उद्दामपणा

Submitted by बेफ़िकीर on 2 December, 2015 - 05:50

राजेश कुलकर्णींच्या ह्या धाग्यामुळे काही इतर आठवणी ताज्या झाल्या.

http://www.maayboli.com/node/56607

त्या धाग्याचा आणि ह्या आठवणींमधील घटनांचा संबंध मुळीच नाही, पण आठवणी आल्या इतकेच.
==========

कोल्हापूरमध्ये तीन चार सरकार घराणी आहेत. सरकार म्हणजे त्या घराण्याच्या आडनावापुढे सरकार हा शब्द वापरून उल्लेख केला जातो. ह्याचे कारण पूर्वी ते घराणे राज्यकारभाराशी संबंधीत होते / असावे. कोल्हापूरमधील मायबोलीकर ह्याबाबत अधिक सांगू शकतील.

एका सरकार घराण्यात सर्व पुरुष निर्व्यसनी आहेत. धार्मिकही आहेत. मात्र अतिशय उद्दाम आहेत. विशेषतः स्त्रिया व तरुण मुली तर अतिशयच उद्दाम आहेत. घरात राबणार्‍या नोकरांना अतिशय घालून पाडून बोलतात. त्यांच्या वयाचा मुलाहिजा बाळगत नाहीत आणि श्रमांची किंमत ठेवत नाहीत.

संपूर्ण घर, अगदी आढ्यासकट, रोज साफ करावे लागते. घरातील सर्व चपला रोजच्या रोज स्वच्छ कराव्या लागतात. घरातील कोणीही बाथरूमला एकदा जाऊन आला की त्वरीत संपूर्ण बाथरूम साफ करून घ्यावी लागते. अनेकांना हे श्रम सोसत नाहीत. पण घाबरून आणि रोजीरोटी म्हणून बिचारे राबत राहतात.

मुलींच्या व महिलांच्या सौंदर्योपचारासाठी बाहेरून पार्लरचालिका येतात. त्या येण्यापूर्वी अगदी वॅक्सिंगसारख्या उपचारांसाठीचीही तयारी एका प्रौढ पुरुषाला करायला सांगितली जाते. त्यात काही चूक झाली तर जोरजोरात खेकसतात. एकदा तेल थोडे जास्त गरम झाले म्हणून संतापून त्या तेलाचे भांडे तेल गरम करणार्‍या म्हातार्‍या बाईच्याच अंगावर उपडे केले. किती भाजते ते तिला कळावे म्हणून! महिला आणि मुलींच्या स्नानापूर्वीची तयारीसुद्धा पुरुषांना करायला लावली जाते. प्रश्न तयारी कोणाला करायला सांगितली जाते हा नसून ह्या विषयात मुळात पुरुषांना समाविष्ट केल्यानंतर त्यांना शिव्या द्यायच्या संधी आपोआपच अधिक मिळतात ह्याचा आहे. अपमान सहन करून सगळे राहत असतात.

============

तांडुर ह्या आंध्रप्रदेशातील एका शहरात एक जैन कुटुंबीय आहेत ज्यांच्या घरी मी गेलो होतो. काम कंपनीचे होते पण त्या मनुष्याचे मुख्य ऑफिस घरात होते. तो एक अजस्त्र बंगला होता. मी काही कारणाने बाहेर उभा असताना वरून टेरेसवरून एक तरुण मुलगी खाली कुठेतरी असलेल्या नोकराला जोरजोरात हाक मारत आली. तिच्या हातात कपड्यांचा प्रचंड ढीग होता. तो ढीग तिला त्या नोकराकडे वरून फेकायचा होता. पण नोकर व्यवस्थित खाली येईपर्यंत थांबणे हा तिला अपमान वाटला. तिने हाक मारल्याक्षणी तो तिथे नव्हता पण धावत येत होता हे पाहून तिने तसाच तो ढीग त्याच्या अंगावर फेकला आणि म्हणाली की हे कपडे धोब्याकडे दे. अर्थातच त्याला पळता पळता तो ढीग व्यवस्थितपणे झेलणे जमलेच नाही आणि बरेचसे कपडे खाली पडले. ते पाहून तिने त्याचा प्रचंड उद्दामपणे पाणउतारा केला. नीट झेलता येत नाही का, ज्या कपड्यांना माती लागली आहे ते तूच धू, हाक मारल्याक्षणी येता येत नाही का वगैरे! मी ज्याच्याकडे गेलो होतो त्याची मुलगी होती ती!

