'पिफ' - उद्घाटन सोहळा

Submitted by चिनूक्स on 14 January, 2016 - 12:40

चौदाव्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चं आज अतिशय देखण्या समारंभात उद्घाटन झालं. या सोहळ्याला श्री. श्याम बेनेगल, चित्रपट महोत्सवाचे परीक्षक, विविध देशांचे राजदूत व चित्रपटक्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती उपस्थित होते.

स्टेजवर मांडलेल्या अनेक खुर्च्या, त्यावर समोरच्या रांगेत बसलेले अनेक राजकीय नेते व विविध संस्थांचे प्रतिनिधी, महोत्सवाचे परीक्षक व निवडसमितीचे सदस्य मागच्या रांगांमध्ये, जागतिक चित्रपटांशी अजिबात संबंध नसलेली मोठी भाषणं, निवेदनातले आणि आयोजनातले गोंधळ असं उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं स्वरूप अगदी गेल्या वर्षापर्यंत होतं. चित्रपटक्षेत्रात महनीय काम केलेल्या जगभरातून आलेल्या चित्रकर्मींसमोर असा कार्यक्रम सादर होणं, हे फार काही चांगलं नव्हतं. गेल्या वर्षी श्री. विनोद तावडे यांनी 'या पुढच्या महोत्सवामध्ये स्टेजवर राजकारणी दिसता कामा नयेत' असं बजावलं होतं आणि सुखद व कौतुकाची बाब म्हणजे या वर्षी स्टेजवर एकही खुर्ची नव्हती आणि पुण्याचे महापौर वगळता एकाही राजकीय नेत्याचा सत्कार केला गेला नाही. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा उशीर झाला, तरी चित्रपट महोत्सवाला साजेसा असा हा समारंभ होता आणि हा पायंडा पाडल्याबद्दल श्री. विनोद तावडे यांचे मनःपूर्वक आभार. असंच आयोजन कलाक्षेत्राशी संबंधित इतर कार्यक्रमांचंही व्हावं, अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाचं अतिशय सुरेख, दर्जेदार सूत्रसंचालन गिरीजा ओक - गोडबोले यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायली व तुषार यांनी अप्रतिम स्वागतगीत सादर केलं. 'जगाला जवळ आणणात खेळ आणि सिनेमा' अशी महोत्सवाची थीम असल्यानं आजच्या कार्यक्रमात दीपप्रज्ज्वलन क्रिकेटपटू श्री. चंदू बोर्डे आणि बॅडमिंटनपटू श्री. नंदू नाटेकर यांच्या हस्ते झालं. नंतर परीक्षकांची ओळख व सत्कार करण्यात आले. परीक्षकांनी महोत्सवाच्या कॅटलॉगाचं प्रकाशनही केलं.

piff3.JPG

यंदाच्या महोत्सवात श्री. सौमित्र चटर्जी, श्री. श्याम बेनेगल आणि श्री. राम मोहन यांनी जीवनगौरव पुरस्कार, तर श्री. उत्तम सिंग यांना 'एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर अचिव्हमेंट इन म्यूझिक' हे पुरस्कार देण्यात आले.

प्रकृती ठीक नसल्यानं श्री. सौमित्र चटर्जी उपस्थित राहू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी महोत्सवाचे अध्यक्ष श्री. जब्बार पटेल कोलकात्यास गेले आणि श्री. चटर्जी यांच्या घरी जाऊन त्यांनी सत्कार केला. या प्रसंगाची ध्वनिचित्रफीत महोत्सवात दाखवण्यात आली. आपल्या मिनिटभराच्या भाषणात श्री. चटर्जी म्हणाले, 'मी हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक स्वीकारतो आहे. जगभरातले अनेक पुरस्कार मला आजवर मिळाले आहेत, तरीही मला हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष अभिमान आणि आनंद आहे, कारण हा पुरस्कार मला पुण्यातल्या महोत्सवानं दिला आहे. उत्तम चित्रकर्मी निर्माण करण्याची जबाबदारी भारतानं पुण्यावर सोपवली आहे. पुण्यातल्या संस्थेतून आजवर जगात भारताचं नाव मोठं करणारे अनेक नट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ बाहेर पडले आहेत आणि यापुढेही ही संस्था असंच उत्तम काम करेल, याची मला खात्री आहे. ही संस्था ज्या शहरात आहे, त्या पुण्यानं मला आज गौरवलं, ही मला विशेष बाब वाटते'.

