फासेपारधी

Submitted by बेफ़िकीर on 14 January, 2016 - 11:31

लहान लहान गावालगत असलेल्या अनेक वस्त्यांमधील माणसे शहरी जीवनशैलीशी व्यवस्थित परिचित असूनही स्वतः मात्र मागासलेलीच राहतात. पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात अश्या कित्येक वस्त्या आहेत. अश्याच एका वस्तीबद्दल, जेथे फासेपारधी जमातीचे लोक राहतात.

सातार्‍याहून पुण्याकडे येताना असलेल्या खंडाळा गावात विविध ठिकाणी फासेपारधी विखुरलेले आहेत. माणूस उभा राहू शकणार नाही इतक्या उंचीच्या बहुतेक झोपड्या असतात. एखाददोन झोपड्या मात्र उंच असतात. हाकेच्या अंतरावर गावातील प्रगत लोकांचे अस्तित्त्व असते. दुकाने, शाळा, हायवे, हॉटेल्स हे सगळे काही शंभरएक पावलांवर असते.

मात्र हे असे काही लोक आपल्या राहणीमानात कोणतीही सुधारणा करण्याचा प्रयत्न करताना आढळत नाहीत. त्यातच बहुधा एकविसाव्या शतकात झालेली प्रचंड व वेगवान प्रगती ह्या लोकांना स्तिमित करते की काय कोण जाणे? म्हणजे समोरच्याचा वेग पाहून आपण मनाशी ठरवावे की आपले आहे तसेच बरे आहे असे झालेले आहे की काय कोण जाणे!

फासेपारधी जमात घातक समजली जाते. असे ऐकण्यात आले की सरकारात ह्यांची नोंद चोरटी जमात अशी आहे. खरे खोटे माहीत नाही.

ह्या फासेपारधी लोकांशी बोलायला गेलो. एक शहरी, अनोळखी माणूस बोलायला आला आहे ह्यामुळे सुरुवातीला त्या लोकांनी घेतलेली आक्रमक भूमिका नंतर थोडी निवळली. बर्‍याच गप्पा झाल्या. गप्पांमधून जे काही समजले ते अवाक करणारे होते. माझ्या पंधरा, वीस वर्षांच्या पुतण्या आणि तेथील त्या वयाच्या मुली ह्यांच्यात असलेली सर्व प्रकारची तफावत खरे सांगायचे तर हादरवून गेली.

आदिवासी, भिल्ल, वडार वगैरे वस्त्यांमध्ये ह्यापूर्वी गेलो होतो. पण त्यांच्यात आणि पारध्यांमध्येही बराच फरक जाणवला.

काही महत्त्वाच्या बाबी:

१. जन्म / प्रसूती - आत्ताआत्तापर्यंत प्रसूती झोपडीमध्येच होत असे. आता शासकीय रुग्णालयात जाऊ लागले आहेत.

२. संगोपन - मूल रांगायाला लागेपर्यंत मांडीवर किंवा कडेवर घेणे आणि रांगायला लागले की जमीनीवर सोडून देणे हे मुख्य संगोपन आहे. 'आपल्या मुलाने शिकावे' वगैरे जाणिवा अस्तित्त्वात नाहीत. मूल कधी एकदा काम करण्यालायक होते इतकाच मुद्दा मनात असावा. किती मुले व्हावीत ह्याबद्दल तेथील सर्वांचे एकमत आहे. 'जितकी होतील तितकी'!

३. मुलांचे आरोग्य - झोपड्या, झोपड्यांबाहेर व इतरत्र अनेक लहान मुले उघड्या-नागड्या अवस्थेत रांगत किंवा दुडुदुडु चालत असतात. बहुतेकांचे नाक भरून आलेले असते. अनेकांना फक्त वरून एक झबले किंवा काहीतरी घातलेले असते. मुले मातीत लोळत असतात, मळलेली असतात. ही मुले काय तोंडात घालत आहेत, कुठे कशी फिरत आहेत ह्याकडे मोठ्यांचे विशेष लक्ष नसते. आंघोळ घालता का विचारल्यावर रोज आंघोळ घालतो असे उत्तर देण्यात आले. पण मुलांकडे बघून तसे वाटत नव्हते.

४. मोठी मुले - ह्यात फक्त मुलांबद्दल लिहीत आहे, मुलींबद्दल नव्हे. मोठी मुले चमकदार डोळ्यांनी बघतात. त्यांची कांती तुकतुकीत असते. थोडी मोठी मुले प्रश्नांना खणखणीत आवाजात आत्मविश्वासाने उत्तरेही देतात. मात्र त्यांना शिक्षण वगैरेबाबत माहिती नसते.

