नकळत घडली चूक

Submitted by सखा on 14 December, 2015 - 03:37

नकळत घडली चूक
==============
(कथा काल ऐशीच्या दशकातील).
आम्ही बोकलवाडी सेंट परषु (षु का शू?) माध्यमिक शाळेतील सातवी 'ड' मधली थोर मुलं भुक्कड अशोक सरांना 'पंखा' म्हणतो. त्याची शास्त्रीय कारणे दोन. एक तर शिकवताना टेबला खालून त्यांचे (गुलाबी बेलबोट्म घातलेले) सुकडे पाय कायम समोरच्या बाकाला हवा घातल्या सारखे हलतात आणि दुसरं चित्रकलेच्या देखण्या नयन खेतान बाई. आलं लक्षात? नसेल तर एव्हढच सांगतो त्या काळात खेतानचा पंखा फार पॉपुलर होता. फारच गार गार हवा हो. अतिशय ए वन. असो.
आमची फक्त मुलांची शाळा. अमक्या शाळेची मुले फार बदमाश अशी काही शाळांची ख्याती असतेना तशी. शाळेच्या दर्शनी भागातच एक मोठा बटबटीत लंगोटी घालून पद्मासनात बसलेल्या कुणा एका दाढीधारी थोर पुरुषाचा रंगीत पुतळा. पुतळ्याच्या दात वासलेल्या मुंडक्याकडे प्रथम पाहताच आत आलेला मनुष्य आपण चुकून चेटूक महाविद्यालयात तर आलो नाहीत ना असे वाटून दचकत असे. पुतळयाचे दोन्ही हात नुकतेच बनियन काढलेल्या मनुष्या सारखे आकाशात होते. थोर पुरुष आणि त्यांचे पुतळे नेहमी कुठला ना कुठला संदेश देतात अस मला कायम वाटते. मग हे बर काय सांगत असतील? मुलानो वेळ आल्यास आपल्या दोन्ही काखा अशा वर कराव्यात हेच हे थोर पुरुष सुचित करीत नसतील?
मला बर्याचदा या पुतळ्यांनी डॉक्टर काका ना दाखवतात तशी जीभ काढल्यास किती मज्जा येईल असे वाटून एकट्यालाच हसू येत असे.
या दिव्य पुतळ्याच्या आणि त्याच्या मागील कुबट भिंतीच्या खोबणी मध्ये उशिरा येणाऱ्या आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या विविध वर्गातील मुलांना आंगठे धरून उभे करण्याची सोय होती. सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा दिल्यास समाजात सुस्थिती निर्माण होते हा काही राष्ट्रांनी स्वीकारलेला विचार आमच्याच जेलरुपी शाळेची देणगी असावा. पुतळ्याच्या मागील भिंताडावर "ब्रम्हचर्य हेच जीवन" असा मोठ्ठा बोर्ड लावलेला. शाळेचे मूळ पुरुष ब्रम्हचारी होते म्हणे. पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेत असा द्रष्टा विचार करणाऱ्या मनुष्याच्या शाळेत आम्ही बालके वाढत आहोत हे भाग्य उमगण्याचे अर्थात आमचे वय नव्हते.
अशोक सर भूगोलाचे असले तरी ते जणू काही गणिताचेच असल्या प्रमाणे मुलांना बदडून काढायचे. आमच्या वर्गातील प्रत्येक मुलानेच सरांच्या हातचा सुप्रसाद घेतलेला होता. तेव्हा चाइल्ड ऍब्यूज खाली शिक्षकांना जेल मध्ये पाठवण्याची प्रथा नव्हती. उलट शिक्षकाचा उलटा हाथ जगन्नाथ असेच सारे म्हणत. दिवसभर हात आणि उरल्या वेळात पाय हलवून का कुणास ठावूक पण बऱ्याचदा त्यांच्या तुमानीच्या शिवणीवर ताण येवून आधुनिक शिवणशास्त्रात ज्याला "टाका उसवणे" म्हणतात ती क्रिया झालेली दिसत असे.
(जाता जाता "उशी अभ्रा उसविता खोळ दिसे, हा घोळ नसे ग बाई घोळ नसे" ही मीच लिहिलेली अप्रतिम कविता माझ्या वर्ग मित्रात सुप्रसिध्ध झाली होती हे आत्मप्रौढीचा आरोप पत्करून नम्र पणे सांगावेसे वाटते.) हा बुधवार निळा, गुरवार नक्की पिवळा असे तंतोतंत भाकीत आमच्या वर्गातील पाटील, डोळे, ढेकणे आदी कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी करत. मुलानो तुमचा आवडता रंग कुठला असा VIP प्रश्न जेव्हा चित्रकलेच्या नयन बाई नी एका तासाला विचारले तेव्हा अख्खा वर्ग एकसाथ "ऑरेंज" म्हणाला तेव्हा नयन बाईंचे नयन आश्चर्याने गरा गरा फिरले.
