माहुतनामा (हादगा ४)

Submitted by Arnika on 5 December, 2015 - 08:51

१६.१०.१५
सकाळी खोलीबाहेर आल्यावर डावीकडे पहिले ही हत्तीण दिसते. जायडी. पासष्ट वर्षांची खवीस म्हातारी तिच्या गोठ्यात सगळ्यात आधी उठून बसलेली असते. आल्या दिवसापासून रोज सकाळची कामं झाली की मी तिच्या माहुताबरोबर जाऊन तिला कलिंगडं भरवते. तिला दात नाहीत म्हणून गाल अगदीच खपाटीला गेलेत. भोपळे चावत नाहीत. राणीसाहेबांना सोललेली कलिंगडं आणि निवडलेल्या चिंचा लागतात.

पहिल्यांदा ती हौदाजवळच्या आडोशाला दिसली तेव्हा मी घाबरून लांब राहिले. एकाऐवजी दोन माहुत दिमतीला होते म्हणजे प्रकरण गंभीर दिसतंय असं वाटून मी बराच वेळ लांबूनच तिच्या गालांकडे बघत होते. शेवटी तिच्या माहुताने मला खुणेने जवळ बोलावलं आणि तिच्या गालाकडे खूण करून तिला दात नसल्याचं सांगितलं. कलिंगडाची आणि चिंचेची एक टोपली माझ्यासमोर ठेवली आणि तिच्या सोंडेला गोंजारत तिला भरवायला शिकवलं! जायडी घास चावायला लागली की तिचं बोळकं इतकं गोड फिरतं... पणजी आजी खारीक खाताना तिचे गाल असेच दिसायचे!

छायरात. साधारण पंचेचाळीशीचा आहे हिचा माहुत. माझा इथला खास मित्र! इंग्लिश त्याला येत नाही आणि थाइ मला नाही, पण आमचं तासन्‍तास बोलणं चालतं. घरी कोण असतं, त्याची मुलं-बाळं, बायको, त्याचं गाव आणि त्याचं काम, भारतातले हत्ती, माहुत अशा खूप गप्पा होतात. कशा ते माहित नाही, पण असं न बोलताच बोलणं आवडायला लागलंय मला या प्राण्यांमधे राहून. कारण डोळे खोटं बोलत नाहीत...

त्याच्याबरोबरचा दुसरा माहुत नवीन आहे आणि तो छायरातकडून माहुतगिरी शिकतोय. त्याची मला भीती वाटते. चायनीज सिनेमातल्या कराटे मास्तरासारखी त्याची दाढी आहे; हनुवटीला लांब शेंडी. डोळे सतत झोपाळलेले आणि नजरेला नजर न देणारे. जायडीवरही पट्कन वैतागतो तो! त्याला फार माणसं गोळा झाली की नको वाटतं. मी रोज रोज जायडीची जेवायची वेळ बघून गेलेलं त्याला आवडणार नाही म्हणून तिसऱ्या दिवशी मी पुन्हा हौदाजवळ थांबले. गंमत म्हणजे त्यादिवशी छायरातऐवजी त्यानेच मला बोलावून घेतलं आणि शेजारच्या खुर्चीत बसवलं. लवून कुर्निसात केला!

जायडीला कलिंगड दिलं की ती खूश होते, पण मीठ-साखरेत बुडवून चिंचेचे गोळे दिले की अक्षरशः मिटक्या मारत खाते हे मला कळल्यावर मी जरा तिची लाडकी नात व्हायचा प्रयत्न केला. सोंड पुढे केली की फक्त चिंच द्यायला लागले. टेचात होते मी, कारण आता ती छायरातकडेही बघायची नाही. फक्त माझ्याकडे! काल तिने पुन्हा सोंड पुढे केली आणि मी चिंच देणार इतक्यात दाढीवाल्या माहुताने तिच्या सोंडेवर चापटी मारली. पुढ्यातल्या टोपलीकडे बघून छायरातनेही डोक्याला हात लावला, आणि माझ्याकडून चिंच काढून घेतली. मला कळेचना का ते!

