भेलवाले (Movie Review - Dilwale)

Submitted by रसप on 18 December, 2015 - 11:08

'When you can't grow a beard, dont grow a beard.'
साधासाच फंडा आहे, पण काही गोष्टी इंग्रजीत सांगितल्याने भारी वाटतात ! मात्र हा साधासा फंडा शाहरुखला काही केल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, हे एखाद्या सुपरस्टारने स्वीकारणे कठीणच म्हणा ! 'चक दे इंडिया' मधला 'कबीर खान' लोकांना आवडला होता ते त्याच्या दिसण्यामुळे नाही, हे त्याला कुणी तरी समजवायला हवे. त्याचा 'जब तक है जान' मधला दाढीचे खुंट वाढलेला बोगस फिल्मी मेजर लोकांनी सहन केला आणि आता परत एकदा तेच वाईट्ट खुंट घेऊन तो 'दिलवाले' बनलाय.
दाढीचं लक्षात येत नसेल, पण एक मात्र शाहरुखला नक्कीच लक्षात आलेलं आहे. 'आपण सेन्सिबल चित्रपट करू शकत नाही'. त्यामुळे 'चक दे इंडिया', 'स्वदेस' आणि बऱ्याचश्या प्रमाणात 'डॉन' वगळता सगळेच शाहरुखपट आणि सेन्सिबिलीटीचं नातं म्हणजे ३६ च्या आकड्यासारखंच असावं. ह्या बाबतीत दिग्दर्शकांमधला शाहरुख खान म्हणजे 'रोहित शेट्टी'. दोघे एकत्र पहिल्यांदा 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये बसले. तो प्रवास जितका मनोरंजक (सेन्सिबल नाही, लक्षात घ्यावे!) तितकाच 'दिलवाले' रटाळ.
इथल्या शाहरुखच्या दाढीचे खुंट अधिकच अणकुचीदार आहेत. इतके की काही फ्रेम्समध्ये त्याला पाहताना नकळत आपण आपलाच गळा खाजवायला लागावं. त्याला असा गबाळा लुक का द्यावा, ह्यावर विचार करायची संधी वरुण धवन देत नाही. वरुण धवन हा वरून, खालून, आतून, बाहेरून, डावीकडून, उजवीकडून, समोरून, मागून सगळीकडून पक्का 'धवन' आहे. त्याचे तीर्थरूप आणि सेन्सिबिलीटी ह्यांचं नातं तर विळ्या-भोपळ्याचं ! त्यामुळे 'बदलापूर' पाहून जर वरुणकडून आपल्या काही अपेक्षा वाढल्या असतील, तर त्या अपेक्षांच्या फुग्याला निर्दयीपणे तो स्वत:च 'दिलवाले'ची टाचणी लावतो. ह्या लक्षणामुळेच 'कृती सॅनोन' नामक मूर्तिमंत मेक अप कीट वरुणसाठी अगदी 'परफेक्ट मॅच' ठरतो आणि दोघे मिळून पूर्णवेळ टाचण्या टोचून हैराण करून सोडतात ! सुरुवातीच्या काही दृश्यांत साक्षात खप्पड दिसणारी काजोल नंतरच्या दृश्यांत हळूहळू सुंदर दिसायला लागते आणि अखेरपर्यंत आपल्याला जाणवतं की तीच एक सहनीय व बघणीय भाग होती ह्या चित्रपटाचा.

खूप मोठी उंची गाठायला फार मेहनत लागते आणि तिथून खाली यायला काहीही लागत नाही. हे सोपं काम रोहित शेट्टीने शाहरुख-काजोलच्या जोडीबाबत व्यवस्थित केलं आहे. त्यांची सुप्रसिद्ध केमिस्ट्रीसुद्धा काही जादू करत नाही. कारण गाण्यांच्या चाली, त्यांची चित्रीकरणं, संवाद, प्रसंग हा सगळाच मालमसाला पद्धतशीर 'कॉपी+पेस्ट' केलेला आहे. 'गेरुआ' चं चित्रीकरण अत्यंत नेत्रसुखद असलं तरी त्यावरची 'सूरज हुआ मध्यम..', 'सुनता है मेरा खुदा..' वगैरे गाण्यांच्या चित्रिकरणाची छाप काही लपत नाहीच. 'जनम जनम जनम..' गाण्याच्या चित्रीकरणावर 'हम तुम' चा प्रभाव ठळकपणे जाणवतो. संवाद तर इतके बुळबुळीत आहेत की ते लिहिण्यासाठी पेनात शाईऐवजी साबण घातला असावा.

