माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2015 - 12:28

शिवी म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संतापाच्या भावना व्यक्त करणारे शब्द ...
अशी काहीशी शिवीची व्याख्या ऐकली होती..
बस्स तिलाच खोटे ठरवायचो आम्ही..

जसं ठेच लागल्यावर पटकन तोंडातून अई निघते, जसे कोणी आपल्याला हाक मारल्यावर पटकन आपण ओ देतो, बस्स तसेच .. मित्राला हाक मारताना किंवा त्याच्या हाकेला ओ देताना पटकन तोंडातून शिवी निघायची. मित्रांमध्ये होणार्‍या संभाषणातील दर वाक्यामध्ये, दर दुसर्‍याही नाही तर दर वाक्यामध्ये, एखादी शिवी मोठ्या खुबीने कुठेतरी पेरलेली असायची. क्रिकेट खेळताना मात्र नेमके उलटे व्हायचे.. अर्रंरर म्हणजे शिव्यांशिवाय बोलायचो असे नाही, तर नुसत्या शिव्या, नुसत्या शिव्याच दिल्या जायच्या.. आणि त्या शिव्यांमध्येच काही शब्द मोठ्या खुबीने पेरून संवाद साधला जायचा.

यात कुठेही राग, संताप, समोरच्याबद्दल द्वेष या भावना दूरदूरपर्यंत नसायच्या. किंबहुना मैत्रीची लेवल या शिव्यांवरून ठरवली जायची. ना कोणी त्या शिव्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा, ना शोधायला जायचा. अर्थात, जेव्हा या वापरायला सुरुवात केली तेव्हा कैक शिव्यांचा अर्थही माहीत नव्हता.

तर या शिवीगाळ प्रकरणात मी साधारण दहाव्या वर्षी फॉर्मला आलो. ईयत्ता चौथी पास होत प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत सरकलो आणि तिथले वारे लागले म्हणू शकता. तिथे आम्ही पाचवी ग्रेडवाले ज्युनिअर आणि आम्हाला धंद्याला लावणारे सहावी ते दहावी सारेच सिनिअर. मी त्यांच्यातच जास्त रमायचो. कारण कुठलाही दुर्गुण समवयीन मित्रांच्या आधी उचलायचा गुण माझ्या अंगी मी बाणवला होता. त्यामुळे आमच्या वर्गात मी ‘गुरू’ आणि ‘महागुरू’ या दोन नावांनी ओळखलो जायचो. शिव्याच नाही तर लैंगिक शिक्षण (जे तेव्हा शालेय अभ्यासक्रमात मिळायचे नाही) मी मोठ्या मुलांकडून घेत माझ्या वयाच्या मुलांमध्ये वाटायचो. हे देखील या पदव्यांमागचे एक कारण होते. मग काय, या इमेजला जपायला भरमसाठ शिव्यांचा सर्रास अन सुलभतेने वापर करणे भागच होते. इथे सुलभता फार महत्वाची. कारण आव आणून शिव्या दिल्यासारखे मी कधीच केले नाही. त्या सहज यायच्या. अर्थात यामागे आमच्या बिल्डींगमधील वातावरणाचाही हात होताच.

वासरात लंगडी गाय शहाणी आणि काशीबाईंपेक्षा देखणी मस्तानी. या न्यायाने मी बिल्डींगमधील एक, किंबहुना एकमेव हुशार मुलगा म्हणून गणला जायचो. जो मुलगा हुशार आहे तो वाया गेलेला नाही या समीकरणानुसार सभ्य मुलगा म्हणूनही ओळखला जायचो. ‘रुनम्या सोबत आहे’ म्हणत माझे नाव घेतल्यास एखाद्याला घरून पिकनिकसाठी परवानगी मिळावी या पठडीतली माझी इमेज होती. आणि ती तशी परवानगी खरोखरच मिळायची म्हणून माझे मित्रही माझी ती फेक इमेज आपापल्या घरी जपायचे. यामागे आमच्या घरचे वातावरणही कारणीभूत होतेच. मी कसाही असलो तरी आमचे घर संस्कारी होते आणि ते बिल्डींगमध्ये सर्वांना माहीत होते.

