विजेता

Submitted by माधव on 5 January, 2016 - 08:44

फारा वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता. तेंव्हा खूप आवडला होता. मधे कधीतरी त्यातले 'मन आनंद आनंद छायो' हे गाणे ऐकले आणि मग हा चित्रपट बघावा असे वाटू लागले. त्या वाटण्याकडे सुरुवातीला मी दुर्लक्ष केले कारण तो चित्रपट ज्या काळात आवडला होता त्या काळात भरपूर मारामार्‍या आणि काहीतरी अद्भूत असलेले चित्रपटांचे मला अप्रूप होते. निर्लज्ज होऊन सांगायचे झाल्यास snake in monkey's shadow, 36 chambers of shaolin, जय संतोशी मा, नागज्योती (हो, असा एक द्क्षिणेकडे बनलेला हिंदी चित्रपट होता) असले अतरंगी चित्रपट तेंव्हा जाम आवडायचे. ही यादी अजूनही वाढवता येइल, पण लाज तरी किती सोडायची माणसाने! आज तेच सपशेल फुसके बार वाटतात (फुसके बार याचा अर्थ मायबोलीकरांच्या डोक्यात एव्हाना कोरला गेला असेलच).

पण विजेतामध्ये रेखा आहे म्हणजे तो बघण्यात धोका कमी आहे असे समजावले - कारण एकच ''मन आनंद आनंद छायो'ने माझ्या मनाला टॅग केले होते. 'धोका कमी आहे असे समजावले' हा चुकीचा शब्दप्रयोग झाला. 'रेखा = चांगला चित्रपट' असे प्रमेय मनाने मांडले. 'रेखा' हा constant बघितल्यावर मेंदूनेही ते लगोलग स्विकारले. प्रूव्ह करून दाखव, constant सहसा उजव्या बाजूला असतो इथे डावीकडे कसा असे अडनीडे प्रश्ण विचारायच्या भानगडीत तो पडला नाही.

तर विजेता ! चित्रपटभर आजच्या तंत्राच्या finesse चा अभाव पदोपदी जाणवत रहातो. चित्रपटात काहीच चकाचक नाही - ना भव्य सेट्स, ना डोळे सुखावणारी फोटोग्राफी, ना काही स्पेशल इफेक्ट्स! सुरुवातीला ते खटकते पण नंतर ते अंगवळणी पडते. चित्रपट आवडण्यामागे त्या चकचकीतपणाचा अभाव हे पण एक कारण ठरते. कथा अगदी आपल्याही घरात घडू शकेल अशीच आहे आणि ती तशीच हाताळली आहे. गोविंद निहलानी म्हटल्यावर ते अपेक्षीतच होते म्हणा.

नायकाच्या वडलांना पडणार्‍या स्वप्नाने चित्रपट सुरू होतो. स्वप्न असते फाळणीच्या काळात सामोरे जावे लागलेल्या मृत्यूच्या तांडवाचे. त्यानंतर अजून एक स्वप्न पडते. (ते काय हे सांगत नाही). पहिला सीन संपतो!

दुसर्‍या सीनलाच 'मन आनंद आनंद छायो' सुरू होते. चला! चित्रपट बघायचे सार्थक झाले. आता डोळे मिटायला हरकत नाही (कायमचे नाही हो, मी डुलकी काढण्याबद्दल म्हणत होतो). पण डोळे बंद व्हायला साफ नकार देतात. कारण? constant ! तिकडे कानांना आपला मालक हत्ती नसून माणूस असल्याचा पश्चात्ताप होत असतो. त्यांचेही बरोबरच आहे म्हणा - इतक्या छोट्या आकारात इतके सुंदर गाणे कसे सामावून घेणार? चित्रपटात हे गाणे दोनदा येते. पहिले नुसते तानपुर्‍यावर आणि मग मोजक्याच वाद्यमेळासहीत. तुम्हाला कुठले आवडले ते तुम्हीच ठरवायचे. रेखा-आशा हे कॉम्बो भन्नाट असते. आशाच्या आवाजातल्या सगळ्या जागा रेखा पडद्यावर जिवंत करते आणि रेखाचा सगळा अभिनय, सगळ्या अदा आशा आपल्या आवाजात उतरवते. ह्या गाण्यात रेखाच्या काहीच अदा नाहीयेत, फारसा आभिनय पण नाहीये पण तरी त्या कॉम्बोची सुंदरता तीळभरही कमी नाहीये.

