तुझ्या आवडीचे

Submitted by संतोष वाटपाडे on 15 January, 2016 - 00:03

नको चांदण्याचे नको सागराचे
नको उंच माडी सुशोभित घराचे
प्रिये स्वप्न पाहू तुझ्या आवडीचे
नदीकाठच्या एकट्या झोपडीचे...

कधी गार वारा कधी ऊन येइल
कधी पावसाने चुडा चिंब होइल
सरी झेलताना भिजू धुंद होऊ
करु सोबतीने तळे ओंजळीचे...
प्रिये स्वप्न...

परसबाग छोटी घरे पाखरांची
उघडताच ताटी फ़ुले कर्दळीची
कधी झोपलो जर तुझ्या पायथ्याशी
मला छत मिळावे तुझ्या ओढणीचे ...
प्रिये स्वप्न..

जिथे चूल आहे तिथे दाट हिरवळ
सदा दरवळावा चुलीतून दरवळ
मला भूक नाही तरी वेड आहे
सुगंधी तुझ्या हातच्या भाकरीचे...
प्रिये स्वप्न...

तुझा हात हाती बसायास माती
नभाची रजाई उजेडास वाती
तरल गंध काही तुझे स्पर्श काही
कसे मोल सांगू प्रिये या सुखाचे....
प्रिये स्वप्न..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा व्वा....अलवार काव्य व चित्रदर्शी वर्णन ...
आणि का कोण जाणे उगाचच बेताब हिंदी सिनेमातले ते ट्री हाउस आठवले Happy