५. अन्न - सहसा भाकरी आणि मिळेल या भाजीचे कालवण असा आहार असतो. आजूबाजूचे सधन (!) लोक अन्न किंवा भाजीपाला पुरवतातही. जे पुरुष शेतात काम करतात ते ज्याचे शेत असते त्याच्याकडे भाजी मागतात. त्याने दिली तर ठीक नाहीतर भाजी चोरतात. मासे आणि खेकडे पकडण्यासाठी मात्र त्यातील काहीजण नित्यनेमाने जातात. पिवळे रेशनकार्ड सगळ्यांकडे असते.

६. शिकार - शिकारीचे प्रमाण कमी झालेले आहे. होले, तितर आणि पारवे प्रामुख्याने मारले व खाल्ले जातात असे म्हणाले. मोठा प्राणी मारता आला तर तो विकतात आणि त्या पैश्यात मटण किंवा इतर काही गोष्टी विकत घेतात. ससा मिळाला तर स्वतः खातात. आठवड्यातून एकदोनदा रानात जाऊन पक्षी मारून घेऊन येतात. पांढरी कबूतरे मात्र पाळतात म्हणे! काही पांढरी कबूतरे पाळलेली दाखवली मला.

७. पशूधन - ह्यांच्याकडे पांढरी कबूतरे सोडली तर कोणतेही जनावर किंवा कोंबड्या वगैरे नव्हते.

८. रोजगार - शेतात किंवा गवंडी काम करणार्‍या पुरुषाला दिवसाला रुपये ३५०.०० मिळतात. स्त्रिया काम करतात की नाही ते सांगितले नाही. पण रुपये ३५०.०० ही तशी इतकी कमी रक्कम वाटत नाही की ह्या लोकांनी असे राहावे. पण हे लोक पैसे का साठवतात ते पुढे दिलेले आहे.

९. शिक्षण - एक, दोन पुरुष पहिली किंवा तिसरीपर्यंत शिकलेले होते. स्त्रियांना शिक्षण मिळालेले नव्हते. सुमारे सहा, सात मुलांपैकी एकाला शिकायला पाठवले जात आहे. त्याचेही कारण शाळेत दुपारचे जेवण मिळते हे आहे. इतरांना त्याच कारणासाठी का पाठवले जात नाही असे विचारले असता म्हणाले की बाकीची मुले नागडीच शाळेत जातात त्यामुळे शाळेत घेत नाहीत. कपडे का घालत नाही विचारल्यावर म्हणाले परवडत नाहीत. तिघा-चौघांकडे मोबाईल असल्याने आणि काही बायकांच्या गळ्यात, कानात बर्‍यापैकी दागिने असल्याने ह्या गोष्टीवर माझा विशेष विश्वास बसला नाही.

१०. आजूबाजूच्यांचा दृष्टिकोन - गावात राहणारे इतर सधन लोक ह्या पारधी लोकांना त्रास देत नाहीत. खरे तर वचकूनच असतात. ते ह्या पारध्यांना अन्न किंवा काही वस्तू देत राहतात. पारध्यांपैकी कोणीही कोणाच्याही घरी घरकाम करत नाही असे सांगण्यात आले.

११. प्रशासन - गावात कुठेही कोणताही गुन्हा घडला तर सर्वप्रथम पारधी पुरुषांना चौकीवर नेऊन मारहाण करण्यात येते. पोलिसांचे हे वर्तन हा ह्या जमातीच्यामते सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.

१२. मद्यप्राशन - मिळाली तर भरपूर दारू पितात नाहीतर नाही. काहीजण मात्र आहारी गेलेले आहेत आणि दिवसरात्र नशेत असतात. बायका सहसा पीत नाहीत असे सांगण्यात आले.

१३. विकास - शिक्षणाबद्दल काही खास आस्था जाणवली नाही. शेतजमीन वगैरे नसतेच. कच्च्या झोपड्यांमध्ये त्याच ठिकाणी वर्षानुवर्षे राहत आहेत. मुळचे कुठले विचारले तर इथलेच म्हणतात.

१४. शस्त्रे - अनेकांनी जवळची अस्त्रे दाखवली. सुरे, कोयते वगैरे! त्यांच्यामते ह्या शस्त्रांचा उपयोग भीती दाखवण्यासाठी केला जातो.