Dilwale.jpg

तर इथून तिथून जे काही हाताला येईल ते उचलून सगळं एकत्र टाकून केलेली ही जी 'दिलवाले' नामक भेळ आहे, तिला चवीसाठी कमी पडणाऱ्या मिठाइतकी कहाणीही आहे.
कोणे एके काळचा माफिया 'काली' (शाहरुख) आपलं जुनं आयुष्य बल्गेरियात सोडून गोव्यात आपल्या लहान भावासह येतो. जुनं आयुष्य सोडताना त्यात गुन्हेगारी जगत जसं आलं, तसंच आपलं प्रेमही येणारच. हे सुज्ञास सांगणे न लागे. त्याचं हे प्रेम म्हणजे मीरा (काजोल) त्याच्या प्रतिस्पर्धी डॉनची मुलगी असते. आता ते आयुष्य सोडून येण्याचं कारणही कळलं असेलच. तरी सांगतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ईर्ष्येने आंधळे झालेले हे लोक आपापल्या जवळच्यांना गमवून बसतात आणि त्यासाठी एकमेकांना जबाबदार धरून वेगळे होतात. सॉरी ! इथे हीरोला 'क्लीन' ठेवणं गरजेचं असल्याने फक्त मीराच असा गैरसमज करून घेते. काली तर शाहरुख असल्याने तो असं काही करूच शकत नाही. मग काली शाहरुख आपलं आवडतं नाम धारण करतो. 'राहुल' नाही. 'राज'. (आता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ची केमिस्ट्री आणायची आहे म्हटल्यावर हे आवश्यकच नाही का ?) मात्र भूतकाळ असा पिच्छा सोडत नसतोच. कालीचा लहान भाऊ वीर (वरुण धवन) आणि मीराची लहान बहिण इशिता (कृती सॅनोन) प्रेमात पडतात आणि द रेस्ट इज नो मिस्ट्री.

अभिनय, कहाणी, संवाद, दिग्दर्शन हे सगळं सुमार असलं तरी ह्या सगळ्यांवर कडी करणारी एक गोष्ट अजून आहे. 'कर्कश्य पार्श्वसंगीत.' अमर मोहिले, तुम्हीसुद्धा ? प्रत्येक दृश्याला मागे ढणढणाट चालूच ! ती 'जनम जनम जनम..' ची धून तर वाजून वाजून वात आणते. दर वेळी शाहरुख-काजोलची नजरानजर झाली रे झाली की वाजवा रे 'जनम जनम जनम...' असं चित्रपटभर चालतं. जोडीला ढिश्युम-ढिश्युम, उडणाऱ्या गाड्या, आपटणाऱ्या गाड्या, धावणाऱ्या, गोल फिरणाऱ्या, करकच्चून ब्रेक मारणाऱ्या गाड्या, स्फोट, वगैरे शेट्टी-मसालासुद्धा ह्या कर्कश्यतेच्या अमानुषतेत भर घालतोच.

