The dog returns to its own vomit.

Submitted by Rajesh Kulkarni on 13 December, 2015 - 13:18

The dog returns to its own vomit.
.
मायकेल पॅलीन या ब्रिटीश विनोदी अभिनेत्याच्या जगाच्या सफरीसह बीबीसीबरोबर केलेल्या अनेक मुशाफि-या प्रसिद्ध आहेत. मुळात विनोदी अभिनेता असल्यामुळे त्याचे सादरीकरणही फारच सुरेख असते.

जगातील सुंदर रेल्वे प्रवासांपैकी एक अशा इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडमधील रेल्वेप्रवासावर आधारित एक डीव्हीडी पाहण्यात आली.

त्याच्या पूर्वजांचा शोध आयर्लंडमध्ये घेत असताना तो एका छोट्या गावात पोहोचतो. पुढचा रेल्वेप्रवास सुरू करण्यास थोडा वेळ असतो, म्हणून तो तेथील एका जुन्या प्रसिद्ध लेखिकेला भेटायला जातो. मॉली कियान (Molly Keane) असे तिचे नाव.

तिच्या काळात स्त्री लेखकांबाबत बराच भेदभाव केला जात असल्यामुळे तिला पुरूष टोपणनाव घेऊन कसे लिहावे लागले याचे ती वर्णन करते. ती सांगते, की तिने इतके लिहिले, तरी तिने कधीही तिचे आधीचे लेखन पुन्हा वाचले नाही. असे का, असे मायकेलने विचारल्यावर ती बायबलमधील एक वचन उद्धृत करते. “The dog returns to its own vomit”.

उत्सुकता म्हणून या वचनाचा पुढला भाग पाहिला तर खालील वाक्प्रचार पहायला मिळाले.
As a dog returns to his vomit, so a fool repeats his folly.
As a dog returns to his vomit, washed pig returns to the mud.

याच सफरीत मायकेलला स्टीपलचेस या स्पर्धेच्या उगमाबद्दल माहिती मिळाली. आयर्लंडमधील एका चर्चमधून दुस-याकडे पोहोचण्याच्या दोघांमधील स्पर्धेत मध्ये अनेक टेकड्या, नाले, वगैरे येत असत. त्यावरून आधुनिक स्टीपलचेस हा क्रीडाप्रकार उदयास आल्याचे कळले.

याच सफरीत मायकेल नॉर्दर्न आयर्लंडमधील हिंसाचाराबद्दल सांगतो. रस्त्यावरून जाताना बेलफास्टमधील एक हॉटेल दाखवतो. त्या हॉटेलचे वैशिष्ठ्य काय, तर जगातले सर्वात पुन:पुन्हा बॉंबिंग होणारे हॉटेल. कमाल आहे की नाही!

डब्लिन ते बेलफास्टमधील रेल्वेलाइन आयआरएचे (आयरिश रिपब्लिकन आर्मी) बंडखोर वारंवार बॉंबने उडवून देत असत. डब्लिन ही स्वतंत्र आयर्लंडची राजधानी, तर बेलफास्ट ही ब्रिटिशांच्या ताब्यातल्या उत्तर आयर्लंडची. या बॉंबिंगचा निषेध म्हणून १९८९मध्ये दोन्ही बाजूंकडील विचारवंत एकत्र आले. त्यांनी एका दिवसासाठी ती ट्रेन भाड्याने घेऊन प्रवास केला आणि ही रेल्वे उखडण्याचे उद्योग त्यांना मान्य नाहीत हे आयआरएला सुनावले. अर्थातच आयआरएने त्यांची टिंगल केली. या प्रवासादरम्यान बॉब ठेवल्याची अफवा पसरवून त्यांना घाबरवण्याचाही प्रयत्न झाला. तरीही आयआरएचे हिंसक मार्ग पाहता या लोकांचे हे धैर्य लक्षात राहिले. ही घटना तशी फार जुनी नाही.

मायकेलच्या अशा सफरींमध्ये अशी अनेक मौक्तिके मिळतात. पण ही पोस्ट मॉलीच्या The dog returns to its own vomit या खास वचनासाठी.

आपल्याकडे या गोष्टींचे कशाशी साधर्म्य दिसले तर तो योगायोग खचितच नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग. पॅलिन बद्दल माहीत नव्हते, त्यामुळे ती सिरीज ही अजून पाहिलेली नाही. आता पाहण्याची उत्सुकता आहे.