१५. पेहराव - पुरुष भडक पेहराव करतात. डोक्याला चपचपीत तेल लावून सगळेजण बसलेले होते. बायका साडी नेसतात.

१६. व्यक्तिमत्त्व - पुरुषांच्या तुलनेत बायका फारच ठसठशीत आणि व्यवस्थित असतात. पण काही बायका अव्यवस्थित आणि घाणेरड्या राहणार्‍याही होत्या. मात्र एक बाब जाणवली ती म्हणजे इतर जातीतील स्त्रिया जश्या लाजाळू असतात तश्या ह्या पारधी मुली किंवा बायका नसतात. किंबहुना, पुरुषांना विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे मुली आणि बायकाच हिरीरीने देत होत्या. अगदी लहान मुलगीही 'आमच्यात आस्लं नाय चालत' वगैरे खणखणीतपणे सांगत होती.

१७. स्त्री - पारधी मुलगी दहा-अकरा वर्षाची झाली की तिचे लग्न लावून देण्यात येते. वयात येईपर्यंत ती आईकडे असते आणि नंतर सासरी! सासर आणि माहेर म्हणजे शेजारची झोपडी किंवा फार तर चार झोपड्या सोडून असलेली झोपडी! ह्या मुलींचे लग्न लवकर होत असल्यामुळे त्यांच्या वस्तीत असलेल्या स्त्रिया आणि मुले ह्यापैकी कोण कोणाचे कोण आहे हे त्यांचे त्यांना तरी समजते की नाही असा प्रश्न पडतो. मी नाती विचारली तर एका पस्तिशीच्या तरुणाने एका रांगत्या मुलीकडे बोट दाखवून सांगितले की ती त्याची मेहुणी आहे. हे मी पुन्हा पुन्हा विचारून तपासून पाहिले.

१८. लग्न - लग्न हा प्रकार सर्वात अवाक करणारा असतो. येथे मुली शांतपणे विकल्या जातात. एक अगदी लहान मूल एका कोपर्‍यात होते त्याच्याकडे बोट दाखवून मी विचारले की ह्याची आई कोण! तर त्याची आई पंधरा वर्षांची होती. तिने स्वतःच वयही सांगितले. तिचे नांव पायल! तिला विक्रमी दिड लाख रुपयांना विकत घेण्यात आले होते. विकत घेणारा त्याच वस्तीतील कोणीतरी होता. असे कसे काय विकता मुलींना असे विचारल्यावर दोन पुरुषांनी तेथे बसलेल्या एकुण पाच बायकांच्या लग्नाच्या वेळेसच्या किंमती सांगितल्या. दोघी तीस-तीस हजाराला, एक चाळीस हजाराला आणि एक पन्नास हजाराला विकत घेण्यात आली होती. एका पुरुषाने हातात बराच पैसा असल्याने चार बायका केल्या होत्या व त्याला एकुण नऊ मुले होती. एकदा एक मुलगी एकाला विकली गेली की नंतर तिच्यासाठी कोणी जास्त बोली लावू शकत नाही. असे सांगण्यात आले की अशी बोली लावू पाहणार्‍याचे तुकडे केले जातात. लहान वयातच मुली आई होतात. त्या तीस-पस्तीस वर्षांच्या असतानाच आजीही होऊ शकतात. बहुतांशी स्त्रिया दिसायला चमकदार, तुकतुकीत दिसतात. 'नवरे आम्हाला नियमीत मारतात' असे हसत हसत सांगतात. 'का मारतात' विचारल्यावर म्हणतात की त्यांची काही ना काही चूक झाली की मारतात. लग्नाच्या दिवशी झोपडीबाहेरच लहानसे मांडवासारखे उभारले जाते. दारू आणि मटण असा बेत असतो. स्त्रियांना ह्या सर्व प्रकाराबद्दल कोणताही आक्षेप असलेला दिसला नाही.

ही भेट सुमारे दिड तासाची होती. समाजात दशकेच्या दशके ह्या लोकांसाठी काम केलेली माणसे आहेत. पण एक प्रचंड दरी आहे त्यांच्यात आणि आपल्यात. आरक्षण ह्या विषयाबद्दल त्यांची उत्तरे अशी होती ज्यातून हे समजावे की असा काही विषय आहे हेच त्यांना ज्ञात नसावे.

