शरद जोशी - एक कळकळीचे पर्व

Submitted by Rajesh Kulkarni on 12 December, 2015 - 13:15

शरद जोशी - एक कळकळीचे पर्व
.

शेतक-यांचे हित कशात आहे हे अगदी शास्त्रीय पद्धतीने सांगणा-या शरद जोशींचे निधन ही फार दु:खद घटना आहे. इतका कळवळा असणा-या व्यक्तीला कमीत कमी महाराष्ट्रातल्या शेतक-यांचेही भक्कम पाठबळ मिळू नये ही शोकांतिका आहे. त्यांच्याऐवजी राजू शेट्टी यांच्यासारख्या निव्वळ ऊसाचे राजकारण करणा-या नेत्याकडे शेतकरी चळवळीचे नेतृत्व जाणे ही केवळ दक्षिण महाराष्ट्रातील राजकारणाची प्रतिक्रिया होती. त्यातून शेतक-यांचे किती खरे भले होत आहे याबद्दल कधी बोलले जातच नाही. आज राजू शेट्टी मारे ते त्यांचे गुरू आहेत असे सांगत आहेत, पण शरद जोशींचा वारसा त्यांना सांगायचा असेल तर त्यांना स्वत:चे कार्य फार विस्तृत करावे लागेल. शिवाय आपल्या आंदोलनामध्ये वाहने जाळणे वगैरे प्रकार करणा-या राजू शेट्टींनी त्यांना आंदोलनाचा मार्ग शरद जोशींनी दाखवला असे म्हणणे अतिशय गैर आहे.

राष्ट्रीय पातळीवर, कमीत कमी उत्तर भारतातील शेतक-यांचे नेतृत्व महेंद्रसिंग टिकैत यांच्यासारख्या केवळ परंपरावादी व आधुनिक काळाचा गंधही नसलेल्या नेत्याकडे जावे, पण जोशींना तो मान मिळू नये हे शेतक-यांचेच दुर्दैव होते.

त्यांनी शेतक-यांचे भले व्हावे म्हणून जीवाचे रान केले, तरी कृषी उत्पन्न बाजार समिती या गोंडस नावाखाली शेतक-यांचे शोषण करणा-या यंत्रणांसारखी एक संस्था ते बंद करू शकले नाहीत, हे त्यांचे अपयश होते असे म्हणण्यापेक्षा राज्यातले राजकारणी कसे पोहोचलेले आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, तेच सिद्ध होते.

शरद जोशींच्या कार्याचा पराभव महाराष्ट्रात ज्यांनी शेतक-यांचे कल्याण होण्याऐवजी केवळ शेतीचे राजकारण करण्यासाठी केला, त्या पवारसाहेबांनी स्वत:ला आपल्या भाटांकडून जाणता राजा असे बिरूद लावून घेतले. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात अशा पवारांबरोबर काम करावेसे त्यांना वाटणे हे न पटणारे होते. पण तोपर्यंत ते फार सक्रीय नव्हतेच, त्यामुळे फार फरक पडला नाही.

आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यामध्ये त्यांच्या चळवळीचा पराभव करणारे राजकारणीच आघाडीवर असतील व हे काम ते अगदी निर्लज्जपणे करतील यात शंका नाही.

पण त्यांना अपेक्षित असलेले बळीराजाचे राज्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात येऊ शकले नाही तरी शरद जोशींच्या कार्याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. त्यांच्या कार्याचे महत्त्व न जाणणारे आपण करंटे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरद जोशींना विनम्र श्रद्धांजली. त्यांच वय ८१ होतं. समृद्ध जीवन जगलेत.

शरद खूप छान लिहिले आहेस पण शेतकर्‍यांची मने त्यांनी जिंकली होती आणि शेतकर्‍यांचा त्यांना बर्‍यापैकी पाठिंबा होता. श

शरद जोशींना श्रद्धांजली. शरद जोशींचे कार्य, त्यांनी उभारलेली संघटना, शेतकर्‍यांची स्वतःची स्वत:च्या हितासाठी व तत्कालिन आर्थिक/राजकीय मतांवर (कम्युनिस्ट-समाजवादी-भांडवलशाही अशा ढोबळ तक्त्यात त्यावेळच्या सर्व चळवळी विभागल्या होत्या) न आधारलेली चळवळ हे सर्वच मोठे काम आहे.

त्यांना श्रद्धांजली देताना इतर लोकांवर अस्थायी टिका करण्याची गरज नव्हती. शरद जोशींची संघटना सर्व शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व करु शकली का, त्यात अंतर्गत मतभेद, शेतकरी संघटनेची राजकीय गणिते वगैरे अनेक गोष्टी चळवळीस मागे ओढण्यास कारणीभूत ठरल्या.

>>
आज राजू शेट्टी मारे ते त्यांचे गुरू आहेत असे सांगत आहेत, पण शरद जोशींचा वारसा त्यांना सांगायचा असेल तर त्यांना स्वत:चे कार्य फार विस्तृत करावे लागेल.
>>
आपण राजु शेट्टींचे शिवार ते संसद पुस्तक वाचावे. आज नाही तर गेली अनेक वर्षे राजु शेट्टी शरद जोशींना गुरु मानत आहेतच. एखाद्याला गुरु मानले तरी गुरुविरोधात जाणे काही अनैतिक नाही.