तर या घरच्या संस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, लहानपणी माझ्या तोंडात "च्याईला" हा शिवीसद्रुश्य शब्द बसला होता. घरी सुद्धा सहजच तोंडात यायचा आणि आल्या आल्या एक थोबाडीत पडायची. एक दिवस मी पुढची पायरी गाठली आणि तोंडातून "साल्या" हा शब्द बाहेर काढला. तो देखील थेट माझ्या काकांसाठी वापरला. बस त्यादिवशी थोबाडीत न पडता माझे थोबाडच फोडले गेले. दुधाचे सारे दात एकाच दिवशी पडले. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. पुन्हा कधी घरच्यांसमोर तोंडातून अपशब्द बाहेर नाही आला. घरातच नव्हे तर बाहेरही कधी थोरामोठ्यांसमोर वा मुलींसमोर तो नाही आला. जसे शिव्या सहज तोंडातून बाहेर पडायच्या तसेच हे नियंत्रण देखील ईतकी वर्षे सहजच जमले. त्यामुळेच आज ऑफिसला व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड ईमेज मिरवताना हा गुण कामी येतोय.

पण एक अपवादात्मक किस्सा मात्र आहे जो कायम आठवणीत कोरला गेलाय ..

शाळेतील गोष्ट आहे. दहावीच्या वर्षाची. शारीरीक शिक्षणाचा तास चालू होता. वर्गातल्या वर्गात उंच उडीची परीक्षा चालू होती. एकेक जण हातात खडू घेत भिंतीजवळ जात उंच उडी मारायचा, हातातल्या खडूने निशाण बनवायचा आणि मग त्या आधारे उडी मोजली जायची. माझी उडी मारून झाली होती. ईतरांच्या थोड्याफार बघितल्या आणि मग त्यातील रस संपला तसे मी आपल्याच विचारांत रमलो. ईतक्यात वर्गात अचानक गोंगाट सुरू झाला. कोणीतरी अफाट उंच उडी मारली होती. मी माझ्या तंद्रीतून खडबडून जागे होत चौकशी केली तसे सुशांतने अमुक तमुक उंचीची उडी मारली असे समजले. आकडा खरेच खतरनाक होता. त्यामुळे अबब असे उद्गारवाचक शब्द तोंडातून निघतात तश्या अर्थाची एक शिवी बाहेर पडली. गंमत म्हणजे माझ्या दुर्दैवाने तेव्हाच अचानक सारा वर्ग शांत झाला. माझी शिवी वर्गात खणखणीतपणे दुमदुमली. आणि पुन्हा एकदा शांत झालेल्या वर्गात हास्याचे स्फोट गडगडले. पुढच्याच बाकावर बसलेलो असल्याने बाईंच्या कानापर्यंत नक्कीच ही शिवी पोहोचली असणारच. पण त्यांनी तसे न दाखवता, मुलांनाच प्रतिप्रश्न केला की काय म्हणाला हा रुनम्या. अर्थात कोणी सांगितले नाहीच. बाईंनीही न ताणता मला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले. याचा एकच फायदा झाला, तो म्हणजे पुढील उंच उडीचा कार्यक्रम मला मान फारशी वरखाली न करता बघता आला.

तर आजही शाळाकॉलेजमधील ज्या अवली कारनाम्यांसाठी मी मित्रांना आठवतो, त्या आठवणीत हा किस्साही जोडला गेला.

शिव्यांमध्ये मातृभाषा फार महत्व राखून असते. मलाही मराठीतच जमायच्या. राष्ट्रभाषेतील शिव्यांमध्ये ती मजा नाही यायची. ईंग्लिश तर कधी जमल्याच नाहीत. नाही म्हणायला ईंग्रजी आद्याक्षर एफ पासून सूरू होणारा दोन अक्षरी शब्द मध्यंतरी तोंडात बसला होता. उगाच शायनिंग मारल्यासारखे वापरायचो. एकदोनदा गर्लफ्रेंडसमोर वापरला आणि तिनेही थोबडावून तो सोडवला.

