"इंदिरा" ह्या नाटकाच्या निमित्ताने .. एक निर्माता

Submitted by मिलन टोपकर on 5 December, 2015 - 05:47

आपल्या आयुष्यात कुठला ग्रह कसली संधी अचानक आपल्या समोर आणून ठेवील हे सांगणे एखाद्या पट्टीच्या ज्योतिषाला देखील शक्य नाही. पण काही काही योग असे असतात की आपण कल्पनाही न केलेल्या गोष्टी सहज घडून येतात आणि आपण अवाक होत, स्तब्ध होतो.

माझी थोरली मुलगी चैताली आणि तिचा मित्र सुयश पुरोहित ह्यांनी एकत्र काही एकांकिका केल्या होत्या. नंतर ऑगस्ट २०१४ मध्ये चैताली उच्च शिक्षणासाठी परदेशी गेली, तरी सुयशचे आमच्या घरी येणे जाणे चालूच राहिले. त्याची नाट्यक्षेत्रात मुशाफिरी देखील चालूच होती. फेब्रु-मार्च २०१५ मध्ये त्याने उत्साहाने मला बातमी दिली, रत्नाकर मतकरी ह्यांच्या "इंदिरा" ह्या नव्या व्यावसायिक नाटकात त्याला दुहेरी भूमिका मिळाली आहे. ह्या बातमीने त्याला झाला तितकाच आनंद मला देखील झाला. मग तो रिहर्सल मध्ये गुंतून गेला. कधी त्या रिहर्सलच्या गमती-जमती मला सांगायचा. तर कधी सुप्रिया विनोद, विक्रम गायकवाड, नकुल घाणेकर, पूर्वा नीलिमा सुभाष ह्यांच्या सारख्या प्रथितयश कलाकारांबरोबर आणि मतकरी सरांबरोबर काम करताना येणारे दडपण ह्याबद्दल देखील बोलायचं. पण तो खुश होता. आणि मी देखील.

"जुन २०१५ च्या सुमारास "इंदिरा"चा पहिला प्रयोग ठाण्याला गडकरी रंगायतन मध्ये आहे आणि तुम्ही यायलाच हवे" असे तो म्हणाला. दुर्दैवाने नेमकं त्याच दिवशी मला काम निघाले आणि मी शुभारंभाच्या प्रयोगाला जाऊ शकलो नाही. म्हटले दुसऱ्या, तिसऱ्या प्रयोगाला जाऊ.

दोन चार दिवसातच "झी" वर "चला हवा येऊ द्या" मध्ये "इंदिरा" चे लेखक दिग्दर्शक रत्नाकर मतकरी, सुप्रिया विनोद, विक्रम गायकवाड, नकुल घाणेकर वगैरे आले होते. त्यांनी सादर केलेले नाटकातले प्रवेश पाहून मला नाटकाच्या भव्यतेची, त्यातल्या नाट्याची कल्पना आली. हे नाटक बघायलाच हवे असे वाटले. आणि तसे ठरवलेदेखील.

काही दिवसांनी मी सुयशला फोन करून पुढचा प्रयोग कधी आहे ते विचारले. त्याने सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. तो म्हणाला, निर्मात्याने पुढचे प्रयोग करायला असमर्थता दर्शवली आहे म्हणून दुसऱ्या प्रयोगानंतर नाटक बंद पडले आहे. त्याच्या आवाजात खिन्नता होती आणि ती साहजिकच होते. मला देखील शॉक बसला, वाईट वाटले. मात्र ह्या मागचे कारण तो सांगू शकला नाही. सुयशच्या आयुष्यातील ही खूप मोठी संधी होती, ती निसटली असे तर वाटलेच पण शुभारंभाच्या प्रयोगाला जाऊ न शकल्याबद्दल मला खूप चुटपूट लागून राहिली. सुयाशला बसलेला धक्का मलाही जाणवला.

