भगवद्गीता - सोप्या मराठीत - ६

Submitted by एम.कर्णिक on 8 February, 2009 - 23:11

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
ध्यानयोग
नावाचा सहावा अध्याय

फलप्राप्तीची आस न धरता कर्मे जो करतो
तो संन्यासी, कर्मयोगिही, ना जो अकर्मि तो १

जाण पांडवा, एकत्व वसे सांख्य कर्मयोगी
फलकामना त्यागल्याविना बने न कुणि योगी २

योगी होण्याच्या इच्छेचे मूळ कर्म असते
योगारूढ झाल्यावर त्याचे शमन मूळ बनते ३

विषयासक्तीविरहित करूनी निरिच्छ आचरण
सर्व कामना त्यागी जो तो ‘योगारूढ’ जाण ४

स्वत: स्वत:ला उध्दारावे खचून ना जाता
स्वत:चे स्वत: शत्रू असतो अन् स्वत:च भ्राता ५

स्वमन जिंकिता त्याशी जुळते बंधुसम नाते
पराजिताच्या मनांत केवळ शत्रुत्वच उरते ६

मनास जिंकी त्याचा आत्मा स्थिर शांती लाही
शीतउष्ण, सुखदु:ख, मान वा अपमानांतरिही ७

ज्ञान नि विज्ञानाने ज्याचा आत्मा तॄप्त असे
त्याला आध्यात्मी योगी ही ख्याती प्राप्त असे
स्थिर बुध्दीने इंद्रियांवरी विजय मिळवोनी
दगड माति अन् सोने याना समान तो मानी ८

जिवलग मित्र, तसे बंधु अन् उदास, मध्यस्थ
साधू अथवा पापी आणिक सुष्ट तसे दुष्ट
या सर्वाना समानतेने जो साधू वागवि
त्या समबुध्दियोग्याचे स्तर विशेष सर्वस्वी ९

एकचित्त होउन योग्याने एकांती जावे
निरिच्छ राहुन पाश सोडुनी योग आचरावे १०

स्वच्छ आणि मध्यम उंचीचे स्थान निवडावे
दर्भावर हरिणाजिन, त्यावर वस्त्र अंथरावे ११

अशा आसनावरी बसावे आवरून चित्तेंद्रियां
आत्मशुध्दिस्तव करण्यासाठी उचित योगक्रिया १२

पाठ, मान, अन् डोके ठेवुनि ताठ, बसावे स्थिर
अविचलित, लावुनि नाकाच्या अग्रावर नजर १३

भीतिमुक्त अन् शांत मनाने ब्रम्हचर्य पाळावे
आणिक माझ्या ठायी अपुले मन केंद्रित करावे १४

अशा प्रकारे करण्याने योगाचे आचरण
माझ्याशी एकरूपतेचे मिळेल निर्वाण १५

अति खाणे, काही ना खाणे, अति निद्रा, जाग्रणे
योगसिध्दि न होण्यामागे ही सारी कारणे १६

यथोचित आहार विहार अन् माफक विश्रांती
यांचे अवलंबन केल्याने सुखद योगप्राप्ती १७

मना आवरून आणिक राहुन आत्म्याशी निष्ठ
उपभोगाप्रत निरिच्छ बनतो म्हणति त्यास ‘युक्त’ १८

वारा नसता जशी दिव्याची वात संथ तेवते
मन आवरता योग्याचेही ध्यान स्थिर बनते १९

बध्द मना योगाभ्यासाने उपरति होते जधि
स्वत:स बघुनी स्वत:त आत्मा होतो आनंदी २०

जेव्हा त्या इंद्रियांपलिकडिल अमर्याद् सुखात
स्थिरावुनी योगी ना होतो कधिही तत्वच्युत २१

ज्या स्थितीमधि अधिक सुखाचा लोभ न तो धरतो
वा अति दु:खद घटनेनेही विचलित ना होतो २२

असा दु:खसंयोगवियोगच ‘योग’ म्हणुनि ज्ञात
कंटाळा न करावा याचे पालन करण्यात २३

मनोवासना पूर्णपणाने टाकाव्या त्यागुनी
इंद्रियांस आवर घालावा आपण चहुकडुनी २४

धैर्य बाळगुनि हळू हळू मग बुध्दि शांतवावी
आत्म्यामध्ये मन गुंतवुनी चिंता न करावी २५

चंचल मन जर स्वैर व्हावया होइल अनावर
निश्चयपूर्वक आत्म्यातच त्या बांधावे सत्वर २६

असे मनाला शांत करूनच ‘युक्त’ योगी मिळविती
दोषमुक्त निष्पाप ब्रम्हमय उत्तम सुखप्राप्ती २७