बोमन इराणीला वाया घालवल्याबद्दल जास्त कीव करावी की संजय मिश्राला वाया घालवल्याबद्दल हे सांगणं अवघड आहे. हे दोघे आणि जॉनी लिव्हर हेच त्यातल्या त्यात थोडीफार मजा करवतात.
छायाचित्रण नयनरम्य आहे. पण सौंदर्य आणि नीटनेटकेपणाचा अतिरेक जाणवतो. प्रत्येक फ्रेम श्रीमंत, सुंदर, डोळ्यांचं पारणं फेडणारी असायलाच हवी हा अट्टाहास चमचाभर कमी करून तो चमचा इतर घटकांत वाढवला असता, तर अडीच तासांचा चित्रानुभव अत्याचार न होता, किमान मनोरंजक तरी झाला असता. रोहित शेट्टीचा सिनेमा पाहताना मनोरंजन वगळता दुसरी कुठलीच अपेक्षा ठेवून प्रेक्षक येत नसतोच आणि बाजारात मनोरंजनाचा व्यापार इतका भरपूर आहे की जर तोही तुम्हाला मांडता येत नसेल, तर काय म्हणणार ! खरं तर काही म्हणून उपयोग नाहीच कारण कितीही सुमार असला तरी शाहरुखच्या नावावर तो शेकडो कोटी कमवून देईलच. भाड मे जाये सेन्सिबिलीटी, कलात्मकता वगैरे, माल तो अंदर आने दो !
बरोबर ना शेट्टी साहेब ?

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/movie-review-dilwale.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण ते एक स्टार देणारे दानशूर? Proud
मी स्टोरीही वाचू शकले नाही. गेरुआ गाण्यातली लोकेशन्स जितकी खोटी वाटतात तितकेच खोटे शारुक आणि काजोल दिसले आहे. पुन्हा तीच ती शिळी एक्स्प्रेशन्स चेहर्‍यावर.

लगेच review? तोही नकारार्थी. थोडे थांबला असतात तरी चालले असते.

सगळीकडे निगेटिव्ह रिव्ह्यू आहेत पण अर्थात त्यामुळे फरक पडत नाही.

Ek star RSP in dilela and ek star to swatach 'SRK'
Kay tumhala ajun runmesh la read karata yeina.. As kasa chalayach Proud

Rasap, agadich apekashit review...... You never disappoint me when it comes to SRK movie reviews

लगेच review? तोही नकारार्थी. थोडे थांबला असतात तरी चालले असते.
>>>>>
मलाही आधी (शाहरूखचा चाहता असल्याने) असेच वाटले होते.
पण नंतर लक्षात आले की यावेळी दोन महत्वाचे सिनेमे रीलीज होताहेत, कदाचित उद्या दुसरा चित्रपट बघून् त्याचाही रिव्यू लिहायचा असावा.
काही का असेना, दोघांमध्ये आधी शाहरूखचा सिनेमा बघून लिहायला सांगितले याचा अर्थ वृत्तपत्र वाचकांचा टीआरपी शाहरूखच खेचतो हे उघड आहे. Happy

वरूण धवनः आने दो उस चोर को उसके हाथ मे यह यह दोनो घडी पहना देंगे.
जॉनी: उससे क्या होंगे?
वरूणः उससे वो दो घडी के महमान बनेंगे.

ह्या आठवड्यापासून 'मी मराठी लाईव्ह' साठी लिहिणं बंद केलंय.
आज आणि उद्या दोन दिवस बाहेरगावी असणार होतो, म्हणून वेळात वेळ काढून संध्याकाळी लिहून पोस्टलं!

छान लिहीले आहे, रसप.

ह्या आठवड्यापासून 'मी मराठी लाईव्ह' साठी लिहिणं बंद केलंय. >> तुमचा चॉईस म्हणा ! पण संधी चांगली होती.

रोमांटिक फिल्मों के शौकीन शाहरुख खान की दिलवाले देखें ।
एक्शन और लव स्टोरी के लिए बाजीराव मस्तानी देखिए
और भक्तगण अपना धरना प्रदर्शन जारी रखें।

मोदि पंतप्रधान झाल्यास भारत सोडून पाकिस्तानात निघून जाईन असे म्हणनारा, शाहरुख खान होता कि कमाल खान?

काल टिव्हीचर्चेत हिंदू महासभेचे प्रवक्ते वरिल वक्तव्य शाहरुख खान याने केले होते, असे सांगत होते.

रसप Happy
शाहरूखचा विषय आला की सग्ळयाना स्टोरी आशय वगैरे आठवायला लागत Happy
जसे काही रोहित शेट्टी आतापर्यंत अगदी कलात्मक चित्रपट काढत होता .