त्यांना स्वतःला सुधारण्याची इच्छा आहे की नाही ह्याचे उत्तर माझ्या मनाने असे दिले की 'आपल्यामते जे सुधारणे आहे ते त्यांना सुधारणा वाटतच नाही'. आपल्याकडे एकुणच अश्या प्रकारच्या समाजाच्या सुधारणांसाठी जे काही केले जात आहे ते एक मोठ्ठे अपयश आहे असे मत निर्माण झाले. मी तिथे जन्मलो नाही म्हणून इथे हे लिहीत आहे इतकेच! काही छायाचित्रे सोबत देत आहे.

-'बेफिकीर'!

==============

IMG_4297.JPGIMG_4306.JPGIMG_4312.JPGIMG_4313.JPG

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या बायकांची छायाचित्रे मायबोलीवर टाकायला त्यांची लेखी परवानगी घेतली आहे का?
धन्यवाद!

.

लेख आवडला!

(बायका विकत घेणे? हे झेपले नाही. विकत घेण्याचे काय कारण असावे? ज्याच्याकडे पैसे नाहीत तो आयुष्यभर अविवाहित का?)

लेख आवडला !

या जमातिबद्दल माहिती मिळाली. आई ज्या शाळेत शिकवत होती तिच्यामधे याच जमातीचे विद्यार्थी शिकत त्यांना पकडून पकडून शाळेत आणावे लागत असे. सहावी सातवी पर्यन्त कसेबसे शिकून ही मुले रेल्वे स्टेशनवर कोळश्याची वॅगन वगैरे फोडताना आढळून येत असत .

<फासेपारधी जमात घातक समजली जाते. असे ऐकण्यात आले की सरकारात ह्यांची नोंद चोरटी जमात अशी आहे. खरे खोटे माहीत नाही. >

ब्रिटिशांनी १८७१ साली एक कायदा केला आणि या कायद्यान्वये सुमारे दोनशे जमातींना गुन्हेगार ठरवलं. या जमातीत जन्म घेणारा प्रत्येक नवीन जीव हा गुन्हेगारच होता. या जमातींना तारांच्या कुंपणांत राहावं लागे. पुढे ब्रिटिशांनी त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्नही केले. कापडगिरण्यांमध्ये त्यांच्यासाठी आरक्षण निर्माण केलं. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटिश कायदा गेला, पण 'सवयीनं गुन्हेगार' अशी श्रेणी सरकारनं तयार केली. ब्रिटिशांनी दिलेल्या सवलती काढून घेतल्या. त्यामुळे जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का बसला होता, तो कायद्यानं दूर झाला तरी या जमातींमधल्या व्यक्ती गुन्हेगार म्हणूनच ओळख बाळगून राहिल्या.
या जमातींपैकी बहुतेक सर्व जमातींना आज आपण 'विमुक्त' या सदरात ढकलतो.

त्यांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या काही संस्था आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी खास शाळाही आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला भेटून मग तुम्ही या मंडळींशी बोलला असता, तर फरक पडला असता, असं वाटतं. Happy

एखाद्या कार्यकर्त्याला भेटून मग तुम्ही या मंडळींशी बोलला असता, तर फरक पडला असता, असं वाटतं >>> +१

प्रा. सुषमा अंधारे यांचे कार्य आणि लेख फेसबुकवर देखील वाचायला मिळेल. उत्तम कांबळेंनी वार्तांकन केले आहे, लेखही आहेत. लक्ष्मण गायकवाड यांचेही लेख आहेत. या लोकांचं काम कदाचित आज ना उद्या पोहोचेल यांच्यापर्यंत.

आतापर्यन्त नुस्तं वाचलेलंच होतं फासेपारधी लोकांबद्दल.. पण तुम्ही आपणहोऊन त्यांच्याशी बोलायला गेलात आणी हा अनुभव आमच्यापर्यन्त पोचवला.. धन्यवाद!!
,'सवयीनं गुन्हेगार' बापरे अशी श्रेणी '.ही असते?? .

लेख आवडला!

एका पुरुषाने हातात बराच पैसा असल्याने चार बायका केल्या होत्या व त्याला एकुण नऊ मुले होती.
>>>>
चार बायका चालतात का त्यांच्यात?
फासेपारधी ही जमात नक्की कोणत्या धर्मात येते?

लेख आवडला
एखाद्या कार्यकर्त्याला भेटून मग तुम्ही या मंडळींशी बोलला असता, तर फरक पडला असता, असं वाटतं. >>> नक्की काय फरक पडला असता ?
आजही गावाशेजारी फासेपारधी आले गावकर्‍यांचे धाबे दणाणते , आजबाजुच्या गावांत दरोडे पडतातच. आणि पोलिसही ह्या लोकांना जबरदस्त मारहाण करतात.