तर अशा या बहारदार शाळेत आम्ही काही विद्यार्थी पाठी शेकत शेकत का होईना पण शिकत होतो.
त्या दुपारी भूगोलाचा रटाळ तास संपत आला असताना अचानक मला तो पुतळा, डॉक्टर काका आणि जीभ आठवून एकट्यालाच हसू आले. मी "खिक्क" करून हसलो. झालं अशोकसरांनी मला जवळ बोलावले मात्र यंदा मारण्या आधी कधी नव्हे तो दयाळू पणे विचारले.
"बोल कुणाला हसलास? भूगोल काय हसायचा विषय आहे?"
"हसलो नाही हसेन कसा सर? खोकलो… खिक्क खिक्क"
"नाही सर हा हसलाच" माझा शेजारचा ढोरे पाटील बोलला. मित्र असावा तर असा.
"तू चूप बैस तुला कोणी विचारले आहे का चोम्बडेपणा करायला?" मास्तरनी ढोर्याला जागीच ढेर केला. साला कृतघ्न. जगात देव आहे म्हणतात तो असा.
मग पुन्हा माझ्याकडे डायनोसोर सारखे वळून म्हणाले
"खोटारड्या … एकटाच हसतोस आणि पुन्हा खोटे बोलतोस?"
"तुमच्या आईची शप्पत सर… हसेन कसा? मला ना एक शंका होती आणि मला शंका आली कि खोकलाच येतो …. खिक्क खिक्क " असे म्हणत मी हसणे आणि खोकणे यातील मधले इम्प्रोव्हायझेशन केले.
"वा रे माझ्या आयची शप्पत घेतोस शहाणाच आहेस की" कुणास ठावूक त्यांनी मला विचारले
"कळू तर दे तुझ्या मनातील शंका"
"सर ब्रम्हचर्य म्हणजे काय?" मी डायरेक्ट ठोकून दिले.
सर एकदम गडबडले " कोण म्हणते असे?"
"आपल्या शाळेतील आचार्यांचा पुतळा हातवर केलेला … म्हणजेच त्यांच्या मागच्या भिंती वरचे ते वाक्य…. त्यांचेच असणार ते "- इति मी
आता मात्र सर चागलेच भांभावून गेले इतके की मला मारायचे देखील विसरले. दुख्खाची कळ त्यांच्या चेहऱ्यावर चमकून गेली.
"ह्म्म्म्म चांगला प्रश्न आहे…. ब्रम्हचर्य म्हणजे तुला सांगतो …. म्हटल तर इट्स पेन म्हटल तर इट्स मॅजिकल .....इट्स डीव्हाइन"
"काय झेपल नाही सर" - मी
"अरे हा भूगोलाचा तास आहे हा प्रश्न तू बायोलॉजिच्या सरांना विचार"
"नाही सर ते फार मारकुटे आहेत तुम्हीच सांगा"
"हो हो तुम्हीच सांगा" - सारी मुले एक साथ ओरडली
"अरे मी नाही … मला भूगोलाचा प्रश्न विचारा"
"म्हणजे काय सर तुम्ही 'ते' आहे का "
"ते म्हणजे?" सर दचकून म्हणाले.
"ब्रम्हचर्य" निरागस मी
"अरे ब्रह्मचारी म्हणायचे आहे तुला. ब्रम्हचर्याचे पालन करणारा तो ब्रम्हचारी "
"हो हो तेच सर ब्रम्हचारी…. ब्रम्हचारी" एक नवीनच माहिती कळल्या मुळे मलाही वेगळाच हुरूप आला.
सारी मुले एक साथ "ब्रम्हचारी" "ब्रम्हचारी" असे बोंबलू लागली.
मलाही चेव आला "सांगा ना सर सांगा ना सर" असा लोचट पणा करू लागलो तेव्हा नाईलाज होवून सरांनी माझा कान पिळला आणि पाठीत बुक्की घालणार इतक्यात टोल पडला आणि दारात नयन बाई आल्या तसे सर शत्रुघ्न सिन्हा सारखे छाती पुढे काढून बाहेर गेले जाताना ते काही नयन बाई कडे पाहून काही तरी कुजबुजले असावेत अशी मला दाट शंका आली.
"का रे का बर मारत होते तुला अशोक सर?" मी जेव्हा माझे चित्र बाईना दाखवायला गेलो तेव्हा बाईनी मला हलकेच विचारले.
"ते मी त्यांना ते ब्रम्हचारी आहेत का विचारले म्हणून"
