निसर्ग नियम

Submitted by salgaonkar.anup on 26 November, 2015 - 06:00

गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर "मनुष्यप्राणी" जन्माला घातला. सगळ्या हुशार आणि बुद्धिमान असा हा मनुष्यप्राणी. निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकासाठी केले काही नियम. निसर्गाचा ठेवा जपला जावा आणि निसर्ग सौंदर्य अबाधित राहावं म्हणून हे नियम. मनुष्य, प्राणी, पक्षी यांना जगण्यासाठी जे जे लागेल ते ते सारं निसर्गाकडूनच पुरवलं जायचं. मानवाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांना निसर्गाने निस्वार्थीपणे तथास्तु म्हंटल.
पूर्वी समुद्र किनारी वाळू ऐवजी मीठ पसरलेलं असायचं आणि समुद्राचं पाणीही अगदी अमृतासारखं गोड असायचं. निळाशार तो समुद्र, त्याचं अमृततुल्य पाणी आणि त्या किनारी पसरलेलं शुभ्र मीठ म्हणजे निसर्गाची किमयाच. सजीवांची तहान भागवण्यासाठी याच पाण्याचा सर्वतोपरी वापर होऊ लागला.
मानवाची उत्कांती झाली आणि अन्नाला चव यावी म्हणून तो या मिठाचाही वापर करू लागला. पण, मीठ आणि पाणी वापराचा निसर्ग नियम असा कि, " अन्नाला लागेल तेवढेच मीठ आणि पाणी समुद्रावरून न्यायचे." नियमाचा उद्देश असा कि निसर्गाचा कमीत कमी -हास होईल आणि निसर्ग सौंदर्य जपलं जाईल.
पण जशी जशी बुद्धीची वाढ झाली, तसा हा मानव अहंकारी, लोभी आणि स्वार्थी होऊ लागला. स्वतः च्या स्वार्थासाठी मानवाने हा नियम मोडला. निसर्गाने जशी क्रिया तशीच प्रतिक्रिया दिली. समुद्रकिनाऱ्यावरचे सारे मीठ समुद्रात वाहून गेले आणि उरली ती फक्त वाळू . मीठ पाण्यात विरघळल्यामुळे समुद्राचे पाणी खरट झाले. इतके खारट कि ते पिण्यायोग्यही राहिले नाही. तेव्हापासून समुद्राचं पाणी खारट झालं. आजही खारट झालेलं समुद्राचं पाणी अनेक प्रक्रिया करून आपल्यला पिण्यायोग्य बनवावं लागतंय.
निसर्गाच्या बाबतीत बेसुमार तोडली जाणारी झाडे, त्यामुळे होणारी जमिनीची धूप, वाढणारे तापमान, अपुरा पाऊस, बिघडलेलं निसर्ग चक्र असे एक न अनेक नियम आपण मोडलेत.
निसर्गाला आपण नेहमीच गृहीत धरलंय.निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा आपला प्रयत्न हा त्या निसर्गाचा अपमान आहे. कदाचित म्हणूनच निसर्ग विविध रूपांनी आपल्याला हेच पटवून देत असतो कि आपण या निसर्गाचा भाग म्हणून नगण्य आहोत.
या निसर्गावर विजय मिळवण्याची आपण कल्पना तरी कशी करू शकतो. आपण जर काही करू शकतो तर निसर्गाने दिलेलं हे दान जपू शकतो, निसर्ग नियम पालन करू शकतो आणि त्या अविरत उर्जेसमोर समर्पित होऊ शकतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच वाचली , मटा मध्ये .नाव ओळखीच वाटलं .
अंदाज होता तुम्हीच असावात . पैठणीमुळे नाव लक्षात होत Happy