संकेत - भाग ४

Submitted by मुग्धमानसी on 21 December, 2015 - 01:07

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
'संकेत' भाग ३ - http://www.maayboli.com/node/56845
_____________________________________________

नलाक्काला खूप गोष्टी माहीत होत्या. गंगात्तूला त्याहून जास्त. तिला आमच्या आईच्या आणि आम्ही जन्माला यायच्या आधीच्याही बर्याच गोष्टी ठावूक होत्या. नलाक्कानं सांगितलं आम्हाला... की आमची आई दिसायला फार सुंदर होती. आणि आमचा आबा अट्टल बेवडा होता. तो आमच्या आजीला मारायचा सुद्धा. नलाक्काची सासू तिला मारते तसा. ते ऐकल्यावर मात्र आमचा आजिबात विश्वास बसला नव्हता. कारण आम्ही आमच्या आबाला कधी दारूच्या थेंबालाही शिवताना पाहिलं नाही. आणि आम्ही एवढं छळायचो त्याला पण त्यानं पाठीत हलकासा धपाटा घालण्याखेरीज आमच्यावर चुकूनही हात उगारला नाही. काठी उगारून गावभर धावायचा आमच्या मागे... पण ती काठी कधी त्यानं आमच्या अंगाला लावली नाही.
एकदा गोदा आम्हा दोघींशी भांडून रुसून निघून गेली होती. गेली ती संध्याकाळ झाली तरी परत आली नाही. आबा बाजाराहून आला तरी गोदा घरात नव्हती. आबानं सगळं गाव धुंडाळलं... गावातले बरेच जण गोदीला शोधू लागले. पण गोदा मिळेना. थकून भागून रडवेला आबा शेवटी घरी आला तर गावातला गजा वाणी गोदीच्या दंडाला धरून आमच्या घराच्या दारात उभा.
"ही तुमची नात आमच्या कोंबड्यांच्या खुराड्यात सापडली. मुटकुली करून झोपली व्हती."
काहीच विचार न करता आबानं गोदीच्या मुस्काडात ठेवून दिली. गोदा भोकांड पसरून भळाभळा रडायला लागली तसं आबानंच तिला ओढून छातीशी घेतलं आणि तिच्यासोबत रडू लागला...

असा आमचा आबा... आजीला मारायचा? छे!!! पण नलाक्का खोटारडी नाही! मग....?
मग आम्ही गंगात्तूला विचारलं तर ती नलाक्कावर चिडलीच. म्हणाली ही बया कशाला लेकरांच्या मनात विष कालवतीये?
तिनं सांगितलं... "मानसं आसतात ती चुकत्यात. पन मग चुक लक्षात आली की लग्येच सुदारायला हवी. अशी चुक ज्यांना वेळीच सुधारता येती ती चांगली मानसं! म्हनून तुमचा आबा चांगला मानूस हाय. द्येवमानूस हाय. खूप बेवडा प्यायचा... तुमच्या आजीस्नी मारायचा बी. पन तुमची आजी मेली. तुमची आय बी त्या पैशेवाल्या सोंगाचा हात धरून पळून ग्येली. आबा एकटा व्हता तवा आनकीनच प्यायचा. वार्‍याला येक दिशा र्‍हायली न्हाय की सगळीकडं भांबावल्यागत घुमणार्‍या वादळात जहाज कसं हिंदळतंय... तसं जाल्यालं आबाचं. म्या बी खूप समजवायची आबाला. पन काय फरक पडला न्हाय. पन येका राती तुमची आय ह्येSSS भलं मोट्ट्ं पोट प्वॉट घ्येऊन आबाच्या दारात हूबी र्‍हायली आन पार झिंगून झोपी गेलेल्या आबाच्या पायाशी तिनं लोळण घ्येतली. सात महिन्यांची गर्भार बाय तापानं फणफणली व्हती. तिला बगून ’कायतरी करायला हवं’ येवढंच ध्येनात आलं आबाच्या आन वार्‍याला दिशा गावली बग. त्या रातच्याला आबानं दारू सोडली. सोडली ती कायमची. तुमी त्याच्या आयुष्यात आल्याव तं त्यानं कातच टाकली. माळ घातली गळ्यात. खरंच तुमचा द्येव हाय त्यो लेकरांनू... त्यास्नी तरास व्हईल असं काय्बी कंदीबी करू वागू नगा बायांनू..."

