सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . .

Submitted by मार्गी on 1 December, 2015 - 02:39

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

शहरामधील सायकलिंग. . .

१९ ऑक्टोबरला ६३ किलोमीटर सायकल चालवली व पायी पायीही बरंच चाललो होतो. मोठ्या राईडनंतर नेहमी येणारा अनुभव म्हणजे पुढच्या राईडची इच्छाच जाते. मोठ्या राईडमध्ये शरीराबरोबरच मनही थकतं. त्यामुळे लगेच मोठी राईड झाली नाही. त्यानंतर काही दिवस परत गॅप पडली. कोणत्याही गोष्टीमध्ये असंच होत असतं. उदा., व्यायाम- आपण काही दिवस नियमित करतो. मग अचानक लय तुटते. काही दिवस गॅप पडतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने असं होतं.

अशा वेळेस आपलं काम आहे की, जर गॅप पडत असेल, तर येवो, पण आपण आपला प्रयत्न चालू ठेवावा. म्हणून गॅप पडली तरी सायकलिंग सुरू ठेवलं. छोट्या छोट्या राईड चालू ठेवल्या. पण दररोज चालवाता आली नाही. दररोज चालवण्यातली मोठी अडचण म्हणजे जवळपासचे सगळे रस्ते फिरून झाले आहेत. आता परत त्याच त्या रस्त्यावर फिरण्यात मजा येत नाही. खरी मजा तर रस्त्यांमध्ये नसून सायकलिंगमध्येच असते, हे तोपर्यंत कळलेलं नव्हतं! आणि दुसरी अडचण हीसुद्धा होती की पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये चालवणं अवघड वाटायचं. अगदी सकाळचा थोडा वेळ सोडला तर इतर वेळेस सर्वत्र ट्रॅफिक. आणि जशी गॅप मोठी होत जाते, सायकलवर राईड करणं कठिण होत जातं. मन तयारच होत नाही. त्यामुळे काही दिवस सायकल तशीच उभी राहिली. जेमतेम एक- दोन किलोमीटर चालवायचो. थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे उठणंही जीवावर यायचं.

ह्या काळात इंटरनेटवरचे सायकलस्वारांचे अनुभव वाचणं सुरू राहिलं. त्यातून प्रेरणा मिळत राहिली. जेव्हा राहावलं नाही, तेव्हा सायकल पुन: काढली. पुण्यामध्ये कामासाठी फिरताना सायकल वापरली. आणि हा अनुभव मस्त आला. पुण्याच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सायकल चालवली. डिएसके- धायरीपासून विश्रांतवाडीपर्यंत. आधी जेव्हा नॅशनल हायवेवर सायकल चालवली होती, तेव्हा लॅपटॉप व सामान सोबत नेण्याचा अनुभव होताच. ह्या वेळेसही सामान घेऊन सायकल चालवली. वीस किलोपर्यंत वजन होतं. गमतीची गोष्ट म्हणजे अशी शहरी राईड- जाऊन- येऊन पन्नास किलोमीटर झाली व तीसुद्धा सहज! वीस किलो वजन घेऊनही डिएसकेचा चढ चढता आला. आणखी गंमत म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने गेलो असतो, तर जितका वेळ लागला असता, तितकाच किंवा थोडा कमी वेळ ह्या प्रवासात लागला! आणि ट्रॅफिकमध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना बाईकप्रमाणे सायकलही सरसर पुढे नेण्याचा आनंद घेता आला. आणि शहरामध्ये सायकलिंग करताना थोडं वेगळ्या प्रकारचं नैसर्गिक सौंदर्यही बघायला मिळतं ते वेगळंच!

आता सायकल चालवणं इतकं सोपं झालंय की, जवळ जवळ कुठेही चालवू शकतो. मागच्या राईडमध्ये झालं तसं जिथे सायकल चालवणं कठिण असेल, तिथे पायी पायीसुद्धा बरंच अंतर जाता येऊ शकतं. पुण्यामध्ये अशा तीन राईड झाल्या. त्यात दोन अर्धशतक झाले. आता अर्धशतक खूप सोपं झालं आहे. अर्धशतक एफर्टलेस वाटत आहे. पण मध्ये मध्ये गॅप पडल्यामुळे थोडा त्रास होतो. आणि अर्थातच दुस-या शतकाची प्रतीक्षासुद्धा आहे!

