माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2015 - 12:28

शिवी म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संतापाच्या भावना व्यक्त करणारे शब्द ...
अशी काहीशी शिवीची व्याख्या ऐकली होती..
बस्स तिलाच खोटे ठरवायचो आम्ही..

जसं ठेच लागल्यावर पटकन तोंडातून अई निघते, जसे कोणी आपल्याला हाक मारल्यावर पटकन आपण ओ देतो, बस्स तसेच .. मित्राला हाक मारताना किंवा त्याच्या हाकेला ओ देताना पटकन तोंडातून शिवी निघायची. मित्रांमध्ये होणार्‍या संभाषणातील दर वाक्यामध्ये, दर दुसर्‍याही नाही तर दर वाक्यामध्ये, एखादी शिवी मोठ्या खुबीने कुठेतरी पेरलेली असायची. क्रिकेट खेळताना मात्र नेमके उलटे व्हायचे.. अर्रंरर म्हणजे शिव्यांशिवाय बोलायचो असे नाही, तर नुसत्या शिव्या, नुसत्या शिव्याच दिल्या जायच्या.. आणि त्या शिव्यांमध्येच काही शब्द मोठ्या खुबीने पेरून संवाद साधला जायचा.

यात कुठेही राग, संताप, समोरच्याबद्दल द्वेष या भावना दूरदूरपर्यंत नसायच्या. किंबहुना मैत्रीची लेवल या शिव्यांवरून ठरवली जायची. ना कोणी त्या शिव्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा, ना शोधायला जायचा. अर्थात, जेव्हा या वापरायला सुरुवात केली तेव्हा कैक शिव्यांचा अर्थही माहीत नव्हता.

तर या शिवीगाळ प्रकरणात मी साधारण दहाव्या वर्षी फॉर्मला आलो. ईयत्ता चौथी पास होत प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत सरकलो आणि तिथले वारे लागले म्हणू शकता. तिथे आम्ही पाचवी ग्रेडवाले ज्युनिअर आणि आम्हाला धंद्याला लावणारे सहावी ते दहावी सारेच सिनिअर. मी त्यांच्यातच जास्त रमायचो. कारण कुठलाही दुर्गुण समवयीन मित्रांच्या आधी उचलायचा गुण माझ्या अंगी मी बाणवला होता. त्यामुळे आमच्या वर्गात मी ‘गुरू’ आणि ‘महागुरू’ या दोन नावांनी ओळखलो जायचो. शिव्याच नाही तर लैंगिक शिक्षण (जे तेव्हा शालेय अभ्यासक्रमात मिळायचे नाही) मी मोठ्या मुलांकडून घेत माझ्या वयाच्या मुलांमध्ये वाटायचो. हे देखील या पदव्यांमागचे एक कारण होते. मग काय, या इमेजला जपायला भरमसाठ शिव्यांचा सर्रास अन सुलभतेने वापर करणे भागच होते. इथे सुलभता फार महत्वाची. कारण आव आणून शिव्या दिल्यासारखे मी कधीच केले नाही. त्या सहज यायच्या. अर्थात यामागे आमच्या बिल्डींगमधील वातावरणाचाही हात होताच.

वासरात लंगडी गाय शहाणी आणि काशीबाईंपेक्षा देखणी मस्तानी. या न्यायाने मी बिल्डींगमधील एक, किंबहुना एकमेव हुशार मुलगा म्हणून गणला जायचो. जो मुलगा हुशार आहे तो वाया गेलेला नाही या समीकरणानुसार सभ्य मुलगा म्हणूनही ओळखला जायचो. ‘रुनम्या सोबत आहे’ म्हणत माझे नाव घेतल्यास एखाद्याला घरून पिकनिकसाठी परवानगी मिळावी या पठडीतली माझी इमेज होती. आणि ती तशी परवानगी खरोखरच मिळायची म्हणून माझे मित्रही माझी ती फेक इमेज आपापल्या घरी जपायचे. यामागे आमच्या घरचे वातावरणही कारणीभूत होतेच. मी कसाही असलो तरी आमचे घर संस्कारी होते आणि ते बिल्डींगमध्ये सर्वांना माहीत होते.

