सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

Submitted by मार्गी on 11 December, 2015 - 00:23

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

दुसरे शतक. . .

१६ जानेवारी २०१४ ला सिंहगडावर जाऊन आल्यानंतर पुढे सायकलिंग सुरू ठेवलं. १९ जानेवारीला पुण्यात धायरीहून हायवेमार्गे चाकणला सायकलवरून गेलो. आणि ह्याच राईडच्या मध्ये जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आला- “गूड न्यूज" ह्याच राईडमध्ये कळाली! जीवनात एक नवीन पर्व सुरू होत आहे! आणि ह्या क्षणीसुद्धा सायकल सोबत आहे! आता अर्धशतक अगदीच सोपं झालं आहे. चाकणवरून परत जाताना आळंदी- विश्रांतवाडी रस्त्याने गेलो. पुण्याच्या अगदी जवळा असूनही हा एकदम शांत रस्ता आहे. सायकलवर फिरताना कित्येक सुंदर व माहित नसलेले रस्ते कळत आहेत. ह्याच सुमारास सायकलचं पहिलं सर्विसिंगसुद्धा करून घेतलं. तसं सायकलला आजवर काहीही झालेलं नाहीय. हजार किलोमीटरपेक्षा जास्त चालवूनही काहीही झीज झालेली नाहीय. असो.

काही दिवस नियमित सायकल चालवली. मोठ्या नाही पण छोट्या- पंधरा- वीस किलोमीटरच्या राईड करत राहिलो. पण परत गॅप पडणारच होती. काही दिवस सायकल चालवता आली नाही. आता मोठ्या राईडची इच्छा होते आहे. आता वाटत आहे की, अजून एक शतक करायला हवं. पहिलं शतक करून कितीतरी महिने झाले आहेत. अर्धशतक तर बरेच झाले, त्यांना मोजणंही सोडून दिलं आहे. पण दुस-या शतकाची अजून प्रतीक्षा आहे. त्यासाठी एका राईडची‌ योजना बनवली. आणि अशा योजना बनवणे हा मनाच्या आवडीचा खेळ असतो! डे ड्रिमिंग! योजना बनवतानाचं गणित वेगळंच असतं. जी योजना बनवली होती, ती आठवली की अजून हसू येतं! इतकं सायकलिंग केल्यानंतर आणि सायकलिंगमधला वेग व प्रक्रिया ह्याची‌ माहिती होऊनही तेव्हा एक हास्यास्पद योजना बनवली. विचार केला की सरळ द्विशतक करावं. पुण्यातून महाबळेश्वरला जाऊन परत यावं. जाताना एकशेदहा होतील व जाऊन- येऊन द्विशतक होईल! त्यामध्ये कंटिंजन्सी‌ प्लॅन हासुद्धा ठेवला की, जर येताना थकलो तर बस किंवा जीपने येईन! पण प्रत्यक्षात जे झालं ते अगदी वेगळं होतं!


जातानाचे चढ- उतार

८ फेब्रुवारीच्या सकाळी निघालो. मस्त थंडीमध्ये सायकल सुरू केली. लवकरच एनएच- ४ वर पोहचलो. इथे सुरुवातीला थोडा चढ आहे. कात्रजचा नवीन बोगदा पार करेपर्यंत एक छोटा चढ लागतो. काहीही त्रास न होता आरामात हा चढ पार झाला. एका तासात बारा किलोमीटर झाले व कात्रज बोगदा ओलांडला. बोगद्यातून सायकल चालवणे हा जबरदस्त अनुभव आहे. जितक्या वेळेस बोगद्यातून जातो, तितक्या वेळेस तो नवीन वाटतो. पहिल्या बारा किलोमीटरनंतर आता जवळजवळ पंचवीस किलोमीटर हलका उतार आहे. हळु हळु पुण्याजवळची ट्रॅफिक कमी होत गेली. हायवेवर अर्थातच ट्रॅफिक सुरूच होती. आजूबाजूला सुंदर नजारे दिसत आहेत. सिंहगडही वेगळ्या कोनातून दिसतोय. किंचित उतार असल्यामुळे चालवताना अडचण आली नाही आणि तीन तासांमध्ये ४५ किलोमीटर अंतर कापलं. पुणे जिल्हा संपून सातारा जिल्हा सुरू झाला.