नलाक्कानंच सांगितलं... आमची आई आजीच्या खूप सार्‍या मुलांमधून एकटीच वाचली. त्यातून देखणी. आबाचा जीव होती ती. दारू पिण्यातून फुरसत मिळून जेंव्हा जेंव्हा आबा शुद्धीत असायचा तेंव्हा तेंव्हा आमच्या आईचे लांब दाट केस विंचरताना, वेणी घालून देताना दिसायचा. तिची थोडीजरी हयगय झाली तरी आजीवर खूप रागवायचा.
एक दिवस गावाजवळची कुठलीशी जमिन पहायला एक बडं प्रस्थ मोठ्ठ्या गाडीतून भसाभसा धूळ उडवित गावात आलं. गाडी बघायला आमची आईपण इतर पोरांसोबत गाडीमागं धावली. गाडीतून उतरलेल्या उमद्या तरुणानं नुकत्या वयात आलेल्या आमच्या आईकडे पाहिलं आणि लगेच त्याला ती आवडली म्हणे. तो तरूण म्हणजेच आमचा बाप - नलाक्का म्हणाली.
’आमची आई एवढी चांगली व्हती?’ - आम्ही नलाक्काला विचारलं. नलाक्का हसली आणि म्हणाली... ’चांगली व्हतीच ती.. तुमच्या आबावानी. पन त्यानं काय बी फरक न्हाय पडत बायांनो. ती बाई व्हती आन त्यात तरुन, देखनी व्हती ह्येच.. येवडंच बास असतंय!’

या नलाक्काच्या छातीतलं दूध थोडं थोडं प्यालो होतो आम्ही तिघी तान्या असताना. चौथी पोरगी झाली म्हणून नलाक्काही तेंव्हा सासूचा मार खात होती. तान्ह्या यमीला घेऊन आणि दुसर्या हातानं दोन वर्षांच्या सुधाला खेचत नलाक्का दुपारची आबाकडं यायची आणि यमीच्या एकटीच्या वाटचं दूध आम्हा चौघींत वाटायची. पोट कुणाचंच भरायचं नाही. उरलेलं काम मग परशू आण्णांची नंदा गाय करायची.
आम्ही तिघी जरा जास्तच तान्या होतो. एक्दम तीन तीन लेकरं उरात सातच महिने पेलू शकली आमची आई. तेवढ्यानंच पार थकली असेल. बाकिचं सगळं बळ तिचं तिच्या परिस्थितीनी संपवलं. खरंतर मेलेलीच होती ती आबाकडे आली तेंव्हा. एका प्रेताच्या पोटात तीन तीन चिरकुटासारखे जीव कुठल्या पुण्याईवर तग धरून राहिले ते देव जाणे!
आमची आई सातव्याच महिन्यात आमाला जन्माला घालून दोनच दिसांत गेली.
आबा म्हणायचा, "आक्शी घुंगुर्ड्यावानी व्हतात तिगीबी जल्माला आलात तवा. आता कसं मुळ धरल्यावानी तरारलंय रुपडं..."

_________________________________________________________

रात्रभर मिटल्या डोळ्यांनी जागी होते. शेजारच्या उघड्या खिडकीतून येणार्या वार्‍याच्या गार झुळूकींनी पडदा उडून माझ्या मस्तकाला हलके घासत होता. जणू आबा हलक्याने थोपटत असावा... नीज बाळा... दिसभर उंडारून थकली न्हाईस व्हय?
मिटल्या डोळ्यांना भार सहन न होऊन एक उष्ण उष्ण पाण्याचा थेंब डोळ्यांच्या कडांतून निसटलाच. कानशीलांना ओलसर गारव्याचा चटका बसला. तरिही मी डोळे उघडले नाहीत... कारण उघड्या डोळ्यांना आबा दिसणारच नव्हता... तो फार फार दूर गेला होता... डोळ्यांना दिसणार नाही कधीच एवढ्या लांब. मला, गोदिला, कावूला एकटं सोडून... पुन्हा एकदा अनाथ करून...

मला आबा हवा होता... त्याची मांडी हवी होती... त्याच्या घट्ट हातांची बोटं माझ्या केसांतून फिरायला हवी होती... आत्ता... या क्षणी... मला आबा हवा होता... इथे माझ्या शेजारी.
गोदा, कावूशी न भांडता... आबाच्या मांडीचा एकेक हिस्सा आम्ही वाटून घेतला असता. आणि आळीपाळीनं त्यानं तिघींनाही थोपटायचं. आम्ही गाढ निजेपर्यंत बसून रहायचं.
आबाचे पाय किती भरून येत असतील... त्याच्या पाठीला रग लागत असेल...
मला जाणवत होतं... जगाच्या निरनिराळ्या टोकांना आम्ही तिघीही टक्क जाग्या होतो. आबाला आठवत होतो. रडत होतो....
माझ्या अंगावर सरसरून शहारा आला. जणू काळाच्या प्रवाहानं वेगवेगळ्या दिशांना भिरकावल्या गेलेल्या आमच्या तिघींच्याही घड्यांत काठोकाठ भरलेल्या प्राक्तनाच्या डोहात एकाच चंद्रानं स्वत:चं प्रतिबिंब पाहिलं असावं... एकाच क्षणी...
एकच माती... एकच चंद्र... एकच प्राक्तन... तिन तुकड्यांत विभागलं गेलेलं.... तरिही प्रत्येक तुकडा अखंड!
_________________________________________________________

