संघाची नव्वद वर्षे व अजूनही असलेली आव्हाने

Submitted by Rajesh Kulkarni on 19 December, 2015 - 07:23

संघाची नव्वद वर्षे व अजूनही असलेली आव्हाने
.
.

इतर संघटना फुटल्या व गेल्या नव्वद वर्षात संघात फुट पडली नाही अशा आशयाचे श्री. रमेश पतंगे यांचे लिखाण पाहण्यात आले. तसे पाहिले तर हे कौतुक करून घेण्याचे कारण आहेच, पण त्यावर् समाधान मानायचे का हा मोठा प्रश्न आहे. कारण नव्वद वर्षे जाऊ दे, स्वातंत्र्यानंतरच्या काळात तरी ही संघटना जेवढी वाढायला हवी होती, तसे झालेले दिसते का, याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.

अजूनही संघ पाकिस्तान, अफगाणिस्तानसह अखंड भारत अशा कल्पनांमध्ये अडकून पडलेला आहे. थोडा फरक दिसतो, तो म्हणजे अखंड भारताऐवजी या भुप्रदेशांचे कमीत कमी सहकार्याच्या दृष्टीने एकत्रीकरण तरी व्हावे असा मतप्रवाह दिसू लागला आहे. पण हे फारच क्वचित ऐकू येते.

भारतातील सा-या समाजांचे प्रतिनिधित्व संघ करतो असे चित्र दिसते का? उलट जातीनिहाय संघटना वाढताहेत. दलित व अनेक ओबीसी संघटना तर संघाला त्यांचे शत्रू मानतात, एवढी मोठी विश्वासाची दरी त्यांच्यामध्ये आहे. जातपंचायती, खाप पंचायती यांना वेसण घातली जात असल्याचे दिसत नाही.

गुरूजींची व संघसंस्थापकांची काही मते आजच्या संदर्भात लागू होणार नाहीत. दलित किंवा हिंदूविरोधक मनुस्मृतीतील अन्यायी संदर्भ जसे उठसुट काढून फडकावताना दिसतात, तसेच गुरूजींच्या काही मतांबद्दलही केले जाते. संघ त्याबद्दल कधीही जाहीर प्रतिवाद करताना दिसत नाही. कधी फारच लावून धरले, तर अमुक वर्षांपूर्वी अमुक सरसंघचालक होते तेव्हा त्यांनी अमुक विधान केले होते याचा पुरावा दिला जातो. अर्थात या गोष्टींवरून पसरलेले गैरसमज दूर होण्यासाठी याबाबतचा प्रचार सातत्याने समाजापुढे यायला हवा. ते होत नसल्यामुळे संघावर एकतर्फी टीका होत राहते व विरोधकांना आपोआपच कोलित मिळते. कोणी प्रतिवाद करताना दिसलेच, तर तोही आडवळणाने केला जातो, किंवा तो अनेकदा इतका लंगडा असतो की कोणाचाही त्यावर विश्वास बसू नये. त्यांची काही मते सद्यपरिस्थितीत लागू होत नाहीत हे मान्य करण्याचे धैर्य कोणाकडेही दिसत नाही. पूर्वसरसंघचालकांची सारीच मते आताच्या संघाच्या सा-याच मोठ्या नेत्यांना मान्य असतील असेही नाही, पण शिस्तीच्या नावाखाली ते उघडपणे बोलण्याचे धैर्य त्यांच्यात नाही हे निश्चित. या दुष्टचक्रामधून बाहेर पडून समाजातील सा-या घटकांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये त्यामुळे खिळ बसते व दुर्दैवाने अशा मूलभूत मुद्द्यांबाबत संघनेतृत्व काही करताना दिसत नाही.

शिवाय तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अनेक संघटना आहेत, त्या अनेक तोंडांनी बोलत असतात. अनेकदा देशाच्या घटनेच्याविरोधी वक्तव्ये केली जातात. संघ त्यांना गप्प बसवताना दिसत नाही, त्यामुळे आधीच असलेले संशयाचे वातावरण अजिबात कमी होण्यास मदत होत नाही. केवळ हिंदुत्व-हिंदुत्व म्हणजे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे हे त्यामुळे लोकांना कळत नाही, उलट त्यांच्या अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमुळे चुकीचा संदेश लोकांपुढे जातो. अशा परिस्थितीत सारा हिंदू समाज तर सोडाच, पण बहुतांश हिंदू समाज तरी संघाबरोबर जाईल याची अपेक्षा कशी करत येईल?