तर या घरच्या संस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, लहानपणी माझ्या तोंडात "च्याईला" हा शिवीसद्रुश्य शब्द बसला होता. घरी सुद्धा सहजच तोंडात यायचा आणि आल्या आल्या एक थोबाडीत पडायची. एक दिवस मी पुढची पायरी गाठली आणि तोंडातून "साल्या" हा शब्द बाहेर काढला. तो देखील थेट माझ्या काकांसाठी वापरला. बस त्यादिवशी थोबाडीत न पडता माझे थोबाडच फोडले गेले. दुधाचे सारे दात एकाच दिवशी पडले. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. पुन्हा कधी घरच्यांसमोर तोंडातून अपशब्द बाहेर नाही आला. घरातच नव्हे तर बाहेरही कधी थोरामोठ्यांसमोर वा मुलींसमोर तो नाही आला. जसे शिव्या सहज तोंडातून बाहेर पडायच्या तसेच हे नियंत्रण देखील ईतकी वर्षे सहजच जमले. त्यामुळेच आज ऑफिसला व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड ईमेज मिरवताना हा गुण कामी येतोय.

पण एक अपवादात्मक किस्सा मात्र आहे जो कायम आठवणीत कोरला गेलाय ..

शाळेतील गोष्ट आहे. दहावीच्या वर्षाची. शारीरीक शिक्षणाचा तास चालू होता. वर्गातल्या वर्गात उंच उडीची परीक्षा चालू होती. एकेक जण हातात खडू घेत भिंतीजवळ जात उंच उडी मारायचा, हातातल्या खडूने निशाण बनवायचा आणि मग त्या आधारे उडी मोजली जायची. माझी उडी मारून झाली होती. ईतरांच्या थोड्याफार बघितल्या आणि मग त्यातील रस संपला तसे मी आपल्याच विचारांत रमलो. ईतक्यात वर्गात अचानक गोंगाट सुरू झाला. कोणीतरी अफाट उंच उडी मारली होती. मी माझ्या तंद्रीतून खडबडून जागे होत चौकशी केली तसे सुशांतने अमुक तमुक उंचीची उडी मारली असे समजले. आकडा खरेच खतरनाक होता. त्यामुळे अबब असे उद्गारवाचक शब्द तोंडातून निघतात तश्या अर्थाची एक शिवी बाहेर पडली. गंमत म्हणजे माझ्या दुर्दैवाने तेव्हाच अचानक सारा वर्ग शांत झाला. माझी शिवी वर्गात खणखणीतपणे दुमदुमली. आणि पुन्हा एकदा शांत झालेल्या वर्गात हास्याचे स्फोट गडगडले. पुढच्याच बाकावर बसलेलो असल्याने बाईंच्या कानापर्यंत नक्कीच ही शिवी पोहोचली असणारच. पण त्यांनी तसे न दाखवता, मुलांनाच प्रतिप्रश्न केला की काय म्हणाला हा रुनम्या. अर्थात कोणी सांगितले नाहीच. बाईंनीही न ताणता मला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले. याचा एकच फायदा झाला, तो म्हणजे पुढील उंच उडीचा कार्यक्रम मला मान फारशी वरखाली न करता बघता आला.

तर आजही शाळाकॉलेजमधील ज्या अवली कारनाम्यांसाठी मी मित्रांना आठवतो, त्या आठवणीत हा किस्साही जोडला गेला.

शिव्यांमध्ये मातृभाषा फार महत्व राखून असते. मलाही मराठीतच जमायच्या. राष्ट्रभाषेतील शिव्यांमध्ये ती मजा नाही यायची. ईंग्लिश तर कधी जमल्याच नाहीत. नाही म्हणायला ईंग्रजी आद्याक्षर एफ पासून सूरू होणारा दोन अक्षरी शब्द मध्यंतरी तोंडात बसला होता. उगाच शायनिंग मारल्यासारखे वापरायचो. एकदोनदा गर्लफ्रेंडसमोर वापरला आणि तिनेही थोबडावून तो सोडवला.

