निकोल किडमन

Submitted by Rajesh Kulkarni on 5 December, 2015 - 15:45

निकोल किडमन ही बुद्धिवंत अभिनेत्री आहे.

ती केवळ शोभेची बाहुली नाही हे तिने तिच्या अभिनयाने अनेकदा सिद्ध केले आहे. ती ५२ वर्षांची आहे हे आज सुहेल सेठने हिंदुस्तान टाइम्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिची मुलाखत घेतली तेव्हा कळले. तिच्या बोलण्यातून तिची विचार करण्याची क्षमता स्पष्ट दिसली.

शाळेतल्या नाटकातली तिची पहिली भूमिका एका बकरीची होती असे तिने गंमतीने सांगितले. ख्रिस्ताच्या जन्मावरील का नाटकामध्ये सगळ्या भूमिका कोणी करायच्या हे ठरले होते. तरीही तिने फारच हट्ट केल्यावर तिला बकरीची भूमिका करता येईल असे तिला सांगितले गेले, त्यामुळे पूर्न नाटकभर मधूनमधून बेंऽऽबेंऽऽ करण्याएवढेच काम होते

तिचे वडील बायोकेमिस्ट व मानसोपचार तज्ज्ञ होते. मागच्या वर्षी तिचे वडील वारले, तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी कितीतरी अनोळखी लोक तिला भेटले. तिच्या वडलांनी चाकोरीच्या बाहेर जाऊन त्यांना कशी व किती मदत केली, त्यामुळे त्यांच्या आपल्या आयुष्याला कसे चांगले वळण मिळाले, त्यातल्या काहींचे प्राण वाचले, अशा अनेक आठवणी त्यांनी तिला सांगितल्या. माझ्यासमोर त्यांचा आदर्श आहे, त्यामुळे मीदेखील जमेल तशी लोकांना मदत करते असे ती म्हणाली.

किती पैसे मिळतात हा सिनेमा स्विकारण्याबाबतचा माझा निकष कधीच नव्हता असे ती म्हणाली, त्यामुळे इतर अभिनेत्यांना किती पैसे मिळतात याकडे मी कधीच लक्ष देत नाही असे ती म्हणाली. मात्र हॉलिवूडमध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनियरची मागच्या वर्षातली कमाई ही तेथील टॉपफाइव्ह अभिनेत्रींच्या एकूण कमाईपेक्षाही जास्त आहे या वास्तवाकडे तिचे लक्ष वेधले असता तिने कोणाला किती मिळतात यापेक्षा ही विषमता नाहीशी करण्याची गरज असल्याचे सांगितले.

तिची स्वत:ची गुलाबाची बाग आहे. ती स्वत: तिची देखभाल करते, त्यामुळे ते गुलाब तिचे स्वत:चे आहेत असे ती अभिमानाने सांगू शकते.

पुनर्जन्म असेल तर तिला काय व्हायला आवडेल असे विचारले असता शास्त्रज्ञ व्हायला आवडेल असे ती म्हणाली. शांतपणे संशोधन करत जग बदलून टाकण्याची क्षमता त्यांच्यात असते, ती मला नेहमी भावते असे ती म्हणाली. माझा स्वभाव अंतर्मुख होणारा आहे. त्यामुळे मी जेव्हा एक्स्ट्रोव्हर्ट लोकांना पाहते तेव्हा मला त्यांच्या त्यातल्या सहजतेचे नेहमी कौतुक वाटते. तेव्हा पर्याय असेल तर पुढच्या जन्मी मला तसे आयुष्य जगायलाही आवडेल असे तिने सांगितले.

स्टॅन्ले कुब्रिक हा तिचा सर्वात आवडता दिग्दर्शक आहे असे ती म्हणाली. ब-याचदा प्रत्येक दिग्दर्शकाची प्रतिभा शिखरावर असण्याचा काळ हा दोन ते चार वर्षांइतकाच असतो, पण कुब्रिकचा त्याला अपवाद होता व त्याची प्रतिभा शेवटपर्यंत टिकलेली दिसली. काम करण्याच्याबाबतीत तो बहुतेकांना अवघड वाटे, पण मला तो अगदी नॉर्मल वाटला. असे ती म्हणाली. त्यानिमित्ताने कुब्रिकचे एक वाक्य आठवले, ‘If something could be written or thought, then it can be filmed.’

