांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार/सन्मान जाहीर करतात. त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे,
• लष्करी सन्मान - परम वीर चक्र, अशोक चक्र, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक इत्यादी.
• राष्ट्रपती पोलीस पदक
• प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक
• नागरी सन्मान - भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री.
• इत्यादी

परदेशी प्रतिनिधींची भेट
प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने भारतातील विविध देशांच्या राजदुतांसाठी २३ जानेवारीला सायंकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींकडून ‘स्वागत समारंभ’ आयोजित केला जातो. परदेशांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद या समारंभातून साधला जातो.

प्रजासत्ताक दिनाचे संचलन
राष्ट्रपती भवनाजवळील विजय चौकापासून सुरू होऊन लाल किल्ल्यापर्यंत जाणारे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे या सोहळ्यातील महत्त्वाचे अंग आहे. पूर्वी या दोन ठिकाणांपर्यंत हे संचलन १३ किलोमीटरचे तर कापत असे. मात्र १३ डिसेंबर २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संचलनाच्या मार्गात बदल करून हे अंतर ८ किलोमीटरपर्यंत कमी करण्यात आले.

समाली मंच आणि आसपासचा परिसर
राजपथाच्या मध्यावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि प्रमुख पाहुणे यांच्यासाठी सलामी मंच उभारला जातो. त्याच्या भोलतीने राजदुतांबरोबरच सर्व खासदार, राजदूत, प्रमुख पाहुण्यांबरोबर आलेले प्रतिनिधी, सामान्य नागरिक इत्यादींसाठी विशेष दीर्घा उभारल्या जातात. सलामी मंचाबरोबरच सजलेला राजपथ आणि संपूर्ण राजपथावर फडफडणारे राष्ट्रध्वज समारंभाला उत्साहवर्धक बनवितात. मागील वर्षात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील १०० शाळकरी विद्यार्थांना पंतप्रधानांच्या खास दीर्घेत बसून संचलन पाहण्यासाठी निमंत्रित केले जाते.

शहिदांना आदरांजली
संचलनाच्या सुरुवातीला इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे देशाच्या सीमांचे संरक्षण करताना शहीद झालेल्या लष्करी जवानांना पंतप्रधान संपूर्ण देशाच्या वतीने आदरांजली वाहतात. १९७१ मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामानंतर इंडिया गेट येथे अमर जवान ज्योती उभारण्यात आली होती. त्यानंतर ही प्रथा १९७२ पासून सुरू झाली.

संचलनासाठी प्रमुख अतिथी
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून एखाद्या देशाच्या प्रमुखाला बोलाविण्याची प्रथा आहे. भारताच्या परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने या प्रथेला महत्त्व असते. संबंधित वर्षात ज्या देशाशी भारताचे संबंध प्राधान्याने विकसित केले जाणार असतात, त्या देशाच्या प्रमुखाला भारताचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करत असतात. ही प्रथा २६ जानेवारी १९५१ पासून सुरू झाली. त्यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो यांना प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथावर सुरू झाल्यावर १९५५ पासून प्रमुख अतिथी म्हणून अधिकृतरित्या एखाद्या देशाच्या प्रमुखाला किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी पाकिस्तानचे गव्हर्नर-जनरल मलिक गुलाम महंमद हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी होते. २०१६ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्क्वा ओलांद यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाला आतापर्यंत फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी १९७६, १९८०, १९९८, २००८ आणि २०१६ असे सर्वांत जास्त वेळी निमंत्रित करण्यात आले आहे.

लष्करी सन्मान प्रदान
राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथींबरोबरच अन्य सर्वांचे सलामी मंचावर आगमन होऊन ध्वजारोहण झाले की राष्ट्रपतींच्या हस्ते नुकत्याच जाहीर झालेल्या लष्करी सन्मानांचे विरतण होते. संचलनाच्यावेळी केवळ परम वीर चक्र आणि अशोक चक्र या सन्मानांचेच वितरण होते. अन्य सन्मान प्रदान करण्यासाठी मार्च/एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात विशेष समारंभ आयोजित केला जातो.