आवडला लेख.
लेख किंवा मुलाखतीमागचा उद्देश माहित नाही, फरक पाडायचा काही उद्देश असेल तर ते ही माहित नाही. पण बोलण्यातून आलेली निरीक्षणे डॉक्युमेंट करण्याच्या दृष्टीने छान आहे प्रयत्न.

आम्ही फक्त पारधी असे म्हणून ओळखतो यांना..
बाहेर वाळू घातलेले कपडे, धुतलेले/धुण्याकरिता ठेवलेले खरकटे भांडे, लोखंड, गज, अगदी ग्रिल सुद्धा चोरलेल्याचा अनुभव आहे म्हणून लोक जरा चार हात लांबच राहतात.. बाया बिनधोक अंगावर धावुन येतात हटकले त्यांना तर.. आई नगर परिषद मधे मुख्याध्यापिका आहे त्यामुळे मुल कशी असतात..किती मिनतवार्‍या करुन शाळेत आणुन बसवाव लागत आणि त्यांचा इतर पोरांनी सांगितलेला त्रास सगळच माहिती आहे..बरेचदा यांच्या पालकांचा फार मोठा सपोर्ट असतो लेकरांना सुद्धा..पोलिसांना अज्याबात घाबरत नै हि मंडळी..निब्बर होऊन जातात मार खाऊन खाऊन.. तुम्ही लिहिलेल्या बर्‍याच गोष्टींची कल्पना आहे शिवाय विकण्याच्या गोष्टी सोडून..
आजकाल नगर परिषद शाळा जबरीने का होईना या लेकरांना आणून शाळेत बसवतात, शिकवतात म्हणून १० पैकी २ गोष्टी तरी ते पोर फॉलो करतात यात समाधान वाटत अस आई म्हणते,,शिकवलेल्या १० पैकी १ पोरात जरी फरक पाडता आला तरी भरुन पावले म्हणते Happy

बेफि, लेख आवडला.

मुली विकत घेणे - एक प्रकारचा, उलटा हुंडा का हा? >> रायगड, हुंडा नसावा. या मुलींना "धंद्याला" लावायसाठी विकत घेत असावेत.

अनिल अवचटांच्या "माणसं" यापुस्तकाची आठवण झाली. त्यांनी त्यात अनेक भटक्या, विमुक्त जमातींबद्द्ल लिहीलं आहे. एवढ्या वर्षांत या लोकांच्या जीवनमानात फारसा फरक पडला नाही हे बघून खेद वाटतो.

नक्की काय फरक पडला असता ?
आजही गावाशेजारी फासेपारधी आले गावकर्‍यांचे धाबे दणाणते , आजबाजुच्या गावांत दरोडे पडतातच. आणि पोलिसही ह्या लोकांना जबरदस्त मारहाण करतात. >>>

पिवळ्या रेशनकार्डासाठी मध्यंतरी आंदोलन झाले होते. त्याबद्दलचा उल्लेख आला असता तर छान झाले असते. दीड तासाच्या मुलाखतीत (पूर्वनियोजित असल्यास) ही माहीती आधी गृहपाठ करून गेल्यास मिळू शकली असती.

दुसरी बाजूही माहीत करून घेण्यात नुकसान काहीच नसावे..

जळणारे पारधी अन् कुलूपबंद संवेदना
https://lekhsangrah.wordpress.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%...

"त्यांच्या' उपेक्षित जीवनात मामलेदारांनी पेटविला आशेचा दिवा
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=bOJ1J

ज्ञानेश्वर भोसले - पारधी समाजातील मुलांसाठी कार्यरत
http://www.thinkmaharashtra.com/node/2002

गिरीश प्रभुणेंचे पारधी हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.
शिवाय इतर अनेकांनी त्यांच्या प्रश्नाचा धांडोळा वेळोवेळी घेतला आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/pardhi-women/ar...

मिरजेत पारधी समाजाची काळी गुढी
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5240782920352956509&Se...

गाव जेवू देईना; सरकार लक्ष घालेना
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4990321971670085800&Se...

