बाहेर पडतेय...

Submitted by भुईकमळ on 2 December, 2015 - 13:06

बाहेर पडतेय
त्या शब्दांच्या आराशीतून
शोधण्यासाठी एक निवांत कोपरा
जिथे फिरकत नाहीत पुन्हा
भुतकाळाचे कवडसे
ओरखडायला वर्तमानाचा
काळोखथंड अंतर्गाभा…

विकलेयत कवडीमोल भावात
कवितांचे कागद की काळजाचे तुकडे
ज्यांच्या सावल्या
पेट घेतात विव्हळ अश्रुंनी
रात्र उत्तरोत्तर गडद होताना,
आता पडत नाही फरक फारसा
मेणबत्ती अर्ध्यातच विझताना...

घरंगळतेय शिशीरस्नात अरण्यात
पाचोळा होऊन
की यायला नकोत दुरुनही वेढायला
तो दरवळ मायावी शब्दांचा ,
मी ठेवलंय पुरून श्वासांना
थडग्याखाली निर्माल्याच्या ….

चाललेय तरळत
पाणकणसाच्या मुठीतून निसटत्या
पंखफुटल्या बीजासारखी
हल्लख होत अधांतरात
अनोळखी जलाशयाच्या काठी
की नव्या जन्माच्या शोधात ?…

................ माणिक वांगडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समाधानी ,धन्यवाद प्रतिसादासाठी ...
kapoche तुमच्या सारख्या लेखकाची दाद इथे खुप मोलाची आहे.
बी, किती भरभरून मनमोकळी प्रतिक्रिया…ती वाचून मीच माझ्या पाठीवर थोपटून म्हणतेय ,.पुलेशु !

>>>विकलेयत कवडीमोल भावात
कवितांचे कागद की काळजाचे तुकडे
ज्यांच्या सावल्या
पेट घेतात विव्हळ अश्रुंनी<<<

आणि

>>>चाललेय तरळत
पाणकणसाच्या मुठीतून निसटत्या
पंखफुटल्या बीजासारखी
हल्लख होत अधांतरात
अनोळखी जलाशयाच्या काठी
की नव्या जन्माच्या शोधात ?…<<<

फार आवडले.

rmd धन्यवाद ! तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया नव्या लिखाणासाठी हुरुप वाढवणारया आहेत .

आता पडत नाही फरक फारसा
मेणबत्ती अर्ध्यातच विझताना... >> थबकलोच इथे... सुंदर जमून आलिये