मुख्य संचलन
लष्करी सन्मान प्रदान केल्यावर राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे मुख्य संचलन सुरू होते. यात सुरुवातीला येणाऱ्या शस्त्रसामग्री आणि संचलन पथकांमधून भारताची लष्करी ताकद दाखविली जाते. भारतातील परराष्ट्रांच्या राजदूत आणि लष्करी प्रतिनिधींसमोर या संचलनाच्या माध्यमातून काही शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले जाते. अशा प्रकारच्या प्रदर्शनाला विशेष महत्त्वही असते. कारण त्यातून परराष्ट्रांना योग्य तो संदेश पोहचविणे शक्य होते. उदाहरणार्थ, सन २०१३ मध्ये संचलनात ५००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राचे प्रथमच प्रदर्शन करण्यात आले होते. या प्रदर्शनाची चीनने तातडीने दखल घेऊन त्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली होती. संचलनादरम्यान भारत विकसित करत असलेल्या आणि लवकरच लष्करात दाखल होण्याची शक्यता असलेल्या शस्त्रास्त्रांचेही याच हेतूने प्रदर्शन केले जाते.

संचलन पथकांपाठोपाठ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचेही प्रदर्शन चित्ररथ आणि अन्य सांस्कृतिक पथकांच्या माध्यमातून घडविले जाते.

मान्यवरांसाठी ‘स्वागत समारंभ’
संचलनानंतर सायंकाळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व मंत्री, खासदार, भारताचे सरन्यायाधीश, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, प्रमुख अतिथी यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींकडून ‘स्वागत समारंभ’ (ॲट होम) आयोजित केला जातो. चहापानाचा हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींसाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि अन्य महत्त्वपूर्ण पदांवरील व्यक्तींच्या अनौपचारिक गाठीभेटी घेण्याचे माध्यम असते.

संचलनानंतरचा दुसरा दिवस
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी संचलनाचील सर्व कलाकार, एनसीसी व एनएसएस शिबिरांमधील छात्र यांच्या भेटीचा खास समारंभ राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो. उपराष्ट्रपती, पंतप्रधानही त्यानंतर या सर्वांच्या भेटी घेतात. यामुळे देशाच्या अतिशय दूरवरच्या भागातून आलेल्या सामान्य व्यक्तीलाही एवढ्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची संधी मिळत असते आणि ही बाब त्या व्यक्तींसाठी निश्चित प्रेरणादायी ठरत असते.

पंतप्रधानांची एनसीसी रॅली
एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराचा औपचारिक समारेप ‘पंतप्रधानांच्या रॅली’ने २८ जानेवारीला होतो. त्यामध्ये एनसीसचे छात्र आणि मित्रदेशांमधून आलेल्या छात्रांची प्रात्यक्षिके होतात. या शिबिरात पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एनसीसीच्या निदेशालयांना विविध सन्मान दिले जातात. यावेळी पंतप्रधान आपल्या संबोधनातून छात्रांना भावी जीवनात उपयोगी ठरेल असा संदेश देतात.

बिटींग द रिट्रीट
राजधानीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारेप २९ जानेवारीला सायंकाळी ‘बिटींग द रिट्रीट’ या समारंभाने होतो. नवी दिल्लीतील विजय चौकात होणाऱ्या या समारंभात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित असतात. हा समारंभ पहिल्यांदा १९५२ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या समारंभात लष्कराच्या तिन्ही दलांची बँडपथके संगीत सादर करतात.
प्राचीनकाळी सूर्यास्त झाल्यावर शंखनाद करून सूर्योदयापर्यंत युद्ध थांबविण्याची भारतात प्रथा होती. शंखनादानंतर युद्धभूमीवरील ध्वज उतरविले जात आणि सैनिक आपल्या मृत साथीदारांना घेऊन बराकींमध्ये परतत असत. त्यावेळी ते विविध प्रकारच्या धून वाजवित जात असत. अशा प्रकारच्या प्रथेचे उल्लेख महाभारतातही आढळतात. ही परंपरा सतराव्या शतकात युरोपात गेल्यावर तिला सध्याच्या ‘बिटींग द रिट्रीट’चे स्वरुप आले.