नीरा नदी

इथपर्यंत वाटत होतं की, महाबळेश्वरला जाता येईल. "फक्त" ६५ किलोमीटर तर राहिले आहेत! पण ४५ किलोमीटर ओलांडल्यानंतर हलका चढ सुरू झाला व वेग मंदावला. एका तासात जेमतेम दहा किलोमीटर आणखी पुढे जाता आलं. अर्धशतक तर झालं, पण त्याला चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. आता दुपारचं ऊन सुरू होतं आहे. बघता बघता मन बदललं. इथूनच परत जावं असं वाटायला लागलं. तसंही बॅक ऑफ द माइंड माहिती होतंच की, महाबळेश्वरला जाणं इतकं सोपं नसणार. इथून पुढे आधी खंबाटकी घाट लागेल आणि नंतर महाबळेश्वरचा घाट लागेल जो सिंहगडापेक्षा कमी नाहीय. अशा वेळेस जे व्हायचं ते झालं. क्षणात मनाने आणि मग सायकलनेही यु- टर्न घेतला.

आज द्विशतक वगैरे काही होत नाही हे निश्चित झालं. पण आज शतक होईल हेही नक्की झालं. कारण अर्धशतक झाल्यानंतर परत फिरलो आहे. परत निघाल्यानंतर थोडं रिलॅक्सही वाटलं की, चला आता सरळ घरीच पोहचेन. मन अगदी उटपटांग असतं. मोठ्या मोठ्या उड्या मारतं. यु- टर्न घेतं! परत फिरल्यावर पहिले दहा किलोमीटर सहज जाऊ शकलो. येताना इथे हलका चढ होता जो जाताना उतार बनला. परत सातारा जिल्हा क्रॉस करून पुणे जिल्ह्यात गेलो. आत्तापर्यंत ७० किलोमीटर पूर्ण झाले असतील. आता इथून पुढे सलग पंचवीस किलोमीटर चढ आहे. घाटाइतका तीव्र चढ नाही, पण सलग चढ आहे. त्यामुळे सायकलचा वेग जेमतेम दहा किलोमीटर ताशी असेल.


धाराऊमातांचं स्मृती स्थळ!

राईडचा सगळ्यात कठिण टप्पा आला. हे पंचवीस किलोमीटर पूर्ण करायला तीन तास लागले. मध्ये मध्ये थांबावं लागलं. मोबाईलच्या मॅपमध्ये सारखं बघत गेलो की, कुठे पोचलो आहे, अजून किती अंतर बाकी आहे. एक एक किलोमीटर खूप मोठं वाटलं. शारीरिक व मानसिक दृष्टीने हे अंतर सगळ्यात अवघड वाटलं. दिलासादायक बाब एकच होती की, जेव्हा हे पंचवीस किलोमीटर संपतील, तेव्हा सरळ अकरा किलोमीटरचा उतार मिळणार आहे. थोडसंच, अजून थोडं पुढे, असं स्वत:ला समजावत पुढे जात राहिलो. त्यावेळेस मूळ योजना आठवली की खूप हसू येतं होतं. हळु हळु उतार सुरू होणारं स्थान- कात्रज टनेल जवळ येत गेलं. जसं टनेलमध्ये शिरलो, तसं पेडल मारण्याची गरज तात्पुरती संपली. आता फक्त लक्षपूर्वक वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे. चढावाचा त्रास सहन करून झाल्यावर मोठ्या उताराचं टेन्शनही गोड वाटतं.