या शिवीगाळीचा जो काही थोडाबहुत अहंकार मनी वसला होता तो हॉस्टेलमधील काही उडाणटप्पू उत्तरभारतीय मुलांसमोर गळाला. आपल्याकडे व्याकरणाचे संस्कार पाळत संधी समास करत शिव्या दिल्या जातात. ज्यांचा थेट अर्थ पोहोचत नाही, पोहोचलाच तरी भिडत नाही. त्यांच्या शिव्या मात्र फोड केलेल्या असायच्या. ज्या ऐकायलाही किळसवाण्या वाटायच्या. देणे तर दूरची गोष्ट.
असो, तर त्यांच्याशी मी कॉम्पिटीशन करायला गेलो नाही हे एक चांगलेच झाले.

आज माझ्या गर्लफ्रेंडला किंवा ऑफिसमधील कलीग्जना मी सांगतो की मी असा आहे वा असा होतो. शिव्यांचे नुसते अर्थच माहीती आहेत असे नसून सफाईतपणे शिवीगाळही करू शकतो. तर त्यांना हे खोटे वाटते. पण मग त्यांचा विश्वास बसावा म्हणून दोनचार सॅंपल शिव्या देण्याचा मोह मी देखील आवरतो.
कारण आज त्या शिव्या खटकतात. शिव्यांच्या या बाजारात आईबहिणींचा उद्धार केला जातो हे खटकते. कारण आज त्या सवयीने सहज येत नसल्याने त्या तोंडात यायच्या आधी त्यांचा अर्थ डोक्यात येतो आणि मग शब्द अडखळतात.

पण या उद्धारावरून आठवले. तीर्थरूपांचा उद्धार करण्याचीही एक पद्धत होती. दहापैकी चार जणांना तरी चिडवायचे नाव म्हणून त्याच्या वडीलांचे नाव असायचे. त्यातही कोणाच्या वडीलांचे नाव शंकर, दिगंबर, पांडुरंग असे धार्मिक असेल तर हमखास त्याच नावाने हाक मारली जायची. लॉजिक शोधायला जाऊ नका पण असे व्हायचे. यातही सोयीनुसार दिगंबरचे दिग्या आणि पांडुरंगचे फक्त पांडू व्हायचे. ज्या कोणाच्या वडीलांचे नाव प्रकाश असेल त्याला तर आयुष्यभरासाठी पक्या हे टोपणनावच पडायचे. माझ्या शाळा, कॉलेज आणि बिल्डींगमधील तीन विविध ग्रूप्समध्ये असे तीन पक्या होते. आणि मी त्यांना पक्या सोडून आजवर कुठलीही दुसरी हाक मारली नाही. याचाही एक किस्सा आहे. विषय निघालाच आहे तर सांगतो,

कॉलेजात असतानाची गोष्ट. सिनेमाचा की अभ्यासाचा प्लान बनत होता. फोनाफोनी चालू होती. सगळ्यांकडेच मोबाईल नसायचा. कोणाचा असला तरी लागेलच याची खात्री नव्हती. तर पक्या म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या एका मित्राचा मोबाईल लागत नव्हता. त्याच्या घरचा नंबर होता म्हणून मी लॅण्डलाईन फिरवला. समोरून त्याच्या आईने फोन उचलला. मी सवयीनेच उच्चारलो, "पक्या आहे का?.."
ती माऊली थोडावेळ गोंधळली. मग म्हणाली, नाही ते आता ऑफिसला गेलेत. आपण कोण? मी फोन कट!

किस्से बाय किस्से आठवले तर बरेच निघतील, पण तुर्तास एवढेच .. कारण सध्या संस्कारक्षम लोकांमध्ये वावरतोय, फार काही लिहिल्यास हा फेकतोय असा भ्रम लोकांमध्ये निर्माण होतो. त्यामुळे ते किस्से माझ्या आत्मचरीत्रासाठी राखून ठेवतो. सध्या माझ्यातील वाईट सवय, दुर्गुण क्रमांक तीन अधोरेखित करायला ईतके पुरेसे ठरावे.