============

एकदा ट्रेनमध्ये चार बायका प्रवास करत होत्या. त्यातील एक स्त्री, सुमारे पंचविशीची, अतिशय वेल टू डू घरातील वाटत होती. इतर तीन स्त्रिया तिच्या नोकर होत्या हेही त्यांच्या वर्तनावरून समजत होते. त्या स्त्रीला ट्रेनमध्ये अक्षरशः हातही हलवावा लागू नये ह्यासाठी त्या तिघी जिवाचे रान करत होत्या. तिने वारा लागल्यामुळे पदर खांद्यावर ओढून घेतला की लगेच बॅगमधून शाल काढून तिच्यापुढे धरली जात होती. तिने शाल पाहिल्यावर त्या नोकर स्त्रीला कोणत्यातरी अगम्य भाषेत शिव्या दिल्या. का ते समजले नाही. पण त्या नोकर स्त्रीने घाबरून पटकन शाल आत ठेवली. मधेच एका स्त्रीने त्या मुख्य स्त्रीच्या पायात मोजे घालून दिले. काही वेळाने त्या बाईला झोप आली तेव्हा तिने बाकावरून तिघींपैकी दोघींना उठवले आणि मगाशी जिला शालीवरून शिव्या दिल्या होत्या तिला एका कोपर्‍यात बसायला सांगितले. ती तशी बसताच ही तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपली. कोणीतरी तिच्या अंगावर पांघरून पसरले. जिच्या मांडीवर ती डोके ठेवून झोपली होती तिला इतकी धन्यता वाटत होती की देवाची प्रचीती आल्यासारखा तिचा चेहरा समाधानी झाला होता. जणू बाईसाहेब आपली मगाचची चूक विसरल्या आणि डोके ठेवायला तिघींपैकी नेमकी आपलीच मांडी निवडली. बाकीच्या दोघी बराच वेळ उभ्याच होत्या. बोलत कोणीच कोनाशी नव्हते. उद्दामपणाचे प्रमाण ह्या घटनेत वरच्या घटनांइतके नव्हते पण तरी ते जाणवत राहिलेच.

=================

वडिलांच्या काळापासून असलेल्या एका म्हातार्‍या नोकराची येता जाता अक्कल काढणारा एक व्यावसायिक दिल्लीला पाहायला मिळाला. दिल्लीला तर नोकर म्हणजे अक्षरशः गुलाम असल्याप्रमाणे वागवले जातात. प्रत्येक वाक्यात अपमानकारक शब्दांची पेरणी हमखास असते.

=================

ही काही उदाहरणे! कोणाच्या अनुभवात अशी उदाहरणे असल्यास कृपया नोंदवावीत. वरील उदाहरणांबद्दल काही म्हणायचे असल्यासही म्हणावे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालकशाही दुसरे काय! डोक्यात जातात अशी लोक. + १
आता या धाग्यावर पुन्हा येणार नाही मी कारण असे काही वाचले, ऐकले, पाहिले तर खुप त्रास होतो आणि संताप होत राहतो जिवाचा.

अशी कैक उदाहरणे नित्य बघायला मिळतात. हल्ली तर नवश्रीमंताच्या शेंबड्या पोरांमधेही हा उद्दामपणा दिसुन येतो.

उदाहरणे संतापजनक आहेत.
सगळ्यांना पुण्यातल्या कामवाल्या आणि त्या वागणे पसंत न पडून सोडून गेल्यास सर्व कामे स्वतः करण्याची शिक्षा दिली जावी.

हा 'उद्दामपणा' नसेल कदाचित, पण अत्यंत खटकणारी गोष्ट आहे. माझे एक नातेवाईक पहायला गेलं तर अतिशय धार्मिक, रोज पूजाअर्चा करणारे, भविष्य बघतात, पण सर्रास खोटं बोलतात, स्वतःच्या तरूण मुलीसमोर 'भकारी' शिव्या देऊन बोलतात.