"आं??" बाई दणकन दचकल्या परंतु त्यांना कुतूहल वाटले असावे त्या सावधपणे म्हणाल्या "मग आहेत का तुमचे सर ब्रम्हचारी?"
"अजून काही स्पष्ट कळले नाही पण उद्या जाहीर सांगतो म्हणाले" माझ्या या वाक्यावर बाईचा चेहरा किंचित जास्तच गोरामोरा दिसू लागला असे मला वाटले.
अजूनही खरं सांगायचे तर ब्रम्हचर्य या शब्दाचा अर्थ कळावा एव्हढे ज्ञान नव्हते. केवळ एक गंमतशीर शब्द याच भावनेने हा सगळा उपद्व्याप चालू होता.
तुम्हाला सांगतो जेव्हा देव देतो तेव्हा तो लगेच देतो नाही तर उशिरा देतो किवा देतच नाही पण त्या दिवशी मला पहिला अनुभव आला. संध्याकाळी गुंजोटी मास्तरकडे मराठीच्या टीवशन ला गेलो तेव्हा मास्तर म्हणाले की " नीट एेका मराठीत बरेच शब्द संस्कृत मधून आले आहेत पण अर्थ वेगळे आहेत उदा. 'धरा'"
काही मुले हसू लागली
"मुर्खानो 'धरा' म्हणजे काय बैल धरा नाही तर 'धरा' म्हणजे आपली पृथ्वी तसाच दुसरा शब्द 'जीवन', सांगा संस्कृत मध्ये 'जीवन' म्हणजे काय?
कुणालाच येईना तेव्हा सर म्हणाले मुर्खानो "जीवन" म्हणजे "पाणी" …. पाणी ज्याला लहान मुलं "पापा" म्हणतात..... प्यायचा "पापा" घ्यायचा नव्हे.
आयला संस्कृत मध्ये कायच्या काय असतं जीवन म्हणजे पाणी? मग अमजद खान म्हणजे काय लोणी? या विचाराने माझे मलाच हसू आले
"खिक्क"!
सर पुढे बडबडू लागल्यावर मी नेहमी प्रमाणे वेगळ्या विचारात गढून गेलो. "जीवन" म्हणजे "पाणी" आणि आपल्या शाळेच्या आणि पाटीवर लिहिले आहे ब्रम्हचर्य हेच जीवन याचाच अर्थ ब्रम्हचर्य म्हणजेच पाणी. आपले अशोक सर पाणी आहेत का? अजिबात नाही ते मानव आहेत. याचाच अर्थ ते ब्रम्हचारी नाहीत. वा रे पठ्ठे याला म्हणतात लॉजिकल डोके. थॅंक यू देव बाप्पा! माझ्या शोधाचे मलाच फार आश्चर्य वाटत होते. टीवशन झाल्यावर नेहमी प्रमाणे मी बाकीचे विद्यार्थी घरी गेल्यावर शंका विच्रारायला गेलो. स्पेशल शंका विचारल्याने आपण एक हुशार विद्यार्थी आहोत असा कुठल्याही मास्तर च्या मनात सु-समज निर्माण होतो हे मला ठावूक होते.
मी प्रश्नाची शक्यतो जड शब्द वापरून जुळवा जुळव करून विचारले
"सर, मला एक प्रामाणिक शंका आहे. संस्कृत मध्ये सगळेच मराठी शब्द वेगळे अर्थ धारण करतात का?"
सर म्हणाले "तसे काही नाही काही नितांत सुंदर शब्द जशास तसे आले आहेत उदा. नयन म्हणजे डोळे"
"अरे वा म्हणजे आपल्या नयन बाईचे नाव संस्कृत वा!" - मी
नयन म्हणताच सरांची एकदम कळी खुलली ते जोरात म्हणाले "येसं , आणि माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले लेका तुला भाषेत चांगलीच गती आहे की"
मी अचानक झालेल्या स्तुतीने गांगरून गेलो आणि बोट दिले कि हात पकडण्याच्या लोचटपणे म्हणालो
"हो सर मला भाषा विषय फार आवडतो. सर तुम्हाला मीच तयार केलेलं एक कोडे सांगू? ओळखा बरे"
"कोडे? अरे वा वा हो सांग" ते बिचारे कुतुहलाने म्हणाले.
आता माझे भाषेचे प्रभुत्व दाखवण्या साठी मास्तरला म्हणालो
"सर या वाक्याला समानअर्थी वाक्य सांगा: 'अशोकसर ब्रम्हचारी नाहीत'.
"म्हणजे??"
मला वाटले सर हिंट मागताहेत मग मी म्हणालो सर हिंट सांगतो. याचा सम्बन्ध आपल्या शाळेतील कुणाशी तरी आहे अर्थात मला पाटीशी म्हणायचे होते.