लेखात म्हटल्याप्रमाणे र. ३५० ही रक्कम वर्षभर रोज मिळते का ? सर्वांना मिळते का याबद्दल काही समजलेले नाही. मोबाईल ही चैनीची वस्तू आहे का याबद्दलही काही समजलेले नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शनिवारी पगार असतो. रविवारी काम नाही. म्हणजे महीना चार ते पाच रविवार रोजगार नाही. शिवाय कधी कधी दोन तीन महीने काम नसते असे साधारण निरीक्षण आहे.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=XOJ2X
हा समाज निवासी नसल्याने त्यांना जातीचे दाखले मिळत नाहीत.

पिवळे रेशनकार्ड आत्ता मिळाले आहे. ते ही सर्वत्र नाही.
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5298116305423077593&Se...

काही ठिकाणी पोलिसांनी किंवा शासकीय यंत्रणांतील संवेद्नशील अधिका-यांनी पुढाकार घेतला अशी तुरळक उदाहरणे आहेत. सकारात्मक दृष्टीकोणातून या समाजाचा विकास होऊ शकतो.
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5390736123975400325&Se...

काही गावातून पारधी समाजावर बहीष्कार चालू आहे. त्यांना रोजगार देण्यास मनाई करण्याचे ठराव झाले आहेत. पारधी समाजावर होणा-या हल्ल्यांमुळे सरकारने त्या वस्त्यांवर सीसीटीव्ही लावले होते. त्यामुळे चिडून जाऊन असे ठराव झाले. ( चो-या वगैरे मधे पारधी समाजाचा हात असू शकतो हे नाकारत नाही).

पारधी समजून एसटीतून बाहेर ओढून ठेचून मारण्यची एक घटना गेल्या चार पाच वर्षात झाली आहे. गुन्ह्यांना शिक्षा व्हायला हवी पण त्यासाठी सरकार , पोलीस यंत्रणा आहेत. पारधी म्हणजे गुन्हेगारच या समजातून कित्येकांना निरपराध असतानाही काय त्रास सहन करावा लागला यासाठी त्या समाजासाठी / समाजातील कार्यरत असलेल्यांचे म्हणणे जाणून घेणे योग्य झाले असते.

मायबोलीवर छायाचित्रे टाकण्याच्या लेखी परवानगी बद्दल म्हणाल तर लिहिता वाचता न येणाऱ्या बायांनी दीड तासाच्या तोंडओळखीवर तुम्ही दाखवलेल्या कागदावर विश्वास ठेवून अंगठा लावला?

'ठेविले अनंते तैसेची रहावे' अशा विचारधारेच्या लोकांना हा समाज जागृत व्हावा शिकुन -सवरुन प्रगती करावी अशी इच्छा नाही.

मोठे-मोठे नेते मंडळी उद्योगपती करोडोचे घोटाळे करुन सभ्य सुस्कृत आणि हे चिंदी-चोर सरकार दरबारी चोरटी जमात
त्या चोरीत पण मोठ्ठा वाटा पोलिसांचा एवढ्या चोर्‍या-मार्‍या करुन नशिबात काय तर गरिबी, दरिद्री आणि झोपडी.

वर दिलेले प्रतिसाद मुलाखतीमागील मेहनत ध्यानात घेऊन दिले आहेत. यापुढेही हे कार्य असेच चालू रहावे या शुभेच्छा !

मुलाखत घेताना ती समतोल व्हावी या हेतूने उदाहरण म्हणून दुसरी बाजू दाखवून देण्याचा अल्पमतीने प्रयत्न केलेला आहे. आपल्याला दिसते तसे नसते, अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात हे पटल्यास पुढच्या वेळी पूर्वग्रहरहीत मुलाखत घेताना प्रश्न तयार करण्यासाठी हा दृष्टीकोण उपयोगी येईल अशी आशा वाटते.

लेख आवडला ! वैदु समाजही असाच काहीसा मागासलेला राह्तो. कुठेही बिर्‍हाड लाऊन जिवन जगतात.

फोटोंबद्दल का वाद घालताय? मूळ मुद्दा भरकटतो ना ह्याने.

गेले तीनेक महिने नॅशनल पार्क बोरिवली येथे हायवेवरच फुटपाथवर आणि वन थर्ड रस्ता व्यापून काही लोक झोपड्या न बांधता राहताना अदिसत आहेत. त्यांच्या जगण्याचे अगदी हुबेहुब वर्णन केलेत. फक्त ह्या बायकांचे कपडे लमाणी लोकांसारखे आहेत तर पुरुषांच्या दाढ्या वाढवलेल्या आणि रंगवलेल्या.