लेख विस्कळीत झालाय खरा, पण आठवणी अश्याच बाहेर येऊ द्यावात. मी माझ्यावर कधी संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, तर लेखावर का करावे Happy

बस्स आपलाच,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच प्रतिसादांचे आभार.
हल्ली व्हॉटसपग्रूपवर जुन्या मित्रांना शिव्या द्यायचीही चोरी झालीय. मागे एका शालेय मित्राला सहज लाडात येत एक हलकीफुलही शिवी दिली. तेव्हा तर यापेक्षाही भारी द्यायचो. पण आता मात्र त्याला खूपच इन्सल्टींग वाटले. खरं तर माझेच चुकले. सर्वच पोरं मोठी झालीयत. कोणाला आता चालते न चालते बघायला हवे होते. ती चूक पुन्हा होऊ दिली नाही मग. कुठेच. त्यातल्या त्यात ऑर्कुट फ्रेंडसशी बोलणे बरे वाटते. कोणाला काय कसे बोललेले झेपते याची कल्पना आहे.

लिंबूटिंबू सहमत,
पण शिव्या न देता मनातल्या मनात घुसमटत चरफडत राहणे त्यापेक्षा वाईट.
जर क्रोध राग संताप यावर नियंत्रण नसेल आकाशाकडे बघत शिव्या देऊन हलके होणे परवडते.
जर कोणी देव तिथे बसला असेल जो या परिस्थितीला जबाबदार असेल तर त्याला लागल्याचे समाधान Happy

अहो ट्रॅजेडी सीन होता, हसताय काय.
आणि सेन्सॉरने कापला नाही म्हणजे देवाला शिव्याशाप देणे यात काही गैर नसावे. सॉफ्ट टारगेट. पलटून वार नाही करत हे त्याच्यावर विश्वास असणार्‍यालाही ठाऊक असते Happy
असो देवधर्माचे विषयांतर नको ..

तु बेफी नाहीयेस ना मग अहो जाहो नको करु.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच धागे विणत रहा. Happy

तुम्हालाही शुभेच्छा सस्मित Happy
बाकी मी माबोवर सर्वांनाच अहोजाहो करतो, बहुधा समोरून एकेरी उल्लेख चालेल अशी परवानगी मिळेपर्यंत सारेच असे करतात.
असो, छान आठवण करून दिलीत. नवीन वर्षाचा हँगओवर उतरताच यावेळी जो आगळावेगळा संकल्प करावा लागणार आहे त्याचा धागा काढायला हवा Happy

शिवीगाळ मधल्या "गाळ" शब्दावरुन "गाली" हा शब्द आलाय की "गाली" वरुन अपभ्रंश "गाळ" की अजुन तिसरेच काही ?

आमचे एक गत बॉस पुरूष सहका_यांना जाम भ.... च्या भाषेत बोलत..
खूप राग आला की त्याचा निचरा होण्यासाठी मनात तरी शिव्या द्याव्याश्या वाटतात.
अरथात मेल्या, नालायका बावळटा असे तर उघड म्हणता येतेच.

जरुरी नाहिये की शिव्याच दिल्या पाहिजेत
माझा एक मित्र येडि झालर असा शब्द वापरायचा

जरुरी नाहिये की शिव्याच दिल्या पाहिजेत
माझा एक मित्र येडि झालर असा शब्द वापरायचा

Lekh chakka changla lihlat ki ho .....ani amhala pan ek vait savay lavlit ....tumche lekh vachnyachi Happy

लिंबु टिंबू यांना अनुमोदन …काहीजणांच्या बाबतीत अशा शिवराळ जोडीदाराबरोबर आयुष्य ढकलण काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्या इतकं भयानक असतं .

