The Imitation Game इंग्रजी चित्रपट

Submitted by दिनेश. on 20 December, 2015 - 13:19

The Imitation Game हा गेल्या वर्षीचा म्हणजे २०१४ सालचा इंग्रजी चित्रपट. मी सिडीवर बघितला.
त्या सिडीच्या सुरवातीला भारतीय सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र आहे आणि चित्रपटाला " फक्त प्रौढांसाठी " असे प्रमाणपत्र आहे.

हिंसाचाराचे एकही दृष्य, न्यूड सीन एवढेच काय मिठी किंवा चुंबनही नसलेल्या या चित्रपटाला असे प्रमाणपत्र का द्यावे कळत नाही. बाजीराव मस्तानी चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केलाय असे जे सर्वसाधारण मत आहे, त्यामूळे या चित्रपटावर लिहावे असे वाटले.

हा चित्रपट इतिहासातील एका पर्वावर आधारीत आहे. ( कथा तशी गुंतागुंतीची आहे. जिज्ञासूंनी हा चित्रपट अवश्य बघावा, म्हणून इथे फक्त थोडक्यात कथा देतोय. )

ही कथा आहे अ‍ॅलन टुरींग या बुद्धीमान गणितज्ञाची. आणि काळ आहे दुसर्‍या जागतिक महायुद्धाचा.
या काळात जर्मनी, ब्रिटनवर हल्ले करत होते. त्या काळात जर्मनांनी एनिग्मा नावाचे मशीन तयार केले होते. ते
मशीन एक प्रकारची गूढ भाषा निर्माण करत असे आणि त्या भाषेत संदेश देत असे.

त्या काळातल्या तंत्रानुसार हे संदेश रेडीओ द्वारे ( मॉर्स कोड ) ने पाठवले जात असत. आणि तसे संदेश पकडणे ब्रिटनला सहज शक्य होते. मॉर्स कोड जाणणारे लोकही उपलब्ध असल्याने ते संदेश नोंदवणेही कठीण नव्हते.
जर्मन भाषेचेही जाणकार उपलब्ध होते... पण..

पण गोम अशी होती कि नेमक्या कुठल्या तंत्राने ती गूढ भाषा विकसित केली होती ते कळत नव्हते आणि त्याहून
वरचढ बाब होती ती अशी कि हे तंत्र रोज बदलले जात असे. म्हणजे अत्यंत प्रयास करून जरी तो कोड ब्रेक
केला तरी, दुसर्‍या दिवशी ते तंत्र कुचकामी ठरत असे. आणखीही त्यात बर्‍याच क्लृप्त्या होत्या पण त्या
पडद्यावरच बघणे योग्य आहे.

त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्राने जर हा कोड ब्रेक करायचा असता तर त्यात लाखो वर्ष गेली असती. म्हणून
अ‍ॅलन टुरिंग त्याच्या काही सहकार्‍यांना सोबत घेऊन एक यंत्र तयार करतो. या यंत्राद्वारे या कामासाठी लागणारी
आकडेमोड जलदगतीने करणे शक्य होते.

आणि तो कोड एकदाचा ब्रेक होऊ शकतो. जर्मनी उद्या नेमका कुठे हल्ला करणार आहे, ते ब्रिटनला कळणे शक्य होते. पण तिथेही एक अडचण असते. जर सर्व ज्ञात हल्ल्याला प्रतिकार केला असता तर जर्मनीला संशय आला
असता, आणि त्यांनी एखादे नवीन तंत्रज्ञान ( कोडींग साठी ) वापरले असते. त्यामूळे त्यांना संशय येणार नाही इतपतच प्रतिकार करायचा आणि काही हल्ले होऊ द्यायचे असे ठरते. यासाठी संख्याशास्त्राचा आधार घेतला जातो.

तरी हे युद्ध थांबवायला दोन वर्षे लागतात. पण तरी हे तंत्र यशस्वी ठरते.
या कामासाठी जे तंत्रज्ञ एकत्र आलेले असतात त्यांना स्वतःलाच त्यांची कागदपत्रे नष्ट करायला सांगितली जातात आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधायचा नाही असे सांगितले जाते.

या टीममधे एक स्त्री पण असते. तिच्या अंगभूत कौशल्यामूळे तिला हे काम मिळालेले असते. पण २५ वर्षाची मुलगी आणि लग्न न करता अशी एकटी राहून काम करते हे तिच्या आईवडीलांना पसंत नसते. त्यावेळी
तिने ते काम सोडू नये या एकाच हेतूने तिला लग्नाची मागणी घालतो.