परततानाचे चढ- उतार

सुमारे अकरा किलोमीटरचा उतार संपल्यानंतर घर जवळ आलं. अर्थात् आता शेवटचा एक चढ बाकी आहे- डिएसकेचा छोटा क्लाइंब. पण राईड संपण्याच्या आनंदात तोही सायकलवर बसून पार केला. अर्थात् त्याच्या आधी खाली परत एक ब्रेक घ्यावा लागला. अशा प्रकारे दुसरं शतक झालं. सुमारे ११२ किलोमीटर सायकल चालवली. द्विशतक नाही, पण ही राईडही मोठी झाली. वाटेत ३ आणि २ ग्रेडचे चढ होते. सुमारे ४०% रस्ता हलक्या चढाचाच होता. अशा चढाच्या रस्त्यांवरही शतक करू शकतो, असा आत्मविश्वास आला. जर स्टॅमिना चांगला नसेल आणि नियमितता पुरेशी नसेल, तर अशी मोठी राईड सगळी ऊर्जा शोषून घेते. आणि घेणारच. कारण जर आपण चार किंवा आठ दिवसांचं काम एकाच दिवसात केलं, तर पुढचे काही दिवस शरीराला फक्त आरामच करावा लागेल. त्यामुळे ह्या शतकानंतरही परत काही दिवस गॅप पडली. छोट्या छोट्या राईडसही करता आल्या नाहीत.

पुढील भाग १०: एक चमत्कारीक राईड- नर्वस नाइंटी!

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> डे ड्रिमिंग! योजना बनवतानाचं गणित वेगळंच असतं. जी योजना बनवली होती, ती आठवली की अजून हसू येतं! इतकं सायकलिंग केल्यानंतर आणि सायकलिंगमधला वेग व प्रक्रिया ह्याची‌ माहिती होऊनही तेव्हा एक हास्यास्पद योजना बनवली. विचार केला की सरळ द्विशतक करावं. <<<<
आहाहा, आख्ख्या वाक्याशी सहमत... (मी तर हे डे ड्रिमिन्ग करीत डायरेक्ट द्विशतकी बीआरेमलाच उतरतो, Proud अन गणित फिस्कटल्यावर मुकाट माघारी परततो मधुनच - पण काय करणार? आदतसे मजबुर.. अन माझ्याकरता तेच गरजेचेही)

>>>> कात्रजचा नवीन बोगदा पार करेपर्यंत एक छोटा चढ लागतो. <<<<<
इथवर चांगलेच "बनचुके" बनलात की सायकलिंगमधे ... Wink अहो या कात्रजचढानेच आजवर माझा घात केलाय. Sad पण एक ना एक दिवस मी त्याला फाट्यावर मारणारच.

एकुणात् छान लिहिलय. सर्व रस्ता माहितीचा असल्याने वर्णन परिचयाचे वाटतय. फोटोही छान. मुख्य म्हणजे शेवटच्या त्या परतीच्या टप्प्यातिल पंचविस किमिमधे दमुनहि फोटो काढण्याइतपत उत्साह व एनर्जी होती हे विशेष.

सायकलिंगला मेंटल गेमही का म्हणतात हे त्या २५ किमी मधेच कळले असेल. कुठुन अवदसा आठवली अन इकडे आलोय असे होऊ लागते, मन अगदी निराश हताश एकटे एकटे होते. थोडा वेळच असते अशी स्थिती. पण ती असते अन तिच्यात अडकुन चालत नाही. तसेच पुढे पुढे रेटत न्यावे लागते. वेळेस सायकल हातातुन न्यावी लागते. हातातुन नेताना खूप लाजही वाटते. (मला तरी वाटते बोवा..). पण थोड्या वेळाने मनात निसर्गाचे व अन्य विचार आणुन मन शांत झाले की परत उमेद जागते. अर्थात "शरिर" कोलॅप्सच झालेले असेल (त्याची कारणे व उपाययोजना केदारच्या लेखांमधे मिळतील) तर त्या उमेदीचा उपयोग फक्त घरी "हसतमुखाने" परतण्याइतपतच होतो.
पण काही म्हणा, फार मजा येते. काही दिवस गेले मधे, की पुन्हा सुरसुरी येते... असेच बाहेर पडायचि.

लेख आणि फोटो इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद काका! Happy

तुम्ही चिंचवडवरून २५-३० किलोमीटर करून येत असल्यामुळे तुम्हांला कात्रज चढ त्रास देत असणार. तुम्ही कमी अंतर चालवून चढलात तर सोपा जाईल. Happy