या शिवीगाळीचा जो काही थोडाबहुत अहंकार मनी वसला होता तो हॉस्टेलमधील काही उडाणटप्पू उत्तरभारतीय मुलांसमोर गळाला. आपल्याकडे व्याकरणाचे संस्कार पाळत संधी समास करत शिव्या दिल्या जातात. ज्यांचा थेट अर्थ पोहोचत नाही, पोहोचलाच तरी भिडत नाही. त्यांच्या शिव्या मात्र फोड केलेल्या असायच्या. ज्या ऐकायलाही किळसवाण्या वाटायच्या. देणे तर दूरची गोष्ट.
असो, तर त्यांच्याशी मी कॉम्पिटीशन करायला गेलो नाही हे एक चांगलेच झाले.

आज माझ्या गर्लफ्रेंडला किंवा ऑफिसमधील कलीग्जना मी सांगतो की मी असा आहे वा असा होतो. शिव्यांचे नुसते अर्थच माहीती आहेत असे नसून सफाईतपणे शिवीगाळही करू शकतो. तर त्यांना हे खोटे वाटते. पण मग त्यांचा विश्वास बसावा म्हणून दोनचार सॅंपल शिव्या देण्याचा मोह मी देखील आवरतो.
कारण आज त्या शिव्या खटकतात. शिव्यांच्या या बाजारात आईबहिणींचा उद्धार केला जातो हे खटकते. कारण आज त्या सवयीने सहज येत नसल्याने त्या तोंडात यायच्या आधी त्यांचा अर्थ डोक्यात येतो आणि मग शब्द अडखळतात.

पण या उद्धारावरून आठवले. तीर्थरूपांचा उद्धार करण्याचीही एक पद्धत होती. दहापैकी चार जणांना तरी चिडवायचे नाव म्हणून त्याच्या वडीलांचे नाव असायचे. त्यातही कोणाच्या वडीलांचे नाव शंकर, दिगंबर, पांडुरंग असे धार्मिक असेल तर हमखास त्याच नावाने हाक मारली जायची. लॉजिक शोधायला जाऊ नका पण असे व्हायचे. यातही सोयीनुसार दिगंबरचे दिग्या आणि पांडुरंगचे फक्त पांडू व्हायचे. ज्या कोणाच्या वडीलांचे नाव प्रकाश असेल त्याला तर आयुष्यभरासाठी पक्या हे टोपणनावच पडायचे. माझ्या शाळा, कॉलेज आणि बिल्डींगमधील तीन विविध ग्रूप्समध्ये असे तीन पक्या होते. आणि मी त्यांना पक्या सोडून आजवर कुठलीही दुसरी हाक मारली नाही. याचाही एक किस्सा आहे. विषय निघालाच आहे तर सांगतो,

कॉलेजात असतानाची गोष्ट. सिनेमाचा की अभ्यासाचा प्लान बनत होता. फोनाफोनी चालू होती. सगळ्यांकडेच मोबाईल नसायचा. कोणाचा असला तरी लागेलच याची खात्री नव्हती. तर पक्या म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या एका मित्राचा मोबाईल लागत नव्हता. त्याच्या घरचा नंबर होता म्हणून मी लॅण्डलाईन फिरवला. समोरून त्याच्या आईने फोन उचलला. मी सवयीनेच उच्चारलो, "पक्या आहे का?.."
ती माऊली थोडावेळ गोंधळली. मग म्हणाली, नाही ते आता ऑफिसला गेलेत. आपण कोण? मी फोन कट!

किस्से बाय किस्से आठवले तर बरेच निघतील, पण तुर्तास एवढेच .. कारण सध्या संस्कारक्षम लोकांमध्ये वावरतोय, फार काही लिहिल्यास हा फेकतोय असा भ्रम लोकांमध्ये निर्माण होतो. त्यामुळे ते किस्से माझ्या आत्मचरीत्रासाठी राखून ठेवतो. सध्या माझ्यातील वाईट सवय, दुर्गुण क्रमांक तीन अधोरेखित करायला ईतके पुरेसे ठरावे.