संचलनातील पथकांना पुरस्कार
संचलनानंतर ३-४ दिवसांनी संरक्षण मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या पथकांना पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये लष्करी आणि निमलष्करी दले, चित्ररथ, शाळकरी मुलांची नृत्यपथके यांचा समावेश असतो. हे पुरस्कार १९८७ मध्ये सुरू करण्यात आले होते.

विविध राज्यांमधील कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील मुख्य कार्यक्रम संबंधित घटकराज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपालांच्या हस्ते पार पडतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संबंधित घटकराज्यांचे राज्यपाल राज्यातील जनतेला उद्देशून संदेश देतात. त्याचप्रमाणे सर्व जिल्हा मुख्यालये आणि अन्य महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये तसेच विविध संस्था-संघटनांकडूनही सार्वजनिकरित्या या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मात्र नवी दिल्लीतील मुख्य सोहळ्याइतके त्याचे व्यापक स्वरुप नसले तरी उत्साह तसाच असतो.

भारताच्या दुतावासांमधील समारंभ
भारताचा प्रजासत्ताक दिन जगातील विविध देशांमध्ये असलेल्या भारताच्या राजदुतावासांबरोबरच वाणिज्य दुतावासांमध्येही साजरा केला जातो. त्यावेळी संबंधित देशांमधील भारताचे राजदूत/वाणिज्यदूत यांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवितात.

एकूणच प्रत्येक टप्प्यावर जाणविणारा वक्तशीरपणा, भारतीय कला-परंपरा आणि संस्कृतीच्या विविध रंगाची उधळण, मतभेद बाजूला जाऊन सोहळ्यातील प्रत्येक सहभागी व्यक्तींमध्ये निर्माण झालेला उत्साह, ऐक्याची भावना आणि शिस्त ही प्रजासत्ताक दिन सोहळ्याची खास वैशिष्ट्ये ठरलेली आहेत. हा सोहळा जगाला भारताचे सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्य दाखविण्याचे साधन ठरत असतो, तसेच तो वैविध्यपूर्ण भारतीय समाजात ऐक्य निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी हातभार लावण्याचेही साधन ठरतो. नवी दिल्लीत चित्ररथांचे कलाकार, एनसीसी व एनएसएस शिबिरांमधील छात्र, लष्करी सरावपथके यांचे महिनाभर वास्तव्य असते. त्यावेळी देशाच्या विविध भागांमधून आलेल्या त्या कलाकारांमध्ये देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळते. जगातील सर्वांत मोठ्या प्रजासत्ताकाच्या या भव्य सोहळ्यात भारताच्या ‘प्रथम नागरिका’पासून अगदी सामान्यातील सामान्य नागरिकाचाही सहभाग असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘भारतीय प्रजासत्ताकाचा सोहळा’ ठरतो आहे.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती.
प्रजासत्ताक दिनाची परेड माझीही अत्यंत आवडीची. Happy

(तुम्हाला संपर्कातून एक ईमेल केलं आहे. कृपया पाहून उत्तर द्यावे ही विनंती.)

प्रजासत्ताक दिनाची परेड माझीही अत्यंत आवडीची.>>+१
आमच्या घरी तर सकाळीच गोडधोड केले जाते..
महाराष्ट्राच्या चित्ररथाविषयी अगोदरच फॉलोअप केले जाते.. यंदा नाही आहे तो..
आता मुलींनाही ही परेड बघण्याची आवड निर्माण करतोय.. त्या शाळेतुन येइ पर्यंत परेड संपलेली असते .. मग रेकॉर्डींग दाखवतो..