चित्रपटसृष्टीतील मतभेदांबद्दल ती म्हणाली की अखेर हा सृजनाचा विषय आहे, त्यामुळे त्यावर काम करताना मतभेद होणारच. हे लक्षात आल्यामुळे ती मतभेद विसरायला आणि लोकांना माफ करायला शिकलेली आहे. जोपर्यंत हे मतभेद सिनेमाचे प्रॉडक्ट चांगले बनण्याच्या दिशेने किंवा उद्देशाने असतात, तोपर्यंत त्यांचे स्वागतच करायला हवे असे ती म्हणाली.

गेल्या काही दशकांमध्ये माहिती तंत्रज्ञान बदलेलेले आहे. मात्र त्यामुळे माणसे आणखी जवळ येण्याऐवजी सबंधांमधला स्पर्श हरवलेला आहे आणि येत्या काळात हे कोठपर्यंत पोहोचेल याचा विचार करताना काळजी वाटते, असे ती म्हणाली.

मुलाखतीनंतर तिला विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न असा होता की आणखी वीस वर्षांनी तू कोठे असलेली तुला पहायला आवडेल? ती म्हणाली की मी जिवंत असलेली पहायला आवडेल. आजवरच्या आयुष्याला छोट्या-छोट्या घटनांमुळे इतकी वेगवेगळी वळणे मिळाली आहेत, की आत यापुढचा प्रत्येक दिवस ही देणगी वाटते, असे ती म्हणाली.

दुस-या का प्रश्नात तिला विचारले की बॉलीवूडमधले सिनेमे हॉलीवूडसारखे कधी होऊ शकतील का? त्यावर तिने प्रतिप्रश्न केला की तुम्हाला खरेच तसे होऊ द्यायचे आहे का? प्रत्येक देशाने आपापल्या संस्कृतीतून आलेला आपला सिनेमा टिकवला पाहिजे असे तिने आवर्जून सांगितले.

ऑस्ट्रेलियाबद्दल तिला असलेला अभिमान तिच्या बोलण्यातून लपून रहात नाही. आणखी एक गोष्ट तिच्या बोलण्यामुळे कळली ती म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये क्रिसमस उन्हाळ्यात येतो. आपल्याला सिनेमांमधून तो बर्फवृष्टीतला पहायची सवय असते.

निव्वळ कचकड्याच्या चमकणा-या आणि ब-याचशा बिनडोक बाहुल्यांपेक्षा निकोलसारखे स्वत:चा विचार करू शकणारे कलाकार काय म्हणतात ते ऐकायला बरे वाटते.

+++++++++++++++++++++++

सकारात्मक कमेंट्स करणा-या सदस्यांसाठी निवेदन:

गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर मायबोलीच्या काही सदस्यांनी निव्वळ टवाळखोरी चालू केलेली आहे. एखाद्याने विषयाला सोडून कमेंट करणे व इतरांनी मग त्यावर पुढे तशाच कमेंट करणे असा प्रकार चालू आहे. येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. काही जण मी लिहूच नये किंवा दुसरीकडे कोठे तरी लिहावे असा आग्रह अजुनही धरत आहेत. यातला विकृत आनंद व त्यातून मिळणारे समाधान त्यांना जरूर मिळू देत. काही सदस्य मात्र विषयाला धरून कमेंट करत असतात व मी काहीवेळा त्यांच्याशी त्यांच्या मतांबद्दल चर्चाही करतो. परंतु येथे टवाळखोरी इतकी वाढलेली आहे की मला अशा सकारात्मक कमेंट शोधणेच अवघड होऊन बसते आहे.

तेव्हा सकारात्मक कमेंट्स करू इच्छिणा-या सदस्यांना माझी विनंती आहे, की ऍडमिनने अशा टवाळखोरीच्या विकृतीचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट करू नये. आपण माझ्या पोस्ट वाचण्यासाठी वेळ दिलात एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे व त्यासाठी मी आपला आभारी आहे. कमीत कमी मी तरी कोणत्याही कमेंटची नोंद घेऊ शकणार नाही.

मायबोली हे इतर काही संस्थळांप्रमाणे टवाळखोरांचा अड्डा नाही अशी माझी समजूत असल्यामुळे मी येथे लिहित राहिलो आहे. मी कोणाच्याही पोस्टवर जाऊन घाण करत नाही, इतरांकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आले आहे. या बाबतीत मी व्यक्तीश: फार काही करू शकत नसल्यामुळे हे निवेदन करत आहे.

