शापित गड भाग ७ अंतीम

Submitted by श्रीमत् on 8 December, 2015 - 04:55

शापित गड सर्व भाग एकत्रित इथे वाचता येतील.

शापित गड भाग १ http://www.maayboli.com/node/49017
शापित गड भाग २ http://www.maayboli.com/node/51000
शापित गड भाग ३ http://www.maayboli.com/node/51077
शापित गड भाग ४ http://www.maayboli.com/node/52056
शापित गड भाग ५ http://www.maayboli.com/node/56667
शापित गड भाग ६ http://www.maayboli.com/node/56688

कथा टाकण्यास विलंब झाल्यामुळे मायबाप वाचक नाराज झालेत असं दिसतय, आज शेवटचा भाग प्रसारीत करताना फार बरं वाटत आहे. झालेल्या विलंबाद्दल माफी असावी. आपला श्रीमत्.

हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.....
..

मंत्राच्या उच्चारणानेच मला जाग आली. मान जाम दुखत होती. सहज हात हालवायला गेलो तर कळालं हात पाय घट्ट बांधलेत. आजुबाजुला गडद अंधार होता तर समोरच वेताळाची शेंदुर लावलेली भडक मुर्ती डोळे आवासुन आमच्याकडे पाहात होती. समोर लावलेल्या दिव्यामुळे तर ती अजुनच गुढ वाटत होती. मी झटकन वळुन भिवाला शोधण्याचा प्रयत्न केला तर चार डोळे माझ्याकडेच खुनशी नजरेणे भाला रोखून पाहात होते. बाजुलाच भिवा माझ्यासारखाच असहायपणे बेशुध्दाअवस्थेत पडला होता. थोडक्यात काय तर आता खेळ संपला होता. आमच्या घरच्यांना कळनार सुध्दा नव्हत कि आमच्या बरोबर नक्की काय झाल. आणि आरोही, ती कशी काय अचानक गायब झाली? काहीच कळायला वाव नव्हता. काय झाल तिच्याबरोबर? की तो आमचा फक्त भास होता? का एखादी चाल आम्हाला यात अडकवण्यासाठीची. नाही ति अस करणार नाही. नक्कीच या हरामखोरानेच काहीतरी केल असणार. आम्ही असहायपणे त्या मंदीरात जायबंदी होऊन पडलो होतो. आता फक्त मेलेल्या कोंबडी सारखी वाट बघायची भट्टीत जायची.

बाहेर मंदीरासमोर किर्रर्र काळोखात होमातुन दाट ज्वाला येत होत्या, तर होमासमोरच समर वर्मा सर्व वस्त्र काढुन एका रिंगणात बसुन मंत्रोच्चारण करत होता. होमाच्या धगीने त्याचं संपुर्ण शरीर लालबुंद होऊन घामान डबडबलं होतं आपले तीक्ष्ण डोळे त्याने वेताळावर रोखुन धरले होते. तर बाजुची भुतावळ आपल्या माना खाली घालुन एका विशष्ट लयीत फेर घालत होती. प्रत्येक शब्दागणिक त्याच्या मंत्राची धार आता वाढु लागली होती. म्हणजेच त्याची पुजा आता उत्तरार्धाकडे पोहचली होती. समर वर्मा ने मंत्रोच्चारण करता करताच हाताने काहीतरी खुण केली. तस मंदीरातल्या सैनिकांनी भिवाला खांद्यावर उचलला आणि ते बाहेर घेऊन गेले. भिवा अजुनही बेशध्द अवस्थेत होता. पण जसा त्याला होमाजवळ नेला तस धगीमुळे तो जागा झाला. आणि बाजच द्रुश्य पाहुन त्याच उरल सुरल बळसुद्धा निघुन गेलं. त्याला राहुन राहुन त्याच्या पोटुश्या बायकोची आठवण येऊ लागली. पण आता समर्पण करण्याशिवाय काहिच पर्याय नव्हता. पहिला बळी बाहेर आणल्यामुळे सारी भुतावळ आनंदाने जल्लोष करु लागली डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम........... सैनिकांनी भिवाला दोरखंडातुन मुक्त केल आणि भाले रोखुन त्याला त्या रिंगणात बसवलं. मंत्राचा आवाज आता जोरात घुमु लागला होता. पडलेला वारा पण आता काहीतरी अमानवीय पाहायला मिळणार म्हणुन घोंघावत वाहु लागला. वार्यामुळे झाडांच्या फांद्या सुध्दा अस्ताव्यस्त झालेल्या केसांप्रमाणे उडत होत्या. तर जंगलातुन प्राण्यांचे विव्हळने चालु झाले होते.

हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.......