मी त्याला सहज म्हटले, "काय अडचण आहे? शक्य असेल तर मी मदत करतो". सहज बोलताना मी काही फारसा व्विचार केला नव्हता. त्यामुळे पुढे काय घडू शकेल ह्याची मला कल्पना नव्हती. तो "ठीक आहे" असे म्हणाला. पण त्याचा फोन नाही आला. मी एक वकील आहे. नाटकाची आवड वगैरे ठीक आहे, पण मदत काय करू शकेन? असे समजून कदाचित तो गप्पच बसला.

त्याच्याकडून काहीच निरोप नाही म्हणून काही दिवसांनी मीच त्याला फोन केला आणि विचारले "काय झाले? मी मदत करतो म्हणालो तर चालणार नाही का?" त्याला आश्चर्य वाटले. "तुम्ही सिरीयस आहात? खरच interested आहात?" असे त्याने मला भीतभीतच विचारले. मी हसत हसत हो म्हटल्यावर म्हणाला, "मी सुप्रियाताईंना विचारातो. तुम्ही त्यांना भेटायला येऊ शाकाल का? त्यांना विचारतो मग आपण त्यांना भेटूया".

मी तयार झालो आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मी सुप्रियाला भेटलो. त्या वेळी सुप्रियाचे पती, मिलिंद विनोद देखील दुबईहून सुट्टीवर आले होते. त्यांना दोघांना भेटून नाटक बंद होण्याचे कारण कळले. आणि एक चांगले, नव्हे तर जबरदस्त नाटक बंद पडल्याचे किती दु:ख त्यांना झाले आहे हे देखील जाणवले.

नाटक हा माझा वीक पोइंट आहे. पण त्या आवडीची धाव फक्त नाट्यगृहापर्यंतच राहिली होती. चैतालीने सुद्धा फक्त एकांकिकच केल्या होता, पूर्ण नाटक नव्हे. त्यामुळे नाट्य क्षेत्राशी माझा संबंध कधीही आला नव्हता. कलाकारांच्या तऱ्हा, मूड ह्याचे अनेक खरे खोटे किस्से फक्त ऐकलेले होते.

पण सुप्रिया आणि मिलिंदला त्यांच्याच घरी, तेही रात्री १० वाजता भेटण्याचा माझा अनुभव खुप छान होता. म्हणजे, पहिल्याच भेटीत चक्क भारतीय बैठकीवर, मांडी ठोकून, मिलिंदनी आग्रहाने स्वत: करून पाजलेल्या कॉफीचा आस्वाद घेत आमच्या भरपूर गप्पा झाल्या. आणि क्षणार्धात आमच्यातील अनोळखीपणाची भिंत नाहीशीच झाली. कुंडलीच जमली म्हणा ना.

तत्क्षणी "इंदिरा" नाटकासाठी आपण मदत करायलाच पाहिजे असे मला वाटले. पण "आपण रत्नाकर मतकरींना भेटू या" असे मिलिंद म्हणाला आणि माझ्या पोटात गोळा आला. म्हटले, ज्या लेखकाची बालनाट्ये, मग व्यावसायिक नाटके पाहत, कथा, गुढकथा, परीकथा वाचत, अचंबित होत मोठे झालो त्यांना कसे भेटणार? ते कसे ट्रीट करतील आपल्याला? त्यांच्या काय अपेक्षा असतील?

५ ऑगस्टला मिलिंद, सुयश आणि मी मतकरी सरांकडे दादरला त्यांच्या घरी गेलो. आणि ग्रह जुळतात म्हणजे काय ह्याचे प्रत्यंतरच मला आले. पुढच्या २ तासात मी त्यांच्याच घरातला सदस्य आहे असे मला वाटू लागली. म्हणजे ह्यात माझ्या घुसखोरीचा भाग किती हा प्रश्न दुर्लक्षिला तरी प्रतिभा मतकरी आणि रत्नाकर मतकरी ह्यांच्या गोड आगत्याचा आणि आपलेपणाचा भाग होताच. परक्याला, त्यातही एका वकिलाला, आपलेसे करणे, आपले मानाने, त्याच्यावर विश्वास टाकणे असे सहज शक्य नसते, हे मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून सांगतो.