पण शिव्या न देता मनातल्या मनात घुसमटत चरफडत राहणे त्यापेक्षा वाईट.
जर क्रोध राग संताप यावर नियंत्रण नसेल आकाशाकडे बघत शिव्या देऊन हलके होणे परवडते.
जर कोणी देव तिथे बसला असेल जो या परिस्थितीला जबाबदार असेल तर त्याला लागल्याचे समाधान>>>>>>>>+१११११

>>>> पण शिव्या न देता मनातल्या मनात घुसमटत चरफडत राहणे त्यापेक्षा वाईट. <<<<
हे तत्वज्ञान "ज्यांच्यात कसलीच कृती" करण्याची धमक नाही, त्यांच्याकरता ठीक आहे. अन कृतिची शक्यताच उरली नसेल, तर ज्याच्या विरुद्ध कृती करायची त्याला आमने सामने शिव्या देणेही शक्य नसते, ही वेगळीच घुसमट. असो.

अन तरीही, शिव्या देऊन घुसमट व्यक्त करणे हा अतिशय मागास, घाणेरडा, असभ्य व असंस्कृत विचारच आहे.
अभिजनांमधे अशांस थारा असत नाही.

हे तत्वज्ञान "ज्यांच्यात कसलीच कृती" करण्याची धमक नाही, त्यांच्याकरता ठीक आहे.
>>>
हेच तत्वज्ञान नास्तिक लोक देवाबाबत वापरतात असे नाही का वाटत. Happy
म्हणजे स्वतात काही करायची धमक नाही तर देवाची पूजा करा, त्याला प्रसन्न करा, त्याला गार्हाणे घाला, आणि मग ती कोणीतरी शक्ती आपल्याला त्या बदल्यात मदत करेन.
त्यातूनही जर काही बिघडलेच तर मग देव रुसलाय म्हणत खापर त्याच्यावरच फोडा.

शेवटी हा आपापल्या श्रद्धेचा भाग झाला..

असो, पुन्हा शिव्यांवर येऊया..

शिव्या देणे हे कुठल्याही परिस्थितीत चूकच आहे म्हणून तर शीर्षकातच वाईट सवय असा उल्लेख केलाय..

माझ्यापुरते सांगायचे झाल्यास लेखाच्या सुरुवातीच्या वाक्यातच क्लीअर केल्याप्रमाणे मी देत असलेल्या शिव्या कोणावर संतापून, रागाने, भांडणात शिव्यांची लाखोली वाहीली अश्या नव्हत्या. तर सर्व यारीदोस्तीतील शिव्या असायच्या. पण कॉलेज सुटले आणि फारच उपासमार होऊ लागलीय..

तरी कधी कधी परिस्थितीला शिव्या घालून हलके वाटत असल्याने हलकीफुलकी शिवी स्वताशीच देतो..

उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये दिवसभर मरमरून काम केल्यावर मला संध्याकाळी माझीच अशी चूक सापडली की आता दोनचार तास एक्स्ट्रा थांबून काम करावे लागणार.. चीडचीड झालीय.. शिवी घाला स्वत:ला तसेच समोरच्या कॉप्म्युटरला आणि हलके व्हा. Happy
पण आजूबाजुला महिला सहकर्मचारी असल्याने ते कधी शक्य न झाल्यास हाताची मूठ वळा आणि आपल्याच छातीवर, डोक्यावर किंवा समोरच्या स्क्रीनवर मारल्यासारखे करा आणि स्ट्रेस रिलीज करा..
पण त्यानंतर तुमची चूक तुम्हालाच कृती करत सुधारायची धमक दाखवायची आहे हे तुम्हाला ठाऊक असते Happy

अवांतर - अभिजन म्हणजे?