चिंच सारक असते, ती फार खाऊन हत्तींना जुलाब होतात हे सांगायला त्या दोन्ही माहुतांनी केलेल्या खाणाखुणा मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी त्यांच्या हातांचा केलेला आटापिटा, आणि नेमका प्रॉब्लेम कळल्यावर माझे कलिंगडाएवढे झालेले डोळे बघून आम्ही तिघंही हसून थकलो! मी सॉरी म्हणाले; छायरातला सांगितलं की हिला खरंच जुलाब झाले तर हिचा गोठा स्वच्छ करायला मी येईन दोन दिवस. मग दाढीवाल्याने मला दाखवलं. पाच कलिंगडं दिली की एक चिंचेचा छोटा गोळा. जास्त नाही. आज मी दोनदा जायडीच्या गोठ्याजवळून फेरी मारून आले. शेण अत्ता तरी नॉर्मल दिसतंय... हुश्श्श!

या माहुतांचं काम भारी जोखमीचं असतं. खतरनाक. कधी जिवावर बेतेल सांगता येत नाही. बरं नेचर पार्कमधे हातात अंकुश किंवा छडीही नाही. बायका-मुलांपासून एवढं लांब येऊन रहायचं, जे काही पैसे मिळतील ते साठवायचे आणि चार महिन्यातून एकदा गावाकडे न्यायचे. काही न येणारी माणसं मिळेल ते काम करतात, आणि त्यांच्यातल्याही अगदीच काही न येणाऱ्या माणसांचा व्यवसाय माहुतगिरी अशी समजूत असते थायलंड आणि आसपासच्या देशातल्या लोकांची. त्यामुळे पोरगे म्यानमारच्या खेड्यापाड्यातून, थायलंडच्या डोंगराळ गावातून पंधरा-सोळा वर्षाचे असताना थोडे पैसे गाठीशी लागावे म्हणून येतात माहुत व्हायला. काहींना खरंच प्राण्यांचं अतोनात प्रेम असतं, आणि काही नाइलाजाने हे काम करतात, पण काम चोख करतात. ज्यांना घरच्यांबरोबर रहायचंय त्यांच्यासाठी नेचर पार्काच्या पलिकडे माहुतगाव आहे. तिथे त्यांची कुटुंबं रहातात, आणि दिवसा बायका नेचर पार्काच्या स्वयंपाकघरात काम करतात. कधीकधी मला चिंचा निवडायला बसवतात पाटावर त्यांच्याबरोबर... इथे सगळ्यांचाच किती विचार केलाय!

१७.१०.१५
चिडचिड. आज खूप चिडचिड. दुपारी हत्ती नदीत डुंबत होते. आज त्यांनी जरा जास्तच वेळ काढला. पिल्लांचं खेळून झालं तरी आया पाण्यात फद्कल मारून बसल्या होत्या, त्यामुळे छायरात आणि दाढीवाला कंटाळले. बाकीच्या माहुतांनी परतीची वाट धरली तरी यांची इतक्यात सुटका होईलसं दिसेना, म्हणून दोघांचे चेहरे जरा त्रासलेले वाटले.