तिथल्या तिथेच ठरले, "इंदिरा"चे प्रयोग लगेच सुरु करायचे. १५ ऑगस्टला मुंबईत माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहात, जिथे नाटकाचा दुसरा तरीही शेवटचा प्रयोग झाला होता तिथेच, नव्याने पहिला प्रयोग करायचा.

सुदैवाने तारीख देखील मिळाली आणि प्रयोग लागला. प्रयोगाच्या तीन दिवस आधी मतकरी काकांची तब्बेत अचानक बिघडली आणि त्यांना दवाखान्यात रहावे लागले. त्यांची देखभाल करायला प्रतिभा काकू होत्या. पण त्यामुळे इच्छा असुनही त्या दोघांना प्रयोगाला येणे शक्य नव्हते.

मी प्रयोगाला जाण्यापूर्वी दवाखान्यात जाऊन मतकरी काकांना भेटलो. त्यांचा आशीर्वाद घेतला. ते म्हणाले, "नाटक न पहाता, संहिता न वाचता तुम्ही ह्या नाटकाच्या निर्मितीसाठी तयार झालात, त्याची कमाल आहे. आज निर्माता म्हणून तुमच्या पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे. Best of luck".

मी काय बोलणार? वाटले सांगावे, तुमच्या लिखाणाची ताकत माहित नसलेला माणूस, मराठी असू शकत नाही. शिवाय १२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या पण आता रंगमंचावर येणाऱ्या ह्या तुमच्या नाटकाचा, आणि ते ही ७५ व्या नाटकाचा, निर्माता मी असावा हा कसला योगायोग? पण नाही बोलालो. त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो.

यशवंतच्या प्रयोगाला प्रेक्षकांची खूप गर्दी होती. नाटकाची जाहिरात, "चला हवा येऊ द्या" मधले आणि वर्तमानपत्रातील परीक्षण सगळ्यांच्या मनात ताजे होते. काहीतरी वेगळे, भव्य पाहायला मिळणार ह्याची खात्री ठेऊन प्रेक्षक आले होते. नाट्यगृहाच्या दरवाज्यात थांबून थांबून फ्लेक्स बोर्डावरचे हुबेहूब दिसणारे इंदिरा, संजय आणि राजोव गांधी ह्यांचे चेहेरे कुतूहलाने पाहत होते.

आणि मी? मी देखील त्याच फ्लेक्स बोर्डवर निर्माता म्हणून माझे नाव पाहताना, आणि तेही इतर निर्माते म्हणून प्रतिभा मतकरी, दिनेश पेडणेकर आणि मुक्त बर्वे ह्यांच्याबरोबर जोडलेले पाहताना मनातून हरखून गेलो होतो.

तीन अंकी महानाट्य डोळ्यासमोर उलगडत गेले आणि मी आणि माझ्या समवेत अख्खे नाट्यगृह थरारून गेले. सुप्रियाची इंदिरा, विक्रम गायकवाडचा संजय गांधी, नकुल घाणेकरचा राजीव गांधी, पूर्वा निलीमा सुभाषची सोनिया, मनाली काळेची मनेका सगळेच आपापल्या भूमिकेत परफेक्ट होते. सुयश पुरोहित, अतुल महाजन, शिरीष घाग, सतीश आगाशे, भूषण गमरे, लीना पंडित, जितेंद्र आगरकर ह्यांनी सुद्धा आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या. "एका वादळाचा नाट्यपूर्ण वेध, अत्यंत वेधक प्रवास" असे महाराष्ट्र टाईम्सने केलेले परीक्षण योग्यच होते.

