संकोचो !!!!!

Submitted by वर्षू. on 14 January, 2016 - 21:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

संकोचो नांव ऐकून गंमत वाटली ना?? हे एक प्रकारचे महा पौष्टिक आणी पोटभरी चे सूप आहे. पनामा च्या खाद्यसंस्कृतीत ,संकोचो' चं स्थान बरंच वरचं आहे. आमच्याकडे हे सूप दर आठवड्यात एकदा तरी होतं . तर संकोचो करता लागणारं साहित्य
१) पाऊण किलो चिकन चे मोठे तुकडे ,बोन्स सकट
२) लसूण - एक गड्डी सोलून, ठेचून घेतलेला.
३) काळ्या मिर्‍याची पावडर - चवीनुसार
४) मीठ - चवीनुसार
५) मूठभर चिरलेली कोथिंबीर
६) मूठभर सेलेरी ची पाने
७) १ मोठा कांदा - उभा पातळ चिरून
८) तीन प्रकारचे याम.. हाँ.. हे थोडं कन्फ्यूजिंग आहे..
हे तीन प्रकार आहेत न्यामे बोबोसो , न्यामे दियामांते आणी न्यामे न्यांपी ,पैकी चिरले की आतून बोबोसो हे क्रीमीश रंगाचे असते तर दियामांते पिवळसर आणी न्यांपी अगदी पांढरे शुभ्र !!
न्यांपी चे टेक्श्चर अळकुडी सारखे असते आणी याचे काप तळल्यावर प्रिंगल्स सारखे लागतात.
खाली फोटो दिलेत , त्यांच्याशी मिळते जुळते याम( रताळे? ) ,भारतात नक्कीच सापडतील!! Happy
९) ओरिगानो - २ टी स्पून

क्रमवार पाककृती: 

१) चिकन च्या तुकड्यांना लसूण, कोथिंबीर्,काळी मिरी पूड आणी मीठ लावून ५,६ तास मॅरिनेट करावे. रात्रभर फ्रीज मधे ठेवलं तरी चालेल.
२) कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून चिकन चे तुकडे स्टर फ्राय करावे. पिवळसर रंग आल्यावर कांदा, सेलरी ची पाने टाकून अजून फ्राय करावे.झाकण ठेवून , सुटलेल्या पाण्यातच चिकन शिजवायचे आहे.
३) हे सगळे होत असता दुसर्‍या गॅस वर सूप करण्याच्या पात्रात भरपूर पाणी उकळायला ठेवावे.
उकळी फुटल्यावर फ्राय केलेले चिकन , याम चे तुकडे , ओरिगानो या पाण्यात अ‍ॅड करावे. चवीनुसार मीठ टाकावे.
याम आणी चिकन शिजल्यावर गॅस बंद करावा. गरमागरम प्यायला घ्यावे.

याम दियामांते

याम बोबोसो

याम न्यांपी

एंड प्रोडक्ट- सिंपली यमी

वाढणी/प्रमाण: 
चार जणांकरता पोटभरीचे आहे.
अधिक टिपा: 

१) सूप मधे मक्याचे कणीस , गाजर अ‍ॅड करू शकता.
२) याम ऐवजी बटाटा अजिब्बात वापरू नये, चव जाईल सूप ची.

माहितीचा स्रोत: 
आमची लोकल panamanian हाऊस हेल्पर आणी कुक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! वेगळाच प्रकार सूपचा. कधी ऐकला नव्हता. याम अशी तीन-तीन प्रकारची असतात? यामची चव मस्त उतरत असेल ना सूपात? करून बघेन एकदा. पण हे सूप विनासंकोच प्यावं ना?

पहिले मला वाटलं की संकोचायला सांगत्येस की काय? Lol

वॉव.. मस्त दिसतेय, करायलाही सोप्पे. फक्त त्या यामवर एकदा हात पडला की बस्स.... यातला पहिला प्रकार साउथी दुकानात पाहिलाय असे वाटतेय. त्यांच्या दुकानात भरपुर प्रकारचे याम अस्तात. फोटो दाखवुन विचारले तर कदाचित मिळतीलही.

रायगड Lol अगदी न संकोचता खा..खरंच.. गुड फॉर पीपल हू आर ऑन डाएट!! Wink

साधना.. ट्राय रिअली .. Happy Happy

सकुरा.. लेकी ने ट्राय केलं की कळवा..