आबा मेला.
आम्हा तिघींनाही बराच वेळ कळलंच नवतं की काय झालंय... आबा कधीचा निजलाय...
पहाटे आमच्या आधी उठून मातीला भिडणारा आबा... आज अवेळी का झोपलाय असा? आज त्याचं खोकणं एकदम बंद झालंय. त्यानं कसं बरं वाटत आसंल त्याला.... निजला आसंल जरा... चेहरा कसा शांत हाय.....
पण आबा बास रं आता... उठ भूक लागलीये... भाकर द्ये की...

नलाक्कानं त्या दिवशी तिच्या सासवा आणि जावांसमोर आम्हा तिघींनाही घट्ट कवेत घेतलं आणि धाय मोकलून रडली ती. अगं का रडतीस नलाक्का? चंद्रीनं मारलं काय तुला पुना? थांब आबाला नाव सांगुयात आपन... चल ना आबाला उठवुयात... तिच्या गच्च कुशीत घुसमटणारी गोदा म्हणाली आणि नलाक्कानं मोठाच हंबरडा फोडला. सगळेच रडत होते. चंद्राबाईसुद्धा रडत होती. तिनं पण आम्हा तिघींना कुरवाळून जवळ घेतलं आणि म्हणाली.... "सोन्यासारक्या ल्येकरांचं पाप हाय रं..... आबाळाच्या छाताडावर आता कुटं कुटं ठिगाळ जोडावं येवड्याश्या लेकरांनी...."
तेंव्हा मात्र मला जाणवलं... काहितरी आक्रीत घडलंय...
गंगात्तू तोंडाला पदर लावून हुंदक्यावर हुंदके देत निजलेल्या आबाशेजारी बसून होती.
मी हळूच कावूला विचारलं... "काय झालंय गं कावू..? हा आबा का उठिना?"
कावूनं एकदम मोठ्ठ्या बाईसारखं गंभीर आवाजात सांगितलं... "आबा मेलाय..."
"म्हंजी.....?" गोदा एकदम कावरीबावरी झाली. "परशू आण्णांच्या गोठ्यातली नंदा गाय मेली तशी? नंदीला सगळ्यांनी मिळून जाळलं व्हतं. नंतर ती परत दिसलीच न्हाय..."
"नलाक्का म्हनली व्हती आपल्या आयला पन मेल्यावर जाळलं व्हतं तितंच त्या वेशीकडं..."
"आपल्या आबाला आता जाळणार?" आम्ही तिघीही घाबरलो. भूक लागली होती... खायला कोण देणार आता?
पण आता... आणि नंतर कधीच... आबा आम्हाला गरम गरम भाकर वाढणार नाही हे आत आत कुठंतरी जाणवलं आणि त्यानंतर आपसूकच सार्‍या जन्माची भूकच आटून गेली...

असा कसा जाऊ शकतो आबा? काल रातच्याला तर आमाला जवळ घेउन कित्ती बडबडत व्हता... म्हनत व्हता आमाला शिकिवनार हाय... मोट्टं करनार हाय त्यो. कावू डागतर व्हनार, म्या ब्यारिस्टर व्हनार, गोदी हापिसर व्हनार... मंग आमाला घेऊन जायाला तीन मोठ्ठे मोठ्ठे रुबाबदार सायब येनार... आमी नवरीसारकं सजून धजून त्याच्यासोबत लांबच्या गावी निघून जानार...
गोदी म्हन्ली..."आबा मी नाय जायची तुला सोडुन कुटंबी."
"मी बी नाय जानार. मी ग्येले तर तुला खोकल्याला औषद कोन द्येनार?" कावू बोल्ली.
"मंग मी बी नाय जानार आबा..."
आबा हासला... म्हणाला... "असं कुटं असतंय व्हय पोरिंनो... नवर्‍याचा हात धरून एक दिवस जावंच लागतंय..."
"आबा मंग असं कर... तुच चल आमच्या संगत." गोदी म्हणाली आणि आम्हा तिघींनाही एकदम आवडली आयडिया!
"आरं पन पोरिंनो... तुमी जानार कुटं कुटं येगयेगळीकडं... आबाचं काय तुकडं करून नेणार व्हय?"
"नाय रं आबा... थोडं दिस कावूकडं र्‍हा, थोडे दिस माज्याकडं आन थोडे दिस या गोदीकडं..."
"हा... आन तुमच्या सायबास्नी नाय चाललं तर...?"
"मंग असा सायब नको आमास्नी... आमाला आबा हवा."
आबानं मंग एकदमच कसंतरी पाह्यलं आमच्याकडं. नंदा गाय मरत व्हती तवा तिचं लांबवर बांदल्यालं कालवड तिच्याकडं पाह्यचं... तसं डोळं व्हतं आबाचं.