जपून ठेवावा हा धागा...इतकी सुंदर आणि सविस्तर माहिती दिली गेली आहे....आपल्या राष्ट्राचे सर्वार्थाने २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दोन दिवस "राष्ट्रीय सण" म्हणून सर्वांनीच साजरे करावे अशीच भावना या लेखातील माहितीमुळे वाटत राहील. धन्यवाद पराग.

"विविध कार्यक्रम" गटाची माहिती देताना एके ठिकाणी..."...‘राष्ट्रीय सर्व भाषा कमी संमेलन’..." असे चुकीचे टंकले गेले आहे....तिथे "कवी" अशी दुरुस्ती करावी पराग.

सुंदर माहिती. एवढ्या शिस्तबद्ध कार्यक्रमाचे संयोजन कसे केले जाते ते वाचता आले. गेली बरीच वर्षे हि परेड बघता आलेली नाही, मला.

काय मस्त माहिती दिली आहे तुम्ही पराग.
प्रजासत्ताकदिनाची परेड पाहणं माझ्याही अत्यंत आवडीचं!

सुंदर लेख. मलादेखील हे संचलन दरवर्षी पहायला खूप आवडतं. खासकरून लष्कराचे संचलन पाहताना त्यांचे नारे आणि इतर माहिती ऐकताना आपोआप अभिमान वगैरे वाटायला लागतोच. नंतर येणारी वेगवेगळी क्षेपणास्त्रे, इतर अस्त्रे रडार वगैरे पाहताना आपल्या देशाच्या प्रगतीचं फार कौतुक वाटतं.

खूप सुंदर माहिती. प्रजासत्ताक दिनाची परेड .... डोळ्यांचे पारणे फिटते.

सुरेख माहिती.
नंदिनी +१
अभिमानाने उर भरून येतो आपली विविध शस्त्रास्त्रे पाहताना _/ Happy

सुंदर लेख, छान माहिती..
टीव्ही समोर बसून लाईव्ह परेड बघायची संधी फार कमी वेळा मिळाली आहे.. बरेचदा मग रात्री बातम्यात वगैरे क्षणचित्रेच बघितली जातात..

khup chan mahiti

Darvarshi avdine sanchalan pahato

pratyek band pathkachi vegli dhun,veg vegle uniform he pan abhyass nya sarkhe aste

लेखात म्हटल्याप्रमाणे मूळ संग्रहित माहिती १०,००० शब्दांच्यावर जमलेली आहे. पण इथे त्यातील सुमारे एक-अष्टमांश भाग प्रकाशित केला आहे.

११ वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा कालावधी कमी करण्याच्या हेतूने त्यातील सहभागी पथकांची संख्या कमी करण्यात आली होती. त्याचबरोबर काही प्रथांनाही कात्री लावण्यात आली होती. त्यात संचलनाच्या वेळी परम वीर चक्र आणि अशोक चक्र प्रदान करण्याची प्रथा बंदी करण्यात आली होती. मात्र त्याबाबत मी माझे मत त्यावेळी तत्कालीन संरक्षण मंत्र्यांना (सध्याचे राष्ट्रपती महोदय) कळविले होते. त्यानंतर ती प्रथा परत सुरू झाली आहे.

अद्भुत लेखनशैली अन अद्भुत संकलन जपून ठेवण्या लायक धागा आहे हा

परागसर मानाचा मुजरा घ्या आमचा ___/\___

. जेव्हाजेव्हा दिल्लीला जाण्याची संधी मिळाली, तेव्हातेव्हा या परिसरालाही आवर्जून भेट द्यावीशी वाटली ती यामुळेच