पुढे हे काम सोडल्यावर अ‍ॅलनवर तो गे ( त्या काळचा शब्द होमोसेक्स्यूअल ) असल्याचा आरोप होतो. त्या
काळातील प्रचलित कायद्यानुसार त्याला तुरुंगवास सोसण्याची किंवा जबरदस्तीने हार्मोनल ट्रीटमेंट
घ्यायची यापैकी एका पर्यायाची निवड करायला कोर्ट सांगते. तो ट्रीटमेंटचा पर्यात स्वीकारतो. पुढे तो आत्महत्या करतो.

अ‍ॅलनने तयार केलेल्या यंत्राची अत्यंत प्रगत अशी आवृत्ती आपण आजही वापरतोय आणि ते म्हणजे आपले आजचे कंप्यूटर्स...

बेनेडीक्ट कंबरबॅचने शीर्षक भुमिकेत जान ओतलीय इतर सर्वच कलाकारांचा अभिनय अत्त्यूत्तम आहे.
एखादा कालखंड सादर करण्यासाठी इंग्रजी चित्रपटात सर्वसाधारणपंणे जशी मेहनत घेतली जाते, तशी याही
चित्रपटात घेतली आहे. युद्धाची मात्र थेट दृष्ये नाहीत त्याचे स्टॉक शॉट्स वापरलेत.
बंकर मधले एक दृष्य आणि बाँबहल्ल्यानंतरचे एक दृष्य आहे फक्त. बाकी अंगावर येणारे हिंसाचाराचे शॉट्स नाहीत. कपडेपट आणि हेअरस्टाईलवर खुप मेहनत घेतलीय. अगदी काही सेकंद पडद्यावर दिसणार्‍या
पात्रांच्या बाबतीतही हे जाणवते.

मी वर अ‍ॅलन गे असल्याचा उल्लेख केलाय तोही ओझरताच येतो. त्यासंबंधी कुठलेही दृष्य नाही अगदी सूचकही नाही.

हा इतिहास काही फार जूना नाही आणि युरपमधल्या पद्धतीनुसार या कालखंडाबाबतच नव्हे तर या व्यक्तींबद्दलही बरेच साहित्य उपलब्ध आहे. स्वतः अ‍ॅलनचे आत्मचरीत्रही उपलब्ध आहे, तरीही चित्रपटासाठी
अनेक बदल केलेले आहेत.

उदा. चित्रपटात दाखवलीत त्यापेक्षा जास्त माणसे त्या टीममधे होती. चित्रपटात अ‍ॅलन आपले गे असणे लपवतो, तसे त्याने प्रत्यक्ष आयूष्यात केलेले नव्हते. त्याचे गे असणे त्या मुलीने सहज स्वीकारले होते आणि त्यासाठी त्यांच्यात वाद झाला नव्हता, चित्रपटात ती हिंसक होते आणि त्याच्या थोबाडीत मारते.
त्याने आपल्या मशीनला कुठलेही नाव दिलेले नव्हते चित्रपटात तो त्याला त्याच्या शाळेतील मित्राचे नाव देतो.

त्याने खरेच आत्महत्या केली का हे गूढ आहे.

तो प्रोजेक्ट संपल्यावर ते परत कधी भेटले नव्हते, चित्रपटात ती त्याला शेवटी भेटते. ती भेट खुप नाट्यपूर्ण आहे खरी पण ती प्रत्यक्षात झालेली नव्हती.

कोड ब्रेक झाल्यावरही सर्वच हल्ले न थांबवायचा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेतला गेला होता. चित्रपटात हा निर्णय अ‍ॅलन स्वतः घेतो असे दाखवलेय आणि याबाबतीत एका सहकार्‍याची विनंती देखील तो मानत नाही ( त्या सहकार्‍याचा भाऊ ज्या बोटीवर असतो तिच्यावरच जर्मनी हल्ला करणार असते ) हा प्रसंग खुप नाट्यपूर्ण वाटला तरी प्रत्यक्षात तो घडलाच नव्हता.

मी फक्त काही उदाहरणेच दिलीत. तुम्हाला उत्सुकता असेल तर आणि अजून बघितला नसेल तर हा चित्रपट आधी बघा आणि मग यासंबधात नेटवर जी माहिती उपलब्ध आहे ती वाचा... आणि मग सांगा चित्रपट माध्यमासाठी म्हणून केलेले बदल तूम्हाला कितपत खटकले ते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार हर्षल.. या चित्रपटाचे अनेक पुरस्कारांसाठी नॉमिनेशन झाले होते ( सर्वोत्तम चित्रपटासाठीही ) बेस्ट अडॉप्टेड स्क्रीन प्ले साठी अवार्ड मिळाले.