नाटकात राजकारण अपरिहार्यपणे येते पण हे नाटक राजकारणावर, कॉंग्रेस पक्षावर नसून चरित्रनाट्य आहे. एका स्त्रीची आई, सासू, आजी म्हणून वादळातून प्रवास करताना होणारी घालमेल वेधकपणे चितारणारे हे नाटक आहे. फक्त ती व्यक्ती देशाची पंतप्रधान होती म्हणून राजकारणापासून नाटक वेगळे काढता येत नाही, इतकेच. पण त्यामुळे त्याला वेगळेच परिमाण लाभले. एक समृद्ध नाट्यानुभव घेऊन प्रेक्षक बाहेर पडले.
आणि मी? नाटक संपल्यावर सुप्रिया, सुयशसह मतकरी काकांना भेटायला दवाखान्यात गेलो. काकांनी विचारले कसे वाटले?

मी म्हटले, "जाताना मी फक्त producer होतो, आता मी proud producer आहे. अभिमान वाटावा अश्या एका महानाट्याचा मी इवलासा भागीदार आहे आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे".

ह्याच नाटकाचे दोन प्रयोग पुण्यात बालगंधर्व देखील झालेत. पुण्यातल्या चोखंदळ प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप छान होता.

आता पुढचा प्रयोग १३ डिसेम्बरला कोथरूड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता आहे. मी सगळ्यांना आग्रहाने विनंती करतो, हा नाट्यानुभव जरूर घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अनुभवकथन!
तुमच्या हिंमतीची दाद द्यावी तितकी थोडीच.
पहिल्या निर्मात्याने अचानक नाटक बंद करण्यामागे आर्थिक दडपण होते की राजकीय हे जाणून घ्यावेसे वाटतेय.

अभिनंदन ! हे नाटक बंद पडणं वगैरे बद्दल रत्नाकर मतकरींच्या वॉलवर तसच मटामध्ये वाचलेलं. एक उत्तम नाटक बंद पडतंय याचा विषाद वाटलं होत . पुन्हा नाटक सुरु झालं हे वाचून आनंद झाला. प्रेक्षकांनाही आता नाटक पाहून या धड्पडीला यश द्यावं हि सदिछा

तुम्हाला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

हे नाटक मला पहायचे आहे. मुंबईत जेव्हा असेल तेव्हा नक्की पाहणार.

बाकी तुमच्या लेखामुळे असे लक्षात येते की आर्थिक कारणांमुळे नाटकाचे प्रयोग थांबवले होते. कारण तुम्ही या नाटकाचे सहनिर्माता आहात, हे तुम्ही तुमच्या लेखात नमुद केले आहे.

खुप गोष्टींचा खुलासा लेखामुळे होत नाही. मी आपणास नंतर विपु करेन.

नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

प्रयोगासाठी व पुढच्या यशाकरता शुभेच्छा! लेखही आवडला.

प्रेक्षकांनाही आता नाटक पाहून या धड्पडीला यश द्यावं हि सदिछा >>> सहमत.

मस्त आणि खूप प्रामाणिकपणे लिहिलंय.

अभिनंदन आणि शुभेच्छा! नाटकाला यश मिळो. मुंबईत लागेल तेव्हा नक्की बघेन.

नाटकाचा पहिला प्रयोग थोडक्यात हुकला माझा. या नाटकात काम करणारी पुर्वा निलिमा सुभाष खूप जवळची नातेवाईक आहे. नाटकाचे प्रयोग बंद झाल्याचं कळालं होतं आणि नंतर प्रयोग परत सुरु होत असल्याचंही समजलं होतं. नाटकाचे प्रयोग परत सुरु होण्यामागे तुमची धडपड आहे हे वाचून तुमच्याबद्दल आदर वाटतोय.
पुढिल प्रयोगांसाठी शुभेच्छा. Happy

प्रयोगासाठी व पुढच्या यशाकरता शुभेच्छा! लेखही आवडला.