संवाद सुरू झाल्याझाल्या आपल्याला समजते की नायकाच्या आईचे (निलीमा) आणि वडलांचे (निहाल) काही तरी बिनसलय. संवाद सुरुवातीला काहीच उघड करत नाहीत पण रेखाच्या आवाजातील कोरडेपणा आणि तिची बॉडी लँग्वेज ते व्यवस्थीत अधोरेखीत करते. एक अत्यंत ग्लॅमरस दिसणारी स्त्री गृहीणीची भूमीका कशी करू शकते? नुसती करतच नाही तर त्या भूमीकेत ती आपल्याला पटू कशी शकते? साध्या साडीतही इतकी सुंदर पण नॉनग्लॅमरस कशी दिसू शकते? उत्तर एकच! constant !

नायक (अंगद) हा सुखाचे बालपण गेल्यामुळे जीवनात कसलेच उद्दिष्ट नसलेला. जीवनात काही मिळवायचे असते हेच त्याला माहित नसते. पण मग अशा काही घटना घडतात आणि तो वायूसेनेत दाखल होतो. कुणाल कपूरचा मी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. तो कपूर बिलकूल शोभत नाही. अजीबात परीकथेतील राजकुमारासारखा रुबाबदार दिसत नाही आणि सहज सुंदर अभिनय करतो. Happy बहुतेक त्याचा पहिलाच चित्रपट असेल पण तो इतका सहज वावरलाय की तो अभिनय करतोय असे वाटतच नाही.

नायक आहे मग नायीका हवीच ना? शेवटी हिंदी चित्रपट आहे Happy सुप्रीया पाठक! अंगदच्या बॉसची मुलगी. प्रेमाचा प्रवास तिने अतिशय सुंदर फुलवलाय तो ही अगदी मोजक्याच प्रसंगातून.

निहालची भूमिका शशी कपूरने केली आहे. हिंदी चित्रपटात मला मोजकेच नायक रुबाबदार वाटतात - त्यातला एक शशीकपूर! यात बापाच्या भूमीकेतही तो रुबाबदारच दिसलाय. त्याच्याकडून अभिनयाची फारशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही Happy

चित्रपटाला युद्धाची पार्श्वभूमी आहे. चित्रपटाच्या नावावरून नायकाला सुद्धात घवघवीत यश मिळेल असे आपल्याला वाटत असते पण तसे काही घडत नाही. म्हणजे तो हरत नाही पण त्याला यश मिळालेले पण दाखवलेले नाही. मग विजेता का म्हणून?

विजय मिळतो पण तो युद्धात नव्हे तर मनातल्या भितीवर. मृत्यू तर प्रत्येकालाच आहे पण त्या मृत्यूच्या भितीवर जो विजय मिळवतो तोच विजेता, तोच मृत्युंजय! अंगद आणि निहाल दोघही एकाच वेळी मृत्युंजय होतात.