जातपात नष्ट करण्यासाठी कोणतेही भरीव प्रयत्न केले जात नाहीत. सामाजिक समरसता अशे लोभस नाव दिले व मधूनमधून त्याचा उद्घोष केला म्हणजे समाजातील सा-या घटकांना विश्वासात घेतले जाते अशा समजात राहून चालणार नाही. प्रत्यक्ष कृती दिसायला हवी. आता समविचारी सरकारच केंद्रामध्ये असताना याबाबतीत भलेही काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले तरी ते घेण्याची हिम्मत का कोण जाणे पण दिसत नाही.

संघाचे सदस्य नसलेले; मात्र संघाबद्दल आत्मियता असलेले अनेक जण समाजात आहेत, पण अनेक वेळा घेतल्या जाणा-या विसंगत भुमिकेमुळे संघाला पाठिंबा देण्याचे त्यांचे धाडस होताना दिसत नाही.

संघामध्ये पारदर्शकपणा अजिबात नाही. सारे निर्णय नेहमीच वरून खाली येताना दिसतात. त्यात कार्यकर्त्यांची मते, सहानुभूतीदारांची मते लक्षात घेतली जाताना दिसत नाहीत. एवढेच काय, संघाला विरोध करणा-यांची मतेही संघटनेत सकारात्मक बदल घडवून आणताना दिसत नाहीत, उलट अशा मतांविरूद्ध संघटनेत धृवीकरण होताना दिसते. त्यामुळे आपल्या मतांचे अवलोकन होणे हे तर सद्यस्थितीत अशक्यच.

आज भाजपचे सरकार आहे, त्यामुळे संघाचा उच्चार आधी कधी नव्हता एवढा ऐकू येत आहे. ही सत्ता पुढच्या निवडणुकांच्यावेळीही आणणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. काहीही कारणाने पुढच्या निवडणुकांमध्ये हे शक्य झाले नाही, तर संघाचा विस्तार पुन्हा एकदा मंदावेल.

संघामध्ये लोकशाही आली की पारदर्शकपणा आपोआप येईलच. पारदर्शकतेमुळे लाथाळ्या सुरू होतील, वेगवेगळे मतप्रवाह उघड होतील, या भितीपोटी ती नकोच हे म्हणणे योग्य नाही. कारण त्यातूनच विश्वासार्हता वाढेल आणि सामाजिक पाया विस्तारता येईल. भारतीय विचारांच्या दलित व विविध समाजातील नेत्यांना संघटनेत मानाचे स्थान द्यावे लागेल. भलेही त्यासाठी त्यांना संघटनेबाहेरून आणावे लागले तरी. ते करायचे झाले की आधी त्यांच्या अतिशय अवघड प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील, त्याची तयारी ठेवावी लागेल. दिसते का हे करण्याची कोणाची तयारी?

प्राचीन संस्कृतीचा आदर मनात ठेवतानाच पुराणातली विमाने, गणपतीचा ब्रेन/हेड ट्रान्सप्लॅंट, वगैरे गोष्टी पुराणातच ठेवावी लागतील. कोणत्याही भंपक गोष्टींना विज्ञानाचा मुलामा चढवून त्या लोकांच्या गळी उतरवण्याचा जो प्रयत्न केला जाताना दिसतो, तो कोणालाच कसा दिसत नाही? वाटते का की आताच्या संघाच्या नेत्यांची तयारी असेल या गोष्टीला?

राजीव दीक्षित यांनी स्वदेशीचा पुरस्कार करताना विदेशी ते सगळेच वाईट असा जो एकतर्फी दुष्प्रचार केला त्याचे तर फार चुकीचे परिणाम झालेले आहेत. किती तरी वेळा ते धादांत खोटे बोलत असत. असा एकतर्फी व चुकीचा प्रचार लोकांच्या कधीच लक्षात येणार नाही व आल्यावर त्याचा उलटा परिणाम होईल अशी शंकादेखील संबंधितांच्या मनात आला नाही का? ते सगळ्याच मुद्द्यांवर तेवढ्याच अधिकारवाणीने कसे बोलू शकतील, त्यामुळे त्यांचे हसू होणार नाही का असेही इतकी वर्षे कोणाला वाटले नाही का? दीक्षित यांची काही भाषणे आता ऐकली तर विनोदी वाटावीत एवढी ती एकांगी आहेत.

समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्याशिवाय या समाजाचे व पर्यायाने देशाचे भले होणे केवळ अशक्य. संघाची ताकद पाहता त्यांना हिंदू धर्मातीलच काय, पण इतर धर्मातील अंधश्रद्धांना हात घालणे शक्य व्हावे. पण मुळात या स्फोटक गोष्टींना हात घालण्याची हिम्मत तरी हवी ना! कारण राजकारणीदेखील मतांकडे लक्ष ठेवून अंधश्रद्धांना हात घालायची हिंमत कधीच करत नाहीत. संघालाही समाजात असलेले मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून समाजात काहीच न्यून नाही य भ्रमात पुढे जायचे आहे का? इतक्या दशकांमध्ये सत्ता नसताना संघाने यावर काम केले असते तर व्होटबॅंक, जातीच्या आधारावरील राजकारण हे सारेच एव्हाना नामशेष झाले असते. पण आता काय दिसते आहे, भाजपदेखील तशाच राजकारणात गुरफटलेला आहे. तर मग ही परिस्थिती बदलणार कधी?

वर म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मियांमध्येच संघाला स्वत:बद्दल विश्वास निर्माण करता येत नाही, तेव्हा हिंदुत्वावादी भुमिकेमुळे इतर धर्मियांमध्ये अविश्वासाची भावला असणे तर अगदीच नैसर्गिक. उठसुट काही झाले की पाकिस्तानात जा अशा वक्तव्यांमुळे याबाबतीत देशाचे काय भले होणार आहे? इतकी वर्षे कॉंग्रेसप्रणित भंपक सर्वधर्मसमभावामुळे इतर धर्मीयलोकांचे केवळ तुष्टीकरण झाले असे म्हणत असताना त्या धर्मातील कडव्या लोकांना बाजुला सारून तरूणांना, महिलांना साद घालण्याची त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची संघाची तयारी दिसते का? तसा प्रयत्न दिसतो का? अन्यथा शिवसेनेसारख्या गुंडांच्या संघटनेप्रमाणे; ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय हेच माहित नाही, केवळ भगवा टिळा लावून आणि भगवा झेंडा हातात घेऊन इतरधर्मियांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत, सामाजिक सौहार्दासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी महाआरतीसारखे पराक्रम करून दोन्ही धर्मियांच्या भावना भडकावणे हीच संघाचीही हिंदुत्वाची कल्पना आहे असे संघाबाहेरील हिंदूंनी व इतर धर्मियांनी समजायचे का?

संघामध्ये राष्ट्रसेविकादल ही स्त्रियांसाठी स्वतंत्र आघाडी आहे. २१व्या शतकातही अशी वेगळी आघाडी ठेवण्याचे कारण काय? कोणी स्त्री सरसंघचाललपदापर्यंत जाऊ शकेल अशी परिस्थिती आहे काय? की फक्त पुरूषच देशाच्या भल्याचा विचार करू शकतात असे संघाला वाटते? आज अभाविपसारख्या संघटनांमध्ये अनेक युवती पुढे आलेल्य दिसतात, पण मी म्हटले तसे पुरूष व स्त्रियांसाठी वेगळ्या रांगा ही मानसिकता बदलून स्त्रियांना संघाच्या मुख्य विचारधारेत स्थान द्यायला हवे.

मुख्य म्हणजे संघाबद्दल ज्यांना गंभीर आक्षेप आहेत, त्यांना थेट भिडण्याची तयारी संघाने ठेवली पाहिजे. हे आक्षेप संघ ब्राह्मणबहुल आहे, इतर धर्मियांच्यादृष्टीने संघ हा एक मोठा धोका आहे, संघ बुरसटलेल्या विचारांचा आहे, गांधीहत्येत सहभाग असण्यापासून संघाचा हिंसेच्या मार्गावर विश्वास आहे व कोणतेही प्रागतिक विचार पुढे येऊ देण्यास संघ विरोध करतो, संघाचे अनेक छुपे अजंडे आहेत असे अनेक स्वरूपाचे आहेत. जोपर्यंत संघावरची टीका जितक्या तोंडांनी होते त्याला पुरसे होईल इतके प्रभावी उत्तर देन्यात संघाची यंत्रणा कमी पडते हे वास्तव आहे. त्यामुळे संघ हे राजकारण्यांचे उठसुट धोपटण्याचे साधन बनलेले आहे.