प्रेक्षकांनाही आता नाटक पाहून या धड्पडीला यश द्यावं हि सदिछा >>> सहमत. >>>>+११११११

दिनांक १३ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेला नाटकाचा प्रयोग पाहिला. सुप्रियाचा अभिनय, तिची संवादफेक सर्वच आवडले. महत्त्वाचे म्हणजे अतिशय विवाद्य विषयावरचे हे नाटक असले तरी कोठेही तोल ढळलेला नाही. नाटकात कसलाही प्रचारकी थाट नाही ते बरंच आहे! इंदिरा गांधींच्या व्यक्तिगत आयुष्यातील वादळी घटना आणि त्याच जोडीला भारतातील राजकारणातील उलथापालथींमधील त्यांची भूमिका या सर्व गोष्टी पाहायला गेलं तर खिळवून ठेवणार्‍या आहेत. एखाद्या महत्त्वाकांक्षी स्त्री सत्ताधीशाची राजकारणी प्रतिमा आणि त्याच व्यक्तीची कौटुंबिक प्रतिमा यांच्यातले द्वंद्वही येथे दिसून येते. नाटकाचे तीनही अंक हां हां म्हणता संपले....

इंदिराजींचा अखेरचा कालखंड - १९८० ते १९८४ - या कालखंडाच्या स्मृती अजूनही माझ्या मनात आहेत. वर्तमानपत्रांतील बातम्या, खलिस्तानची मागणी, ऑपरेशन ब्लू स्टार, त्यानंतरचा हल्लकल्लोळ आणि नंतर शीख समाजात उमटलेली कडवट प्रतिक्रिया... परिणिती इंदिरा गांधींची हत्या! बराच मोठा घटनाक्रम इथे खूप नेटकेपणाने हाताळला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत दुही, खेचाखेची, खुर्चीचे राजकारण, चमचेगिरी कधी सूचकपणे तर कधी संवादांमधून छान दाखवली आहे. त्याचबरोबर इंदिरेनंतर सत्ताधीश कोण, याबद्दल अंदाधुंदी असणे, घराणेशाही जोपासण्याकडे कल.... हेदेखील पुढे येत राहाते. जरी इंदिरा गांधींचे वैयक्तिक आयुष्य व नातेसंबंध, त्यांना पेलावी लागणारी कौटुंबिक वादळे नाटकातून दाखवली गेली असली तरी राजकीय घटनांचे संदर्भ त्याच जोडीने अनिवार्यही आहेत.
भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान, नेहरूंच्या कन्या, महत्त्वाकांक्षी राजकारणी अशा इंदिरा गांधींच्या खाजगी आयुष्याबद्दल जनमानसांत कुतूहल नसले तरच नवल! एक कुटुंबवत्सल स्त्री ही त्यांची जनसामान्यांत असणारी प्रतिमा या नाटकात अधोरेखितच होते. सर्वसत्ताधीश म्हणून एकाधिकारशाही गाजवताना मनात लोकशाहीचे व लोककल्याणाचे स्वप्न बाळगणारी, भोळ्याभाबड्या जनतेच्या आपल्यावरील प्रेमाबद्दल विश्वास असणारी इंदिरा येथे सामोरी येते. परंतु उदात्त स्वप्ने पाहात असताना स्वतःच्याच सत्ता मनोर्‍यात कैद झालेले तिचे असहाय एकाकीपण व त्यातून उध्वस्त होत जाणारी इंदिराही विषण्ण करत जाते.

नाटकातील प्रत्येक कलाकाराने मनापासून अभिनय केला आहे. सर्वांनीच मेहनत घेतलेली जाणवते. हे नाटक निश्चितच हलक्या फुलक्या मनोरंजनाच्या अपेक्षेने जाणार्‍या नाट्यरसिकांसाठी नाही. बुद्धिजीवी विचारवंतांनाही नाटकातून खूप काही हाती लागेल असे नाही. लेखकाला भावलेल्या, त्याच्या कल्पनेतून साकारलेल्या इंदिरेची ही वास्तवावर आधारित हृदयस्पर्शी कहाणी आहे एवढेच म्हणू शकेन!

नाटकाच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा आणि एवढे दर्जेदार नाटक समोर आणण्यासाठी मेहनत घेणार्‍या सर्वांचेच हार्दिक अभिनंदन!!