मी आत मध्ये शक्तीहीन अवस्थेत वेताळाच्या मुर्तीकडे पाहात होतो. आणि हळुच माझ लक्ष आरोही ने दिलेल्या अंगठीकडे गेलं आणि तिचे शब्द आठवले. मी महतप्रयासाने माझे बांधलेले हात धोतराच्या पिरवटात लपवलेला माझा स्वीस नाईफ बाहेर काढला आणि दोन्ही हाताच्या पकडीत आडवा पकडुन दाताने खोलला मग पायात पकडुन आधी हाताची रशी खोलली मग पायाची. दोन्ही सैनिक मगाशीच भिवाला बाहेर घेऊन गेल्यामुळे आत कोणीच नव्हत. बाजुलाच भिवाच आवरण त्याला उचलताना त्यातील वजणामुळे खाली पडल होतं. आता माझ्या कानातही तोच मंत्र वाजु लागला होता. ज्या वेताळाच्या उपासनेसाठी हे सर्व चालल होतं त्याच वेताळाचा आशीर्वाद घेऊन मी रागातच त्या आवरणातल डुकराचं मुंडक बाहेर काढुन डाव्या हातात धरल तर उजव्या हातात ति कुपी पकडली. बाहेर पडलो तेव्हा समर वर्माने आपला अंगठा कापुन त्याच रक्त भिवाच्या कपाळाला लावल. तस त्या दोघांपैकी एकाने भिवाचे दोन्ही हात पकडुन त्याला वाकवल तर दुसर्या ने कमरेचा धारधार सुरा आपल्या हातात घेतला. आता मंत्राचे आवाज अजुन जोरात घुमु लागले होते.

पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.......

त्याच शेवटच वाक्य पुर्ण होणार इतक्यात मी जोरात आरोळी ठोकली. "तुला बळी हवाय ना हा घे बळी.............." मी हातातली कुपी जोरात त्या रिंगणात आपटली व हातातली अंगठी समोर रोखुन धरली. कुपी फुटल्यामुळे एक उग्रसा दर्प त्या वातावरणात पसरला त्या वासामुळे व अंगठीच्या सामर्थ्यांमुळे सारी पिशाच्चे शक्तिहीन झाल्याप्रमाणे वागु लागली तसा भिवा झटकन माझ्या बाजुला येऊन उभा राहिला. पंडीत उर्फ समर वर्मा ना त्या वासाला घाबरत होता ना अंगठीला. तो त्याच्या धगधगत्या डोळ्यातुन अक्षरशः आग ओकत मंत्रोच्चारण करत होता. जणु त्याला हेच म्हणायच होत कि कोणीच माझ काहिच उखडु शकत नाही. मी जराही वेळ न दवडता एकदा मंदीरातील वेताळाकडे पाहिल आणि कुत्सित पणे हसून ते मुंडक होमात फेकलं तसा स्फोट व्हावा त्याप्रमाणे ज्वाला भडकल्या आणि आम्ही दोन-तीन फुट लांब पडलो. समर वर्मा तर गुर हंबरतात तसा ओरडु लागला आणि क्षणात वादळ याव त्याप्रमाळे वारा सुटला. धुळीचा जोरात लोट आला. बाजुला सर्व जग गोल गोल फिरतय अस वाटु लागल आणि मध्येच पंडीत पाच सहा फुट हवेत वर उडुन जोरात जमीनीवर त्याच रिंगणार आदळला. त्याचे शेवटचे शब्द आमच्या कानावर पडले "स्सोडणार नाही........................................!"