ह्या परिसराला जेव्हा जेव्हा भेट देतो (राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक, एकुणच रायसीना हिल्स भाग) अंगावर काटा उठतो. ६० ६५ वर्षं अगोदर लढ़ा ते फाळणी घाव झेललेल्या ह्या राष्ट्राची ती आत्मविश्वासाने एकविसाव्या शतकाकड़े बघणारी गर्दन वाटते ती मला. अन्नधान्य उत्पादन कमी होते तेव्हा शास्त्रीजी सारख्या पुण्यात्मा माणसाने दिलेल्या सार्वजनिक उपासाच्या हाकेला शिस्तीत ओ देणारे बापजादे आठवतात, रेशनच्या कापड़ाची पातळे नेसणाऱ्या आया बहिणी आठवतात, हळूहळू चुकांतुन शिकत फ़ीनिक्स सारखा उभा राहणारा माझा लाडका देश झरझर सरकतो डोळ्या समोरुन माझ्या, "भारतासारख्या गरीब देशाला अंतरिक्ष संशोधनाचे चोचले परवडणार आहेत का?" हे विचारणाऱ्या गर्विष्ठ पाश्चात्य शक्ति आठवतात जिद्दीचा खेळ आठवतो, नागा साधू अन गारुड्यांचा देश अशी प्रतिमा ते जगातल्या सर्वात मोठ्या इंजीनियर डॉक्टर्स अन शास्त्रज्ञाचा पूल असणारा, अत्यंत हुशार संगणक अभियंत्यांचा देश ही बदलणारी प्रतिमा आठवते, आपण राखेतून उठणारे म्हणून इतर कित्येक देशांचे कौतुक करतो जे रास्त आहे पण असेच एक सोनेरी उदाहरण आपली परमप्रिय मातृभूमी आहे हे पटवणारा तो क्षण असतो जेव्हा मी इंडिया गेट ला उभा असतो, अतिशय शांत अन लीनपणे सुरु झाला होता हा प्रवास, आज आमचा साउथ ब्लॉक हे जगातले तिसरे सर्वाधिक शक्तिशाली सत्ताकेंद्र आहे हे जाणवते तिथे, एका छपराखाली ३५० आईएस अधिकारी बसणारे पीएमओ हे जगातले सर्वाधिक बुद्धिजीवी सत्ता केंद्र असल्याचे जाणवते.

मित्रहो, हजार प्रॉब्लम संपले लाखो अजुन समोर दत्त आहेत पण रायसीना पाहताच ते अंगावर घ्यायची ताकद आली आहे हे जाणवते. ह्या विभोर वातावरणात आपणा सर्वांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! _/\_

सोन्या बापू जी, तुमची प्रतिक्रियाही थोडक्या शब्दात मोठा आशय सामावलेली आहे. भारताबाबत सकारात्मक दृष्टी निर्माण करणाऱ्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खरंच मनापासून धन्यवाद!

राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या राष्ट्रहितांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही भारतीय नौदलाची भूमिका आणि कार्यक्षेत्र अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. म्हणूनच राजपथावरील संचलनात भारतीय नौदलाचा सहभाग वाढविण्यात यावा आणि तो नौदलाच्या हवाई शाखेच्या माध्यमातून वाढू शकतो, असे मी सुचविले होते. गेल्या म्हणजेच २०१५ च्या संचलनात नौदलाच्या पी-8 आय या विमानाबरोबरच दोन मिग-29 के विमाने सहभागी झाली होती.

प्रजासत्ताक दिनाची परेड खरोखर एक छान सोहळा! Happy

खुप छान माहिती दिलीत! Happy

आम्ही आवर्जुन पहातो!

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी पक्वान ठरलेले ते म्हणजे जिलेबी! ह्या शिवाय पर्याय नाही!

संपुर्ण भारतात जिलेबी आ सेतु हिमालय मिळते! Happy

दोनवेळा प्रत्यक्ष संचलन पहावयास मिळाले आहे.
त्या राजपथावरुन संचलन होत असताना इतक्या कडाक्याच्या थंडीत अंगावर रोमांच फुलतात, छाती अभिमानाने भरुन येते.

Pages