पोलिसांनी अशी माहिती दिली. की इथे बरेच लोक राहायला येत जात असतात. कोणी तक्रार केली की आम्ही ह्यांना हुसकावतो पार दहिसरच्या पलिकडे. पण ते पुन्हा येतातच. त्यांना हुसकवायला गेल्यावर बायका अंगावर धावून येतात, स्वतःचे कपडे फाडतात, तान्ह्या बाळांना हातातून खाली टाकून देतात आणि त्यात एखादे मूल दगावले तर आमचेच वांदे होतात. नाव आमचच येतं. (त्यांनी मुद्दाम सांगितले की दिल्लीला झोपडपट्टी तोडताना दगावलेले मूल असेच दगावले असणार कारण ह्या लोकांना काही फिकिर नसते पोराबाळांची, मुलांचे जन्म एकामागोमाग एक चालूच असतात) थोड्या मोठ्या मुलांना तिथेच टाकून निघून जातात. आणि पुन्हा परत येतातच.

पोलिसांनी हेही सांगितले की ह्यातल्या कितीतरी लोकांना सरकारकडून एसआरए अंतर्गत जागा मिळाल्यात वसई नालासोपारा इथे. पण ती घरे भाड्याने देतात आणि परत येऊन रहतात.

अशाच वस्त्या बोरिवली लिंक रोड आयसी कॉलनी, बोरिवली गोविंद नगर जवळचे टेलिफोन एक्स्चेन्ज येथेही वाढत आहेत.

पोलिसांनी मुद्दाम हेही सांगितले की रात्रीच्या वेळी इथून जाताना काळजी घ्या कारण समजा एखादा माणूस दारू पिऊन किंवा झोपेत रस्त्यावर आला आणि तुमच्या गाडीसमोर आला तर तुमचाही सलमान खान होईल. आम्ही दारू पित नाही हो ह्यावर त्यांचे उत्तर होते की तुम्ही दारू प्यायली होती हे वकिल सिद्ध करेल एखाद्या पोलिटिकल पार्टीचा (मी सलमान खानची अथवा त्याच्या केसच्या निकालाची समर्थक आहे असे कृपया समजू नये)

ह्या लोकांबद्दल सहानुभुती बाळगावी का? आणि का बाळगावी असा मला प्रश्न पडू लागलाय.

सर्व प्रथम बेफिजी, तुमचे आभार, तुम्ही किमान या लोकनपर्यन्त पोहोचलात तरी.

१. आजही, 'फासेपारधी' म्हटले कि चोर इतकेच डोळ्यासमोर येते. ( हे 'वडार' समाज्या बद्दल पण आहे)
२. तुमच्या लिखाणावरुन दिसत आहे , की हे लोक स्वतःच्या प्रगतिबद्दल उदासीन आहेत.
३. बायका मात्र खरेच तुकतुकित , हुशार आणी बोलक्या वाट्ल्या.
४. लग्नाची रित आणी लहान मुलान्ची सद्य स्थिती आन्गावर काटा आणणारी आहे.

त्या वस्तीत जाऊन त्यांच्याबद्दल जाणुन घेण्यामागे काहितरी चांगला हेतू नक्कीच असेल. पण..
>>फासेपारधी जमात घातक समजली जाते. असे ऐकण्यात आले की सरकारात ह्यांची नोंद चोरटी जमात अशी आहे. खरे खोटे माहीत नाही. >> ठळक वाक्यावरुन तुम्ही तिथे अभ्यास न करता गेला असावेत असे दिसते. थोडा फार गृहपाठ करुन गेला असतां तर त्या अनुषंगाने आणखीही काही माहिती आपण विचारली असती व आम्हालाही काही ज्ञान प्राप्त झाले असते.

उदा: गुन्हेगार हा शिक्का बसल्याने समाजाचा यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे मुख्य प्रवाहात येण्यात काय अडचणी येतात, या समाजाला स्वत:हुन मुख्य प्रवाहात यावेसे वाटते की नाही?? नसल्यास का नाही हे बरेचसे प्रश्न विचारायचे राहुन गेले असावेत.

तेव्हढं लेखी परवानगीचं छायाचित्रदेखिल डकवलं असतं तर बरं झालं असतं. असो.

