बोर-न्हाण

Submitted by स्वीटर टॉकर on 15 January, 2016 - 05:01

गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.

आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.

तर मग आपण आपल्या कार्यक्रमामध्ये अशांना का सहभागी करून घेऊ नये ज्यांना हा अनुभवच कधी घ्यायला मिळालेला नाही आणि मिळण्याची शक्यता देखील कमीच आहे? ह्या विचारानी आम्ही उत्सवचं बोर-न्हाण सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या ‘आपलं घर’ नावाच्या अनाथाश्रमात केलं. अनाथ मुलामुलींबरोबर तिथे निराधार वृद्धांची देखील काळजी घेतली जाते.

बोर-न्हाण हा छोट्यांचा कार्यक्रम असल्यामुळे तिथल्या चौथीपर्यंतच्याच मुलामुलींना त्यात सहभागी करून घेतलं होतं. त्यातली सगळ्यात छोटी मुलगी ‘खुशी’ चार वर्षांची आहे. तिचंही बोर-न्हाण केलं. सर्व मुलांना साखरेच्या दागिन्यांचं जाम कुतूहल! डोक्यावर ओतलेली बोरं आणि चॉकलेटं गोळा करायला हीऽऽ झुंबड. मग त्यांचे खेळ घेतले. ते झाल्यावर संस्थेतल्या सर्वांनाच हॉलमध्ये बोलावलं. मग एक तासभर जादूचे प्रयोग झाले. त्यानंतर जेवण. कार्यक्रम समाप्त.

संस्थेला दिलेली देणगी हा कार्यक्रमाचा भाग न ठेवता संस्थेचे संस्थापक, संचालक अर्थात सर्वेसर्वा श्री. फळणीकर यांच्या ऑफिसमध्ये खाजगीत दिली. खरं सांगायचं तर ऑफिस खाजगी नाहीच. संस्थेचे सर्व व्यवहार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक. हे सगळं तिथली स्वच्छता, साधेपणा, टापटीप, मुलांची वागणूक आणि स्वावलंबन यातून पावलोपावली दिसून येतं.

काही वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ करण्याऐवजी ती सगळी रक्कम आम्ही ‘जनसेवा फौंडेशन’ नावाच्या अशाच संस्थेला दिली होती तेव्हां माझा तिथल्या मुलांशी संबंध आला होता तेव्हां देखील मी अशीच इंप्रेस झाले होते. मात्र मला तेव्हां असं वाटलं की ही संस्था खास चांगली आहे म्हणून इथली मुलं इतकी गुणी आहेत. आता माझ्या लक्षात आलं की कळकळीनी चालवलेल्या या सर्वच संस्था भावनिक रीत्या सक्षम अशी पिढी तयार करताहेत. मात्र आपला त्यांच्याशी संबंध नसल्यामुळे आपल्या हे लक्षात आलेलं नाही.

त्यांच्या हॉलमध्ये आम्ही फुग्यांचं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. मात्र आपल्या कामासाठी त्यांचं मनुष्यबळ वापरायचं नाही असं ठरवून आम्ही एक तास आधीच तिथे पोहोचलो. फुगे तिथेच फुगवणं जरूर होतं कारण इतका व्हॉल्यूम गाडीत मावणार कसा? मोठे फुगे तोंडानी घट्ट फुगवणं आणि त्यांची नीट गाठ मारणं सोपं नसतं. पहिली ते चौथीची मुलं हे सटासट करू शकतील यावर माझा विश्वास बसला नसता जर मी स्वतः डोळ्यांनी ते पाहिलं नसतं! अर्ध्या तासात हॉल तयार झाला!

जादुगार देखील आम्हाला डेकोरेशनला मदत करंत होते. ते मंगेश पाडगावकरांची एक कविता गुणगुणू लागले. मी मुलांना विचारलं, “ही कविता कुणाची आहे माहीत आहे का रे मुलांनो?” “होऽऽऽ” एकसुरात उत्तर. कविता त्यांच्या अभ्यासक्रमात नसूनसुद्धा त्यांना ते माहीत होतं! त्यांना हे देखील माहीत होतं की काही दिवसांपूर्वीच पाडगावकरांचं देहावसान झालं होतं! Maybe I am out of touch, आणि एकाचं कौतुक करण्यासाठी दुसर्‍याला खाली खेचण्याची जरूर नाही, पण मला वाटत नाही की नॉर्मल मुलांना प्रायमरीमध्ये साहित्याबद्दल इतकी माहिती असते म्हणून. (यात माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीदेखील सामील आहेतच.)

आपण या मुलांना अनाथ म्हणतो खरं, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज तिथल्या प्रत्येक मुलाला वीस भावंडं, पंधरा मावशा, दहा आजोबा आणि दहा आज्या आहेत. भले त्यांच्याकडे दिवाळीत फोडायला हजारो रुपयांचे फटाके नसोत, पण तिकडे गणपती, दिवाळी, जन्माष्टमी वगैरे जितक्या जोमात साजरे केले जातात तितक्या जोरात बाहेरची मुलं करंत नाहीत. ‘जनसेवा फौंडेशन’ मध्ये लहान मुलांची काळजी घेणार्‍या ज्या मावशी आहेत त्या व्हील-चेअरमध्ये आहेत! त्या नेहमी म्हणतात, “मी मुलांची काळजी घेतेच कुठे? मुलंच माझी काळजी घेतात!”

अशा ठिकाणी मी जाऊन आले की मला अगदी खुजं असल्यासारखं वाटतं.

हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Bagz - लेख वाचला, मन विषण्ण झालं वगैरे म्हणणार नाही, कारण एवढे तोडके शब्द नाहीत पुरेसे.
डोळ्यात अचानक अश्रू जमा झाले. अशी माणसे थकता कामा नये.

स्वीटर टॉकर काकु,
काय सुरेख !!
खास करुन "हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?" ह्या वाक्यांनी तुम्ही सगळ्यांना च विचार करायला भाग पाडलतं.
माझा मुलगा आता ६ वर्षाचा आहे, आत्तापासुन च त्याला मी हे पढवायाला लागलो आहे कि आपण आता तुझा वाढदिवस असा वेगळ्या प्रकाराने साजरा करत जाउया... आणि हळुहळू त्याला ही ते पटतयं... बघु काय होतयं पुढे नक्की ते. पण हे पक्कं आहे की सामाजिक बांधिलकी जपणं आणि ती पुढच्या पिढी कडे पोहोचवणं हि आता आमची(पालकांची) जबाबदारी आहे.

बा.द.वे. गोडबोले काकांना सांगा कि काही तरी लिहायला.. मीस करतो आहे त्यांचे लिखाण आम्ही Happy

- प्रसन्न

Pages