लोकलने चर्चगेटकडे जाताना अंधेरीच्या आधी, पूर्वेकडे सबवेच्या बाजूला एक मोडकळीस आलेली इमारत दिसते. त्यावरचा बोर्डही धूसर झालाय.
पण ती अक्षरं खूप ओळखीची वाटतात!
बहुधा या इमारतीत तयार झालेली वस्तू आपण प्रत्येकाने दप्तरात प्रेमानं सांभाळली होती.
शाळा सुरू व्हायच्या आधीच्या खरेदीचा पहिला मानही या वस्तूलाच मिळायचा.
वही!
तिच्या गुळगुळीत कव्हरवरून तळवा हळुवारपणे फिरवताना, आपण जगातली सर्वात मौल्यवान वस्तू हाताळतोय असं नकळत वाटायचं.
वही उघडून नाकाशी धरल्यावर नाकात घुमणारा कोऱ्या करकरीत पानांचा गंध आंबुस असला तरी धुंद करून सोडायचा.
आम्हाला तेव्हा दोन प्रकारच्या वह्या घेऊन दिल्या जात.
काहींचा कागद अगदी, इतका हलक्या दर्जाचा असायचा, की फाउंटन पेन टेकवताच शाईचा डाग पानावर पसरायचा.
ही वही मात्र, मस्त, शुभ्र, गुळगुळीत पानांची, रेखीव रेघांची असायची.
ज्याच्या दप्तरात सगळ्याच वह्या अशा असायचा, तो वर्गातला श्रीमंत घरचा मुलगा!
त्यामुळेच त्या वहीचं अप्रूप वाटायचं.
म्हणूनच, आजही येताजाताना त्या मोडकळीस आलेल्या इमारतीवरील अक्षरं हळवं करून सोडतात.
केविलवाण्या इमारतीकडे पाहताना उगीचच काहीतरी हरवल्यासारखं वाटू लागतं!
... तुम्हीही कधी या मार्गावरून रेल्वेनॆ येत जात असाल, तर मुद्दाम या इमारतीकडे पाहा.
त्यावरची अक्षरं तुम्हालाही असाच अनुभव देतील.
कारण, तो बहुधा 'रजत' वह्यांचा कारखाना होता!
दप्तरातली 'रजत' ची वही आठवली ना?
खरंच आठवली रजतची वही!
खरंच आठवली रजतची वही!