>>>> आजही, 'फासेपारधी' म्हटले कि चोर इतकेच डोळ्यासमोर येते. ( हे 'वडार' समाज्या बद्दल पण आहे) <<<<<
नसावे. माझ्या माहितीत नाही. व यांचेशी त्यांची तुलना होऊ शकत नाही.
मी वडार समाजातल्या अनेकांकडे पुजा सांगायला गेलेलो आहे. घरदार करुन स्थिरस्थावर होण्याचा कल असतो. अफाट रास्त मार्गाने कष्ट करण्याची तयारी असते. यांच्यात लाखोपती लोकही बघितले आहेत, तरी दैनंदिन रहाणी साधीच असते. तसेच हे सहसा इतरांच्या अध्यात मध्यात पडायला, इतरांना डिवचायला जात नाहीत.
कदाचित माझे अनुभव तोकडे असतीलही, पण ते असेच आहेत.

>>>> आजही, 'फासेपारधी' म्हटले कि चोर इतकेच डोळ्यासमोर येते. ( हे 'वडार' समाज्या बद्दल पण आहे) <<<<< असे नसावे.

मी स्वतः लग्न करुन वडार समाजात गेलेय. लग्नाआधी ज्यांनी या लग्नाला विरोध केलाय तो फक्त एकतर आग्री आणि वडार समाजाची तुलना होऊ शकत नाही, खालची जात, दगड फोडाणारी जात याच कारणांनी. मी कधीही ऐकले नाही की वडार लोक चोर असतात/होते.

शहरात राहणारे वडारी तर ओळखुही शकत नाही एव्हढे सुधारलेले आहेत.[फक्त नातेवाईकांत वडारीतच बोलतात] माझे सासुसासरे आणि इतर बरेच नातेवाईक जरी कमी शिकलेले असले तरी त्यांनी चोर्‍यामार्‍या न करता दगड फोडुन, रस्ते वैगरे बांधकामाच्या इथे मजुरी करुन कमाई केली आहे. सुरवातीला भटके असणारे हे लोक आता स्थिर झाले आहेत, नोकरीधंद्याला लागुन स्वतःची घरे, जमीनी घेतल्या आहेत. या आधीची पिढी भटकी होती आतातर सगळे स्थिर आहेत.

आमच्या नातातले/ओळखीतले जेव्हढे वडारी आहेत त्यांची स्वतःची अशी ओळख आहे, कुणी पोलीस तर कुणी नगरसेवक/आमदार, कुणी इंजिनियर कुणी वकील तर कुणी रजिस्ट्रार. आणि हे फक्त ठाणे/मुंबईत नाही तर पुणे, अहमदनगर येथीलही.

इथे मी कुठलीही गोष्ट पर्सनली घेत नाही पण सरसकट वडार जातीला चोर म्हंटल जातय याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. तसे बघायला गेलो तर चोर हा प्रत्येक जातीत असु शकतो/आहे.

निल्सन

समज, गैस समजल्याशिवाय ते दूर करणार तरी कसे ? अर्थात प्रत्येक वेळी योग्य शब्दात दूर करता येत नाहीत हे खरंय.

उदा. प्रत्येक जातीत गबाळे राहणारे लोक आहेत, त्याची कारणे शोधणे हा स्वतंत्र विषय होईल. महिना ९००० रु जास्तीत जास्त या वेतनात पोराबाळांचं लेंढार सांभाळून कपडेलत्ते वगैरे शौक परवडत असतील का याची कल्पना नाही. पैशाच्या बचतीचे मार्ग माहीत नसणे, शिक्षणाची आबाळ , एकंदरच जगाचे भान नसणे, प्रगत जगाशी संबंध ठेवता येणारे बुजरेपण, त्यांनी हिडीस फिडीस केल्यानंतर राग न येता लाचारीने स्विकारणे हे ज्या मानसिकतेतून येते ती जाणीव पूर्वग्रहातून त्या समाजाकडे पाहताना दिसत नाही हेच खरे.

त्यातून अशा समाजातून पुढे आलेले अनेक लोक त्यांनी स्वतः सांगितल्याशिवाय मुख्य समाजापासून वेगळे ओळखणे अशक्य असते. त्यामुळे परंपरागत पद्धतीने आणि गबाळे राहणारे लोक अशीच त्या त्या समाजाची ओळख शिल्लक राहते. त्यातून गैरसमज !

विचार करण्याची पद्धतच वेगळी असल्याने आपल्या चष्म्यातून समस्यांकडे पाहून तसे लेख लिहील्याने आधीच असलेल्या गैस त आणखी भर पडत जाते. मात्र तथ्य आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरणाला मरण नसते.

पारधी - गावपारधी, फासेपारधी
वडार , रामोशी, होलार या स्वतंत्र जाती आहेत.

Pages