आम्ही काठावर बघत उभे होतो. माझ्याबरोबर खोलीत रहाणारी हालीनासुद्धा तिथेच होती. या दोन्ही माहुतांकडे बघून ती म्हणाली, “इतका कंटाळा करायचा असेल तर येतात कशाला हे इथे कामाला? मला प्राण्यांचं वेड आहे, प्रेम आहे माझं म्हणून मी आले volunteer करायला. ते पॅशनेट नाहीयेत तर येतातच का?”
खूप राग आला मला. एकतर छायरातला कुणी काही म्हणायचंच काम नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो गेले आठ दिवस जीव ओतून, जीव लावून काम करतोय ते बघूनही या एका मिनिटात ती असं कसं म्हणू शकते? ज्या हत्तिणीने छायरातच्या १७ वर्षाच्या मुलाला सोंडेत धरून, चिडून आदळलं होतं त्याच हत्तिणीच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवत होता तो आज. त्याच्या पॅशनबद्दल तरी कोणीच असं म्हणता कामा नये!
“नाही गं, किती प्रेम आहे त्यांचं हत्तींवर. स्वत:च्या जीवापेक्षा जास्त जपतात हे त्यांना.”
“असं कुठे वाटतंय पण? दिवस संपवायचाय त्यांना फक्त.” हालीना फणकारली.
उगाच शब्दाला शब्द वाढायला नको म्हणून मी छायरातशी बोलायला गेले. हालीनाही मागोमाग आली.
“तुला नाही वाटत अर्निका, असे माहुत नकोत म्हणून? पॅशन नसेल तर हे काम करायचंच कशाला?”
आता माझाही पारा चढला होता. “हे बघ, इथल्या सगळ्यात खास माहुतांपैकी हे दोघं आहेत. आज हत्तिणी खूपच रमत-गमत डुंबतायत म्हणून कंटाळले असतील. म्हणून काही ते पॅशनेट नाहीत असं होत नाही. आणि तू एका गवंड्याच्या ऑफिसमधे सेक्रेटरी आहेस ते काही तुझ्या आयुष्याचं पॅशन नाहीये! पोटापाण्यासाठी करतेसच ना काम? दोन आठवडे आपण येणार, हत्तींना कुरवाळणार आणि जन्मभर जी माणसं त्यांचे नखरे सहन करतायत त्यांच्या पॅशनवर शंका घेणार?”
मी जरा जास्तच बोलले होते बहुतेक. हालीना पुढे दिवसभर माझ्याकडे फिरकली नाही. असू दे. माझंही डोकं फिरलंय; मीही नाही जाणार. आज बाकी काही लिहिण्यासारखंही नाहीये. मरो!
...
सकाळी घडल्या प्रकाराबद्दल चिडून फेसबुकवर काहीतरी लिहावंसं वाटत होतं. माणसं कशी लगेच judgemental होतात, आणि कसं माझंच बरोबर आहे हे बाकीच्यांकडूनही ऐकून घ्यावंसं वाटत होतं, पण इंटरनेटच नव्हतं!

संध्याकाळचा चारा घालायला ट्रक गेला त्यात मी गवताचे भारे भरत होते. हालीनाही आली मदतीला. काहीच न बोलता दोघींनी एकत्र भारे उचलून ट्रकमधे चढवले. मग मानेवर हुळहुळायला लागलं काहीतरी. मी ओरडायच्या आतच हालीनाने माझ्या मानेवरच्या दोन गोगलगायी काढून टाकल्या होत्या. एकमेकींकडे बघून आम्ही लगेच पुढचे भारे घेतले. त्या निढळाच्या वगैरे घामानंतर फाल्तूच्या रुसव्याला वेळच नव्हता. एकत्र जेवलो नेहमीसारख्या, हसत खेळत!

बरं झालं इंटरनेट नव्हतं आज. गोष्टी पट्कन सुटल्या! नाहीतर फेसबुकवर त्या चिघळल्या असत्या आणि मला त्याची मजा येत राहिली असती. जरा काही झालं की त्याबद्दल सतत कुठेतरी काहीतरी ‘म्हणत रहाणारे’ झालोय का आपण? खरंखुरं काम हातात होतं त्यामुळे वाद वाढण्याआधीच गोडीने संपला.

१८.१०.१५

आज मी-सुक नावाची नवी हत्तीण सोडवून आणली या मंडळींनी. ती ट्रकमधून उतरताना बघायला केवढी गर्दी जमली सगळ्या volunteers ची! बिथरली ती जरा. छायरात तिच्या दुखऱ्या पायावरून हात फिरवत होता. माहुतांच्या बाजुला एक बाई चवड्यावर बसली होती. विस्कटलेले केस, मळका चेहरा, भलेऽऽ खणखणीत आवाज आणि चमकदार लहानसे डोळे... म्हंटलं माहुतांच्या बायका येत नाहीत सहसा इथवर! ही कोण हाकारे पुकारे करणारी बोटाएवढी बाई?

मी-सुकला उतरायला अजून तासभर तरी लागेल म्हंटल्यावर गर्दी पांगली. या बाईने उभं रहात बाहीला तोंड पुसलं आणि ट्रकचं दार पुन्हा लावलं. मी तिथेच खिळून होते. एव्हाना खाणाखुणांनी बोलायची सवय आंगवळणी पडल्याने मी हातांनी विचारलं, “तिचा पाय खूप दुखतोय?”
“No, she brave. She will be OK.” ती बाई एका आईचं हसू हसून म्हणाली.