लेख विस्कळीत झालाय खरा, पण आठवणी अश्याच बाहेर येऊ द्यावात. मी माझ्यावर कधी संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, तर लेखावर का करावे Happy

बस्स आपलाच,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिव्यांशिवाय कुठली तरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री चालतीये का ते बघा एकदा...

शॉप फ्लोअर वर काम करुन घायचे असेल तर सगळ्यात उत्तम मार्ग तोच आहे... शिव्या दिल्या शिवाय कामचं पुढे पटापटा सरकत नाहीत...

मुंबई क्रिकेटशीं संबधित माझा एक मित्र मला न चुकतां महत्वाच्या सामन्याचा पास किंवा तिकीट तरी मिळवून देत असे. मग तो तिथला मोठा पदाधिकारी झाला व एका कसोटी सामन्याच्या तिकिटासाठी मीं जरा दबकतच त्याला फोन केला. "सॉरी", असं तुटक उत्तर मिळालं. "जावूंदे रे. तुझ्यावर आतां खूप दबाव असणार. नाहीं तर नाहीं " , मींच सारवासारव करत म्हटलं. त्यावर तो गरजला, " अरे *****, तुझा पास ठेवलाय. मींच फोन करणार होतो तुला. पण ******, मीं फोन उचलल्यावर नेहमीं प्रमाणे तूं ********, ******** ने सुरवात केली नाहीस म्हणून मीं वैतागलो !!"
मला वाटतं, शिवी ही पाण्याप्रमाणेच असते; संदर्भाप्रमाणे, नात्याप्रमाणे तिचा रंग बदलतो !
[******** - ह्या असली शिव्या आहेत, हें सांगणे नलगे !]

हिम्या, असहमत. शिव्यांशिवायही मॅन्युफॅक्चरिन्गचे काम काढता येते. दोन कौतुकाचे शब्द बोलले, वेळच्यावेळी शाब्दिक्/आर्थिक प्रोत्साहन दिले तर दुप्पट कामही निघते हा स्वानुभव आहे. Happy

वा भाऊ अगदी, धाग्याचा रंग पकडलात ..

एक जवळचा खास मित्र लग्न करतोय, उद्या त्याची हळद आहे.. कॉलेजचा कट्टा पुन्हा भरणार आहे.. ३१स्ट ची पार्टी उद्यासाठी शिल्लक ठेवलीय.. खाणारे खातील पिणारे पितील.. पण खरी भूक भागणार आहे ती मैत्रीच्या नात्यातील कचकचीत शिव्यांनी.. त्यासाठीच एक्सायटेड आहे Happy

दोन कौतुकाचे शब्द बोलले, वेळच्यावेळी शाब्दिक्/आर्थिक प्रोत्साहन दिले तर दुप्पट कामही निघते हा स्वानुभव आहे.

>>>>>

अभियांत्रिकी मध्ये स्थापत्य की काही (सिविल ईंजिनीअरींग) पण एक असते ज्यात साईटवर काम करणार्‍या ईंजिनीअरला, सुपरवायझरला, मुकादमला शिव्या येत नसतील तर बिल्डींग कधी वेळेत बनणारच नाही..

तर आज जे घर तुम्हाला निवारा देतेय, शांत समाधानाची झोप देतेय, त्याचे फाऊंडेशन या शिव्यांनी गच्च भरलेय, घरातील बीम कॉलम वॉलमध्ये मध्ये रेती खडी सिमेंट बरोबरच शिव्याही मिक्स झाल्यात हे विसरू नका Happy

बाळ ऋन्मेष, मी सिव्हिल इंजिनियरिन्ग अंतर्गत "बांधकामाच्या" क्षेत्रातही हाताखाली लोक वापरले आहेत, व एकही शिवी न देता कामे वेळेत व चांगली करवुन घेतली आहेत. (तुला माहित नसेल्च, किन्वा विसरला असशील, पण मी अनुभव वा अनुभूतिशिवाय एक अक्षरही बोलत/लिहित नाही.) तेव्हा बांधकाम वा अन्य कोणत्याही क्षेत्रात "शिव्यांशिवाय कामे होतच नाहित" हा एक फार मोठा गैरसमज आहे.