फोटो टेंप्टींग आहेत.. असे याम नायजेरियात खुप मिळतात. भारतात लागवड व्हायला हवी. भरपूर उत्पन्न असते, खाजरे नसतात आणि चवदारही असतात. शिवाय टीकाऊही असतात.

मस्त दिसतंय सूप वर्षुताई. Happy

असे याम साउथैंडियन दुकानात दिसतात. २-३ व्हराईटी असतात. ते घातले तरी चालतील.

पहिले मला वाटलं की संकोचायला सांगत्येस की काय? >>>>>>>> मलाही रायगडसारखंच वाटल........आनि मग म्हनलं त्ये कस्काय जमायच भौ? Proud

अरे वा वर्षूताई एकदम मस्त.

साहित्य क्रमांक १ते ७ पर्यंत आणि त्यात दालचीनी मिठ अ‍ॅड करून मी चीकनचे सुप बनवते.

चेन्नईमध्ये हे प्रकार मिळतील असा अंदाज आहे. तेव्हा हे सूप नक्की करून पाहणार. चिकन सूप तसंही आवडीचाच प्रकार आहे.

खतरनाक दिसतय..
करेल हा प्रकार नक्कीच..
आता पुण्यात याम शोधणे आले..
पण हाय रे माझ्या कर्मा Sad फ्रिज नै न माझ्या कडे Sad
जा बा मी नै..कुठ ना कुठ माशी शिंकतेच...

मुंबईत कसावा वगैरे मिळू शकेल.
आपल्याकडचे पर्याय म्हणजे गराडू, कच्ची केळी, काटी कणंग वगैरे.

या यामच्या वेली असतात. वर्षूने दिलेल्या फोटोवरून आकाराची कल्पना येत नाही पण नायजेरियात ते दीड फूट
लांब आणि ६ इंच व्यासाचे असतात. या वेली एकदा लावल्या कि काही देखभाल करत नाहीत ( मांडवावर सोडतात ) या वेली सुकून गेल्या कि याम खणून काढतात. नवीन याम खास चवदार असतात पण ते पाच सहा महिनेही टिकतात. खराब होत नाहीत.

किंवा मग त्याचे काप करून ते वाळवून ठेवतात. त्याची पूड करून वापरतात. पांऊडेड याम हि तिथली खासियत.
(ताजा याम उकडून, सोलून तो उखळात कूटतात.) किंवा याच्या चकत्या सूपमधे वापरतात. तळूनही छान लागतात.
आपल्या पद्धतीने केलेल्या भाज्याही चांगल्या लागतात, या यामच्या.

थांकु थांकु.

ओह टीना.. घे की एक मिनी फ्रिज आणी मग याम शोधायला जा..
मामी ,कर्रेक्टो.. सौदिंडिअन भाजीवाल्याकडे मिळेल वरायटी..
दिनेश, प्रत्येक याम दहाएक इंच लांबीचा होता. चवीला गोड बिड नव्हता रताळ्या सारखा!!!
इथलं ही हे स्टेपल फूड आहे. तळून मस्त लागतात. अजिबात खाजरे नसतात.
या आम्ही तळून पाहिलेल्या न्यांपी च्या काचर्‍या..

एकदम प्रिंगल्स.. यम्मी

नंदिनी, नक्की करून बघ Happy
सुरण घालून कसं लागेल, कल्पना नाही.. शक्यतो न खाजणारे कंद घ्या.

जागुले तुझी रेसिपी ही शेअर कर इकडे.. फोटू सकट!! Happy

अनु, फ्लॉवर? यू मीन कॉलीफ्लॉवर?? ऐ नको ना गं.. Lol

साउथ इंडियन दुकाना त मिळणारे साबुदाण्याचे कंद , इथल्या इंडियन अन लॅटिन अमेरिकन दुकानातही मिळतात पण ते या कंदांपेक्षा वेगळे असतात.

मुलं लहान असताना एकदा लायब्ररीतून हे पुस्तक आणलं होतं. तेंव्हापासून थंडीच्या दिवसात याच पुस्तकातल्या रेसिपीने सानकोचो करते बरेचदा . आता या रेसिपीने करुन पाहीन .

http://www.amazon.com/Saturday-Sancocho-Reading-Rainbow-Books/dp/0374464510

मेधा, कोलंबियात जन्मलेली ही रेसिपी, पनामा ला पोचेस्तो इकडलीच होऊन बसली. हे अगदी बेसिक वर्जन आहे संकोचो चे!!