बबनचा ब्रेन आणि त्याचा ब्रेन वॉश

Submitted by सखा on 13 December, 2015 - 16:49

तुम्हाला सांगतो इंजिनीरिंगच्या दिवसात माझा मित्र बबन हा फारच इन्टरेस्टिंग माणूस होता. "हमसे दिलचस्प कभी सच्चे नहीं होते है अच्छे लगते है मगर अच्छे नहीं होते है…" ही जावेद अख्तरची मी तोंडपाठ केलेली कविता बबन मला भेटला की हमखास म्हणायला लावायचा. ती म्हणे त्याला कुठे तरी आत भिडायची. खर म्हणजे बबन्या देखील अजिबात सच्चा वगैरे नव्हता किंबहुना चतुर लबाड होता. सगळयांना सुबक शेंड्या लावणारा बबन मला मात्र कधी मधी चहा पाजायचा. "यार ये कविता मेरे जिंदगी कि कहाणी है और तेरा आवाज अमिताभ जैसा है" असं बबन्या एका दमात म्हणायचा तेव्हा चहाचे पैसे जरी बबन देत असेल तरी आपल्या एकमेव रसिकाला चहाच्या आधी मिसळ पाव विकत घेण्याचे आपले कर्तव्य मी विसरत नसे. अरे कादिर भाई जरा दो मिसळ पाव देना पहले हैSSSSS " ! अशी आमच्या मते अमिताभच्या आवाजातली है-कारांत ओर्डर कादिर भाई साक्षात मनमोहन देसाई असल्या सारखे प्रेमाने घेत.
एकदा एका नवशिक्या ट्राफिक पोलीसने लुनाला दिवा नाही म्हणून पकडले तर बबन्याने त्यालाच ट्राफिक पोलिसचे एकसे एक चावट जोक सांगितले. हसणारा पोलिस पावती कशी फाडेल? अजिबात अभ्यास न करणे, कॉप्या करून सामुहिक पास होणे (ग्रुप activity) , मित्रांच्या प्रेमप्रकरणात पोस्टमनचे काम करून त्यांच्या मोठ्या उधाऱ्या गाफील क्षणी माफ करून घेणे, कोलेज बुडवून पतंग उडवणे, कधी मधी थेटरवर ब्ल्येक ने एक दोन तिकीटे विकून पुढच्या सिनेमाची सोय करणे, मित्राच्या गाड्या पेट्रोल संपायचा किंचित आधी परत आणून देणे आदी गुण असले तरी केवळ विनोद बुद्धी आणि मदत करण्याच्या स्वभावा मुळे बबन सर्वाना हवा हवासा वाटत असे, थोडक्यात काय तर विद्यार्थीदशेत बबन हा अत्यंत उपद्व्यापी आणि उत्कृष्ट मनुष्य होता. बबन्या म्हणजे हसून हसून पुरेवाट. जगातल्या सर्व दुख्खा वर एकच रामबाण उपाय बबन असं आमच्या साऱ्या मित्रांचं मत होतं. बबनचे किस्से आजही आम्ही मित्र भेटलो कि आठवतो कधी मधी मुंबईला गेलो कि त्याला खास जेवायला घेवून जातो. दिवार मधला छोटा अमिताभ जसे फेकलेले पैसे उचलत नाही तसा बबन आजही कधीच बिल देत नाही (फक्त वाढवतो, असो) . आम्ही मित्र बबन्याचे नौकरी आणि संसारातील भीम पराक्रम मन लावून ऐकतो आणि पोट फुटे पर्यंत हसतो . शालेय पुस्तकाचा अभ्यास न करता माणसांचा केल्याने साहजिकच बबन आज एका फार मोठ्या कंपनीत सेल्स मधील बडा आणि यशस्वी अधिकारी आहे … नव्हे होता.
अगदी एक वर्षा पर्यंत त्याचं मस्त चालले होते. अचानकच एक दिवस आमचा एक कॉमन मित्र भेटला त्याने मला सुचवले कि मी बबन ला ताबडतोब भेटावे कारण बबन हा अचानकच अत्यंत बोर माणूस झाला आहे आणि त्याची नौकरी देखील जाण्याच्या मार्गावर आहे.
बबन्या आणि बोर मनुष्य? शक्यच नाही. मला संस्कृत येत नाही अथवा मुंगी का मेरु पर्वत कधी गिळेल? जानव्ही का कधी बाळंत होईल? भारताची ट्राफिक का कधी सुधारेल? अशा आशयाचे मी सुभाषित इथे तुम्हाला नक्की ऐकवले असते म्हणजे तुम्हाला मला किती मोठा धक्का पोहोचला आहे हे तुमच्या लक्षात आले असते. असो.
मुंबईत जेव्हा बबन हॉटेलात आला. एक ही अनुद्गार न काढता त्याने मला वाकून नमस्कार केला. मी म्हणालो अबे भणजाळला का? पाया काय पडतोस साल्या?
त्या वर बबन म्हणाला -
"मित्र गुरु समान आणि तू तर माझा महागुरू!"
"असं कोण म्हणतं?"
"व्ही ए माय गुरु"
आता हा कोण ब्रेन वॉश बाबा बबन ने धरला आहे हे मला कळेना पण आता हा पेशंट समजून घेण्या साठी जरा धीराने घ्यावे लागेल हे मला लक्षात आले. आपल्या सेलफोन कडे नजर खिळवून बसलेल्या बबन ला मी म्हणालो:
"बबन स्कॉच की व्होडका?"
"मठ्ठा"
"अबे माठ झालास का?"
" बटर मिल्क ह्याज ४० केलोरिज… पाणी म्हणजेच जीवन.
आरोग्यासाठी करा सेवन"
"बबन्या अबे तुला झालंय काय?? काही इंटरेस्टिंग बोल की लेका"
"ओके ऐक मग
-मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम.

-शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन.

- सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड )
-सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
-सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस.
"बबन्या हे इंटरेस्टिंग?? हे असलं ऐकण्या साठी मी बिल नाही भरणार" या वर बबन म्हणाला
"अन्नदान से बडा पुण्य कोई नही होता, माझी माणसं हीच माझी श्रीमंती आजचे बिल मी देणार"
"हे पण तुझे गुरु व्ही ए का? अबे साल्या काही धीनचक जोक सांग हे काय पांचट नाटक लावलं आहेस?"
"सांगतो हा ताजा आहे, पुण्यात पाणी बचतीचा उपाय सापडला -
जन्मतारीख सम असणाऱ्यांनी सोमवार,बुधवार आणि शुक्रवारी अंघोळ करायची
आणि विषम असणाऱ्यांनी मंगळवार,गुरुवार आणि शनिवारी अंघोळ करायची
रविवारी कोणीच अंघोळ करायची नाही."
आता मात्र बबन ला बडवून काढावे असे वाटू लागले फुलपाखराचे सुरवंट झाले कसे?
मग अचानक माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. बबन सारखा त्याच्या सेलफोन कडे पाहत होता. व्ही ए म्हणजे "व्हाटस app" आणि अत्यंत बोरींग ग्रुप जॉईन केल्याने साहजीकच सततच्या संत वचनांच्या आणि बोरिंग माहितीच्या भडीमाराने बबन चा पार पांचट मनुष्य झालेला आहे. मी ताबडतोब बबन्याचा सेलफोन घेतला आणि त्याचे काही अती सज्जन आणि कायम गोडबोले ग्रुप डिलीट करून टाकले. बबनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण "मी अहिंसा हेच जीवन" असे म्हणाल्या मुळे त्याला काहीच करता आले नाही. मुकाट्याने बिल देवून बबन घरी गेला. काल बबन्याचा दोन आठवड्यानी फोन आला होता मागचे बिल स्वतः भरल्याचा त्याला पश्चाताप झाला आहे त्या मुळे मी पुन्हा मुंबईला येवून त्याला पार्टी द्यावी असे त्याचे म्हणणे होते. आनंद आहे याचाच अर्थ तो पुन्हा नॉर्मलत्वा कडे वाटचाल करीत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पण मस्त Happy

आम्ही व्हॉटसपवर कॉलेजातल्या संतसज्जन मित्रांना सुधरवतोय आणि हा तुमचा बबन्या स्वतःच बिघडत होता. Happy

:). :). Happy

दिवार मधला छोटा अमिताभ जसे फेकलेले पैसे उचलत नाही तसा बबन आजही कधीच बिल देत नाही (फक्त वाढवतो, असो) >> मस्त!! Happy

छानच. Lol