तेव्हा जोपर्यंत संघाकडे आधुनिक विचारांचे नेतृत्व येत नाही आणि बुरसटलेल्या विचारांची खोडे बदलली जात नाहीत, तोपर्यंत संघाची खरी व मोठी वाढ होणे अशक्य! त्यामुळे नव्वद वर्षांनंतर संघ अस्तित्वात आहे याबद्दल कोणाला अभिमान वाटत असेल, तर तो केवळ संघटना टिकण्यापुरताच आहे असे खेदाने म्हणावे वाटते. केंद्रात समविचारी सरकार असल्यामुळे कधी नव्हे ते संघटनावाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे, पण एकूणच विविध आघाड्यांवरील आपल्या भुमिकांचे पुनरावलोकन करण्याची इच्छा नसल्यामुळे फार बदल होताना दिसतील असे वाटत नाही.

काही महिन्यापूर्वी सरसंघचालकांनी हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी नाहीशा करण्याबद्दलचे विधान केले होते. केवढे आशादायी वक्तव्य होते ते! त्या विधानाचे मी स्वागत केले होते. मात्र यावेळच्या दस-याच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भाषणामध्ये याचा वा वर उल्लेख केलेल्या काळजीच्या विविध मुद्द्यांवर विशेष भर दिसला नाही, त्यामुळे त्यांच्याकडून ही मोठी संधी गमावल्यासारखे वाटले.

अखेर देशहिताचा निर्णय कोणी मुठभर लोक पोलादी पडद्यामागे राहून करू शकतील आणि देशाच्या जनतेच्या गळी उतरवू शकतील असे संघाला वाटते का? तेही स्वत:बद्दल आधीच संशयाचे वातावरण सभोवताली असताना!

संघाने आजवर केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल कोणीच काही वावगे बोलू शकत नाही. संघाच्या चांगल्या कार्याचा येथे उल्लेख केलेला नाही, कारण तो या लेखाचा हेतु नाही. वर म्हटल्याप्रमाणे संघासारखी मोठी संघटना नव्वद वर्षे फूट न पडता अस्तित्वात राहिली यावरच समाधान न मानता संघासमोर कोणती आव्हाने आहेत त्यांचा विचार करण्याचा हेतु आहे.

तेव्हा स्वत:बद्दलचे संशयाचे वातावरण निवळण्यासाठी संघ लवकरात लवकर प्रभावी पावले उचलेल ही अपेक्षा व त्यासाठी शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी,
मलाही हा लेख याआधी येथे टाकला होता का याबद्दल खात्री नव्हती. आधीच्या लेखापेक्षा अनेक मुद्दे वाढवले आहेत. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

संघाच्या वेगवेगळ्या समाजकार्यांबद्दल, मिशनर्‍यांनी जसे धर्मप्रसारासाठी लोकांत पोचून घुसण्याच्या कामात समाजकार्याचा वापर केला तसेच संघ तथाकथित सेवाभावी कामांचा वापर करीत आहे. इथल्या आदिवासींना ते आदिवासी मानायला तयार नाहीत. त्याना ते 'वनवासी ' म्हणून संबोधतात. वनवासी म्हणजे जंगली प्राणी की काय? म्हणजे आदिवासी नसून तथाकथित आर्य हे इथले मूळ निवासी आहेत असे त्याना भासवायचे आहे. एखाद्या विद्वान हिंदू दलिताला ते सरसंघचालक म्हणून का निवडीत नाहीत त्यामुळे संघ सगळ्या हिंदूंचा आहे हा संदेश जाईल. मुळात सगळ्या ब्राम्हणांच्या मनात तरी संघाने विश्वास निर्माण केलाय का? जे चुका दाखवतात त्याना समाजवादी, कम्युनिस्ट , देशद्रोही म्हणून संभावना करायची. हिटलरही असेच करायचा , ज्याना संपवायचे त्याना कम्युनिस्ट म्हणून लेबल लावून तुरुंगात टाकायचे. आज संघ टिकून आहे त्याचे कारण त्याचे समाजकार्य नसून विविध मेडियात आणि महत्वाच्या पदांवर घुसवलेली माणसे व त्यांच्या मार्फत वैचारिक प्रदूषण पसरवून निर्माण केलेले अस्तित्व आहे...
खरे जाज्वल्य हिंदुत्व फक्त शिवसेना सांभाळते. जय बाळासाहेब.