आणि जर तुम्हाला यात शाहरूख काजोल केमिस्ट्री दिसली नाही , तर ... ठीक आहे , तुमची मर्जी Happy

जसे काही रोहित शेट्टी आतापर्यंत अगदी कलात्मक चित्रपट काढत होता .>>>>>>>> अर्थातच. गोलमाल सीरीज सारखी कलात्मकता आहे कुठे?

महाराष्ट्र टाईम्स - दिलवाले ऑडियन्स ले जायेंगे

http://maharashtratimes.indiatimes.com/movie-masti/cine-review/Dilwale/m...

काही प्लस पॉईंटस

'इन्सान की उमर उतनीही होती है जितना वो फील करता है' हा डीडीएजजे मधला हा संवाद शाहरुखनं फारच मनावर घेतलेला दिसतोय. त्याच्या चेहर्यावर वय जाणवत असलं तरी तरुण 'राज'चा 'चार्म' अजूनही कायम आहे. त्याचे हावभाव, गालावरची खळी आणि सिग्नेचर स्टेप नेहमीप्रमाणे भुरळ घालतात. आणि थिएटरमध्ये शिट्या, टाळ्या मिळवण्यासाठी एवढं पुरेसं आहे.

या सगळ्यांसोबतच जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, बोमन इराणी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट वरुण शर्मा या चौकडीनं आपापल्या भूमिकांतून चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यांचे संवाद पडद्यावर हास्यफोट घडवून आणतात. विशेषतः वरुण शर्माचं कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे.

कलाकारांचे कॉस्च्युम्स आणि कला दिग्दर्शन एकमेकांमध्ये उत्तम समरस झालेले दिसतात. त्यामुळे प्रत्येक सीनमध्ये रंगीत जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. बऱ्याच कालावधीनंतर अनेक नवीन स्टाइल स्टेटमेंट्स एकाच चित्रपटात बघायला मिळत आहेत.

एकुणात काय तर निखळ मनोरंजन करण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. एकदा थिएटर आणि नंतर पुन्हा पुन्हा टीव्हीवर बघता येईल अशी करमणूक करणारा पैसावसूल चित्रपट आहे.

Watched
Loved
Ekdum halaka fulaka movie
Somwari punha family sobat pahanar Happy

आयुश्यात खुप टेंन्शन्स असतील, सततच्या संकटांना आणि सल्ल्यांना वैतागला असाल, अजिबात वैतागवाणं, अति वैचारिक वगैरे बघण्याची इच्छा नसेल तर जा दिलवाले बघा. दिल खुष हो जायेगा.
टिपिकल रोहितशेट्टी सिनेमा आहे . हलका फुलका आणि अबाल वृद्ध enjoy करू शकतील असा.
एक स्टार देणार्यांनो - एक चुटकी निखळ मनोरंजनकी किंमत तुम क्या जानो reviewer बाबू Proud

एक चुटकी निखळ मनोरंजनकी किंमत तुम क्या जानो reviewer बाबू >> Biggrin
रोहित शेट्टी ब्रँडच्या मानाने पण जरा बोअर आहे हं Wink कृती फक्त "इमोसन" मध्ये आवडली. बाकी सिनेमात ती काहीही वाटते. काजोलची बहिण कसली सेक्रेटरी वाटते.

'इन्सान की उमर उतनीही होती है जितना वो फील करता है' हा डीडीएजजे मधला हा संवाद शाहरुखनं फारच मनावर घेतलेला दिसतोय. त्याच्या चेहर्यावर वय जाणवत असलं तरी तरुण 'राज'चा 'चार्म' अजूनही कायम आहे. त्याचे हावभाव, गालावरची खळी आणि सिग्नेचर स्टेप नेहमीप्रमाणे भुरळ घालतात. आणि थिएटरमध्ये शिट्या, टाळ्या मिळवण्यासाठी एवढं पुरेसं आहे>>.+१००००००००

'इन्सान की उमर उतनीही होती है जितना वो फील करता है' हा डीडीएजजे मधला हा संवाद शाहरुखनं फारच मनावर घेतलेला दिसतोय. त्याच्या चेहर्यावर वय जाणवत असलं तरी तरुण 'राज'चा 'चार्म' अजूनही कायम आहे. त्याचे हावभाव, गालावरची खळी आणि सिग्नेचर स्टेप नेहमीप्रमाणे भुरळ घालतात. >>> यासाठी तुला +१ ऋन्मेषा!