श्री. श्याम बेनेगल यांच्या सत्काराच्या वेळी सभागृहातले अनेकजण भारावले होते. गेली अनेक दशकं कार्यरत असलेल्या श्री. बेनेगलांनी 'मंडी', 'भूमिका', 'निशांत', 'अंकुर' असे चित्रपट जेव्हा तयार केले, त्यावेळी महोत्सवात प्रेक्षक म्हणून आलेल्या अनेकांचे जन्मही झाले नव्हते. हे चित्रपट सिनेमाबद्दल आपुलकी असणार्‍या प्रत्येकानं पाहिले आहेतच, पण आजही अनेकांचं चित्रपट-प्रशिक्षण बेनेगलांच्या चित्रपटांपासून सुरू होतं. बेनेगल आजही कार्यरत आहेत, ही अजून एक महत्त्वाची बाब.

piff4.JPG

श्री. राम मोहन हे भारतीय अ‍ॅनिमेशनविश्वाचे जनक समजले जातात. त्यांच्या कामाबद्दल माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखवली, तेव्हा सर्व सभागृह अवाक् झालं होतं, कारण त्यांच्या या फार मोठ्या कामाबद्दल आजवर फार थोड्यांना माहिती होती. त्यांनी तयार केलेले अनेक अ‍ॅनिमेशनपट, जाहिराती आपण पाहिले आहेत, त्यांचे अ‍ॅनिमेशनपट जगभरात नावाजले गेले आहेत. या महोत्सवाच्या निमित्तानं त्यांचं कार्य चित्रपटरसिकांसमोर आलं, हे महत्त्वाचं आहे.

श्री. उत्तम सिंग यांनी संगीतक्षेत्रात पदार्पण केलं, तेव्हा ते एकोणीस वर्षांचे होते. श्री. एस. डी बर्मन यांच्याकडे वादक म्हणून त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली. अनेक चित्रपटांमध्ये व्हायलिनवादन, अनेक चित्रपटांसाठी संगीतसंयोजन व संगीतदिग्दर्शन त्यांनी केलं आहे. 'मी संगीतकार आहे, भाषण काय करू?', असं म्हणून त्यांनी आपले आभार व्हायलिनच्या सुरांद्वारे मानले. खांदा दुखावल्यामुळे गेली काही वर्षं व्हायलिनपासून ते दूर होते, पण आज त्यांनी व्हायलिन हाती घेतलं. 'ये दिल दिवाना है' हे गाणं त्यांनी वाजवलंआणि 'चिठ्ठी न कोई संदेस' हे गाणं गायलं.

piff5.JPG

महोत्सवातला पहिला चित्रपट होता 'द थिन यलो लाईन'. एका छोट्याश्या कथाकल्पनेला किती सुरेख आणि ताकदीचा आकार देता येतो, हे या चित्रपटानं दाखवून दिलं. बांधीव आणि परिणामकारक पटकथा, अप्रतिम अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. आज ज्यांना हा चित्रपट बघता आला नाही, त्यांना महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कोथरुडच्या सिटिप्राईड चित्रपटगृहात स्क्रीन क्र. दोनवर सकाळी ११ वाजता हा चित्रपट बघता येईल.

उद्या सकाळी १० वाजता श्री. श्याम बेनेगल व श्री. गोविंद निहलानी यांच्या हस्ते 'पिफ बाझार'चं उद्घाटन होईल. अभिनेत्री श्रीमती स्मिता पाटील यांचं नाव या पॅव्हेलियनला देण्यात आलं आहे. त्यांचे कुटुंबीयही उद्या याप्रसंगी उपस्थित असतील.

'पिफ बाझार'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची यादी जबरदस्त आहे. उद्या सकाळी ११ वाजता श्री. श्याम बेनेगल आणि श्री. भरत दाभोळकर यांच्याशी संवाद साधणार आहेत श्री. रवी गुप्ता. सेन्सॉरशिप, अवॉर्ड-वापसी यांसह अनेक विषयांवर यावेळी चर्चा होईल.

piff1_0.jpg

दुपारी चार वाजता 'मराठी चित्रपट - काल, आज आणि उद्या' या विषयावर श्री. महेश मांजरेकर, श्री, नागराज मंजुळे आणि श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतील श्री. अनुपम बर्वे.

piff2.png

चुकवू नयेत असे हे कार्यक्रम आहेत.

उद्यापासून दिवसभर चित्रपटही आहेतच. मराठी चित्रपटविभागात उद्या 'हायवे - एक सेल्फी आरपार' आणि 'नटसम्राट' हे दोन चित्रपट दाखवण्यात येतील.

महोत्सवासाठी नोंदणी उद्याही सुरू आहे.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंयस. Happy
काय काय झालं ते वाचायला, क्लिप अलाउड असेल मुलाखतींची, तर बघायला उत्सुक आहे. लिही वेळ मिळेल तसं.

वा मस्त वृत्तांत !

सुखद व कौतुकाची बाब म्हणजे या वर्षी स्टेजवर एकही खुर्ची नव्हती आणि पुण्याचे महापौर वगळता एकाही राजकीय नेत्याचा सत्कार केला गेला नाही. >>>> जबरी !

Yes.

फार छान आणि नेटका कार्यक्रम झाला म्हणजे! श्री. राम मोहन यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे! कुठून माहिती मिळेल?