आमचे एक नातेवाईक पुण्यातल्या एका कॉलेजात प्रोफेसर आहेत. त्यांच्याच विभागात एक अतिशय गरिबीतून आणि हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले दुसरे एक प्रोफेसर आहेत. ते निम्न सामाजिक स्तरातूनवर आलेले, स्वतःची प्रगती करुन घेतलेली आहे, याचे कौतुकच आहे, पण ते त्यांच्याकडे येणार्‍या चांगल्या सुसंस्कृत घरातील विद्यार्थ्यांना अतिशय घालून पाडून बोलत असतात. "तुम्हाला काय, सगळं आयतं मिळतंय तर माज आलाय", "तुम्ही काय जन्मजात विद्वान, तुम्हाला काय गरज आहे अमुकतमुकची", वगैरे मुक्ताफळे उधळली जातात. अरे तुम्ही आलात खालच्या स्तरावरुन वर, गरिबीतून सुस्थितीत, पण मग पुढे काय केलंत? उठसूठ विद्यार्थ्यांचा असा अपमान? किती दिवस तुमच्या या वर येण्याच्या कर्तृत्वाला गोंजारत माज करणार आहात?

त्यातले मोजके काही विद्यार्थी तर सांपत्तिक स्थितीने असे आहेत की यांच्यासारख्या छप्पन्न प्रोफेसरांना विकत घेतील हसत हसत. तरी शिक्षकांना उलटून बोलू नये हे संस्कार झालेले असल्याने गप्प असतात.

शेवटी संस्कारच महत्वाचे. ते माणसासारखं वागायला शिकवतात.

चला ह्या धाग्यालाही नेहमीच्या वळणावर नेण्याकरता..
शाखाने वानखेडेवर गार्ड बरोबर केला तो उद्दमपणा म्हणता येइल का?
(फॉर अ चेंज, रुन्म्या बाळाचा प्रत्येक धाग्यावर शाखा आणण्याचा काम आज म्या करतु)

गरीब आहे किंवा सामाजिक दर्जामध्ये आपल्या खाली आहे म्हणून एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याची आपल्याला संपूर्णपणे मुभा आहे अशी प्रवृत्ती सर्रास सगळीकडे आढळते. घरातील कामवाल्या बायकांचा, वाहनचालकांचा, हॉटेलमधील वेटर्सचा असा अपमान करताना खूप लोक दिसतात. अतिशय हीन प्रवृत्ती किंवा स्वतःची फ्रस्ट्रेशन्स दुसर्‍यावर (जे उत्तर देउ शकत नाहीत) काढण्याचा हा प्रकार आहे. अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे कोणीतरी भेटले पाहिजे असे मला नेहेमी वाटते.

प्रश्न गरीब किंवा श्रीमंत असण्याचा नाही, वृत्तीचा आहे. कामवाल्या आणि काम करून घेणारे दोन्ही वेळप्रसंगी आलटून पालटून उद्दाम असतात.

लोकांना पाणी नाही मिळाले तर काय झाले मी नळ चालू ठेवणारच, लिकेजेस काढणार नाही, सांगायला गेल्यास भांडणच काढतात असे घरमालक तर अनेक सापडतात.

अभिनेत्री मुमताज पण यातलीच. स्वयंपाकघरातील बरण्यावर खुणा करून ठेवते. Happy
नोकरांनी दोन सेकंदात समोर हजर झाले पाहिजे असाच तोरा असतो.

उद्दामपणा दोन्ही बाजुला दिसुन येतो.

कोल्हापूरमधील सरकार घराण्यातील इतकी आतली माहिती तुम्हाला कशी? म्हणजे तुम्ही रीलेटेड आहात काय? कारण अगदी स्त्रीयांबद्दल पार्लर वै लिहिलंय म्हणुन विचारतेय. कृगैन.

<<<<<<<<राजेश कुलकर्णींच्या ह्या धाग्यामुळे काही इतर आठवणी ताज्या झाल्या. >>>>>>>>>

बेफी - राकूं चे साम्य तुम्हाला नक्की कोणाशी दिसले, कोल्हापुरच्या सरकार स्त्रीयांशी का त्या तांडुर मधल्या जैन मुलीशी?

सस्मित,

काही कनेक्शन्समधून समजले. कोल्हापूरला अनेक नातेवाईक व मित्र आहेत.

======

टोचा,

त्या धाग्यावरून केवळ ह्या कोल्हापूरच्या प्रकाराची आठवण झाली आणि मग सिमिलर उदाहरणे आठवली इतकेच. त्या आणि ह्या धाग्याचा संबंध काहीच नाही (असे धाग्यातही लिहिलेले आहेच).