मला हा धागा आणि विषय दोन्ही आवडले... प्रामाणिकपणे कठोर आत्म परिक्षणाची नितान्त अवशक्ता आहे. अनेक आरोप आहेत, काहीन्मधे जरुर तथ्य आहे.

कुठल्याही प्रसिद्धी मोहापासुन स्वत: ला दुर ठेवुन केवळ समाजकार्यासाठी स्वत: ला वाहुन घेतलेले अनेक कार्यकर्ते रात्रन्दिवस झटत असलेले मी पाहिले आहे (१९९० च्या अगोदर). त्यान्च्या कडे अन्गावरचे खादी कपडे, खान्द्यावर शबनम... काम करण्याची प्रामाणिक भावना या व्यतिरिक्त काही नसायचे.... सन्घटने मधे लेयर्स आहेत... मी १९९० आधी वेगळी लेयर (बहुतान्श निस्वार्थी) बघितली असेल... त्या नन्तर स्वार्थी लोक वर आलेले बघितले. केवळ फोटोसाठी काम करणारे. जवळ कॅमेरामन नसेल तर हे काम करत नाहीत... यान्चे हेतू सत्ता स्थानापर्यन्त पोहोचण्याचे आहे... आणि भ्रष्टाचार उघड झाल्यास रक्षण मिळावे हा

केवळ ब्राह्मणान्ची सन्घटना आहे आणि सर्व समावेशक नाही... , हा अतिशय गन्भिर आरोप आणि फार मोठ्या वर्गाचा अविश्वास या दोन गोष्टीवर काम करणे अस्तित्वासाठी गरजेचे आहे....

<<राजीव दीक्षित यांनी स्वदेशीचा पुरस्कार करताना विदेशी ते सगळेच वाईट असा जो एकतर्फी दुष्प्रचार केला त्याचे तर फार चुकीचे परिणाम झालेले आहेत.>>
------- त्यान्चा अकस्मित मृत्यु का झाला ? कारण काय होते ?

अखन्ड भारत हे स्वप्न विसरायला हवे.... तसेच प्रत्येक शोधाचे मुळ भारत वर्षातच आहे असा खोटा प्रचार थाम्बवणे... त्याने अविश्वास अजुनच वाढतो.
काही उदा:
(अ) विमानाचा शोध भारतातच लागला.... अनेक तक्लादू आणि हास्यास्पद 'पुरावे' समोर येतात.
(ब) शुन्याचा, पायथागोरस शोध भारताच लागला
(क) टेस्ट ट्युब बेबी.... प्लास्टिक सर्जरी (गणपतीचे डोके)... मिसाईल्स (महाभारत)....
.
.
.

हिडन अजेन्डा आहे असा जनसामान्यान्ना वाटते.

भाजपा सन्घाची राजकीय शाखा आहे हे नाकारण्यात अर्थ नाही... आणि सन्घ स्वच्छ असेल तर व्यापम का घडले ? १०० लोकान्ची हत्या, अकस्मित मृत्यु कसे घडले ? कुणा कडुनही "ब्र" का नाही ?

व्यापम घडणे जेव्हढे चिन्ताजनक आहे... दु:खदायक आहे तेव्हढेच येथे मायबोलीवर त्या विषयावर एक टिप्पणी होताना दिसत नाही...

हजारो कोटीन्चा 'बिझीनेस' असणारी मन्डळी मन्त्रीपदावर आहे... काय असतो हा बिझीनेस ? माया कशी जमा होते ?

माझा प्रश्न सन्घाचे पक्षावर पुर्ण नियन्त्रण आहे तर "स्वच्छता" निर्माण होण्याकरता का नाही ते दबाव आणत ?असो.
लिहायचे खुप आहे...

शिवाय तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अनेक संघटना आहेत, त्या अनेक तोंडांनी बोलत असतात. अनेकदा देशाच्या घटनेच्याविरोधी वक्तव्ये केली जातात. संघ त्यांना गप्प बसवताना दिसत नाही, त्यामुळे आधीच असलेले संशयाचे वातावरण अजिबात कमी होण्यास मदत होत नाही. केवळ हिंदुत्व-हिंदुत्व म्हणजे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे हे त्यामुळे लोकांना कळत नाही, उलट त्यांच्या अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमुळे चुकीचा संदेश लोकांपुढे जातो. अशा परिस्थितीत सारा हिंदू समाज तर सोडाच, पण बहुतांश हिंदू समाज तरी संघाबरोबर जाईल याची अपेक्षा कशी करत येईल? >>>>

राकुंच्या लिखाणाचे फॅन्स कुठल्या बिळात लपलेत? पहा कशी लेखणी चालतेय धारदार. अगदी संयत भाषा, अचूक निरीक्षणे.. याचे कौतुक करणारे मंडळ इथे अवतरले नाहीये, असे की बरे ?

केवढे आशादायी वक्तव्य होते ते! त्या विधानाचे मी स्वागत केले होते.

तुमचा लेख वाचला. तुम्ही संघाविशयी आशावादी आहात हे ही वरील वाक्यातुन समजले. संघ म्हणजे सरकार सारखी राजकीय नेते आणि नोकरशहांसारखे अधीकृत सत्ता केंद्र नाही. एका आदेशाने कालबाह्य रुढी थांबतील. तुमच्या घरात तुम्ही एखादी कालबाह्य रुढी थांबवली आहे का ? जर तुम्ही केले तरच ते होणार आहे. हा विचार संघ प्रमुखांनी सांगीतला. यावरचे कार्येक्रम संघशाखांवर होतात. त्याचा परिणाम समाजात दिसतो.

मायबोलीवर जर कोणी दापोली तालुक्यातले सदस्य असतील तर आपल्या वयाने मोठ्या असलेल्या नागरिकांना विचारा. गांधी विचाराने प्रेरीत दलीतमित्र बाबा फाटक यांनी जेव्हा जातीबाहेर स्वतःचे लग्न केले तेव्हा तिथल्या ब्राह्मण समाजाने त्यांना वाळित टाकले. अश्या बाबा फाटक यांच्या घरी मुद्दाम संघ कार्यकर्ते जाऊ लागले. या वाळीत टाकण्याच्या प्रथेला विरोध म्हणुन. ही घटना मला वडीलांकडुन समजली कारण ती १९४७ सालाच्या आधीची आहे.

वर उल्लेखलेल्या गोष्टी तर स्वयंसेवक स्वयंप्रेरणेन करतात तिथे आदेश लागत नाही.

मी आजवर एकदाही ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनाला गेलेलो नाही ना रितसर सदस्यत्व स्विकारले आहे. याचे कारण एकच माझे वडील म्हणत आपण हिंदु आहोत इतकाच स्वाभिमान बाळगायला हवा. ही विचारधारा संघस्थानावरुन आलेली आहे.

कुलकर्णी आपले विचार आणि संघावरचे आरोप ऐकीव आहेत. आपण संघकार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन पहा. आपले मत खुपच पुर्वग्रहदुषीत नसेल आणि ते बदलायचे नाही असा दुराग्रह नसेल तर नक्की बदलेल.

नवीनचंद्र,
या लेखात संघाची चांगली बाजू व डोळ्यावर येणारी बाजू त्यांचा लेखाजोखा घेण्याचा हेतु नाही.
तुम्ही जर पतंगेंचा मूळ लेख वाचला असेल, तर ही त्यावरची प्रतिक्रिया आहे. नव्वद वर्षांनंतर जी काही पुरी-अपुरी स्थिती आहे, मुळात आहे त्यावर समाघान मानण्यासारखी स्थिती आहे काय, त्यावरचे हे भाष्य आहे. ती 'टीका' साप्ताहिक विवेकच्या वेबसाइटवरही प्रसिद्ध झाली आहे.

संघ म्हणजे भारतिय राज्यघटना, भारत सरकार आणि शासकीय व्यवस्था ही देशासाठी कर्यरत नाही अशी भावना असलेल्या लोकांची संघटना. देश स्वतन्त्र होण्याआधी ज्या स्वतंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि काँग्रेस सारख्या पक्षाने सर्वसामान्य जनतेला हाताशी धरुन आंदोलने करुन इंग्रजांना भारत सोडुन जायला भाग पाडले ते सारे आपणाला का करता आले नाही या विचाराने त्रस्त झालेले लोक संघात आहेत. निदान देश स्वतंत्र झाला तेव्हा तो आपल्या सरख्या 'काहीं'च्या हातातच रहायला हवा होता ते न झाल्यामुळे गेली ९० वर्षे धर्मिक ध्रुवीकरण करुन जनतेमधे पकिस्तान-बांग्लादेश सहीत 'अखंड भारत' वगैरे खुळ डोक्यात पेरुन, म. गांधींना शिव्या देउन आपला विखार व्यक्त करत आहेत. हिंदुस्थानी संघ आणि जर्मन नाझी या एकाच हुकुमशाही पंथातील.. सतरंज्या उचल म्हटले कि उचलायच्या..!! संघाला ९० वर्षे पुर्ण झाली तरी मनसिकता तीच... १२८ वर्षांच्या काँग्रेस ला हद्दपार वगैरे..वगैरे..!! काँग्रेस आहे म्हणुन यांचे अस्तित्व..!! गेली ९० वर्षे म.गांधी, पं. नेहरु, इंदिर गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी.... यांना शिव्या घालण्यापेक्शा काय केले..?? (आता इथुन पुढची कैक वर्षे प्रियंका-ऱोबर्ट यांच्या पोरांना शिव्या वाहत घालवणार..!!:G Biggrin :खोखो:)

बाय द वे... गेल्या ९०वर्षात ड्रेस कोड का बदलला नाही या बद्दल हस्यात्मक कुतुहल वाटते.:G Biggrin Biggrin शहरी आणि त्यातही (त्यातही 'काही') पेठी इन्क्युबेटरी वातावरणात मधे जन्मलेला 'काही' समाज सोडला तर संघाकडे बघण्याचा इतर जनतेचा दृष्टीकोण फार वेगळा आहे.

@ moga : Biggrin Biggrin Biggrin

कापोचे,

वरील दोन तीन प्रतिक्रिया पहा. या धाग्यावर संघी लोकांनी का लिहिले नाही याचे कारण हे आहे.

इथे संघाचा केवळ द्वेष करणारे आणि काही ऐकून घ्यायची क्षमता नसलेले बरेच लोक आहेत. त्यांच्या बेताल पोस्टी येथे वाचत बसाव्या लागतात.
कोणी खरेच संघ जाणून घेण्याच्या दृष्टीने, पूर्वग्रह बाजूला ठेवून ऐकणारे असेल तर सांगण्यासारखे भरपूर आहे.

असो. द्वेष करणाऱ्यांना करू द्यावा. काहीच फरक पडत नाही.

बर तब्येतीला चांगले आहे Wink

बाकी स्वातंत्र्य यांच्यामुळेच मिळाले हे १०० % सत्य आहे पण कोणी कौस्तुभने संशोधन केले नाही म्हणून हे कटू सत्य अजुन बाहेर पडले नाही

स्वातंत्र्य .? कौस्तुभ .? Uhoh
काही कळाले नाही.

रच्याकने, आपल्या माहिती साठी,
आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार हे कॉंग्रेस नेते म्हणूनच स्वातंत्र्य संग्रामात भाग घेत असत. संघस्थापनेनंतर सुद्धा शेवटपर्यंत ते कॉग्रेसचे सक्रीय सदस्य राहिलेले आहेत.

संघाची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेली नसून सामाजिक एकता आणि प्रगती साठी झालेली आहे.

