ठहरने को बोला है

Submitted by स्वीट टॉकर on 4 December, 2015 - 01:49

साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं.

माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन मि.मि. व्यासाच्या. त्यामुळे सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं. सिक्यूरिटीवाला सहा फूट उंच आणि सहा फूट रुंद जाट होता. मी त्याच्या तुलनेत अर्धा. मी त्या 'स्पेशल व्यायामाच्या आहेत' असं सांगितल्यावर तो हसला. ‘उपहासानी’ असं मला तेव्हां वाटलं. पण बहुदा तसं काही नसणार. असो.

“व्यायाम करके दिखाओगे?” असं मला विचारल्यावर मी मानेनीच “नाही” असं दर्शवलं. वजनं दाखवायला बॅग उघडली होती तेव्हां त्यानी माझा युनिफॉर्म आणि ऍप्लेट्स बघितल्याच होत्या. बहुदा त्यामुळेच जास्त वाद न घालता त्यानी मला सोडलं.

सहप्रवाशांप्रमाणेच डिपार्चर गेटच्या जवळपासच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. थोड्या वेळानी माझ्या नावाची घोषणा झाली. “कृपया एअरलाईन स्टाफला भेटावे.” गेटपाशीच एक सुंदरी चार्ट न्याहाळत होती. तिला भेटलो. तिनी मला तिथेच ताटकळंत ठेवलं.

मोबाइल फोनस् च्या आधीचा हा काळ. तेव्हां फक्त डुलकी लागलेल्यांच्याच माना खाली असायच्या. बाकी जवळ जवळ प्रत्येक जण नजरेनी चांभारचौकशा करायला मोकळा असायचा. एक सिक्यूरिटीचा मनुष्य आला आणि मला घेऊन गेला. डोळ्यांच्या दोनशे जोड्यांनी आम्हाला दरवाज्यापर्यंत पोहोचवलं. मला का बोलावलं आहे असं त्याला विचारावं असा मध्यमवर्गीय विचार डोक्यात आला पण प्रयत्नानी जीभ आवरली. बहुदा त्या सहा बाय सहा शिपायानी काहीतरी काडी केली असणार.

त्याचा बॉस म्हणजे एक बाई अधिकारी होत्या. त्यांच्या ऑफिसच्या दारात माझी बॅग होती. प्रश्नोत्तरं झाली. ती वजनं पायाला बांधून काय व्यायाम केले जातात ते मी त्यांना दाखवलं. त्यांनी मला ती वजनं जमिनीवर ठेवून त्यांच्यावर उभं राहायला सांगितलं. मी ते करून दाखवलं. त्यांचं समाधान झाल्यावर आता त्याची एन्ट्री एका अधिकृत रजिस्टरमध्ये करणं जरूर होतं. त्यात “या वस्तूचं नाव काय लिहू?” असं त्यांनी मलाच विचारल्यावर मी म्हटलं, “Weight for Exercise” असं लिहा. “एस्गरसाइज?” असं त्यांनी विचारल्यामुळे माझ्या मनात आलं की बहुदा ‘Exercise’ च्या स्पेलिंगचा त्या राडा करणार. म्हणून मी ‘फिटनेस’ हा शब्द सुचवला. तो त्यांना पसंत पडला आणि माझी सुटका झाली.

परत गेटपाशी आलो. तासाभरानी बोर्डिंगची वेळ आली पण बोर्डिंग काही होईना. पण या उशीराचा आपल्याशी काही संबंध आहे असं मला वाटायचं काहीच कारण नव्हतं. पण संबंध होता. मला पुन्हा बोलावणं आलं. आता मी कोण हे माहीत असल्यामुळे घोषणा देण्याची जरूर नव्हती. सुंदरी जातीने माझ्याकडे आली आणि मला घेऊन एरोड्रोम मॅनेजरच्या ऑफिसकडे निघाली. आता मात्र सगळे दोनशेच्या दोनशे डोळेजोड माझ्यावर आळ घेत होते. कनेक्टिंग फ्लाइट जर का चुकली तर कोण जबाबदार हे त्यांना पक्कं ठाऊक झालं होतं. पुन्हा कोपर्यापर्यंत डोळ्यांची सोबत होती. एकदाचं दृष्टीआड झाल्यावर मला बरं वाटलं.