दिलवाले फक्त शाहरूखकरता पाहिला. आवडला.

"लड्डू खाके पछताते है", म्हणत अखेर काल पाहिलाच. अपेक्षेप्रमाणे दारुण फील आला. शाहरुखच्या लुकला मेजर मेकओव्हरची गरज आहे. दाढीशिवाय पिचका आणि दाढीत भकास दिसतोय. काजोल धड ग्रेसफुल एजिंग नाही किंवा पहिली चमक नाही अशामुळे बघवत नाही, काहीवेळा तर ती चक्क नीरस वाटून शाहरुखची एनर्जीही कमी करते. रंग बदाबद ओतल्यासारखे छायाचित्रण डोळ्यांना त्रास देते आणि दशावतारी संगीत कानांना!
अगदी शेवटी शाहरुख काजोलला बडबड करत घर दाखवतो आणि वरुणच्या मित्राच्या लग्नात दोघे नृत्य करतात हे दोन दोन मिनिटांचे सीन्स मात्र जुन्या आठवणी जागवून जातात. हा शाहरुख दिग्दर्शकाने सिनेमाभर पकडला असता तर बाकी खाती निल असूनही सुसह्य वाटला असता पण अति मसाला टाकण्याच्या अट्टाहासात मूळ मुर्गी पार नष्ट झाली आहे.
बाकी वरुण कृती आणि इतर सहकलाकार प्रत्येक दृश्यात बकाल अभिनय करत शाहरुखचे उरले सुरले संचित उधळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात जो अतिशय यशस्वी ठरला आहे.

रसपने बरेच माइल्ड परीक्षण लिहिलेय असे आता वाटते.

'इन्सान की उमर उतनीही होती है जितना वो फील करता है' हा डीडीएजजे मधला हा संवाद शाहरुखनं फारच मनावर घेतलेला दिसतोय. त्याच्या चेहर्यावर वय जाणवत असलं तरी तरुण 'राज'चा 'चार्म' अजूनही कायम आहे. त्याचे हावभाव, गालावरची खळी आणि सिग्नेचर स्टेप नेहमीप्रमाणे भुरळ घालतात. >>> यासाठी तुला +१ ऋन्मेषा!

>>>>>>
रमड माझे वाक्य नाहीये ते

महाराष्ट्र टाईम्स ऑफ ईंडिया वाल्यांचे तसे म्हणने आहे.

हा चित्रपट यशस्वी झाला (बहुतेक झालाय) तर शाहरुख खानचा Arrogance आणखी वाढेल की आपण काहीही केले तरी ४०० कोटी Guaranteed. तेच झालेय सलमानचेही ..प्रेम रतन धन पायो - नावाच्या कचर्‍याने ४०० कोटी कमावले.
दोन्ही अतिशय Third class movies.
मला रोहित शेट्टीचे गोलमाल, गोलमाल २, ऑल द बेस्ट आणि चेनाई एक्सप्रेस आवडले होते. पण गोलमाल ३ आणि दिलवाले हे तद्दन भिकार..
तो टीवीवर चाललेले चॅनेल्स वरुन स्टोरी सांगतो ते तर सपशेल फसले आहे, पोगो काय धोबी काय? काजोलची नेहमीप्रमाणे ओवरअ‍ॅक्टींग..वरुण धवन सलमानची कॉपी करायचा प्रयत्न करतो आणि सपशेल फसतो. मला ती क्रिती सॅनन बरी असेल असे वाटले होते पण ती पण काहीच प्रभाव टाकत नाही.
संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर यांची कामे पाहताना मला "ऑल द बेस्ट" मधली त्यांची कामेच आठवत होती. (आर जी व्ही आणि नोबुभाय)

रोहित शेट्टीच्या चित्रपटातुन प्रबोधन/संदेश इ.इ ची अपेक्षा कधीच नसते पण निखळ मनोरंजनाची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का?

Pages