आणि हो, तुम्ही जर त्यांच्यापैकी कोणाला विकृत म्हणाला असाल तर ती माझ्यामते शिवी आहे Happy

>>>> तुम्ही जर त्यांच्यापैकी कोणाला विकृत म्हणाला असाल तर ती माझ्यामते शिवी आहे <<<<<
जर तर ची गृहितके मांडू नकोस उगाचच. एखाद्याला विकृत म्हणणे ही शिवीपेक्षाही गंभीर बाब आहे.

माझे मूळचे वाक्य असे आहे.
>>>>> पण त्याकरता "शिवी घालणे" शाप देणे ही निव्वळ विकृत पळवाट आहे. <<<<
त्यावर तुझी विषयांतराची मल्लीनाथी ही अशी....
>>>>> आता तुम्ही वर वापरलेला विकृत हा शब्द. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही विकृत म्हणत असाल तर ती माझ्यामते एक शिवीच आहे. <<<<<
पळवाटेला "विकृत" असे विशेषण लावले असताना, व्यक्तिला लावलय अशा "जर तरच्या" कसरतीची गरज ऋन्मेष, तुला का पडू लागलीये? Wink

>>>>> "बांधकामाच्या" क्षेत्रातही >> नक्की कुठे .. तुमचा व हाताखालच्या लोकांचा जॉब प्रोफाईल काय होता? <<<<
तूच्च सान्ग, तुला "बांधकामाच्या कोणकोणत्या क्षेत्रात" शिव्या देणे भागच आहे असे वाटते.... !

>>>> लिंबूभाऊंना घेऊन जा. एक तर मित्र सुधरतील या लिंबूभाऊ शिव्या देतील <<<<
याव्यतिरिक्तही शक्यता आहे जयंतराव ती नजरेआड कशी काय केलीत? ..... मित्र एक तर सुधारतील तरी नायतर, पळून तरी जातील किंवा चुळकाभर पाण्यात जीव देतील... Biggrin

माझे मूळचे वाक्य असे आहे.
>>>>> पण त्याकरता "शिवी घालणे" शाप देणे ही निव्वळ विकृत पळवाट आहे. <<<<

>>>

आता हे एक उदाहरण बघा,
जर रस्त्याने जाताना मला एक जण तिथे थुंकताना दिसला, आणि मी त्याला म्हणालो, "अरे बाबा रस्तावर थुंकणे ही एक चु ## गिरी आहे." तर याला शिवी म्हणाल की आणखी काही Happy

असो,
चला लिंबूभाऊ, ऑफिसातून लवकर पळतो आज जरा, नववर्ष सेलिब्रेट करायचेय. तुम्हालाही शुभेच्छा. जर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठलीही शिवी देत नसाल, अपशब्द वापरत नसाल, तर कौतुक आहे तुमचे. नवीन वर्षात हे टिकवून ठेवा.. आता थेट २ जानेवारीलाच भेटू Happy

भाऊ फारच समर्पक उदाहरण... मित्रांच्या बाबतीत असे घडते हे नक्की... माझे काही मित्र आहेत त्यांच्याशी बोलताना आजही वाक्याची सुरुवात **** अशीच होते.. त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही... तसे नाही म्हटले तर तुम्ही म्हणताय तशीच लाखोली ऐकून घ्यावी लागते....

पण काही जण एकदम १८० अंशात बदलेलेही आहेत... म्हणजे जे पूर्वी वाक्यात चार तरी शिव्या द्यायचे ते आता १० मिनिटे बोलले तरी शिव्या देत नाहीत... त्यांच्याशी बोलताना शॉक बसतो एकदम... आणि त्यांच्या बद्दल चर्चा करताना परत.. **** हा असा कधीच नव्हता, असे काय करतो आहे आता... असेच बोलले जाते..

दर वाक्यागणीक शिव्या देत बोलणे म्हणजे सरळ रस्त्याने डावीकडून सरळसोट न जाता विनाकारण झिगझॅग करीत जाण्यासारखे आहे.
वाहतुकीचे नियम पाळीत व्यवस्थितपणे सरळ गाडी चालविणारा तो व विनाकारण हॉर्न वाजवीत, गाडी झिगझॅग अन इतरांना कट मारित चालविणारा यात जो फरक आहे, तोच फरक शिव्या न देता बोलणारा, व सतत शिव्या देत बोलणारा यात आहे.
या सगळ्यात प्रश्न इतकाच आहे की "नियम पाळायचेत वा नाही".

