श्री. सौमित्र चॅटर्जी आणि श्री. श्याम बेनेगल यांना 'पिफ'चा जीवनगौरव पुरस्कार

Submitted by चिनूक्स on 8 January, 2016 - 12:05

Untitled.jpg

महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन १४ ते २१ जानेवारी, २०१५ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.

यंदाच्या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी श्री. सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्री. श्याम बेनेगल यांचा 'जीवनगौरव पुरस्कार' देण्यात येणार आहे. प्रसिद्ध संगीतकार श्री. उत्तम सिंग यांना संगीतक्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल 'एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला असून अॅनिमेशन क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री. राम मोहन यांना 'डीएसके - पिफ लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०१६ इन अॅनिमेशन' या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि छायालेखक गोविंद निहलानी, सर्बियन चित्रपट-समीक्षक नेनाड ड्युकिक, डॅनिश दिग्दर्शक नील्स मल्म्रोज, भारतीय अभिनेत्री मलाया गोस्वामी, अर्जेंटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर, इटालियन दिग्दर्शक फॅब्रिझिओ फेरारी, अमेरिकन दिग्दर्शक डॅनियल रेन व इराणी दिग्दर्शक रेझा दोर्मिशियन हे परीक्षक म्हणून काम पाहतील

मराठी स्पर्धा-विभागात यंदा ८४ चित्रपटांनी भाग घेतला आणि निवडसमितीने त्यांपैकी ७ चित्रपटांची निवड केली आहे. या विभागात महाराष्ट्र शासन - संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (रु. पाच लाख) व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनय, पटकथा आणि छायाचित्रण असे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.

यंदा मराठी स्पर्धाविभागातील चित्रपट पुढीलप्रमाणे -

१. सैराट (दिग्द. - नागराज मंजुळे)
२. हायवे - एक सेल्फी आरपार - (दिग्द. - उमेश कुलकर्णी)
३. रिंगण - (दिग्द. - मकरंद माने)
४. हलाल - (दिग्द. - शिवाजी लोटन पाटील)
५. रंगा पतंगा - (दिग्द. - प्रसाद नामजोशी)
६. नटसम्राट - (दिग्द. - महेश मांजरेकर)
७. कौल - (दिग्द. - आदिश केळुस्कर)

यंदा महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं 'कोकणातले समुद्रकिनारे', 'विदर्भ - ताडोबा' आणि 'औरंगाबाद - एक पर्यटनस्थळ' या तीन विभागांत लघुपटांची स्पर्धा घेतली. प्रत्येक विभागात अंतिम फेरीसाठी पाच लघुपटांची निवड झाली असून हे लघुपट महोत्सवात दाखवले जातील. तिन्ही विभागांत प्रत्येकी तीन पारितोषिकं देण्यात येतील.

'कोकणातले समुद्रकिनारे' या विभागात दिलीपकुमार डोंगरे दिग्दर्शित 'मालगुंडा- शांत, निसर्गरम्य किनारा', स्वप्नील पवार दिग्दर्शित 'कोकण', मनोज जानवेकर आणि संतोष भंडारे दिग्दर्शित 'कम, इट्स अवर ओन कोकण', दिनेश जगताप दिग्दर्शित 'येतासका... देवबाग संगमाक' आणि संदीप माने दिग्दर्शित 'हाईड अँड सीक' या लघुपटांचा समावेश आहे.

'विदर्भ – ताडोबा' या विभागात दिलीपकुमार दोग्रे यांचा 'ताडोबा', महेश लिमये यांचा 'वाघोबा', ऐश्वर्या श्रीधर यांचा 'दि ज्वेल ऑफ विदर्भ', स्वप्नील पवार दिग्दर्शित 'ताडोबा डायरीज' आणि अनिल दामले दिग्दर्शित 'विदर्भ - टायगर कॅपिटल ऑफ वर्ल्ड' या लघुपटांचा समावेश आहे.

'औरंगाबाद - एक पर्यटन स्थळ – बिबी का मकबरा' या विभागात सोमनाथ जगताप दिग्दर्शित 'अन्वा - ए फरगॉटन हिस्टरी', रमेश होल्बोले दिग्दर्शित 'दि ब्युटी ऑफ बिवी का मकबरा', प्रवीण कौलगी दिग्दर्शित 'औरंगाबाद', योगेश शर्मा दिग्दर्शित 'औरंगाबाद अॅज टुरिस्ट डेस्टीनेशन' आणि महेश चिंचोळकर व अंकुर थेपडे दिग्दर्शित 'औरंगाबाद .. दि सिटी ऑफ हिस्टरी' या लघुपटांचा समावेश आहे.

या वर्षीच्या महोत्सवाचं खास आकर्षण आहे विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान.

जागतिक पातळीवर नावाजले गेलेले श्री. गिरीश कासारवल्ली आणि श्री. जाहनु बरुआ हे दोन भारतीय दिग्दर्शक या व्याख्यानात श्री. ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांबद्दल बोलणार आहे.

तसंच 'बाहुबली' या गाजलेल्या चित्रपटाचा व्हीएफएक्स चमू आणि 'टोटल रिकॉल' या चित्रपटाचा व्हीएफएक्स चमू दोन स्वतंत्र कार्यशाळा घेणार आहेत.

अजूनही नोंदणी केली नसल्यास लगेच आपलं नाव नोंदवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिफ साठी मनाच्या कोपर्‍यात एक जागा नेहमीच राखीव आहे. पुण्यात नसलो तरी बातम्या वाचतच असतो. ऐन सुरवातीच्या वर्षांमध्ये आम्ही कॉलेजात होतो त्यामुळे ३ वर्ष सलग पाहिलेला. एका दिवसात ५ - ५ चित्रपट पहाण्याचा आनंद काही तरी औरच असतो.

यंदाच्या पिफला शुभेच्छा!

चिनुक्स तू कशात आहेस का ? परिक्षक, ऑर्गनायझर वगैरे ?

मस्त. इतकं काय काय असणार आणि आपल्याला बघायला जमणार नाही म्हणून अंमळ वाईटच वाटलं...
सौमित्र आणि बेनेगल दोघांचीही चाहती असल्याने मनापासून आनंद झालेला आहे. Happy

धन्यवाद चिनूक्स या माहीतीबद्दल. प्रवेशिका मिळाली तर पहिल्या दिवशी जाईन.

धनि,

मी परीक्षक कसा असेन? Proud संयोजकही नाही. पण संयोजकांशी परिचय आहे.

kapoche,
तुम्ही महोत्सवात हजेरी लावल्यास भेटायला आवडेल. दरवर्षी आम्ही काही मायबोलीकर असतोच. यंदाही मी, साजिरा, अरभाट नक्की असू.