एरोड्रोम मॅनेजरच्या ऑफिसबाहेर पुन्हा माझी बॅग हजर असणार असा माझा कयास. पण नव्हती. जरा हायसं वाटून मी आत शिरलो. एअरलाइनचा अधिकारी आणि एरोड्रोम मॅनेजर वाद घालत होते.

“मैं नही छोड सकता सर जी!” एरोड्रोम मॅनेजर.

“बॅगके फिटनेसकी बात कर रही है मॅडम। हवाइ जहाजके नही। पॅसेंजर और लगेजको डीप्लेन कर देते हैं। फिर छोड दो फ्लाइटको।” एअरलाइनचा अधिकारी.

मी चरकलो. मला आणि माझ्या सामानाला डीप्लेन करण्याबद्दल चाललंय की काय?

“मगर मेरी जिम्मेदारी है।” एरोड्रोम मॅनेजर.

“जब कुछ रोकनेका होता है तभी जिम्मेदारी होती है आपकी। कुछ करनेका होता है तो जिम्मेदारी नही लेते।” प्रत्येक मतभेदाप्रमाणे याला देखील इतिहास असणार. “लो. ये साहब आ गये।” एअरलाइनचा अधिकारी. हे शेवटचं वाक्य माझ्याकडे बघून.

“इनका क्या है? इनकी बॅग तो क्लियर है। फिटनेस सर्टिफिकेट दिखाओ और ले जाओ अपना हवाई जहाज.” एरोड्रोम मॅनेजर.

मला त्यांच्या बोलण्यात कसलाच संदर्भ लागत नव्हता. माझी बॅग क्लियर आहे असं जरी तो म्हणाला असला तरीपण जे काय चाललं आहे ते आपल्यासाठी चांगलं नाही याची खात्री होती. मात्र ‘फिटनेस’ हा शब्द ऐकल्यावर माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडू लागला. प्रत्येक बोटीला तसंच विमानाला सुद्धा पुनःपुन्हा चाचण्यातनं जायला लागतं. बोट seaworthy आहे ना आणि विमान airworthy आहे ना यासाठी विविध चाचण्या असतात आणि त्या सर्टिफिकेटला Certificate of Fitness असं देखील म्हटलं जातं. विमानाच्या फिटनेसची माझ्या फिटनेसशी काहीतरी गफलत झाली असणार असं मला वाटलं. म्हणून मी त्यांना सांगितलं की मी बोटीवर नोकरी करंत असल्यामुळे मला Certificate of Fitness ची काही माहिती आहे. तर काय झालंय ते मला सांगता का? एरोड्रोम मॅनेजरने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून दुर्लक्ष केलं. बुडत्याला काडीचा आधार. एअरलाइनच्या अधिकार्याला मिळेल ती मदत पाहिजेच होती. त्यानी मला समस्या सांगितली.

“यहां की जो सिक्यूरिटी-इन-चार्ज मॅडम है उन्होने सिक्यूरिटी रजिस्टरमें रिमार्क लिखा है की ‘फिटनेस सर्टिफिकेट के लिये रोक लो।’ अब सिक्यूरिटीके लोगोंको ‘Certificate of Fitness’ मांगने का कोई हक नही है। मगर मॅनेजर मानते नही। मॅडम जब तक घर नही पहुचेंगी तब तक हम उनके साथ संपर्क भी नही कर सकते।”

मी रजिस्टरमधली एन्ट्री वाचली आणि हसायलाच लागलो. त्यांना चूक समजावल्यावर एक मिनिटात प्रश्न सुटला.

काय होती ती एन्ट्री?

Weight for Fitness ऐवजी बाईंनी लिहिलं होतं Wait for Fitness!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबबब... केव्हडा तो घोळ....
>>>>> डोळ्यांच्या दोनशे जोड्यांनी आम्हाला दरवाज्यापर्यंत पोहोचवलं>>>>> Biggrin

भारी आहे. Happy
मोबाइल फोनस् च्या आधीचा हा काळ. तेव्हां फक्त डुलकी लागलेल्यांच्याच माना खाली असायच्या. >>>> हे आवडलं.

सर्व प्रतिसादकर,
धन्यवाद!

स्पेलिंग चुकलेल्याला खरं तर मी अजिबात दोष देत नाही. ती भाषाच इतकी मठ्ठ आहे ! काहीतरी जरूर होती का त्याच उच्चाराचे दोन वेगवेगळे शब्द बनविण्याची ?

Pages