माझ्या बाबान्चे परम मित्र आमच्या शेजारीच ( ३ घरे सोडुन ) रहायचे. मी असेन चौथीत वगैरे, तर एकदा कानावर त्यान्च्या शिव्या पडल्या. आता त्या शिव्या आहेत हे मला कळलेच नाही त्या वेळी. अगदी वर्‍हाडी हेल काढुन ""अबे सन्त्या भे..... मा.....ऐकुन नाही र्हायले का भैताडानो?"" मग मी आईला जाऊन विचारले की हे भे... मा.. काय आहे? त्याच वेळी त्या काकु ( बामिबा) नेमक्या आमच्याकडेच बसल्या होत्या. त्या पण गडबडल्या. अग हे डोक्यात घेऊ नकोस. मोठी माणसे ना अशा शिव्या देतात, लहान मुला-मुलीनी लक्ष देऊ नये असे म्हणून मला गप्प केले.

आता गाडीतुन जाताना कोणी खोडसाळ पणा केला ( म्हणजे रॉन्ग साईडने कुणी आला गेला, कट मारला, ओव्हरटेक केले की नवरा आणी दिर काहीतरी बडबडतात. किती वेळा सान्गीतले की लहान मुले शेजारी आहेत, पण ""अरे बैला"", असे बडबडणे त्यान्चे चालूच असते. बहुतेक माझी मुलगी कधीतरी हा शब्द उच्चारेल तेव्हा बन्द होईल हे सगळे.

माझ्या मैत्रिणीच्या बाबत घडलेली गोष्ट. तिच्या नवर्‍याची एक पेटंट शिवी सतत कानावर पडत असे.एकदा लिफ्ट्मधे तिला, तिचा शेजारी, त्यांच्या सेक्रेटरीबद्द्ल काही सांगत होता.हिनेही त्याची री ओढत म्हटलं 'तो ना, तस्साच आहे भो***'!
बोलून गेल्यानंतर शेजारी शॉक्ड बघून ही हैराण.घरी तंबी देऊन ठेवली.

>>अरे बाबा रस्तावर थुंकणे ही एक चु ## गिरी आहे.<<

आयला एव्हढं सगळं रामायण लिहिलंस पण हे वरचं वाक्य वाचल्यावर मला शंका आलीय कि तुला, तु देत असलेल्या शिव्यांचे अर्थ माहित आहेत का?

राज, अर्थ माहीत आहे. नसला तरी काय फरक पडतो. तसेही इथे मला शिव्यांवर पीएचडी केल्याचा दावा करायचा नाहीयेच Happy
पण सदर शिवी मुर्खपणाला समानार्थी शब्द म्हणून जास्त प्रचलित आहे. उदाहरणार्थ क्रिकेट मॅच बघताना खराब फिल्डींगला वापरायचा आवडीचा शब्द. अर्थात घरचे जवळपास असल्यास मनातल्या मनात..

दोन जानेवारीची पन्नास मिनिटेपण झाली नाहीत तर लगेच आपले 'दोन जानेवारीला भेटण्याचे ' शब्द खरे करायला आलास हो ऋबाळा.
किती गुणी आहेस.
Wink

हा हा .. तसे नाही, होतो मी तेव्हाही.. पण मला ती चर्चा तिथेच थांबवायची होती म्हणून २ जानेवारीला भेटूया म्हणत पळ काढला..
येस्स असा मी पळ काढतो, कोणी मला पळपुटा भगौडा म्हटले तरी चालेल Happy

फक्त ती शिवी तर नाही ना हे आधी चेक करा Wink

ऋन्मेष, कधी कधी, मुंबईतल्या काहि ट्रिवियल गोष्टी तु इतक्या छातीठोकपणे चुकिच्या लिहितोस कि साला मला शंका येते कि तु खरंच मुंबईकर आहेस कि मुंबई गेल्या २५ वर्षांत साफ बदलुन गेलेली आहे...