सगळं गाव आबाला सांगायचं... ’आबा तुजं वय झालंय आता. तु गचकलास तर या पोरिंकडं कोन बगनार हाय? या पोरिंची लगिन लावून द्ये... कुटं शिकवित बसतुयास? जीवाला घोर व्हतील तुज्याच.... या पोरिंपायी तुजाबी आत्मा घुटमळत र्‍हाईल हितंच. त्यापरीस त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी द्ये पाटवून. काय न्हाय तर दोन घास तरी मिळतील त्यास्नी...’
आबा म्हणायचा, ’राम हाय माजा या लेकरांची काळजी घ्याया माज्या मागनं. रानातल्या बोरीबाभळीवानी वाढतील माज्या लेकी. माज्या सुनंदाचं जालं तसं आयुष्याचं मातेरं मी या कोवळ्या ल्येकरांचं न्हाई होऊ द्येनार. आताशी बारावं लागलंय पोरिंना. शिकायचं, हसा-खेळायचं वय हाय लेकरांचं. इतक्यात त्यांना संसाराला लावू म्हनताय? जमाना बदलला बाबानू... मी शिकिवनार हाय तिगींनाबी. मला ज्येवडं जमल त्येवढं. माज्यामागनं आयुष्याशी दोन हात करावे लागल्ये तर कायतरी हत्यार नको व्हय त्यांच्या हाती? ह्ये शिक्षानंच त्यांना ताकद दिल बगा...’ सल्ले देणारे खांदे उडवत निघून जायचे. पण आबा ठाम होता.

आम्हा तिघींनाही त्यानं शहराकडच्या मोठ्ठ्या शाळेत घातलं होतं. इंग्रजी शाळेत. जामदारांच्या घरचे सुन्या आणि पम्या पण याच शाळेत जायचे. वरच्या यत्तेत होते ते. पशा सुद्दा आमच्याच शाळेत. आबाच्या मागं लागून लागून त्याला चंद्राबाईशी बोलायला लावून आम्ही तिघींनी यमीला आणि सुधालाही त्याच शाळेत घालायला लावलं होतं. आम्ही सगळे एकत्र एसटीनं शाळेला जायचो आणि एकत्रच परत यायचो. आम्हा तिघींत कावू सगळ्यात चांगले मार्क मिळवायची. ती आमच्या तिघींत मोठी... माझ्यात-तिच्यात आठ मिनिटांचं अंतर! कावू नेहमी पहिला नंबर काढायची शाळेत. आबाला तिचं फार फार कौतूक! आम्ही तिघीही अभ्यासात चांगल्याच होतो. जामदारांच्या पोरांतलं एकही पोरगं पहिल्या दहांत यायचं नाही कधी. सुन्या तर सहावीत दोनदा बसलेला आणि सातवीत तीनदा!
त्यामुळं असेल कदाचित.... चंद्राबाई आमच्यावर खार खाऊन असायची. पण यमी आणि सुधाला इंग्रजी शाळेत घालायला लावल्यामुळं नलाक्का फार सुखावली होती. आमच्यावर जास्त प्रेम करू लागली होती. त्यामुळे चंद्राबाईचा आणखिनच जळफळाट व्हायचा. आमचा आबा म्हणजे गावातल्या पंचायतीचा प्रतिष्ठीत सदस्य होता. सगळं गाव त्याला मान द्यायचं. त्याचं बोलणं टाळताही येत नव्हतं चंद्रीला. मोठ्याच अवघड कचाट्यात सापडली होती चंद्री. आबा होता तोवर तिला काहीच करता येत नव्हतं...

_________________________________________________

क्रमशः
_________________________________________________

यापुढचा भाग - http://www.maayboli.com/node/56917

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users