मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला

Submitted by Rajesh Kulkarni on 4 January, 2016 - 05:14

मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला
.

+++

अमित शिंदे यांची "काही येत नाही" या शीर्षकाची खालील पोस्ट फार छान आहे.

छातीत गोळी लागली आणि त्याच्या मेंदूत वीज चमकली . रक्ताच्या थारोळ्यात पडताना तो अचानक भानावर आला. एका क्षणात संपूर्ण आयुष्याचा चलतचित्रपट त्याच्या नजरेसमोरून झरझरत गेला. त्याला दिसू लागले, गेल्या काही वर्षात त्याने उभे केलेले गुन्हेगारी साम्राज्य, हातून घडलेले असंख्य गुन्हे, गुन्हेगारी विश्वात प्रवेश करण्यापूर्वी बेकारी आणि दारिद्र्यात घालविलेले अपमानित दिवस, त्यापूर्वीचे अतिसामान्य विद्यार्थ्याचे शालेय आयुष्य, परीक्षा पास होण्यात अनेक वेळा आलेले अपयश आणि जगाने उडविलेली खिल्ली. असा तो रीवाइंड चित्रपट त्याच्या प्राथमिक शाळेतील वर्गात जाऊन स्थिरावला. नुकताच खेड्यातल्या बालवाडीतून शहरातील शाळेत आलेला, भांबावलेला एक चिमुरडा. नवीन वातावरण आणि पहिल्याच दिवशी बाईंनी सुरु केलेली ए बी सी डी ची उजळणी. बरोबरच्या विद्यार्थ्यांना हे सर्व ज्युनिअर सिनिअर केजी पासूनच येत होते. मात्र त्याला हे सर्व नवीन होते. त्याला फक्त एक अक्षर ओळखीचे वाटले. “यु”. गावातल्या बालवाडीत शिकलेल्या “ण” बाणाचा शी साधर्म्य असलेले. तो उत्साहाने उद्गारला, “ बाई ! हा ‘न बानाचा’” बाईंनी त्याच्याकडे रागाने पहिले आणि म्हणल्या, “बस खाली , काही येत नाही !!”
मृत्युपूर्वी काही असंबद्ध क्षण डोळ्यासमोरून चमकून जातात असे म्हणतात. नेमका हाच क्षण मरताना त्याला का आठवावा?

+++

अगदी एखाद्याचे गुन्हेगारी जगतात जाणे सोडून दिले तरी शिक्षकांना मुलांची हेटाळणी करण्याचा काय अधिकार असतो?

आजकाल मुलांना शाळेत मारणे हा गुन्हा समजला जातो. पण मुलांची अक्कल काढणे, त्यांची हेटाळणी करणे, एखाद्याला ढ म्हणणे हेदेखील गुन्हेच समजायला हवेत.

तुम्ही वर्गातल्या सगळ्याच मुलांना प्रेरणा मिळेल असे काही करत नसाल, काही ठराविक हुशार मुलांवरच लक्ष केंद्रित करत असाल, तर कमीत कमी इतरांचे असलेले उरलेसुरले मनोबल तरी खच्ची करत जाऊ नका. अशी मुले कोणत्या सामाजिक पार्श्वभुमीवरून तुमच्या इथे शिकायला येतात, ते पाहता त्यांचे शाळेपर्यंत येणे व तेथे बसणे हीच क्रांतीकारी घटना असते. त्यात तुम्ही त्यांना त्यांच्या गणवेशावरून, एकूण अवतारावरून, गृहपाठ न करण्यावरून, विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर नीट न देण्यावरून त्यांची हेटाळणी तरी करू नका ना!

शिक्षक म्हणून तुमच्याबद्दल वर्गातल्या प्रत्येक मुलाला तुमच्याबद्दल आत्मियता वाटावी, तुम्ही शिकवता त्याची गोडी लागावी याकरता तुम्ही काय करता? तुमच्या विषयात, तुमच्या वर्गातला मुलगा नापास होतो, चांगले गुण मिळवण्यात अपयशी होतो हे तुम्ही तुमच्या शिकवण्याचे अपयश मानता का?

बाकीचे जाऊ दे, कधीतरी वर्गातल्या प्रत्येक मुलाची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी विचारायची, त्यांच्या अडचणी काय आहेत, गरजा काय आहेत हे विचारण्याची तसदी घेतलीत का? वर्गातला सर्वात हुशार मुलगा व सर्वात कमजोर मुलगा यांच्यातली दरी बुजवण्याचा प्रयत्न केलात का? अशा दुर्बल मुलांकडेही तुमचे लक्ष आहे हे त्यांना वाटावे अशी तुमची इच्छा तरी आहे का? मी तुम्हाला तुमच्या वर्गात असायला हवा आहे असे त्या मुलाला मनोमन वाटावे असे काही तुम्ही कधी केलेत का?

शिक्षक आहात, टवाळखोर नाहीत. तुमची नेमणूक तुमच्या गुणवत्तेवर झाली असो की त्या नोकरीसाटी लाख-पाच लाख मोजून झाली असो, आला अाहात ना या पेशात आयुष्यभर राहण्यासाठी? य़ा मुलांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात हो तुमच्याकडून. तेव्हा शिक्षक म्हणून तुमचे ‘शैक्षणिक’ व ‘बौद्धिक’ वय त्या मुलांपेक्षा जास्तच आहे. तर मग त्या कोवळ्या मनावर हिडिस-फिडिस करण्याचे, हेटाळणीचे आणि दुर्लक्षाचे कसले संस्कार करता? ते करायला बाहेरचे जग आहेच की!