२५ वर्षांची कल्पना नाही, माझे वय बावीस आहे Happy

पण चुकत असेल तर कर्रेक्ट करा. मी माझे मित्र माझ्या ओळखीपाळखीतले सारे त्या शब्दाचा मूळ अर्थ वेगळा असला तरी त्याला मुर्खपणाचा समानार्थी शब्द म्हणूनच जास्त वापरत आलोय.
किंबहुना हल्ली त्या फू बाई फू सारख्या शो मध्येही मुर्खपणाच्या अर्थाने चु बोलून नंतर चुकीचे वगैरे शब्द बोलून विनोदाचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात.
आणि तो फेमस डायलॉग, क्या मेरे सर पे लिखा है के मे चु हू .. (अलिबाग से आया हू)

तरी पण तुम्ही सांगा ..

अरे बाबा तो शब्द - कोणाला गंडवल्यास किंवा कोणी गंडवला गेल्यास वापरतात. आता मुंबईत रस्त्यावर थुंकणे हा मुर्खपणा आहेच पण यात किळस आणि सार्वजनिक स्वच्छतेचा भाग सोडला तर कोणी वैयक्तिकरीत्या गंडतो वा गंडवला जातो का?

<< तु देत असलेल्या शिव्यांचे अर्थ माहित आहेत का?>> << अरे बाबा तो शब्द - कोणाला गंडवल्यास किंवा कोणी गंडवला गेल्यास वापरतात.>> राज, वरचीं हीं दोन्ही विधानं आपलींच आहेत; मला वाटतं, शिव्यांचा शब्दशः अर्थ काढत बसलं तर अनर्थच होईल [ मित्रांच्या टोळक्यात एकमेकानां ज्या शिव्यानी संबोधलं जातं, त्याचा अर्थ काढत बसलं तर तिथल्या तिथं खूनच पडतील !]; विशिष्ठ शिव्यांचा वापर एखाद्या मित्रांच्या टोळक्यात, एखाद्या समाज घटकांत, एखाद्या प्रदेशात इ.इ. किती सहजगत्या केला व स्विकारला जातो, हेंच महत्वाचं. [ उत्तरेकडे 'आप' ऐवजीं 'तुम' असं कुणाला संबोधलं तरी तें अपमानास्पदच होतं !] त्यामुळे आपल्या फक्त दुसर्‍या विधानाशी मीं सहमत होवूं शकतो.

सुनिधी धन्यवाद Happy

अहो राज काय हे, तुम्ही तेच बोलत आहात. गंडवणे म्हणजेच मुर्ख बनवणे. फक्त तुम्ही चु बनणे आणि चु बनवणे याबद्दल भाष्य करत आहात. एखादी व्यक्ती स्वता चु असणे म्हणजे ती मुर्ख बिनडोक बेअक्कल असणे. आणि तिने चु##गिरी करणे म्हणजेही बिनडोकगिरी करणे. एखाद्याची चु##त गिणती करणे हा देखील एक वाक्यप्रचार आहे. हल्ली ते फेसबूकवर सुद्धा क्या चु##पा है म्हणत अश्याच बिनडोकगिरीच्या पोस्ट फिरत असतात..

भाऊ हो..
राज आणि आशा करतो की तुम्हाला त्या शब्दाचा खरा अर्थ माहीत असेल. आधीच्या पोस्टमध्ये मी उल्लेखलेल्या तो आणखीनच वेगळा आहे. आणि घाण आहे. म्हणून हा शब्द घाण आहे. घरी वापरता येत नाही.

छान लिहिले आहेस.
शिव्या देणे वाईट असते हे तुला कळले ते छानच. मैत्रीच्या नात्यातील आपलेपणा जपण्यासाठी/वाटण्यासाठी शिव्यांची काहीच गरज नसते हेही माहीत असेल पण जेव्हा हे उमजेल तेव्हा तुझे त्यांना आपुलकीनेसुद्धा शिवी देणे आपोआप बंद होईल.

तू आत्मचरीत्र लिहीणार आहेस? व्वा!! Happy

Pages