अशा प्रकारे पापमुक्त अन् आत्मतुष्ट योगी
ब्रम्हमीलनामधि मिळणारे आतीव सुख भोगी २८

आत्मा ज्याचा योगयुक्त तो समदॄष्टी राही
सर्व जिवांमधि स्वत:, स्वत:मधि सर्व जीवां पाही २९

मी सर्वांभूती, अन सारे मम ठायी मानतो
अशास मी ना अंतरतो, ना तो मज अंतरतो ३०

एकत्वाने सर्वांभूती असलेल्या मज भजतो
तो योगी वागुनी कसाही मज ठायी वसतो ३१

स्वत:सारखे सर्वां लेखी सुखात वा दु:खात
अशा युक्त योग्याची गणना सर्वोत्कॄष्ठात ३२

अर्जुन म्हणाला,
हे मधुसूदन, समत्वतेचा योग तुवा सागितला
चंचलतेमधि टिकण्याजोगा मला न जाणवला ३३

चंचल मन हे बलिष्ठ असते, कठिण तया रोखणे
जसे कुणाही अशक्य असते वार्‍याला बांधणे ३४

श्रीभगवान म्हणाले,
यात नसे शंका, चंचल मन दुष्कर वळवाया
पण अभ्यासाने, वैराग्याने बधेल, कौंतेया ३५

मनावरी ताबा नसला तर योग हा अशक्य
प्रयत्नपूर्वक मिळवुनि ताबा योगप्राप्ति शक्य ३६

अर्जुन म्हणाला,
असुनहि श्रध्दा यत्नाअभावी योगातुन ढळतो
हे श्रीकॄष्णा, नर ऐसा कुठल्या गतीस जातो ? ३७

ब्रम्हप्राप्तिमार्गातुन भ्रष्ट अन् गोंधळलेला तो
नभात फुटल्या मेघापरी का तोहि नष्ट होतो ? ३८

संशय हा माझा, भगवंता, तुम्हीच दूर करा
निरसन करणारा तुम्हाविण नसे कुणी दुसरा ३९

श्री भगवान म्हणाले,
इहलोकी वा परलोकिही तो नष्ट नाहि होत
कल्याणप्रद कर्में करि त्या दुर्गति ना प्राप्त ४०

पुण्यकर्म करणार्‍यांजैसा तो स्वर्गी जाई
दीर्घकाळ राहुनी तिथे मग पुनर्जन्म घेई
पुनर्जन्मही अशा घरी जे शुध्द नि श्रीमंत
योगभ्रष्ट असुनिही असा तो ठरे भाग्यवंत ४१

किवा बुध्दीवंत योगि या घरी जन्मा येई
जन्म असा अतिदुर्लभ, पार्था, ध्यानी तू घेई ४२

या जन्मीहि मिळे तया गतजन्मामधले ज्ञान
ज्यायोगे तो मिळवू पाहिल सिध्दी, कुरूनंदन ४३

पूर्वजन्मिच्या ज्ञानाने तो जिज्ञासू होई
योगाकर्षण त्याला वेदांपलीकडे नेई ४४

जन्मोजन्मी प्रयत्न करूनी पापमुक्त होत
सिध्दी मिळुनी योगी तो मग जाई शांतिप्रत ४५

तपस्व्याहुनी, विद्ववानाहुनी, कर्मठांहुनी श्रेष्ठ
योगी असतो असा, पार्थ, तू योगी बनणे इष्ट ४६
सर्व कर्मयोग्यात ठेवुनि श्रध्दा मजलागी
भजतो जो मज त्यास मानि मी सर्वोत्तम योगी ४७

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
ध्यानयोग नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला.
**********
अध्यायांसाठी दुवे :
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

हल्लीच्या तणावपुर्ण आयुष्यात मनाची शांती मिळवीन्याचा हा सोपा मार्ग आहे.
सगळ्याच गोष्टी आचरता येणार नाहीत, पण थोड्याफार आचरल्या तरी फायदा होतो.

मला सगळ्यात जास्त आवडलेल्या ओळी -

स्थिर बुध्दीने इंद्रियांवरी विजय मिळवोनी
दगड माति अन् सोने याना समान तो मानी ८

हरीश

तुम्ही ज्या सहजतेने 'गीता' लिहिता आहात ते वाचून धन्य झालो.
शरद

छान केलंय मराठीत रूपांतर... आवडलं Happy