१९८२ सालातला चित्रपट आहे (असे गूगल सांगते). वर म्हटल्याप्रमाणे चित्रपट चकचकीत अजीबात नाही. पण सगळ्यांचे सहज अभिनय आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुंदर फुलवलेली आणि जे सांगायचय ते लखलखीतपणे मांडणारी पटकथा चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय माधव तुम्ही...
शशीकपूर चा कलियुग जरुर पहा तुम्ही, आवडेल कदाचित तुम्हाला....
सॉलिड स्टारकास्ट आहे त्यात..शशी कपूर, रेखा, कुलभुषण खरबंदा, अमरीष पुरी, विजयाबाई मेहता, रिमा, लहान उर्मिला मातोंडकर पण आहे

अतिशय सुंदर चित्रपट ओळख. कधिपासुन पाहयचा राह्यला आहे तो आता हे सुंदर परीक्षण वाचून आता मात्र लगेच पाहीन.
" शशीकपूर चा कलियुग जरुर पहा तुम्ही, आवडेल कदाचित तुम्हाला....
सॉलिड स्टारकास्ट आहे त्यात..शशी कपूर, रेखा, कुलभुषण खरबंदा, अमरीष पुरी, विजयाबाई मेहता, रिमा, लहान उर्मिला मातोंडकर पण आहे" ...अगदी, अगदी.

छान लिहीले आहे. हा पाहिलेला नाही.

ते constant वगैरे डोक्यावरून गेले, पण बाकी लेख आवडला Happy

कलयुग म्हणजे महाभारतासारखी काही कॅरेक्टर्स आहेत ना? पूर्वी पाहिलेला. बघायला हवा परत. अनंत नाग वगैरेंचे रोल्सही आठवतात.

" कलयुग म्हणजे महाभारतासारखी काही कॅरेक्टर्स आहेत ना? "....हो, बरोबर. साधारणपणे महाभारतातल्याच व्यक्तिरेखांवर आधारित कथा आहे. प्रकाश झा चा राजनीतीपण तशाच प्रकारचा होता. फक्त राजनीति मधे महाभारत आणि चित्रपटातले साम्य फारच ऑब्वियस पणे मांडल्या गेले आहेत पण कलियुग मधे तसं नाहीये. रेखाचा अभिनय तर क्या केहेने! बाकि शशीकपूर, अनंत नाग, विक्टर बॅनर्जी सगळीच तगडी टीम आहे.

विजेता मला खूप आवडलेला होता. अंडर कॉन्फिडन्ट अंगद. सरदारजी असलेले नायक फार कमी असत्तत. त्यात रेखा पुण्याची दाखवलीय शशी कपूर एके ठिकाणी म्हणतोही ' दुनियाकी सब अकल पुनावालोंके पासही होती है '. असो मला दोन पात्रांचा उल्लेख करावा लागेल एक म्हणजे अमरीश पुरी. हा फ्लायिंगत्ट्रेनर असतो अत्यंत कठोर शिस्तीचा. आवाजात जरब.पण शिष्यांना आत्मविश्वास देणारा. अंगदचे विमानाचे कंट्रोल जाते आणि आता ते कोसळून अपघात होणार एवढ्यात कंट्रोल रूम मधून अमरीश पुरींच्या दमदार आवाजात इन्स्ट्रकशन्स सुरू झाल्यावर त्याला आत्मविश्बास येऊन तो सावरतो आणि सगळे टळून सुखरूप परत येतो. हा सीन अगदी पहाण्यासारखा आहे.यांच्याच मुलीवर त्याचे प्रेम असते. पुढे अमरीश पुरींना कॅन्सर होतो.
दुसरा म्हणजे वर्दीमध्ये अत्यंत हँडसम दिसणारा विंग कमांडर परुळकर उर्फ शफी इनामदार . शफीचा मला वाटते पहिल्या काहे पिक्चरपैकी एक. त्यावेळी त्याचे नावही लोकाना माहीत नव्हते.

नुकताच पाहिला. मला परत पहाताना कंटाळवाणा वाटला. पण अनेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा पहाताना खूप आवडल्याचं आठवतंय. कुणाल कपूर एकच एक्सप्रेशन देतो.

ह्याच सिनेमात 'तुम आकाश विश्वास हमारे' ही एक प्रार्थना आहे लताबाईंनी गायली आहे. ऐकली की हुरहुर दाटून येते. पण ह्या गाण्याची क्लिप नाही मिळत तूनळीवर. असेल तर लिंक द्या. अनुराधा पौडवालबाईंनी हे गाणे गायले आहे. पण ती आर्तता नाही जी लताच्या गाण्यात आहे.