सप्पकन कोणीतरी पाण्याचा सपका तोंडावर मारला तशी जाग आली. डोळे उघडले तर ठाकरवाडीतली पोर आम्हाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. हातापायातल बळच गेल होतं त्यांनी आणलेल पाणी पिल्यानंतर थोडी तरतरी आली. भिवा आणि पंडीतची अवस्था पण काही वेगळी नव्हती. ठाकर वाडीत आल्यावर भिवाला पाहुन त्याच्या बायोकोच्या जिवात जीव आला. रडुन रडुन डोळे सुजले होते बिचारीचे. पंडीतचं सर्व अंग ठणकत होत त्याला रात्रीच काहीच आठवत नव्हतं आम्ही त्याला विचारल कि "तू तिथपर्यंत पोहचलास तरी कसा?" त्यावर त्याने सांगितल की, "मला तूच तर आवाज देऊन बोलावलस मग मी तुला शोधत आवाजाच्या दिशेने वाड्याच्या मागे गेलो तर तु मला पळत खाली जाताना दिसलास म्हणुन मी सुध्धा पळत तुझ्या मागे खाली आलो. तर तु पटकन काळोखात दिसेनासा झालास. तुला शोधत मी सुध्दा त्या काळोखात खाली उतरुन गेलो तेव्हा एका दालनात मला चमचमता प्रकाश दिसला, मी कुतुहलाने आत शिरलो तर समोर एका भव्य दिवानावर भरजरीत पोशाख ठेवला होता. त्याच्या बाजुलाच एक तलवार ठेवलेली आढळली. मी गंमत म्हणुन सहजच त्या पोशाखातला मुकुट डोक्यावर घातला आणि ती तलवार उचलली तशी वीज सरकावी त्या प्रमाणे एक कळ माझ्या डोक्यातुन सर्व शरीरात भिनली त्यानंतरच मला काहीच आठवत नाहीये." सारी ठाकरवाडी तिथे आम्हाला बघायला लोटली होती. मग त्या पोरांनी आम्हाला सांगितल. रात्री कसे चित्र-विचित्र आवाज येत होते. मग सकाळीच ते आमच्या शोधात वर गेले तर वर फक्त् एक बिना मुंडक्याचा डुक्कर त्यांना दिसला आणि वाड्यात आमच्या बॅगा सापडल्या. मग कुणीतरी सुचवल कि रातच्याला येताळाच्या हितन कसल-कसल भयानक आवाज येत व्हतं तिकड धुंडुया. म्हणुन तुमची कापड आणि बॅगा घिऊन तिकड आलो तर ह्ये साहेब बिगर कपड्यात पडले होते, तर तुम्ही दोघे नुस्त्या धोतरावर बेसुद पडला व्हता. भिवाच्या घरी थोडी न्याहारी केल्यानंतर त्याचा निरोप घेऊन आम्ही तेथुन निघालो. निघताना बॅगेतले थोडे पैसे त्याच्या हातावर ठेवले तर पठ्ठया घेइना म्हटल, ठेव बाळंतपणात कामी येइल. तस त्याने साश्रु नयनांनी मिठी मारली आणि मलाही मग माझे अश्रु लपवला आले नाहीत. नाही म्हणता एका रात्रीत हा कोण कुठचा ठाकर पोरगा सख्या भावापेक्षा जवळचा झाला होता. त्याला लवकरच परत येइन म्हणत निरोप घेतला. एव्हाना आमची बातमी सार्या ठाकर वाडीत पसरली होती. सारी ठाकर वाडी आम्हाला निरोप द्यायला रस्त्यापर्यंत आली. भिवाचा बापपण त्यात होता. कालचा हाच विक्षिप्त म्हातारा आज मात्र समधानाने हात जोडुन उभा होता. पुंडलिकच्या दुकानापाशी गेलो तर दादोसा त्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन आमची वाट पाहात उभा होता. तिथे पुन्हा परत सर्व कथा कथन झाल्यानंतर आम्ही निघता निघता. त्या दोन सापळ्यांविषयी त्याला माहिती दिली. म्हटल पोलीसांना कळवा. जर ते त्याच फॉरेनर्सचे असतील तर त्यांच्या ऍंबेसीला तरी रीतसर कळवतील. जमल्यास पुरातत्व खात्याला पण कळवा, वर अशा भरपुर गोष्टी आहेत ज्या त्यांना संशोधनाच्या कामी येतील. मला आता कधी एकदा घरी जातोय अस झाल होतं. यावेळीही दादोसानेच त्याच्या फटफटीवरुन आम्हाला त्या फाट्यावर सोडलं आणि आमचा निरोप घेऊन निघुन गेला. पंडीत साहेबांच्या काहीच लक्षात नसल्यामुळे तो संमिश्र विचारात गुंग होता. पण माझ मन मात्र वर गडावरच अडकल होतं आरोही पाशी. ती डोक्यातुन जाता जाईना. काल सकाळी जाताना ज्या दिशादर्शकावर हार्ट मध्ये जे बी.ए. लिहल होत ते माझ्यासाठी होत वाटत. "भास्कर लव्ह्स आरोही" मी अनामिकेतील अंगठीचे चुंबन घेत पुटपुटलो माझ्या विचाराने मलाच हसु आलं. इतक्यात आमची एस.टी धुरळा उडवत आमच्या समोर येऊन उभी राहीली. आम्ही दोघेही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामळे काल पासुन बंद असलेले आमचे मोबाईल बाहेर काढुन त्यात गुंग झालो. मी सहज मेसेजेस चेक करत असतानाच आईचा कॉल आला गेली पंधरा मिनिटे मी फक्त हा..हु..हा..हुच करत होतो. आता तुम्हाला कळालच असेल ति काय बोलली असेल ते. फोन ठेवल्या ठेवल्या फेसबुकचा नोटीफिकेशन मेसेज आला. सहज चेक करायला गेलो तर डोळे मास्क मधल्या जिम कॅरी सारखे मोठ्ठे होऊन बाहेर येतायत का अस वाटल. मेसेज होता आरोही वर्मा सेंट यु अ फ्रेंन्ड रिक्वेस्ट. तर इकडे पंडीत कानाला इअर फोन लाऊन हसत ह्सत कसल्यातरी ओळी गुणगुणत होता.

हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.......

समाप्त
मंत्र संदर्भ (शिव पुराण : वेताळ उपासना )
वरील कथेतीलल सर्व व्यक्ती, घटना, स्थळ पुर्णपने काल्पनिक असुन काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

मायबोली संकेतस्थळासह http://shrimat.blogspot.in/2015/12/blog-post_7.html प्रकाशित.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

ओ, हा अंतिम भाग कसा? Uhoh आम्हाला पुढची पण कथा पाहिजे बा! Happy जी जास्त इंटरेस्टींग असणार आहे.