शरद जोशींना श्रद्धांजली. शेतीला मिळणार्‍या सबसिडीचे मिथक अभ्यासपूर्ण पद्धतीने खोडून काढत ते. सरकारी बाबूंना मिळणारा भरमसाट पगार याविरुद्ध ते तेव्हाही लिहित. आता तर सातवा वेतन आयोग आला आहे, तो महाराष्ट्रातही यथावकाश येइलच, मग महाराष्ट्र सरकार करते काय याचे उत्तर "लोकांकडून कर घेणे, तो पगार म्हणून वाटून टाकणे व उरलेल्या चिल्लर पैशात इकडे तिकडे किरकोळ विकासकामे करणे" असे द्यावे लागेल.

एक मूलगामी विचार देणारा अभ्यासक गेला.

मा. शरद जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टण्या +१
यातल्या मुद्यांना उत्तर देण्याची ही जागा आणि वेळ नव्हे.

आजपर्यंतचे श्रद्धांजलीपर लेख आणि कुलकर्णींचा लेख यात तुलना नको. त्यांच्या माबो-वॉलवरील लेख कसा असावा हे ठरवण्याचे अधिकार परमेश्वराला देखील नसावेत.

मयेकर, हा निव्वळ श्रद्धांजलीचा लेख नाही. त्यांच्या जाण्यामुळे आपण काय गमावले आणि त्यांच्या उत्तुंग कामाचे त्यांच्या हयातीत चिज कसे झाले नाही किंबहुना कसे होऊ दिले नाही हे सांगण्याचा हेतु आहे.

<<आणि त्यांच्या उत्तुंग कामाचे त्यांच्या हयातीत चिज कसे झाले नाही किंबहुना कसे होऊ दिले नाही हे सांगण्याचा हेतु आहे.>>
----- त्यान्च्या कामाचा आढावा घेतला असता तर जास्त रुचले असते. मयेकर यान्च्या मताशी सहमत (पण मला येथे वाद नव्हता उपस्थित करायचा).

यथावकाश श्री. गन्गाधर मुटे हे त्यान्चा कामाचा विस्तृत आढावा घेणार असतीलच. त्याची वाट बघतो.

मा. शरद जोशी साहेबांना विनम्र श्रद्धांजली
शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शरद जोशी साहेबांचे आज (१२-१२-२०१५) सकाळी 9 वाजता पुणे येथे दुखद निधन....
मा. शरद जोशी साहेबांना विनम्र श्रद्धांजली
मा. शरद जोशी यांचा जीवनपरिचय
अधिक माहिती http://www.sharadjoshi.in/jivanpat

: शोकसंदेश :

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त झालेले बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, अशी दृढ प्रतिज्ञा करून संपूर्ण देशातील शेतीच्या कर्जमुक्तीची स्वप्न बघणारा एक युगपुरूष आज आपल्यापासून काळाने हिरावून घेतला आहे. देशातले संपूर्ण शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त न होताच शेतकरी संघटनेच्या प्रणेत्याला डोळे मिटून घ्यावे लागले, ही बाब अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

"शेतकरी तितुका एक एक" अशी शिकवण देणार्‍या या शेतकरी नेत्याने शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला आणि शेतकर्‍यांच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करून त्याग करायलाही शिकवले. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने व सुखाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा सूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेवर वाटचाल करून त्यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आता शेतकर्‍यांनी कटीबद्ध झाले पाहिजे. हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

अंत्यसंस्कार : दिनांक १५/१२/२०१५ मंगळवारला त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या अंतिम इच्छेचा सन्मान राखून पुणे येथेच “वैकुठ” मध्ये त्यांची प्दिवंगत पत्नी आणि दिवंगत आईच्या स्थळाशेजारीच अंतिम संस्कार करण्यात येतील आणि त्याच दिवशी दर्शनासाठी ठेवला जाईल. दर्शनाचे स्थळ नक्की झाल्याबरोबर कळवण्यात येईल.

तरी पाईकांनी मंगळवारी सकाळपर्यंत पुण्याला पोचावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

- गंगाधर मुटे
महासचिव, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा

khup Great manus, samnya mansanbaddal prachanda asta
Bhavpurna shradhanjali "RIP"

१९८० च्या दशकात दोन शरद अतिशय लोकप्रिय होते. पैकी शरद जोशी यांचे चित्र तर अनेक लग्न समारंभात लग्नपत्रिकेवर छापले जायचे.

साधारणपणे तडजोडी न करणार्‍या व्यक्तींच्या वाट्याला जी उपेक्षा येते ती शरद जोशींच्या वाट्याला आली असे वाटते. पुरस्कार आणि पदांपेक्षा शेतकरी नेत्याची शेतकर्‍यांनीच केलेली उपेक्षा हा माझ्या मते त्यांच्या वाट्याला आलेला वाईट भाग असावा.