तुम आशा विश्वास हमारे ।
तुम धरती आकाश हमारे ॥

तात मात तुम, बंधू भ्रात हो,
दिवस रात्रि संध्या प्रभात हो ।
दीपक सूर्य चद्र तारक में, रामा,
तुम ही ज्योति प्रकाश हमारे ॥

साँसों में तुम आते जाते,
एक तुम्ही से हैं सब नाते ।
जीवन वन के हर पतझर के,
एक तिम्ही मधुमास हमारे ॥

तुम्ही ही सब में, हैं तुम में सब,
तुही भव हो, हो तुम ही रब ।
अश्रु हमारी आखों में तुम , रामा,
तुम होटों पे हास हमारे ॥

इथे हे गाणे ऐकता येते..
http://www.bhajanganga.com/bhajan/lyrics/id/227/title/tum-aasha-vishvaas...

अतिशय सुंदर चित्रपट ओळख. कधिपासुन पाहयचा राह्यला आहे तो आता हे सुंदर परीक्षण वाचून आता मात्र लगेच पाहीन. >>>>> +१११११११

पद्मावती व फारेण्ड....
येस्स !!
" कलयुग म्हणजे महाभारतासारखी काही कॅरेक्टर्स आहेत ना? "....हो, अगदी बरोबर Happy
राईट्..अनंत नाग पण आहे त्यात आणि ए. के. हंगल पण बहुदा.
शशी कपूर कितपत चांगला अभिनेता होता हा वादाचा मुद्दा होउ शकतो..पण त्याने स्वतः प्रोड्युस केलेल्या चित्रपटात तो काही च्या काही कमाल करायचा हे नक्की, कलयुग, जुनुन, विजेता हे सगळे त्याच पठडीतले. व्यावसायिक चित्रपटात कधी कधी बोअर करणारा शशी कपूर ह्या चित्रपटांमध्ये मात्र एकदम संयत अभिनय करतो Happy

सगळ्यांना धन्यवाद!

प्रसन्न, कलयुग पाहिलाय खूप आधी. आवडला होता की नव्हता ते आठवत नाहीये आता. पण मिळवून नक्की पाहीन.

व्यावसायिक चित्रपटात कधी कधी बोअर करणारा शशी कपूर ह्या चित्रपटांमध्ये मात्र एकदम संयत अभिनय करतो >>> अगदी अगदी ! अपवाद - ३६ चौरंगी लेन. चित्रपट प्रचंड कंटाळवाणा वाटलेला आणि त्यात शशीकपूर अत्यंत नीरस वाटलेला.

फारएण्ड, रेखा कायमच आवडते म्हणून constant Happy ती कुठल्याही भूमीकेत शीरू शकते आणि त्या भूमीकेत सुंदरच दिसते. Happy

नुकताच पाहिला. मला परत पहाताना कंटाळवाणा वाटला. >>> अंजली, मला पण आवडणार नाही असेच वाटत होते सुरुवातीला. पण नंतर खूपच आवडला. तुम्हाला का नाही आवडला ते पण वाचायला आवडेल. (आपल्याला आवडलेला चित्रपट दुसर्‍यांना का नाही आवडला हे समजून घेताना मजा येते. कधी कधी त्यांचे मुद्दे समजून घेताना चित्रपट आपल्याला का आवडला हे अधिक स्पष्ट होते.)

बी, अरे ते गाणे ह्या चित्रपटात नाहीये. ते सुबह मध्ये आहे.

रेखाबद्दल टोटली सहमत. साधारण १९८० च्या आसपास आलेल्या तिच्या काही चित्रपटांतील रोल्स बघितले तर तिची रेंज दिसते - घर, खूबसूरत, उमराव जान, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला.