भेलवाले (Movie Review - Dilwale)

Submitted by रसप on 18 December, 2015 - 11:08

'When you can't grow a beard, dont grow a beard.'
साधासाच फंडा आहे, पण काही गोष्टी इंग्रजीत सांगितल्याने भारी वाटतात ! मात्र हा साधासा फंडा शाहरुखला काही केल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, हे एखाद्या सुपरस्टारने स्वीकारणे कठीणच म्हणा ! 'चक दे इंडिया' मधला 'कबीर खान' लोकांना आवडला होता ते त्याच्या दिसण्यामुळे नाही, हे त्याला कुणी तरी समजवायला हवे. त्याचा 'जब तक है जान' मधला दाढीचे खुंट वाढलेला बोगस फिल्मी मेजर लोकांनी सहन केला आणि आता परत एकदा तेच वाईट्ट खुंट घेऊन तो 'दिलवाले' बनलाय.
दाढीचं लक्षात येत नसेल, पण एक मात्र शाहरुखला नक्कीच लक्षात आलेलं आहे. 'आपण सेन्सिबल चित्रपट करू शकत नाही'. त्यामुळे 'चक दे इंडिया', 'स्वदेस' आणि बऱ्याचश्या प्रमाणात 'डॉन' वगळता सगळेच शाहरुखपट आणि सेन्सिबिलीटीचं नातं म्हणजे ३६ च्या आकड्यासारखंच असावं. ह्या बाबतीत दिग्दर्शकांमधला शाहरुख खान म्हणजे 'रोहित शेट्टी'. दोघे एकत्र पहिल्यांदा 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये बसले. तो प्रवास जितका मनोरंजक (सेन्सिबल नाही, लक्षात घ्यावे!) तितकाच 'दिलवाले' रटाळ.
इथल्या शाहरुखच्या दाढीचे खुंट अधिकच अणकुचीदार आहेत. इतके की काही फ्रेम्समध्ये त्याला पाहताना नकळत आपण आपलाच गळा खाजवायला लागावं. त्याला असा गबाळा लुक का द्यावा, ह्यावर विचार करायची संधी वरुण धवन देत नाही. वरुण धवन हा वरून, खालून, आतून, बाहेरून, डावीकडून, उजवीकडून, समोरून, मागून सगळीकडून पक्का 'धवन' आहे. त्याचे तीर्थरूप आणि सेन्सिबिलीटी ह्यांचं नातं तर विळ्या-भोपळ्याचं ! त्यामुळे 'बदलापूर' पाहून जर वरुणकडून आपल्या काही अपेक्षा वाढल्या असतील, तर त्या अपेक्षांच्या फुग्याला निर्दयीपणे तो स्वत:च 'दिलवाले'ची टाचणी लावतो. ह्या लक्षणामुळेच 'कृती सॅनोन' नामक मूर्तिमंत मेक अप कीट वरुणसाठी अगदी 'परफेक्ट मॅच' ठरतो आणि दोघे मिळून पूर्णवेळ टाचण्या टोचून हैराण करून सोडतात ! सुरुवातीच्या काही दृश्यांत साक्षात खप्पड दिसणारी काजोल नंतरच्या दृश्यांत हळूहळू सुंदर दिसायला लागते आणि अखेरपर्यंत आपल्याला जाणवतं की तीच एक सहनीय व बघणीय भाग होती ह्या चित्रपटाचा.

खूप मोठी उंची गाठायला फार मेहनत लागते आणि तिथून खाली यायला काहीही लागत नाही. हे सोपं काम रोहित शेट्टीने शाहरुख-काजोलच्या जोडीबाबत व्यवस्थित केलं आहे. त्यांची सुप्रसिद्ध केमिस्ट्रीसुद्धा काही जादू करत नाही. कारण गाण्यांच्या चाली, त्यांची चित्रीकरणं, संवाद, प्रसंग हा सगळाच मालमसाला पद्धतशीर 'कॉपी+पेस्ट' केलेला आहे. 'गेरुआ' चं चित्रीकरण अत्यंत नेत्रसुखद असलं तरी त्यावरची 'सूरज हुआ मध्यम..', 'सुनता है मेरा खुदा..' वगैरे गाण्यांच्या चित्रिकरणाची छाप काही लपत नाहीच. 'जनम जनम जनम..' गाण्याच्या चित्रीकरणावर 'हम तुम' चा प्रभाव ठळकपणे जाणवतो. संवाद तर इतके बुळबुळीत आहेत की ते लिहिण्यासाठी पेनात शाईऐवजी साबण घातला असावा.

Dilwale.jpg

तर इथून तिथून जे काही हाताला येईल ते उचलून सगळं एकत्र टाकून केलेली ही जी 'दिलवाले' नामक भेळ आहे, तिला चवीसाठी कमी पडणाऱ्या मिठाइतकी कहाणीही आहे.
कोणे एके काळचा माफिया 'काली' (शाहरुख) आपलं जुनं आयुष्य बल्गेरियात सोडून गोव्यात आपल्या लहान भावासह येतो. जुनं आयुष्य सोडताना त्यात गुन्हेगारी जगत जसं आलं, तसंच आपलं प्रेमही येणारच. हे सुज्ञास सांगणे न लागे. त्याचं हे प्रेम म्हणजे मीरा (काजोल) त्याच्या प्रतिस्पर्धी डॉनची मुलगी असते. आता ते आयुष्य सोडून येण्याचं कारणही कळलं असेलच. तरी सांगतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ईर्ष्येने आंधळे झालेले हे लोक आपापल्या जवळच्यांना गमवून बसतात आणि त्यासाठी एकमेकांना जबाबदार धरून वेगळे होतात. सॉरी ! इथे हीरोला 'क्लीन' ठेवणं गरजेचं असल्याने फक्त मीराच असा गैरसमज करून घेते. काली तर शाहरुख असल्याने तो असं काही करूच शकत नाही. मग काली शाहरुख आपलं आवडतं नाम धारण करतो. 'राहुल' नाही. 'राज'. (आता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ची केमिस्ट्री आणायची आहे म्हटल्यावर हे आवश्यकच नाही का ?) मात्र भूतकाळ असा पिच्छा सोडत नसतोच. कालीचा लहान भाऊ वीर (वरुण धवन) आणि मीराची लहान बहिण इशिता (कृती सॅनोन) प्रेमात पडतात आणि द रेस्ट इज नो मिस्ट्री.

अभिनय, कहाणी, संवाद, दिग्दर्शन हे सगळं सुमार असलं तरी ह्या सगळ्यांवर कडी करणारी एक गोष्ट अजून आहे. 'कर्कश्य पार्श्वसंगीत.' अमर मोहिले, तुम्हीसुद्धा ? प्रत्येक दृश्याला मागे ढणढणाट चालूच ! ती 'जनम जनम जनम..' ची धून तर वाजून वाजून वात आणते. दर वेळी शाहरुख-काजोलची नजरानजर झाली रे झाली की वाजवा रे 'जनम जनम जनम...' असं चित्रपटभर चालतं. जोडीला ढिश्युम-ढिश्युम, उडणाऱ्या गाड्या, आपटणाऱ्या गाड्या, धावणाऱ्या, गोल फिरणाऱ्या, करकच्चून ब्रेक मारणाऱ्या गाड्या, स्फोट, वगैरे शेट्टी-मसालासुद्धा ह्या कर्कश्यतेच्या अमानुषतेत भर घालतोच.

बोमन इराणीला वाया घालवल्याबद्दल जास्त कीव करावी की संजय मिश्राला वाया घालवल्याबद्दल हे सांगणं अवघड आहे. हे दोघे आणि जॉनी लिव्हर हेच त्यातल्या त्यात थोडीफार मजा करवतात.
छायाचित्रण नयनरम्य आहे. पण सौंदर्य आणि नीटनेटकेपणाचा अतिरेक जाणवतो. प्रत्येक फ्रेम श्रीमंत, सुंदर, डोळ्यांचं पारणं फेडणारी असायलाच हवी हा अट्टाहास चमचाभर कमी करून तो चमचा इतर घटकांत वाढवला असता, तर अडीच तासांचा चित्रानुभव अत्याचार न होता, किमान मनोरंजक तरी झाला असता. रोहित शेट्टीचा सिनेमा पाहताना मनोरंजन वगळता दुसरी कुठलीच अपेक्षा ठेवून प्रेक्षक येत नसतोच आणि बाजारात मनोरंजनाचा व्यापार इतका भरपूर आहे की जर तोही तुम्हाला मांडता येत नसेल, तर काय म्हणणार ! खरं तर काही म्हणून उपयोग नाहीच कारण कितीही सुमार असला तरी शाहरुखच्या नावावर तो शेकडो कोटी कमवून देईलच. भाड मे जाये सेन्सिबिलीटी, कलात्मकता वगैरे, माल तो अंदर आने दो !
बरोबर ना शेट्टी साहेब ?

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/movie-review-dilwale.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉनी लिव्हरला नको इतकं फूटेज मिळालं आहे आणि तिथेच पिक्चर गंडलाय. मला वाटतं लव्हस्टोरी, कॉमेडी आणि अ‍ॅक्शन यांच्यात कशावर फोकस ठेवायचा ते न ठरल्यामुळे रोशेने वाट्टेल त्या प्रमाणात हे सगळं मिसळलं आहे आणि त्यामुळे फायनल पदार्थ बिघडला आहे.

@अमेयदा आणि mansmi1@,

दोन्ही पोस्ट्सना अनुमोदन.
काजोल मला चांगली वाटली मात्र. (कदाचित इतरांच्या तुलनेने बरी असल्याने चांगली वाटली असावी !)

>> रोहित शेट्टीच्या चित्रपटातुन प्रबोधन/संदेश इ.इ ची अपेक्षा कधीच नसते पण निखळ मनोरंजनाची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का? <<

अगदी हाच सवाल मला सिनेमा पाहताना आणि पाहिल्यानंतर पडला.
मी कशासाठी पाहिला हा सिनेमा ? केवळ मनोरंजनासाठी. कारण रोशेचा सिनेमा म्हणजे टाईमपासच. मात्र जागोजाग पांचटपणा, ढापूगिरी आणि एकंदरच सगळं फसलेलं रसायन असह्यच झालं.

एक लिहायचं राहिलं..

वरुण धवनचा मित्र म्हणून जो कुणी अभिनेता आहे.. ('स्प्राईट'च्या एका जाहिरातीत होता तो.) ते ध्यान पराकोटीचं इरीटेटिंग आहे. कर्कश्य आणि घाणेरड्या चिरक्या आवाजात तो प्राणी पूर्ण वेळ बोलतो आणि बादल्या बादल्या ओव्हर अ‍ॅक्टिंगही ओततो. आय एस जोहर नामक एक किळसवाणा प्राणी कॉमेडीच्या नावाखाली टॉर्चर करायचा पूर्वी. हा वरुणचा मित्र तोच वारसा पुढे चालवू शकतो.

विशेषतः वरुण शर्माचं कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे.>>> या वाक्याला अनुमोदन
आजून दिल्वाले बघितला नाही .
पण वरूण शर्माचा "मै तेरा हिरो " नामक फालतु चित्रपट , केवळ त्याच्यामुळेच आवडतो Happy
शेवटी डेव्हिड धवन चा मुलगा आहे तो , काहितरी वारशाने आलं असणारचं .

या विकांताला बघेन दिलवाले बहुतेक .

मस्तच र स प !!

तुमच्या बाजीराव्-मस्तानी च्या रिव्ह्यु च्या प्रतिक्षेत आहे, तुम्ही अगोदर टाकला आहे का रिव्ह्यु ?
मी मिसला काय ? नसेल तर लिवा की राव बिगी बिगी Lol

वरुण शर्मा कोण ?
वरुण धवन आहे ना या सिनेमात ? >> हो तोच . म्हणजे मी तरी वरूण धवन बद्दलच बोलतेय .
गलतीसे मिस्टेक हो गया Happy

@स्वस्ति,

वरुण शर्मा गुगललं तेव्हा कळलं, तो अतिप्रचंड इरिटेटिंग, किळसवाणा, चिरक्या, कर्कश्य प्राणी म्हणजेच वरुण शर्मा !

वरुण धवनचा मित्र दाखवलाय पिक्चरमध्ये. असल्या थर्ड क्लास अ‍ॅक्टिंगला 'मटा'वालेच 'जबरदस्त' म्हणू शकतात. कारण ऑन द सेम स्केल ऑफ मेजरमेण्ट, 'मटा' हे एक महान वृत्तपत्र आहे.

कित्येकांना शाहरूखही इरीटेटींग वाटतो, तर कित्येकांना तो कमालीचा ईंटरेस्टींग वाटतो.
यात नक्की कोणास महान म्हणावे Happy

शाहरुख जसा कसा आहे, 'शाहरुख' आहे. आज तो ज्या उंचीवर आहे, तिथे भले भले पोहोचू शकत नाहीत. त्याची आणि वरुण शर्मा नामक कुणा फुटकळ (सद्यस्थितीत) माणसाची तुलना का करायची, ऋन्मेष ?

रसप, वर सस्मित यांनी तोच मुद्दा उचलत माझे आणि माझ्या धाग्यांचे नाव गुंफलेय. पण प्रत्यक्षात माझी सुद्धा लायकी आहे का शाहरूखशी तुलना करून घ्यायची.
मी फक्त कोणाला काय आवडेल काय नावडेल हे किती दोन टोकांचे असू शकते हे दर्शवायला उदाहरण दिले. अर्थात शाहरूखला पराकोटीचे प्रेम आणि राग दोन्ही मुबलक मिळत असतात हे दाखवायला त्याचे नाव पटकन सुचले ईतकेच.
बाकी मी वरुण शर्माला ओळखतही नसल्याने नो कॉमेंट्स. वर त्याची तुलना आपण त्या आय एस जोहर नामक कलाकाराशी केलीय, तसाच तो असेल तर मात्र आपल्याशी सहमत.

एक चुटकी निखळ मनोरंजनकी किंमत तुम क्या जानो reviewer बाबू >>> Biggrin

शारुख आणि काजोल ऑटाफे असल्यामुळे केवळ त्यांच्यासाठी दिलवाले (सगळे ग्रह जुळून आल्यानं चक्क फर्स्ट डे सेकंड शो) बघितला. हे असे चित्रपट म्हणजे लॉजिक-बिजिक को गोली मार के फ्रेंड्ससोबत एन्जॉय करायचे चित्रपट असतात. तर तसा टाइमपास म्हणून बघायला आवडला चित्रपट. रोहित शेट्टीचा सिनेमा आहे हे घोकून ठेवल्यामुळे फार अपेक्षा नव्हत्या तरी रसप यांचा रिव्ह्यु पटलाच. मनोरंजनाच्या बाबतीत चेनई एक्सप्रेसपेक्षा १० पायर्‍या खाली आहे. "विनोद" अगदी ओढून-ताणून केलेले आहेत. वरुण धवनला विनोदाचं अंग, समज काहीच नाही असं वाटतं. बदलापूरमधला धवन हाच का असा प्रश्न पडावा इतका यडछाप रोल आणि अभिनय आहे. शारुख आणि काजोल तोंडं तासल्यासारखे अवघडलेले दिसतात अनेक सीन्समध्ये. गेरुआ गाण्यात तर शारुख खप्पड दिसतो एकदम. पण तरी बरेच तरूण दिसतात दोघं. संपूर्ण चित्रपटभर शारुख एकदा सुद्धा तोंड उघडून हसलेला नाही. सगळी नुसती मंद स्मितं. त्यातल्या त्यात फाइट सीन्स फार भारी वाटले. मला सारखं 'बुकलून काढणे' आठवत होतं Proud

आमच्या एमेनसीत युरोत हिशोब होतो म्हणून डॉलरचा पत्ता नाही. प्रामाणिकपणे विचारले तर अशी टिंगल उडवायची होय Sad Proud

तर सांगायचा मुद्दा असा की भारतातच उथळ चित्रपट चालतात, फालतू चित्रपट चांगली कमाई करतात, असे कोणी म्हणत असेल तर परदेशातही काही वेगळे चित्र नाही हे यातून दिसून येते. Happy

@स्वस्ति,

वरुण शर्मा गुगललं तेव्हा कळलं, तो अतिप्रचंड इरिटेटिंग, किळसवाणा, चिरक्या, कर्कश्य प्राणी म्हणजेच वरुण शर्मा ! >>>> ओह ! ओके ओके .
मी तर प्रामाणिकपणे वरूण धवन बद्दल बोलत होते :).

"तर सांगायचा मुद्दा असा की भारतातच उथळ चित्रपट चालतात, फालतू चित्रपट चांगली कमाई करतात, असे कोणी म्हणत असेल तर परदेशातही काही वेगळे चित्र नाही हे यातून दिसून येते. स्मित"

परदेशात (त्यातही गजबजलेले देसी भाग वगळून) भारतातुन आलेले चित्रपट पहायची ओढ ईतकी असते, की कुठलाही देसी चित्रपट चांगला-वाईट ठरायच्या आधी आर्थिक गणितं सोडवण्याईतका नक्कीच चालतो. त्यातून भारताबाहेर रहाणार्या लोकांच्या काही काही बाबतीत भुमिका ईतक्या टोकाच्या नसतात. त्यांचे संघर्ष / टेन्शन्स वेगळी असतात. खूप मोठ्या प्रमाणात बरेचसे भाग असे आहेत जिथे जवळच्या मोठ्या शहरात जाऊन देऊळ, ईंडियन रेस्ट्राँट / चाट हाऊस, ईंडियन सिनेमा हा एक डे-ट्रीप चा प्लॅन असतो. त्यातुन भारतीय विद्यार्थी हे आणखीन वेगळा प्रकार आहे. त्यामुळे भारताबाहेर भारतीय सिनेमा किती चालला ह्यातला आर्थिक गणिताचा भाग सोडला (करंसी कन्व्हर्जन वगैरे भाग आहेतच) तर बाकी त्यात फार काही शोधू नये. मग तो प्रादेशिक सिनेमा असो, किंवा हिंदी. मला तरी पटकन असं उदाहरण आठवत नाही की भारतीय सिनेमा भारताबाहेर 'पडला'.

मला तरी पटकन असं उदाहरण आठवत नाही की भारतीय सिनेमा भारताबाहेर 'पडला'.
>>>>
सर्वच सिनेमे भारताबाहेर प्रदर्शित होतात का?
किंवा जे होतात त्या प्रत्येकाचा बिजनेस काय होतो हे बघणे रोचक राहील.

तरीही परदेशात कुठलाही सिनेमा चांगला वाईट हे न बघता भारतीय सिनेमा आहे तर बघा एवढाच निकष लाऊन बघितला जातो हे नाही पटत. चांगले दर्जेदार सिनेमे तिथे प्रदर्शित होत नाहीत का?
जर परदेशातील भारतीयांनी अश्या बिनडोक शाहरूखपटाकडे पाठ फिरवली तर नक्कीच त्यांची डिमाण्ड बघूनच चित्रपट बनवले वा तसेच चित्रपट प्रदर्शित केले जातील ना?

परदेशातील भारतीयांनी अश्या बिनडोक शाहरूखपटाकडे पाठ फिरवली तर नक्कीच त्यांची डिमाण्ड बघूनच चित्रपट बनवले वा तसेच चित्रपट प्रदर्शित केले जातिल>>> तु विनोदीही लिहतोस हे माहित नव्हत!!

आणि मला वाटायचे मी विनोदीच लिहितो Happy

पण जोक्स द अपार्ट काही चुकले का?
जशी डिमाण्ड तसा सप्लाय ना..
उद्या परदेशातील भारतीयांनी शाहरूखकडे पाठ फिरवली तर तेथील वितरक का त्याचे चित्रपट लॉसमध्ये जाऊन प्रदर्शित करतील..

Pages