“हिला इंग्लिश बरं येतं?” असा मी विचार करणार इतक्यात दोन मोठ्ठे कॅमेरे आले. चार अमेरिकन माणसांनी तिच्याभोवती कोंडाळं केलं आणि पार्काच्या ‘सर्वेसर्वा’ला ते विचारायला लागले, “Tell us a bit about Mee Suk’s rescue.”

लेक! अर्निके, लेक होती ती! पहिल्या दिवशी कॅमेरात दिसली होती ती वीस वर्षापूर्वीची होती; मी ओळखलीच नाही. आज ती मी-सुकजवळ असताना तेव्हापेक्षाही छोटी, रांगडी आणि तडफदार वाटली. माझ्या एक तृतियांश आकाराच्या माणसासमोर मला याआधी कधीच इतकं ठेंगणं वाटलं नव्हतं. देव पाहिल्यासारखी तिच्याकडे बघत बसले...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! अजून एक सुरेख भाग.
खरंय, सगळं virtually share करण्याच्या नादात आपण त्याच त्याच गोष्टी उगाळत राहतो Sad
लेक ला भेटलीस हे वाचून छान वाटलं Happy

वाह!!!!!! मस्त अनुभव घेऊन आलीयेस.. प्राण्यां व्यतिरिक्त माणसाशी जुळवून घेण्याचं कठीण काम ही छान पार पाडलंस..

आर्निका, एक शंका आहे.
मी सहा महिन्यापुर्वीच श्रीलंकेतील हत्तींच्या अनाथालयाला भेट दिली. तिथे त्यांच्या खाण्यात त्यांचे नैसर्गिक अन्नच देतात. ( त्यात बराचसा पालापाचोळा, कवठाची फळे, केळी, नारळ वगैरे असते. ) त्यात चोथ्याचे प्रमाण लक्षणीय असते. त्याच्या शेणापासून तिथे कागदही करतात. मग या ठिकाणी त्यांना इतकी कलिंगडे का देतात ? ते त्यांचे नैसर्गिक अन्न तर नाहीच शिवाय त्यात चोथाही नाही. हत्तींना चिंच आवडते हे खरे आहे ( अंगोलात ते गोरखचिंचाही खातात ) पण त्यांना निसर्गात ती नेहमीच मिळते असे नाही ( सिझन असेल तेवढ्यापुरत्याच. ) मग इथे एवढ्या प्रमाणात का देतात ?

केनयातले हत्ती तर बाभळीच्या पूर्ण झाडाचाच चट्टामट्टा करतात. पण आफ्रिकन हत्ती हा आशियाई हत्तींपेक्षा वेगळे असतात.

माझ्या एक तृतियांश आकाराच्या माणसासमोर मला याआधी कधीच इतकं ठेंगणं वाटलं नव्हतं. देव पाहिल्यासारखी तिच्याकडे बघत बसले...>> Happy
खुपच सुरेख.

अग्गं बाई!! काय लिहितेस गं अर्निका!!
माणसांच्या जजमेंटल होण्याविषयी काय अचूक लिहिलं आहेस. कमीत कमी शब्दांत पण चपखल!

शेगावीचा तो प्रसंग. हत्तीखान्याच्या वरच्या बाजुलाच आम्ही उतरलो होतो. पुण्याहुन रेल्वेने येताना नाष्टा करण्यासाठी ब्रेड आणले होते. शिल्लक राहिलेले चांगले ब्रेड हत्तीला खायला घालावेत असे ठरले आणि मी व ओसवाल हत्तीखान्यात आलो. मोठा हत्तीच्या समोरुन जाऊन आम्ही पुढच्या लहान हत्तीला आधी ब्रेड खायला दिला याचा राग मोठ्या हत्तीने व्यक्त केला. एक मोठठा आवाज करत त्याने सोंडेने अगदी हलका प्रहार ओसवालांच्या छातीवर केला. माझी तर हवाच गेली होती. पुढच्या क्षणाला तो महाकाय हत्ती शांत होऊन त्याला दिलेल्या ब्रेडचा आस्वाद घेत होता.

जीयो!

लेक हे नाव कसलं भारी आहे! त्यांचं पूर्ण नाव काय आहे?
लहानखुरा बांधा आणि चमकदार डोळे वाचून एकदम आंग सान स्यु की उभ्या राहिल्या डोळ्यासमोर.

Pages