वास्तविक या टवाळखोरांपैकी एकहीजण माझ्या पोस्टकडे फिरकला नाही तरी मला काडीचाही फरक पडत नाही. परंतु येथे त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांना त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे आहे. या प्रकारातून मायबोलीची प्रतिष्ठा वाढणार असेल तर त्यांनी तसे जरूर करत रहावे. माझी हरकत नाही. तेव्हा टवाळखोरांनो, वर म्हटल्याप्रमाणे तुमची विकृती येथे जरूर दाखवा. तुम्हाला कसलेही भय नाही. तुम्हाला कसलीही लाजलज्जा असेल याची मला अपेक्षाही नाही. तेव्हा तुमचे चालू द्या. उलट हे निवेदन पाहिल्यावर तुम्ही आणखीच चेकाळाल याची मला खात्री आहे.

यापुढे येथील माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी हे निवेदन टाकत जाणार आहे.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे निवेदन पाहिल्यावर-------
नाही तसं काहीही होणार नाही.तुमच्याकडे विषयलेखनाची विविधता आहे तसेच पाल्हाळीक न लावण्याची कला आहे.इथे एक वाचक म्हणून आल्यावर आणि सदस्य म्हणून वाचक होऊन आल्यावर दोन्ही भूमिका कराव्या अशी अपेक्षा असते-आपले नवीन लेखन आणि इतरांना प्रतिसाद.हे एकप्रकारचे कधीकधी विरंगुळापेक्षा कर्तव्य ठरू शकते कारण यांपैकी एक गोष्ट दुसरीपेक्षा अधिक चांगली अवगत असू शकते.स्वसंपादन आणि स्वप्रकाशन या दोन पैलूंमुळे सदस्यांचा एखादा गुण अवगुण म्हणून इतरांना वाटू शकतो परंतू त्यासाठी त्यास गप्प करणे उचित ठरत नाही.लिहित रहा.

कुलकर्णी साहेब, यात तूम्ही तूमची मते काहीच लिहिली नाहीत. त्या मुलाखतीचाच गोषवारा दिला आहेत. तिच्या एखाद्या भुमिकेबद्दल तूम्हाला काय वाटते ते लिहिले असते तर...

असो, दक्षिण गोलार्धातील सर्वच देशांत उन्हाळ्यातच नाताळ येतो. यात ऑस्ट्रेलियाबरोबर न्यू झीलंड, आफ्रिकेतील केनयाच्या दक्षिणेचे सर्व देश, दक्षिण अमेरिकेतील सर्व देश येतात. ( मी पण सध्या दक्षिण गोलार्धातच आहे. आमच्याकडे सध्या वसंत ऋतू आहे, आंबे पिकायला लागलेत. गुलमोहोर, ताम्हण फुललीय, कडुनिंबाला बहर आलाय... आणि पाऊसही भरपूर पडतोय !!! )

अ‍ॅज पर विकी, निकोल किडमनचं वय ४७ आहे, ५२ नाही. (१९६७ बॉर्न). बायकांना आपलं वय वाढवून सांगायला आवडत नाही तेव्हा हे खरं असावं.

मुलाखतीचा गोषवारा छान Happy

दिनेशदा + १
ऑस्ट्रेलियात समर चालूये (सदर्न हेमिस्फिअर... )

आमच्याकडे सध्या वसंत ऋतू आहे, आंबे पिकायला लागलेत. गुलमोहोर, ताम्हण फुललीय, कडुनिंबाला बहर आलाय

आणी कुहु कुहु करणारी कोकिळा ? आमच्या लहानपणी मराठी निबंधात पावसाळ्यात हिरवा शालू नेसलेली स्रुष्टी व वसंतात कोकिळा नसल्यास एकेक मार्क कट व्हायचा.

<<<<<<आणखी एक गोष्ट तिच्या बोलण्यामुळे कळली ती म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये क्रिसमस उन्हाळ्यात येतो>>>>>

राकुं ना ऑस्ट्रेलियामध्ये क्रिसमस उन्हाळ्यात येतो हे निकोल किडमन मुळे कळले. धन्य ते राकू

निव्वळ कचकड्याच्या चमकणा-या आणि ब-याचशा बिनडोक बाहुल्यांपेक्षा>> हे कोणाला उद्देशुन आहे
आणि हे
निकोलसारखे स्वत:चा विचार करू शकणारे कलाकार काय म्हणतात ते ऐकायला बरे वाटते.> कोणाला उद्देशुन आहे काही बोध होत नाही

विकु, कोकिळा नाही हो आमच्याकडे .. कुठे मिळतात त्या ? ( मला माहिती आहे कुण्णी कुण्णी उत्तर देणार नाही मला )

मुक्तेश्वर.. ते बहुदा मेरील स्ट्रीप, जेन फोंडा, जोडी फॉस्टर वगैरेंना उद्देशून बोलत असतील.. त्यांच्या कुठे मुलाखती होतात ?