रच्याकने, आपल्या माहिती साठी,
आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार हे कॉंग्रेस नेते म्हणूनच स्वातंत्र्य संग्रामात भाग घेत असत. संघस्थापनेनंतर सुद्धा शेवटपर्यंत ते कॉग्रेसचे सक्रीय सदस्य राहिलेले आहेत. >>

आपण माहीती द्यावी इतकी परिस्थिती नाही हो ओढावली. तरी ती दिल्याबद्दल धन्यवाद,
इतरांबद्दल माहीती दिल्यास उत्तम Happy वल्लभभाईंसारखे मात्र करू नये

>> संघाची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेली नसून सामाजिक एकता आणि प्रगती साठी झालेली आहे.<< आरे बाप्रे..... हे म्हणजे स्वयंपाक तुम्ही करा आम्ही पोषणमुल्ये शोधायला येतो... तुम्ही शेती करा आम्ही धान्य विकायला येतो... तुम्ही कोड लिहा आम्ही क्वालिटी बघायला येतो.. स्वतंत्र्यासाठी बलिदान तुम्ही द्या आम्ही आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्यात सामाजीक एकता आणि प्रगती करायला येतो असेच ना...?? (अरे.. पण ते तरी जमतेय का..? ९० वर्षे फुकटच गेलि..!!) Biggrin Biggrin

भोसले सरकार,

क्षणभरासाठी फक्त काँग्रेसमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असे मान्य केले तरी कॉग्रेस या व्याजावर किती दिवस जगणार ? ६५ वर्षे सत्ता उपभोगुन अद्याप खालील प्रश्नांवर काय काम घड्ले ते लिहावे.

१) लोकसंख्या
२) प्रार्थमिक शिक्षण
३) विषमता

घटनासुध्दा काँग्रेसनेच लिहली असे मानले तर घटनेत लिहलेल्या कल्याणकारी राज्याचे काय झाले ?

महात्मा गांधीचे चित्र आणि खादीचे कपडे घातले की झाले का ?

किती काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यात गांधींना अपेक्षीत असलेल्या तत्वांचा अंगिकार केला ?

या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाही. प्रतिसादात भाजपच्या राज्यात काय घडले याचा मिडीया स्टाईलने आढावा घेतला जाईल.

जे लिहताय त्यात तुमचा दोष नाही. ज्यांना संघाची भिती वाटते त्यांनी काही कंड्या पिकवल्या आहेत. काही लोकसभा मतदार संघात सक्षम राजकीय नेतृत्वा शिवाय संघाच्या लोकांनी भाजपचा उमेदवार निवडुन आणल्यावर तर अनेकांना संघ आपले राजकीय शत्रु वाटु लागला आहे.

घटनासुध्दा काँग्रेसनेच लिहली असे मानले तर घटनेत लिहलेल्या कल्याणकारी राज्याचे काय झाले ?>>
अहो तुम्ही याच कल्यानकारी राज्यात राहत आहे ना? की देशाबाहेर आहात? Uhoh

ज्यांना संघाची भिती वाटते त्यांनी काही कंड्या पिकवल्या आहेत >> काय सांगतात.? ऐकावे ते नवलच. गेली ६५ वर्षे भीत भीतच काँग्रेसने राज्य केले म्हणा Wink

हो मला वाटते संघाची भीती, का?. आमच्याकडे भाजप आणि मातृसंस्थेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आमदार निवडून आणलाय. नुकताच एक गुन्हेगार मलेशियातून भारतात आणलेला आहे, त्याचे हे साथीदार. आता या आमदाराचा भूतकाळ संघाला बिलकुल माहित नसणार यावर माझा तरी काडीमात्र विश्वास नाही.

त्यावर कडी म्हणजे भाजपने महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रादेशिक कोकणी विरुद्ध आगरी असा प्रचारही केला होता.

आता यात कोणती उच्च तत्वे अंगिकारली गेलेली आहेत, ते आम्हाला सांगावे.

भाज्पाने तर बिहार निवडणुकित पण असाच प्रकार केलेला. जेडीयु यांना मत दिली की पाकिस्तानात फटाके फुटतील अशी भीती मतदारांच्या मनात निर्माण केली होती.
नंतर किती फटाके फुटले याचा रेकॉर्ड मोजण्यासाठी मोदी स्वत: गेले होते.

तुमच्या काँग्रेसने काय प्रगती केली हे सांगा नैतर आमचा संघ महान अहे हे मुकाट्याने मान्य करा , हा निर्लज्ज युक्तिवाद आवडला.

केवळ हिंदुत्व-हिंदुत्व म्हणजे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे हे त्यामुळे लोकांना कळत नाही, उलट त्यांच्या अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमुळे चुकीचा संदेश लोकांपुढे जातो. >>>>>> ++++++११११११

या धाग्यावर लेखणीचे कौतुक करणारे केव्हां उगवतील ? Happy