माझा मराठी हा देश...

Submitted by atuldpatil on 31 December, 2015 - 23:16

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं
पर देशी जाता येई, त्याचा आठव आठव

कोकणचा समंदर, दर्या अफाट अफाट
दूर चमचमती लाटा, काय वर्णू त्याचा थाट
त्याचा किनारा किनारा, लांब चालावं चालावं
रेघा वाळूत मारता वारं, अंगी भिनावं भिनावं

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||१||

कडे कपारी नी किल्ले, सह्य पहाड पहाड
बोरे आणि चिंचा खात, मस्त फिरावं उनाड
रायगडी कधी जाता, हिरकणीला स्मरावं
अन राजाच्या चरणी, शीर झुकावं झुकावं

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||२||

शेतामंदी बळीराजा, राब राबतो राबतो
नदीमंदी गार पाणी, ऊस जोमाने वाढतो
धान्य पिकता पिकता, घामाचं मोती व्हावं
दसरा दिवाळी सुगीला घर भरावं भरावं

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||३||

बालपणीची मैत्रीण, गाल तिचे गोरे गोरे
बोलताना चमकती, तिचे पाणीदार डोळे
बोलण्याचा तिच्या बाणा, अन डोळ्यातले भाव
मराठीचीच लेक ती, तिला ऐकावं ऐकावं

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||४||

- अतुल दि. पाटील (०१/०१/२०१६)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!