>>>> हेच तत्वज्ञान नास्तिक लोक देवाबाबत वापरतात असे नाही का वाटत. स्मित म्हणजे स्वतात काही करायची धमक नाही तर देवाची पूजा करा, त्याला प्रसन्न करा, त्याला गार्हाणे घाला, आणि मग ती कोणीतरी शक्ती आपल्याला त्या बदल्यात मदत करेन. त्यातूनही जर काही बिघडलेच तर मग देव रुसलाय म्हणत खापर त्याच्यावरच फोडा. <<<<
या ठिकाणि तुम्ही गृहित धरता आहात की कर्म न करताच देवाकडे काहि मागितले जाते... तीच ती चूक करताय जी अन्निस/बुप्रावाले करतात. असोच.
बायदिवे, वर तुम्ही लिहीलेला "नास्तिक" शब्द न वापरता त्या जागी "आस्तिक" शब्द हवा असे तुम्हाला का वाटत नाहीये? Wink (कृपा करुन आस्तिक म्हन्जे काय असे विचारु नका.... Proud )

राग आल्यामुळे , खास करुन दुसर्‍याचा राग आल्यानंतर काहीच न करता येणे ही परिस्थिती मात्र "लादलेली" असू शकते, तरी "राग येणे/न येणे" तुमचेच हातात असते. राग आल्यावर समोरच्याच्या कानफटात न मारता येणे इथे देवही काही करु शकत नाही, पण त्याकरता "शिवी घालणे" शाप देणे ही निव्वळ विकृत पळवाट आहे. किंवा खरे तर वाईट सवईचे तुटपुंजे समर्थन आहे.

अभिजन नाही ठाऊक? कुठल्याही वंचित ब्रिगेडी/नक्शल्याला विचारा... तो सांगेल Proud

शिव्यासुद्धा व्यक्तीसापेक्ष बदलतात. काहींसाठी ब्रिगेडी, नक्सली, कम्युनिस्ट, सि'क्युलर,फु'रोगामी या शिव्या असतात.

काहीजण संस्कृत शब्द वापरून त्याच शिव्या देतात.

"शिवी घालणे" शाप देणे ही निव्वळ विकृत पळवाट आहे. >>
मान्य केल्याबद्दल लिंब्यचे जाहीर अभिनंदन

शापवाणी तर रुशी- मुनी, देवं पण द्यायचे ना? त्या पण शिव्या-शाप च झाल्या की..

शिवी द्यायची वाईट सवय मला पण होती...
मुल लहान असताना गाढवा सारखा लोळतोस काय उठा
कधी-कधी गाढवा ऐवजी डुक्कर असायचा.
आणखिन दोन ठरलेल्या मुर्ख-बावळट.

मयेकर प्लस वन

लिंबूजी, शिवी म्हणजे आईबहीणवडीलांवरून उद्धार केला तरच ती झाली असे नाही. तुम्ही कोणाचाही हेटाळणी केल्यासारखा उल्लेख करणे ही देखील शिवीच झाली नाही का.

आता तुम्ही वर वापरलेला विकृत हा शब्द.
जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही विकृत म्हणत असाल तर ती माझ्यामते एक शिवीच आहे.
तसेच एखादा खरेच विकृत म्हणण्याच्या लायकीचा असेल तर त्याच्यासाठी तो शब्द वापरणे गैर नाही हे देखील नमूद करतो.
पण मग ती शिवी नाहीयेच असा बचाव करत असाल तर तो चूक आहे Happy

..

तरी "राग येणे/न येणे" तुमचेच हातात असते.
>>>>>
हे मला अमान्य आहे Happy
राग येणे न येणे हे आपल्या हातात नसते. तो सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात स्वभावाला अनुसरून येतोच.
पण त्यानंतर व्यक्त कसे व्हायचे हे बरेचसे आपल्या हातात असते.
यावर मी कधीतरी एक धागा काढेनच, (कदाचित याच मालिकेतही लिहू शकतो) म्हणून तुर्तास जास्त नाही लिहित.

लिंब्या ब्रिगेडी, अनिस बोलायला लागला मधून बोल्ड टाईप करायला लागला की समजाय्चे प्रचंड राग आलेला आहे आणि किबोर्ड बडवायला सुरुवात झाली आहे. Wink

लिंब्या ब्रिगेडी, अनिस बोलायला लागला मधून बोल्ड टाईप करायला लागला की समजाय्चे प्रचंड राग आलेला आहे आणि किबोर्ड बडवायला सुरुवात झाली आहे<<<<<<<<यात बत्तिशी काढुन हसायला लागला की....
हे पण अ‍ॅड करा

Pages