आता मात्र नयन बाई च्या नावाने जेव्हढे सर तेजस्वी दिसत होते त्याच्या उलट अशोकसर चे नाव घेताच ते काळे ठिक्कर पडले मग हळू हळू तांबडे होत रागावले आणि जोरात डरकाळी फोडून म्हणाले "तरी मला शंका होतीच ही, कसला आलाय 'ब्रम्हचारी' हरामखोर एक नंबरचा डांबिस. मला माहिती आहे तुला तुझ्या आयुर्वेदिक डॉक्टर काका कडून कळलं असणार नाही तरी तिथेच बसून अभ्यास करतोस न तू. आता कळले कुठले काढे घोटून पितो तो बदमाश"
आता मला वाटले सर बुद्धिमान असतील आणि कोडे डिकोड करत माझ्या उलट आधी "अशोकसर पाणी नाहीत" पासून "ब्रम्हचर्य हेच जीवन" इथ पर्यंत येवून ठेपतील पण हे तर भलतेच काही बोलायला लागले आहेत. सर अचानक असे वेड्या माकडा सारखे वागू लागले म्हटल्यावर माझी तर भीतीने बोबडीच वळली आणि मी तुफान घरा कडे धूम ठोकली.
दुसर्या दिवशी शाळेत काही विलक्षण घटना घडल्या. दुपारी १२ च्या सुमारास मधल्या सुट्टीत अचानक गलबला झाल्याने सारेच विध्यार्थी पुतळ्याच्या दिशेने धावले. बघतात तर काय अशोकसर आणि गुंजोटी सर यांची जोरदार कुस्ती चाललेली. आधी सूचना न देता असा सामना कसा काय आयोजित झाला याचेच मला आश्चर्य वाटले. त्यातच दोघाही सराना इतक्या अप्रतिम शिव्या देता येतात हे पहिल्यांदाच कळले. बर्याच वेळ दोघांनी एकमेकांना चांगलेच बुकलून काढल्यावर अचानक रसभंग करणाऱ्या प्रेक्षका प्रमाणे पी टी चे नवे दांडगे सर पळत येवून मध्ये पडले आणि दोघांना कॉलर धरून हेडमास्तरच्या खोलीत फरफटत नेले. मग नयन बाई पण हेडमास्तर च्या रूम मध्ये धावत गेल्याचे दिसले. आम्ही सारी हिरमुसली मुले वर्गात गेलो.
दुसऱ्या दिवशी शाळेत नोटीस फिरली की दोन्ही सर बडतर्फ का काय झाले आहेत म्हणे. दुपारच्या तासाला अधून मधून हुंदके देणाऱ्या नयन बाईनी चित्रा साठी खालील विषय दिले:
१) नकळत घडली चूक
२) दिल दिया दर्द लिया
३) जालीम ही सारी दुनिया
४) प्रेमाचा त्रिकोण
आता यातला एक ही विषय न झेपल्याने माझा मित्र ढोर्याने नेहमी प्रमाणे डोंगरातून उगवणारा सूर्य आणि चारच्या आकड्याचे बावळट कावळे काढले. मी मात्र प्रामाणिकपणे "नकळत घडली चूक" हाच विषय निवडून अप्रतिम चित्र काढले. त्यात मी शाळेचा दर्शनी भाग दाखवला होता. काही किड्या सारखे दिसणारे गोळे म्हणजे अंगठे
धरलेली मुलं दाखवली होती. मागे तो हात वर केलेला भयंकर पुतळा दाखवला होता आणि नकळत चूक म्हणून मागच्या पाटीवर "पाणी हेच जीवन" असे वाक्य टाकले आणि ती पुरेशी चूक न वाटल्याने पुतळ्याच्या तोंडातून डॉक्टर काका ना दाखवतात तशी "वॅsss क्क" जीभ काढली होती.
आता माझे चित्र पाहून मलाच हसू आले
"खिssss क्क"!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीवन म्हणजे पाणी? मग अमजद खान म्हणजे काय लोणी?>>>>> Lol सॉलिड हसायला आलं हा वाचला तेव्हा.
भारी आहे सगळा लेखच! Lol
मी अशाच टवाळ पोरांची म्हणून फेमस असलेल्या शाळेत शिकलोय त्यामुळे टोटली रिलेट करता आलं.

जीवन म्हणजे पाणी? मग अमजद खान म्हणजे काय लोणी?>>>>> हाहा सॉलिड हसायला आलं हा वाचला तेव्हा.>>>+१ एकदम ख्खिक्क झालं.

मस्त, खुप दिवसांनी निखळ विनोदी वाचायला मिळाले मायबोलीवर.+++१०००००००

खुप निखळ आणि अस्सल विनोदी.

जबरदस्त ! भयंकर कंट्रोल ठेवावा लागला ऑफिसमधे वाचताना, खिक्क करावेसे वाटत होते सारखे

क ह र .............................._____________/\_______________

Pages