'फिर जिंदगी’- Phir Zindagi - संपूर्ण चित्रपट

Submitted by Admin-team on 4 December, 2015 - 20:53

अवयवदानाच्या प्रक्रियेत सर्व संबंधित व्यक्ती, रुग्णालय व संस्था यांच्यांत समन्वय साधण्याचं, रुग्णांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करण्याचं, गरजू रुग्णांच्या याद्या अद्ययावत करण्याचं, जो अवयव देणार त्याच्या आणि ज्याला अवयव मिळणार आहेत त्याच्या नातेवाइकांना सर्व प्रकारची मदत करण्याचं, अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचं काम करते झेडटीसीसी, म्हणजे झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी. ही एक सरकारमान्य, पण बिगर-सरकारी अशी कमिटी आहे.

अवयवदानाविषयी समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या हेतूनं झेडटीसीसीच्या पुणे विभागानं प्राज फाऊंडेशनच्या सहकार्यानं 'फिर जिंदगी...' या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हा संपूर्ण चित्रपट आपण इथे बघू शकता -

***

आपल्या देशात दरवर्षी लाखो रुग्ण अवयव निकामी झाल्यानं आजारी पडतात किंवा मृत्यूला सामोरे जातात. मृत्यूवर अजून आपण विजय मिळवला नसला, तरी वैद्यकीय क्षेत्रातल्या नवनव्या संशोधनांमुळे संबंधित व्यक्तीच्या अवयवांना पर्याय म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातले अवयव काढून त्यांचं प्रत्यारोपण करता येणं आज शक्य झाले आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात लोकांचे प्राण वाचू शकतात. मात्र भारतात दुर्दैवानं अवयवदात्यांचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. भारतातल्या लाखो रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासत असली, तरी अवयवदानाबाबत फारशी जनजागृती नसल्यानं गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळू शकत नाही. अवयवदान-चळवळीबद्दल भारतात सामाजिक, आर्थिक, धार्मिक कारणांमुळे सामाजिक जागृती करणं अतिशय कठीण असल्यानं अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

एखादा ‘ब्रेन-डेड‘ झालेला रुग्ण किडनी, डोळे, यकृत, हृदय, फुफ्फुसं, त्वचा दान करू शकतो, अवयवदान नक्की कोणाला करता येतं, 'ब्रेन-डेड' असणं म्हणजे काय, अवयवदानाची नक्की प्रक्रिया कशी, अवयवदानामुळे नक्की योग्य त्या व्यक्तीला मदत मिळते का, असे अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांच्या मनांत असतात. जोडीला असतात अंधश्रद्धा, गैरसमज आणि मर्गदर्शनाचा अभाव. हा चित्रपट आपल्या काही शंका दूर करण्यास मदत करेल, अशी आशा आहे.

6Standy copy.jpg

आपल्या सर्व शंकांचं निरसन आणि अवयवदानासाठी मदत यांसाठी झेडटीसीसीशी आपण संपर्क साधू शकता.

http://www.ztccpune.com/

http://donatelifeindia.org/the-network/donate-life-maharashtra/ztcc-mumbai/

***

हा चित्रपट मायबोली.कॉमवर प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्याबद्दल प्राज फाऊंडेशन, झेडटीसीसी व विचित्र निर्मिती (श्रीमती सुमित्रा भावे - श्री. सुनील सुकथनकर) यांचे मनःपूर्वक आभार.

***

'फिर जिंदगी' हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, अशी इच्छा आहे. हा चित्रपट यापुढे 'मायबोली'वर कायम उपलब्ध असेल. आपण या पानाचा दुवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी आपल्याला विनंती आहे.

***

फिर जिंदगी

निर्मिती - प्राज फाऊंडेशन व झेडटीसीसी (पुणे विभाग)
दिग्दर्शन व संकलन - सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर
कथा, पटकथा, संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - धनंजय कुलकर्णी
संगीत - साकेत कानेटकर
कविता - सुनील सुकथनकर
ध्वनिलेखन - गणेश फुके
कलादिग्दर्शन - संतोष सांखद
वेशभूषा - योगिनी कुलकर्णी
रंगभूषा - आशीष देशपांडे
दिग्दर्शन साहाय्य - वरुण नार्वेकर, तुषार गुंजाळ

कलाकार - रत्ना पाठक शाह, नासीरुद्दीन शाह, नीरज काबी, विक्रम गोखले, उत्तरा बावकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, ग्यानप्रकाश, डॉ. शेखर कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, पर्ण पेठे, अलोक राजवाडे, कृतिका देव आणि सिद्धार्थ मेनन

***

यापुढेही असेच उत्तमोत्तम चित्रपट बघण्यासाठी ’मायबोली.कॉम’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

www.youtube.com/maayboli

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेरणादायक चित्रपट!!! अतिशय संयतपणे हाताळलेला आहे हा नाजूक विषय.
इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोली टीम चे आभार!

khup mast movie Thanx maayboli

मध्यंतरी असे वाचनात आले की एका स्त्रीला पतीचे अवयव दान करयचे होते पण पोलिस स्टेशन मध्ये ह्याचा अवेअर नेस नसल्याने डेथ कुठे झाली कोण त्या पोलिस स्टेशन च्या ज्युरिस्डिक्षन खाली झाली ह्यात पोलिसांनी वेळ वाया घालवला व त्यात अवयव दानाला योग्य राहिले नाहीत. पोलिसांना पण काही माहिती देण्याची गरज आहे.

Pages