डिसेंबरमध्ये पानशेत डॅमच्या रस्त्यावर आणखी एक राईड केली. एक आठवड्याच्या गॅपनंतर करत असल्यामुळे पन्नास किलोमीटरचंच लक्ष्य ठेवलं. जाताना काहीच अडचण आली नाही. दिड तासामध्ये पंचवीस किलोमीटर गेलो. पण येताना हाल झाले. त्याच पंचवीस किलोमीटरसाठी जवळजवळ तीन तास लागले. हा एका प्रकारचा rustiness होता| कारण मी नियमित प्रकारे सायकलिंग करत नाहीय. एक मोठी राईड व मग आठ- दहा दिवसांची गॅप. एका राईडने शरीराला जो टेंपो आणि मूमेंटम मिळतो, तो इतक्या दिवसांमध्ये निघून जातो. त्याचं फळ भोगावं लागलं. फक्त ५१ किलोमीटरच्या राईडसाठी पाच तास लागले. योगायोगाने ह्या राईडसह पहिलं सहस्रक- १००० किलोमीटर पूर्ण झाले.

अजूनही मोठ्या राईडस तितक्या सहजतेने जमत नाही आहेत. आणि जितक्या नियमित प्रकारे करायला हव्यात, तितक्या करता येत नाही आहेत. हे थोडं गमतीचं गणित आहे. असं आहे- आपण जितक्या मोठ्या राईडस करतो, तितक्या त्या सोप्या होतात. पण त्यासाठी किमान पहिल्या पाच- सहा राईडस अशाच- कठिण- कराव्या लागतात व त्याचा ताण पडतो! त्यातून बाहेर पडणं कठिण जातं. पण मी प्रयत्न सुरू ठेवेन. केवळ पाच महिन्यांमध्ये १००० किलोमीटर पूर्ण झाले. बघताना हे छान वाटतं. पण खरी गोष्ट अशी आहे की, ह्या पाच महिन्यांमध्ये मी फक्त २० दिवस राईडस केल्या (१० किलोमीटरपेक्षा कमी राईडस मोजल्या नाहीत). म्हणजे एकशे पन्नास दिवसांमध्ये फक्त वीस दिवस! त्यामुळे सुधारणेला प्रचंड वाव आहे.

चांगली एक गोष्ट अशी आहे की, अनियमित प्रकारेच पण योग- प्राणायाम करतोय. त्याशिवाय छोट्या १०० उड्या आणि मोठ्या १५ उड्या सुरू केल्या आहेत व त्यामुळे आत्ताच्या राईडनंतर पाय जड झाले नाहीत- जे आधी नेहमी व्हायचे. त्याशिवाय आणखीही बरंच करायचं आहे- रनिंग किंवा स्विमिंग. त्यामुळेही सायकलिंगला बळकटी मिळेल. ह्या सर्व गोष्टी सायकलिंगला पूरक आहेत. शरीर आणखी मजबूत होतं. नोव्हेंबरच्या शेवटी एक अर्धशतक आणि डिसेंबरच्या सुरुवातीला दोन अर्धशतकांनंतर परत सायकल थांबली. चालवायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे २०१३ वर्षातलं सायकलिंग इथेच थांबलं.


पानशेत रोडवरचं दृश्य

अनेकदा आपण अशी चूक करतो. जर आपलं टारगेट ४० मिनिट व्यायाम असेल, तर आपण एक तर ४० मिनिट व्यायाम करतो किंवा मग करतच नाही. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी! Happy किंवा दहा सूर्यनमस्कार. करेन तर दहा नाही तर एकही नाही. मी हीच चूक करत होतो. खरं तर दृष्टीकोन असा हवा- चला, चाळीस मिनिट व्यायाम करता आला नाही, तर किमान वीस मिनिट तरी करू. तेही जमत नसेल तर दहा मिनिट प्राणायाम तरी करू. किंवा जर सायकलची मोठी राईड होत नसेल, तर दहा किलोमीटर तरी करू. पण मन छोट्या गोष्टीने संतुष्ट होत नाही आणि मोठ्या गोष्टींसाठी अडतं! असो. २०१३ वर्ष संपताना सायकलच्या विश्वाचं दार किलकिलं झालं आहे!

पुढील भाग ८: सिंहगड राउंड २!

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> अनेकदा आपण अशी चूक करतो. जर आपलं टारगेट ४० मिनिट व्यायाम असेल, तर आपण एक तर ४० मिनिट व्यायाम करतो किंवा मग करतच नाही. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी! स्मित किंवा दहा सूर्यनमस्कार. करेन तर दहा नाही तर एकही नाही <<<<
अगदी बरोब्बर........ हेच होत माझही... Sad
त्यातुन भर म्हणुन "एक जमानेमें (१९८०चा सुमार) हम भी क्या थे..... " तेव्हा तितके करत होतो तर आत्ताच काय धाड भरलीये.... आत्ताही तेव्हडेच व्हायला हवे... असा खाक्या, जो मला टाळला पाहिजे.

छान लिहीलय. वाचतोय. फोटोंनी मजा येत्ये.