शाळेतही तुम्ही तेच करणार, तर मग तेथे जायचेच कशाला?

ते राष्ट्रउभारणी, nation building वगैरे फार मोठे शब्द आहेत हो. आपापले काम नीट केले तरी ते आपोआपच होते.

तुम्ही तर शिक्षक आहात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हाला एक शिक्षक होते, जीव तोडुन शिकवायचे. पण एकदा माझीच वेळ खराब होती. एका शब्दाला मला हसू आले ( त्या मागे मोठे कारण होते, शिक्षकान्चा सम्बन्ध नव्हता) तर यानी भर वर्गात मला वाटेल तसे बोलुन घेतले. इतके कमी पडले म्हणून आमच्या एका शेजारच्या शिक्षक बाईन्कडे ते आले होते, मी तिथेच होते. बाई माझ्याशी आणी त्यान्च्याशी बोलत होते, प्रश्न विचारत होत्या. पण मध्येच हे सर मला बाईन्समोर म्हणाले तुला काय कळतय, अक्कल तर नाही, मध्ये बोलु नकोस. झाले तेव्हापासुन (माझी कसलीही चूकी नसताना, केवळ कुठल्या दुसर्‍या रागावर हे मला बोलले) ते सर माझ्या जे मनातुन उतरले ते कायमचे. ते आता समोर दिसले तरी मी तोन्ड फिरवते. त्याना आता माझ्याशी बोलावे वाटते, पण मी बोलणार नाही हे निश्चीत.

शिक्षक म्हणून ते खरच महान होते/ आहेत. पण माणुस म्हणून अपयशी आहेत माझ्या नजरेत.

माझी नववीची परीक्षा होती. पर्यवेक्शक म्हणुन सर होते ते उत्तरपतिकेवर सही करण्यासाठी आले. मी एक पुरवणी जोडली होती. आधी भराभर लिहुन घेउ मग पुरवणीवर नाव घालु असा विचार करुन मी नाव वैगेरे घातले नव्हते. हे सही करण्यासाठी आले आणि पुरवणी बघुन जे भडकले. मला म्हणाले ह्यावर नाव वैगेरे तुझा बाप येउन लिहिणार आहे का?
Angry अस्सा खुन्नस भरा लुक दिलेला मी. एक शिक्षक म्हणुन ग्रेट होता की कसा गेले खड्ड्यात. माझ्या तर तेव्हापासुन डोक्यातच गेले.

sorry.

मी एका सरांच्या शिकवणीला जात नव्हतो. त्या ऐवजी एका रिटायर्ड शिक्षकाच्या शिकवणीला जात होतो.

दहावीची सायन्स प्रॅक्टीकलची वेळ. मला दुधात अ‍ॅसीड घातले तर पिवळा रंग येतो ज्यामुळे दुधात प्रोटीन्स आहेत हे सिध्द होते हा प्रयोग आला होता.

मी लेखी काम लगेच केले ज्यात उपकरणे, कृती लिहुन काढली. निष्कर्ष लिहायला विसरायला नको म्हणुन चुकुन दुधात अ‍ॅसीड घालण्यापुर्वीच निष्कर्ष लिहला. ते सर खवळले. त्यांच्या क्लासला मी गेलो नाही यासाठी त्यांनी एक्स्टर्नल एक्झामिनरला बोलावुन मी अ‍ॅसीड घालण्या आधीच निष्कर्श लिहला यावर लाल रंगाचा शेरा मारुन माझे मार्क्स कापण्याची तजवीज केली.

राजेश, मी नाशिक मधील एका नावाजलेल्या मराथी माध्यमामधुन शिकले. पण शिक्षक अतीशय अपमानकारक बोलणारे होते. विशेशतः कमी हुशार तुकड्यामधुन तर हा प्रकार अती होता.

आमच्या शाळेत गणिताचे सर फक्त अ विभागातील गणिते शिकवायचे आणि अगदीच मनात आले की ब विभागातील एखाद दुसरे गणित घ्यायचे. बाकी क आणि ड विभागातील गणितच घेत नव्हते. खाजगी शिकवणी घेत होते तिथे मात्र सगळी गणिते सोडवून घ्यायचे. आम्ही जाब विचारल्यावर शिकवणी लावा म्हणून कुत्सितपणे म्हणाले होते. आमचे १०वीचे वर्ष महत्त्वाचे म्हणून मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. याचा राग येऊन एकदा त्यांनी भर वर्गात एका मुलाला फक्त हसला म्हणून फार मारलेला. खर तर तो मुलगा गरीब कुणाशीही न बोलणारा अंतर्मुख राहणारा होता. आमच्या टीमला हात लावायची हिम्मत नव्हती म्हणून सग़ळा राग त्याच्यावर काढला.

दुसर्‍या आठवड्यात त्याच शिक्षकाच्या मुलाला जो दुसर्‍या डिव्हिजन मधे होता. त्याला मधल्या सुट्टीत "मुलीची छेड काढतो" म्हणून जबरदस्त बुकलून काढला. वर मुख्याध्यापकांकडे मुलींकडे बघून इशारे करतो ही तक्रार सुध्दा केली. तेव्हा त्यानंतर त्या शिक्षकाने क आणि ड विभागातील गणिते घ्यायला सुरुवात केली.
कधी कधी आम्ही केलेला प्रकार चुकिचा वाटतो पण तोच योग्य सुध्दा वाटतो.